Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

शिवरकर गटाची नाराजी दूर;पण संताप उफाळून आलाच!
पुणे, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

काँग्रेसचे आमदार बाळासाहेब शिवरकर यांची, तसेच त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यात कलमाडी यांना अखेर यश आले असले, तरी ‘समेटा’साठी आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राग, डावलले जात असल्याची भावना व संतापच उफाळून आला आणि नाराजीचेच दर्शन अधिक घडले. पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आमदार शिवरकर यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते स्वत: तसेच त्यांचे समर्थक नाराज होते. त्यांची नाराजी प्रचार सुरू झाल्यापासूनच दिसत होती. कलमाडी यांच्या प्रचार सभेत ते आतापर्यंत एकदाही गेलेले नाहीत.

सारे काही पाण्यासाठी!
‘‘आज कुठल्या भागात प्रचाराला जायचे आहे. मग तेथील पाण्याची वेळ काय आहे ते पाहा.’’ एक कार्यकर्ता सांगत होता. अनेक ठिकाणी पाणीच येत नाही, तेथे काय करणार, असा सवाल दुसऱ्या कार्यकर्त्यांने केला. त्यामुळेच पाण्याचा विषय हडपसर परिसरात रंगल्याचे स्पष्ट होते आहे. सार्वजनिक नळावर एखाद-दुसरा हंडा मिळत आहे. रात्रीच्या वेळी पाणी येत आहे. मग तुम्ही रात्री पाणी भरून झाल्यावर त्या वेळी प्रचाराला जाणार का, असा उपरोधिक सवालही काही खोडसाळ कार्यकर्त्यांनी केला. तसे नाही रे बुवा!

सहा महिन्यांत पुणे बदलून दाखवीन- बोके
पुणे, ७ एप्रिल/ विशेष प्रतिनिधी

आपल्याला संधी मिळाल्यास सहा महिन्यांत पुणे बदलून दाखवीन, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी पोलीस अधिकारी विक्रम बोके यांनी व्यक्त केला. बोके यांनी आज लोकसत्ता कार्यालयाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. पुण्याची प्रत्येक पातळीवर अधोगती झाली असून हे चित्र बदलण्यासाठी नवीन माणसाला संधी देणे गरजेचे आहे. यंदाची निवडणूक जातीय पातळीवर गेली असून लोकांमध्ये फारसा उत्साहही दिसत नाही. त्यामुळे या वेळी पुण्यातील निकालाचे चित्र नक्कीच बदललेले असेल, असेही ते म्हणाले.

‘डोक्यावर टोपी घाला, ताक प्या, किमान तीन लिटर तरी पाणी प्या’
पुणे, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

‘‘डोक्यावर टोपी घाला, ताक प्या, किमान तीन लिटर तरी पाणी प्यायलेच पाहिजे, मसालेदार पदार्थ खाऊ नका.. रणरणत्या उन्हामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी घरातून बाहेर पडताना व दिवसभर वेळ मिळेल त्यानुसार मोबाईलवर मी या गोष्टी त्यांना आवर्जून सांगते. अगदी खिशात ठेवायला एक कांदाही देते..’’ प्रचाराच्या काळात उन्हापासून बचावाच्या या ‘टिप्स’ अनिल शिरोळे यांना मिळतात ‘होम मिनिस्टर’कडून ! लोकसभेचा मोठा मतदार संघ.. रोजच्या प्रचार फेऱ्या, सभा.. मतदारांच्या गाठीभेटी अन् डोक्यावर रणरणते ऊन, अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्याबाबत अगदी हक्काने शिरोळे यांना ऑर्डर देणाऱ्या या ‘होम मिनिस्टर’ आहेत अर्थातच त्यांच्या पत्नी माधुरीताई! उस्मानाबादच्या निंबाळकरांच्या जहागीरदार घराण्यातील माधुरीताईंना राजकारणाचे बाळकडू त्यांच्या माहेरातूनच मिळाले.

‘गरज सरो काँग्रेस मरो’ हीच राष्ट्रवादीची व्यूहरचना
संपर्कमंत्र्यांसमोर पदाधिकाऱ्यांची गाऱ्हाणी

िपपरी, ७ एप्रिल / प्रतिनिधी

केवळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि निवडणुकांपुरती राष्ट्रवादीकडून काँग्रेसशी युती केली जाते, त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण होत असून ‘गरज सरो वैद्य मरो’ याप्रमाणेच राष्ट्रवादीची व्यूहरचना आहे. कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून विश्वासात घेतले जात नाही, येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू, अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी गाऱ्हाणी मांडत संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यपध्दतीविषयी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आचारसंहिता भंगाचा आढळरावांविरुद्ध गुन्हा
शिरूर, ७ एप्रिल/वार्ताहर

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव व सेनेचे शिरूर शहर प्रमुख संजय देशमुख यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत शिरूर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे शिरूर शहर प्रमुख संजय देशमुख यांनी सेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हे गावभेट दौऱ्याकरिता शिरूर शहरात ३ एप्रिल २००९ रोजी येणार असल्याचे शिरूर पोलीस ठाण्यास अर्जाद्वारे कळविले होते. देशमुख यांनी गावभेट दौऱ्याबाबत अर्ज पोलीस ठाण्यास दिला. परंतु अर्जाप्रमाणे गावभेट दौरा न करता (एमएच १४, एएस ६३०६) जीपमधून प्रचार रथातून खासदार आढळराव व शहरप्रमुख देशमुख यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्याद शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. सदर गुन्ह्य़ाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करीत आहेत.

नोकरीच्या आमिषाद्वारे फसवणूक क रणाऱ्यास अटक, कोठडी
पुणे, ७ एप्रिल / प्रतिनिधी

महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे तीन लाखांना गंडा घालणाऱ्या एका भामटय़ास पोलिसांनी अटक केली असून त्याची नऊ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत. भीमराव दगडू खरात ऊर्फ बाबूजी (वय ५२, रा. नागपूर चाळ) असे भामटय़ाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सुधाकर बालाजी दिघे (वय ५० ,रा. येरवडा) यांनी ही फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २००५ ते आजपर्यंत ही येरवडय़ातील तारकेश्वर मंदिरात घटना घडली होती. दिघे यांच्यासह कमलाकर आणि प्रदीप दिघे यांना पुण्याच्या महापालिकेत कारकुनाची नोकरी लावून देतो, असे आमिष भासविले. त्यानंतर त्यांच्याकडून तीन लाखांचा धनादेश घेतला. मात्र पालिकेचे बनावट लेटरपॅड तयार करून त्याद्वारे प्रतीक्षा यादीत नाव असल्याचे भासवून नोकरी लावली नाही आणि त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी पोलिसांनी खरात या भामटय़ाला अटक करून न्यायालयात आज हजर केले. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. किरण बेंडभर यांनी युक्तिवाद केला. रक्कम जप्त करणे, धनादेश कोठे वठविले यासाठी पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी केली.

अखेर शिक्रापूरची ‘ती’ धोकादायक कूपनलिका बुजवून टाकली
शिक्रापूर, ७ एप्रिल/ वार्ताहर

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील भरवस्तीत उघडय़ा असणाऱ्या धोकादायक कूपनलिकेचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच स्थानिक रहिवाशांनी ही कूपनलिका बुजवून टाकली. उघडय़ा असणाऱ्या कूपनलिकेत लहान मुले पडून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना देशात घडल्या. सुमारे दीड वर्षांपूर्वी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे अशाच एका कूपनलिकेत पडून एका बालकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तत्कालीन तहसीलदार उदयसिंह भोसले यांनी तालुक्यात बंद परंतु उघडय़ा असलेल्या कूपनलिका बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे ही कारवाई पुढे थंडावली. शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गालगत रविराज मेडिकलच्या बाजूला तेथील कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी एक वर्षांपूर्वी ही कूपनलिका २८० फूट खोदली होती. मात्र पाणी न लागल्याने ती कूपनलिका तशाच अवस्थेत उघडी राहिली. या परिसरात माणसांची सातत्याने वर्दळ असते. तसेच शिकवणीच्या निमित्ताने या ठिकाणी लहान मुलांचा रोजचा वावर असतो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. याबाबत दैनिक लोकसत्तामधून वृत्त प्रसिद्ध होताच स्थानिक रहिवाशांना तसेच प्रशासनाला त्याची जाग आली. ज्ञानेश्वर शहाणे, आत्माराम शहाणे, गणेश शेडूते, रूपेश शहाणे आदींनी तातडीने ही कूपनलिका बुजवली.

रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मोटारीच्या धडकेने मृत्यू
पिंपरी, ७ एप्रिल / प्रतिनिधी

पुनावळे रानवडे वस्ती येथे रस्त्याच्या पलीकडे एका खोलीत चार्जीगला लावलेला मोबाईल संच आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोटारीच्या धडकेने मृत्यू झाला. पोलिसांनी कोल्हापूरच्या एका इंडिका गाडीवर गुन्हा दाखल केला आहे. िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी इंदरराव डेंगळे (वय २३, रा. रानवडे चाळ, गगनगिरी मठाजवळ, पुनावळे, ता. मुळशी, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी (एमएच ०९ एल ८८६६) या इंडिका कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवाजीचा भाऊ संभाजी इंदरराव डेंगळे (वय १९) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. शिवाजी हा गवंडी काम करतो. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजी त्याच्या मित्राच्या खोलीवर चार्जीगसाठी लावलेला मोबाईल संच आणण्यासाठी गेला. मोबाईल घेऊन परतत असताना त्याला मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव इंडिका मोटारीची धडक बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. इंडिका गाडीचा चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. चालकाचा शोध सहायक पोलीस फौजदार एच. एन. कदम घेत आहेत.