Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
  युनायटेड नेशन्समधील करिअर
  ई-फोलिओ-वेब फोलिओ
  १२वी सायन्सनंतरचे विविध पर्याय..
  इनलॅक्स फाऊंडेशनचे शिक्षण-प्रोत्साहन
  ग्रंथालयातील प्रत्येकासाठी!
  वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती
  हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा
  ‘अरिना’ची अ‍ॅनिमेशन आणि पोस्ट प्रॉडक्शन कोर्सेस
  पथिक प्रेरणा: व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण
  फॅशनच्या क्षेत्रातील स्मार्ट करिअर
  कल्पकता, सृजनशीलता आणि उद्योजकतेची संधी!
महिलांसाठी खास स्वयंरोजगार

 

आर्थिक मंदीचा भूकंप काही काळ पुढेही ‘आफ्टर शॉक्स’ देतच राहणार आहे. भारतालाही याची झळ पोहोचली आहे. बऱ्याच मोठय़ा कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर नोकर कपात सुरू केली आहे. किंवा सरळ सरळ ‘ले-ऑफ’ जाहीर केला आहे. इतर कंपन्यांनी नोकर कपात जरी केली नसली तरी वेतन कपात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत आणली आहे. परंतु या स्थितीतही ‘युनायटेड नेशन्स’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आजही ‘रिक्रुटमेंट’ करीतच आहेत. धाडसी, धडपडय़ा व अनुभवी युवकांनी या संधीचा फायदा घ्यायला हवा..
अमेरिकेत केंद्रबिंदू असलेल्या परंतु जगभरातील जवळ जवळ सर्वच देशांत असर दाखवणाऱ्या आर्थिक मंदीचा भूकंप काही काळ पुढेही ‘आफ्टर शॉक्स’ देतच राहणार आहे. भारतालाही याची झळ पोहोचली आहे. बऱ्याच मोठय़ा कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर नोकर कपात सुरू केली आहे. किंवा सरळ सरळ ‘ले-ऑफ’ जाहीर केला आहे. इतर कंपन्यांनी नोकर कपात जरी केली नसली तरी वेतन कपात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत आणली आहे.
 

परंतु अशा परिस्थितीतही ‘युनायटेड नेशन्स’सारख्या संघटना आजही ‘रिक्रुटमेंट’ करीतच आहेत. धाडसी, धडपडय़ा व अनुभवी युवकांनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.
‘युनायटेड नेशन्स’ सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळणे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. युनायटेड नेशन्स (युएन), आयएलओ किंवा वर्ल्ड बँक अशा ठिकाणी काम करणारी मंडळी आजही सर्वाच्याच कौतुकाला व आदराला पात्र ठरतात.
वरवर ही नोकरी अतिशय आकर्षक भासत असली तरी तिचे खरे स्वरूप अतिशय खडतर असते. आपल्या कामाप्रती कमालीची निष्ठा आणि सर्वस्व झोकून देण्याची वृत्ती हे निकष अशा तऱ्हेच्या नोकऱ्या करू इच्छिणाऱ्यांमध्ये तपासून पाहिले जातात. कारण या नोकऱ्यांचे स्वरूप वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक पातळीवरही अतिशय ‘डिमांडिंग’ स्वरूपाचे असते.
येथे काम करणाऱ्यांना मिळणाऱ्या विविध संधी तसेच वेतनाचे स्वरूप बघता, इतर नोकऱ्यांशी यांची तुलनाच करता येत नाही. युनायटेड नेशन्सचे माजी सेक्रेटरी जनरल कोफी अन्नान यांच्या करिअरचा आढावा घेतल्यास हे अधिकच स्पष्ट होत जाते.
‘युनायटेड नेशन्स’ विषयी थोडक्यात जाणून घेऊ या!
‘युनायटेड नेशन्स’ काय आहे?
१९४५ मध्ये संपलेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातील सर्वच देशांना युद्धातून कुठलेच प्रश्न अथवा समस्या सुटू शकत नाहीत हे प्रकर्षांने जाणवले. यापुढे जगात शांतता नांदायला हवी यावर सर्वाचेच एकमत होते. जागतिक शांततेच्या पुरस्कारासाठी २४ ऑक्टोबर १९४५ रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली.
आज १९२ देश ‘युनायटेड नेशन्स’चे सदस्य आहेत ज्यांनी यूएनचा ‘चार्टर’ (जाहिरनामा) मंजूर केला आहे.
सहा प्रमुख संस्था, १५ एजन्सीज आणि अगणित कार्यक्रम व समित्या असे बरेच काही सामावून घेणाऱ्या युनायटेड नेशन्सला आपल्या जगभरातील कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विविध कुशल व उच्चशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उच्चशिक्षित असाल तर यूएन तुम्हाला सामावून घेऊ शकते.
जगभरात विविध व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जसे उच्चशिक्षित मनुष्यबळ लाभते तसेच कमी शिकलेल्या परंतु मेहनती व सेवाभावी युवक/युवतींना युएनच्या विविध एनजीओजमध्ये स्वयंसेवक (व्हॉलंटीअर्स) म्हणून संधी मिळू शकते.
तसेच नागरी सेवेत असणाऱ्या अतिउच्च दर्जाच्या नोकरदारांना यूएनच्या विविध संघटनांच्या प्रमुखपदी अथवा इतर महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते.
या सर्व (वर सांगितल्याप्रमाणे तीन पातळ्या) पातळ्यांच्या दरम्यानही यूएनमध्ये अक्षरश: हजारो रोजगार संधी उपलब्ध असतात.
‘युनायटेड नेशन्स’मध्ये शिरकाव कसा कराल?
यूएनमध्ये अधिकारी म्हणून काम करायची इच्छा असलेल्या व्यक्ती उच्चशिक्षित म्हणजेच पदव्युत्तर व पीएचडी अथवा तत्सम स्पेशलाइज्ड शिक्षण घेतलेल्या असाव्या लागतात.
येथील कामाचे स्वरूप विकसनशील अथवा गरीब देशांच्या समस्यांशी संबंधित असल्याने बहुतेक ‘पोस्टींग्ज’ ही अशाच ठिकाणी होतात.
सोशल सायन्सेस, इंटरनॅशनल रिलेशन्स, ह्य़ुमन राईट्स, जेंडर स्टडीज अशा विषयांतील तज्ज्ञांना लवकर संधी मिळते.
पाच ते सात वर्षे कामाचा अनुभव असणे हाही एक निकष आहे. ‘सोशल डेव्हलपमेंट’ संबंधी कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम केलेले असेल तर तुमचा विचार केला जातो.
इंग्रजी भाषेवर लिखित व मौखिक स्वरूपात प्रभुत्व असणे गरजेचे असते. अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन व स्पॅनिश या सहा ‘ऑफिशियल लँग्वेजेस’मध्ये यूएनचे कामकाज चालते.
जर तुमची ‘भाषा’ या विषयात गती आहे व वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असेल तर ‘लँग्वेज स्पेशालिस्ट’ किंवा ट्रान्सलेटर म्हणूनही तुम्ही यूएनमध्ये काम करू शकता. वरील सहापैकी दोन भाषांमध्ये इंग्रजीतून भाषांतर करता येणे आवश्यक असते.
या पदासाठी पात्रता परीक्षा व मुलाखतीतून निवड केली जाते. तुम्ही जर पब्लिक स्पीकिंग, प्रेझेंटेशन्समध्ये अव्वल असाल व स्वत: अग्रेसर राहून एखादे काम पार पाडणे तुम्हाला छान जमत असेल तर अशांनाही यूएनमध्ये पदोन्नती लवकर मिळते.
यूएन व्हॉलंटिअर (स्वयंसेवक)
कुठल्याही तऱ्हेच्या विकास कामांमध्ये तुम्हाला आवड असेल तर तुम्ही यूएन व्हॉलंटीअर बनू शकता. याद्वारे ज्या क्षेत्रात तुम्हाला पुढे सखोल व अधिक कार्यक्षमतेने काम करायचे आहे त्याची तोंडओळख तुम्हाला करून घेता येते. हा अनुभव अतिशय महत्त्वपूर्ण असतो. यूएनच्या कुठल्याही एजन्सीमध्ये तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला पगार दिला जात नाही तर केवळ प्रवासभत्ता व लिव्हिंग अलाऊन्स दिला जातो. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही यूएनमधील एखाद्या चांगल्या जॉबसाठी पात्र ठरू शकता.
व्हॉलंटीअर म्हणून भरती व्हायची इच्छा असेल तर www.unv.org या वेबसाइटवरील प्रश्नमंजुषा सोडवावी. तुम्ही दिलेली उत्तरे व यूएनच्या चालू कार्यक्रमांची गरज यानुसार तुमचे प्रोफाईल तपासले जाते व स्क्रीनिंगद्वारा योग्य वाटल्यास तुम्हाला तसे कळवले जाते.
यूएन इन्टर्नशिप
यूएनच्या कार्यप्रणालीचा परिपूर्ण अनुभव या इन्टर्नशिपद्वारा मिळू शकतो. वर्षांतून तीनदा, असा यूएन इन्टर्नशिपचा कालावधी असतो. जाने.-मार्च, जून-ऑगस्ट व सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा कालावधीदरम्यान हा स्टुडंट इन्टर्नशिप कार्यक्रम राबवला जातो. ज्या दरम्यान तुम्हाला इन्टर्नशिप करायची इच्छा असेल त्याच्या ११ ते चार महिने आधी तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. या इन्टर्नशिपसाठी खालील निकष आवश्यक असतात.
* विद्यार्थ्यांने अर्ज करते वेळी पदव्युत्तर शिक्षणासाठी नोंदणी केलेली असावी.
* यूएनच्या इतर एजन्सीज जसे यूएनडीपी, युनिसेफ, आयएलओ किंवा युनिटारमध्ये इन्टर्नशिपसाठी अर्ज करताना त्या त्या विशिष्ट एजन्सीला संपर्क करावा.
यूएन महिलांसाठी
यूएनचे पीसकीपिंग मिशन असाईनमेंट ऑफिस स्त्रियांचा ‘पीसकीपिंग मिशन’मधील सहभाग अधिकाधिक वाढावा म्हणून प्रयत्नशील आहे. वरिष्ठ तसेच व्यवस्थापकीय पदांसाठी खासकरून स्त्रियांच्या निवडीवर भर दिला जातो. महिलांना लैंगिक भेदभावाचे बळी ठरू दिले जाऊ नये यासाठी विशेषकरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आहे.
यूएनमध्ये कोणाला करिअर करता येईल?
अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सिव्हिल अफेअर्स, सिव्हिल पोलीस, अर्थतज्ज्ञ, निवडणूक तज्ज्ञ, इंजिनीअरिंग तज्ज्ञ, ह्युमन रिसोर्सेस, ह्युमन राईटस्, ह्युमनिटरियन अफेअर्स, इन्फर्मेशन मॅनेजमेंट, इम्फर्मेशन सिस्टीम व टेक्नॉलॉजी, ज्युरी, लीगल अफेअर्स, लॉजिस्टिक्स, प्रोग्रॅम अ‍ॅनालिसिस, मेडिकल, पोलिटिकल अफेअर्स, पॉप्युलेशन अफेअर्स, प्रोक्युरमेंट, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, पब्लिक इन्फर्मेशन, सिक्योरिटी, सोशल अफेअर्स, स्टॅटिस्टिक्स, जर्नालिझम, डेटा प्रोसेसिंग यापैकी कुठल्याही क्षेत्रात तुम्ही तज्ज्ञ आहात व कामाचा अनुभव जर तुमच्या जवळ असेल तर यूएन तुम्हाला सामावून घेऊ शकते.
मात्र एक अट आहे- जात-पात, वर्ण, लिंगभेद, उच्च-नीचता या सर्व गोष्टींवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी अर्ज करू नयेत.
यूएनमध्ये काम करणारी मंडळी वरील सर्व बाबींपासून अलिप्त असतात तसेच अखिल मानवजात एकसमान आहे असे मानणारी असतात. किंबहुना ज्यांची विचारसरणी सर्वाना समान मानणारी आहे त्यांचेच यूएनमध्ये स्वागत आहे.
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट बघा : staffing@un.org
ज्यांना इंटरनेट अॅसेस नाही त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा : युनायटेड नेशन्स इन्फर्मेशन सेंटर, ५५, लोधी इस्टेट, नवी दिल्ली- ११०००३.
शर्वरी जोशी
sharvariajoshi@indiatimes.com