Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

गर्जा जयजयकार ‘क्रांती’चा

वेलिंग्टन, ७ एप्रिल / पीटीआय

 

अपेक्षेप्रमाणे आलेल्या पावसामुळे न्यूझीलंडमध्ये २-० फरकाने मालिका जिंकण्याच्या आणि भारताच्या क्रिकेट इतिहासातील १००वा कसोटी विजय मिळविण्याच्या ‘टीम इंडिया’च्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. पण हॅमिल्टनची पहिली कसोटी जिंकून घेतलेल्या १-० आघाडीच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी न्यूझीलंडच्या मातीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास धोनीच्या भारतीय संघाने घडविला. १९६८मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या भारतीय संघाने ३-१ असा विजय साकारला होता, तशीच क्रांती धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये घडविली. अखेरच्या कसोटीत विजय हुकल्याची चुटपूट मात्र क्रिकेटरसिकांना लागून राहिली.
अखेरच्या दिवशी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता आणि ती शक्यता अखेर खरी ठरली. भारताच्या ६१७ धावांचा पाठलाग करताना ८ बाद २८१ अशा कठीण स्थितीत असलेला न्यूझीलंड संघ पराभवापासून थोडक्यात बचावला. हॅमिल्टनची पहिली कसोटी भारताने १० विकेट्सनी जिंकली होती तर नेपियरची कसोटी अनिर्णीत राहिली होती. तिसरी कसोटी जिंकून २-० अशी बाजी मारण्याचे भारताचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही. सलामीवीर गौतम गंभीरने या मालिकेत झळकाविलेली दोन शतके त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देऊन गेली. तिसऱ्या कसोटीतही तोच सर्वोत्तम ठरला.
भारताने या कसोटीच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडची ४ बाद १६७ अशी अवस्था केल्यामुळे कसोटी विजय आवाक्यात आल्याचा आनंद भारतीय क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर दिसत होता. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने आणखी चार फलंदाजांना टिपून विजय जवळपास निश्चित केला होता, पण वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पावसाचे आगमन झाले आणि भारताचे विजयाचे स्वप्न त्या पाण्यात वाहून गेले. ८ बाद २८१ धावसंख्येवरच सामना थांबविण्यात आला. डॅनियल व्हेटोरी १५ तर ओब्रायन १९ धावांवर नाबाद राहिले.
उपाहारानंतर हलका पाऊस पडू लागल्यानंतर खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर जवळपास अर्धा तास खेळ थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आणि भारत कसोटी विजय साकारेल, अशी आशाही वाटू लागली. मात्र थोडय़ाच वेळात जोरदार वृष्टी सुरू झाली आणि हे स्वप्न अधुरे राहिले. भारतीय वेळेनुसार सकाळी १०.१५ वाजता म्हणजेच सामना संपण्यास जवळपास दीड तासाचा अवधी शिल्लक असताना पंचांनी सामना पुढे होणार नसल्याचे स्पष्ट केले.
या संपूर्ण मालिकेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या झहीर खानने अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात पाच बळींसह एकूण सात बळींची नोंद केली. तर ऑफ स्पिनर हरभजनने ५९धावांत ४ बळी घेत उत्तम साथ दिली.
न्यूझीलंडने आज सकाळच्या सत्रात ४ बाद १६७ धावसंख्येवरून सुरुवात केली आणि तासभर भारतीय गोलंदाजांना त्रस्त केले. रॉस टेलर व जेम्स फ्रँकलिन यांनी पाचव्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी करून भारतीय खेळाडूंची परीक्षा पाहिली. टेलरने १०७ धावांची जिगरबाज खेळी केली तर फ्रँकलिनने ४९ धावा केल्या. सकाळचे सत्र संपण्यास १५ मिनिटांचा अवधी असताना सचिनने प्रभावी गोलंदाजी करीत फ्रँकलिन व ब्रेन्डन मॅकक्युलम यांना बाद करून न्यूझीलंडला धक्का दिला. त्याआधी, हरभजनने टेलर-फ्रँकलिन जोडी फोडण्याची कामगिरी पार पाडली. त्याने टेलरला माघारी धाडले.
हरभजनने चहापानानंतर आणखी एक धक्का देताना टिम साऊदीला टिपले व न्यूझीलंडची अवस्था ८ बाद २५८ अशी झाली. तेव्हा भारतीय संघ विजयापासून थोडाच दूर होता. पण पावसाने सारे चित्र पालटले.
हरभजनच्या गोलंदाजीवर साऊदी साफ चकला. त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षक धोनीच्या हाती कधी विसावला हे साऊदीला कळले नाही. त्यानंतर सचिन तेंडुलकरला आणखी एक बळी मिळविण्याची संधी चालून आली. सचिनच्या फुलटॉस चेंडूवर ओब्रायनने स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू इशांत शर्माला झेलता आला नाही. त्यामुळे भारताच्या हातून आणखी एक आयती संधी निसटली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने सकाळच्या सत्रात ४ बाद १६७ धावसंख्येवरून सुरुवात केल्यानंतर हळूहळू जम बसविण्यास प्रारंभ केला. टेलरने आपल्या कसोटी कारकीर्दीतील चौथे शतकही संयमी फलंदाजी करीत झळकाविले.
बेसिन रिझव्‍‌र्हवर वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा अडथळा भारतीय गोलंदाजांना सोसावा लागला. त्यातच भारतीय क्षेत्ररक्षकांनीही ढिलाई दाखविल्यामुळे मॅकक्युलम व फ्रँकलिन यांना बाद करण्याची संधी हुकली. टेलरने मात्र बिनधास्त फलंदाजी करताना इशांत शर्माच्या एकाच षटकात तीन चौकार वसूल केले आणि नंतर हरभडनला ग्लान्स करीत आपले शतक साजरे केले. टेलरने १६५ चेंडूंत १०७ धावा केल्या. त्यात १६ चौकारांचा समावेश होता. टेलरने फ्रँकलिनसह केलेली १४२ धावांची भागीदारी ही न्यूझीलंडचा पाचव्या विकेटसाठी झालेला विक्रम होता.
टेलर-फ्रँकलिन जोडीचा वाढता जोर पाहता धोनीने सचिन तेंडुलकरच्या हाती चेंडू सोपविला आणि सचिनने तो विश्वास सार्थ ठरविताना सकाळचे सत्र संपण्यास १५ मिनिटे शिल्लक असताना दोन बळी मिळविले.