Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

धनंजय भोसेकर यांच्या सुरेल गीतरामायणाने रसिक मंत्रमुग्ध
डोंबिवली/प्रतिनिधी

गेली २० वर्षे सुरेल गीतरामायणाच्या सुस्वर आणि सुसंवादातून मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या गायक धनंजय भोसेकर यांनी काल दर्दी रसिकांसमोर गीतरामायणातील सुरावटींमधून गारूड केले आणि तब्बल साडे तीन तास रसिक रामजन्माच्या उत्सवात रंगून गेले. निमित्त होते ‘स्वर संस्कार’ निर्मित धनंजय भोसेकर यांच्या गीतरामायणाच्या गायनाचे. रामनवनीनिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम ते मोफत आयोजित करत असतात. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुरेंद्र बाजपेयी उपस्थित होते.

ठाण्यात मिळणार ११ लाखांत घर !
ठाणे/प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत मुंबईशेजारील ठाण्यात घर उपलब्ध करून देण्यासाठी विहंग ग्रुप ऑफ कंपनी पुढे सरसावली असून ‘विहंग व्हॅली’ या गृहसंकुलाची घोषणा केली आहे. फक्त ११ लाखांत वन बीएचके आणि १५ लाख ६० हजारांमध्ये टू बीएचकेचे घर विकत घेता येईल, अशी माहिती विहंग ग्रुपचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर व विहंग सरनाईक उपस्थित होते.

नियोजनबद्धतेचा नवा फंडा
ठाणे/ प्रतिनिधी

हारफुले, बुके काहीही नाही..व्यासपीठावर नेते, पदाधिकाऱ्यांची भलीमोठी गर्दी नाही..शब्दफुलांनी पाहुण्यांचे स्वागत. विनाकारण घोषणाबाजी नाही..३५ मिनिटांत कार्यक्रम समाप्त..असा शिस्तबद्ध कार्यक्रम म्हणजे एखाद्या कार्पोरेट कंपनीचा सेमिनार नसून, एखाद्या राजकीय पक्षाची सभा असेल तर आश्चर्य वाटायला हरकत नाही. शरद पवार यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे नुकतीच पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत सभा झाली. पवारांचे हेलिकॉप्टर बिघडल्याने गाडीने त्यांना यावे लागल्याने कार्यक्रम उशिरा सुरू झाला. मात्र एकदा कार्यक्रम सुरू झाल्यावर ३५ मिनिटात भाषण वगैरे आटोपून पवार बाहेर पडले.

जमीनदार टावरे करोडपतीही
ठाणे/प्रतिनिधी

नव्यानेच निर्माण झालेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे जसे जमीनदार आहेत, तसेच करोडपतीही असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी भिवंडी-निजामपूर महापालिकेत महापौरपद भूषविलेल्या टावरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जासोबत आपल्यावर साधी एनसीचीही नोंद नसल्याचे नमूद केले आहे. रोकड, दागिने, जमीन आणि ठेवी अशी करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचेही त्यांनी आयोगास सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

वाडा, विक्रमगडमधील शिवसैनिकांच्या नशिबी ‘कमळाबाईच’
रमेश पाटील

निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची, युतीच्या जागावाटपांमध्ये पाच, दहा वर्षांनी जागा आलटून पालटून मित्रपक्षांना मिळाल्यास कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येतो. पण वाडा तालुक्यांतील ७५ टक्के मतदान क्षेत्रातील व विक्रमगड तालुक्यातील १०० टक्के मतदान क्षेत्रातील शिवसैनिकांच्या नशिबी मात्र गेल्या २० वर्षांंपासून (१९९०) आजपर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचाच प्रचार करण्याची वेळ आली आहे. ३० एप्रिल रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीतही या दोन्ही तालुक्यांच्या मतदान क्षेत्रात येत असलेल्या पालघर व भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार असल्याने या दोन्ही तालुक्यांतील शिवसैनिकांच्या नशिबी पुन्हा एकदा कमळाबाईच आली आहे.

कल्याणमध्ये युतीच्या विरोधात महाआघाडी
ठाणे/प्रतिनिधी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय व गंगाजल फ्रंट यांनी महाआघाडी स्थापन केली असून, डावखरे यांना मते देण्याचे आवाहन महाआघाडीतर्फे करण्यात आले. उल्हासनगर येथे महाआघाडीची स्थापना झाली, त्यावेळी लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, गंगाजल फ्रंटचे साई बलराम, उल्हासनगरचे आमदार पप्पू कलानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, प्रमोद हिंदुराव यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जातीयवादी शक्तींचा बीमोड व्हावा यासाठी ही आघाडी असून, मतदारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांना मत देण्याचे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले.

मागासवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक
ठाणे- राज्यातील मागसवर्गीय कर्मचाऱ्यांची भूमिका आणि निवडणूक पाठिंब्याबाबत घेण्यात येणारा निर्णय, यासाठी केंद्रीय, सरकारी, निमसरकारी, रेल्वे, बँका, आयुर्विमा महामंडळे, महानगरपालिका आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मागसवर्गीय संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक ठाणे येथे गुरुवार ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रिपब्लिकन कामगार नेते प्रकाश बनसोडे, अ‍ॅड. आनंदराव माने, अ‍ॅड. पंडितराव लोखंडे, सुधाकर थोरात आदी मार्गदर्शन करणार आहेत. संपर्क-९८२०८४३०४१.

लोकलच्या धडकेत बहीणभावाचा मृत्यू
ठाणे/ प्रतिनिधी

मतिमंद भावाला शाळेत सोडण्यासाठी चाललेल्या बहिणीला लोकलने दिलेल्या धडकेत दोघेही ठार झाल्याची घटना मुंब्रा बोगद्यापाशी घडली. मुंब्रा येथील युती अपार्टमेंटमध्ये राहणारी कमल कमलेश सिंग (१७) तिचा भाऊ अभिषेक (११) याला शाळेत सोडण्यासाठी घेऊन चालली होती. मुंब्रा बोगद्याजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला.

दापोडा येथील महापालिकेच्या जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त
भिवंडी/वार्ताहर

महापालिकेच्या जैविक व घनकचरा खतनिर्मिती प्रकल्पाच्या जागेवर झालेले अतिक्रमण आज सकाळी उपविभागीय अधिकारी रेवती गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गोपीनाथ ठोंबरे, नायक तहसीलदार भालेराव यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी दापोडा सरकारी जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. महापालिकेच्या दापोडा येथील सव्‍‌र्हे नं. ११५ मध्ये राज्य शासनाने जैविक व घनकचरा खत निर्मिती प्रकल्पासाठी भिवंडी महापालिकेस ही जागा देण्यात आली होती. मात्र या जागेवर वॉल कम्पाऊंड टाकण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला, तर या जागेवर शहरातील सुमारे ३०० टन दररोज निघणारा कचरा तेथे टाकण्यास विरोध केला आहे. परिसरातील भूमाफिया रमणिकलाल शहा यांनी ४३०० चौ. मी. जागेमध्ये मोठाले गोदामे बांधले होते. महापालिकेचे भाजपचे गटनेते सिद्धेश्वर कामूर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असता, या जागेवरील अतिक्रमण चार आठवडय़ांत जिल्हाधिकाऱ्यांनी पाडून संबंधित अहवाल उच्च न्यायालयास पाठवावा, असा आदेश त्यावेळेस देण्यात आला होता. मात्र परिसरातील काही बिल्डरांनी हे बांधकाम तोडू नये, म्हणून न्यायालयाकडून मनाई हुकूम घेतला होता. हा मनाई हुकूम आज उठताच उपविभागीय अधिकारी रेवती गायकर, तहसीलदार गोपीनाथ ठोंबरे, नायब तहसीलदार भालेकर, अतिक्रमण विभागाचे ७० कर्मचारी, तीन जेसीबी व १२५ पोलीस बंदोबस्त दापोडा येथील सव्‍‌र्हे नं. ११५ मध्ये जाऊन सरकारी जागेवरील झालेले अतिक्रमण पूर्णत: दूर केले. हे अतिक्रमण दूर होऊ नये म्हणून परिसरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दबावाला भीक न घालता महसूल अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण दूर केले.

सायकल चोर अटकेत
डोंबिवली/प्रतिनिधी

रामनगर पोलिसांनी धारावी येथे राहणाऱ्या संजय ऊर्फ योगेश दबडे या सायकल चोराला अटक केली असून, त्याच्याकडून ५३ हजाराच्या २७ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अट्टल सायकलचोर म्हसोबानगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला होता. योगेश येताच त्याला पोलिसांनी पकडले.

वैशाली ठाकरे यांचे निधन
वाडा :
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य वैभव ठाकरे यांच्या मातोश्री वैशाली वसंत ठाकरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५५ वर्षांंच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

प्रचार रंगू लागला..
ठाणे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपाबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांशी सुसंवाद साधण्यावरही भर दिला जात आहे. मनसे उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजन राजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच झाला. त्यानंतर त्यांनी राबोडी, वृंदावन सोसायटी, गोकुळनगर, कोलबाड, आंबेडकर रोड, टेंभी नाका, चरई, चंदनवाडी, खोपट, पाचपाखाडी, वंदना टॉकिज, भास्कर कॉलनी आदी भागांत प्रचारदौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष हरी माळी व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आनंद परांजपेंचा डोंबिवलीत प्रचार कल्याण लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागात विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांच्या भेटी घेऊन आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे.