Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

क्रिकेटमध्ये एक सुवर्णवचन आहे.. ‘फॉर्म इज टेम्पररी अ‍ॅण्ड क्लास इज परमनन्ट.’ म्हणजे एखाद्या क्रिकेटपटूला गवसलेला सूर काही कालावधीपुरताच मर्यादित राहतो, पण त्याचा दर्जा हा कायमस्वरूपी असतो. ‘ट्वेन्टी-२०’ची बाजारपेठ कितीही वधारली, तरी तो फक्त क्षणिक ‘फॉर्म’चा खेळ झाला. कौशल्य सिद्ध करीत क्रिकेटविश्वात मानाचे स्थान मिळविण्यासाठी ‘कसोटी’ हेच व्यासपीठ आहे. म्हणूनच न्यूझीलंडविरुद्धची मालिका गौतम गंभीरच्या खेळाच्या दर्जावर ‘परिपक्व कसोटी फलंदाज’ असा शिक्कामोर्तब

 

करणारी ठरली. दुसऱ्या कसोटीत पराभव आणि भारतामध्ये गंभीर नावाचा निर्धार उभा ठाकला होता. ६४३ मिनिटे खेळपट्टीवर राहून गौतमने १३७ धावा केल्या त्या ४३६ चेंडूंवर. या खेळीने अनेक विक्रम प्रस्थापित केले. तो कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला, तसेच भारतीय फलंदाजाची ती सर्वात संथ खेळी ठरली. अर्थात, गंभीरच्या खेळीला संथ म्हणून हिणवता येणार नाही. धीरोदात्त मानसिकतेची प्रचीती देत खडतर आव्हानाचा केलेला सामना, जबाबदारीचे पेललेले भान, स्थितीनुसार खेळामध्ये केलेले बदल, असा परिपक्व सलामीवीर त्या ११ तासांच्या फलंदाजीमध्ये प्रकर्षांने दिसला. म्हणूनच की काय, गंभीरचा ‘दुसरी भिंत’ असा गौरव करण्याचा मोह प्रभारी कर्णधार वीरेंद्र सहवागला आवरला नाही! तिसऱ्या कसोटीतही दीड शतकी खेळी करणारा गंभीर सामनावीर ठरला. किवींच्या भूमीत ऐतिहासिक यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या गंभीरची मालिकावीर म्हणून झालेली निवड निर्विवाद होती. विशेष म्हणजे, कसोटी गाजविणाऱ्या याच गंभीरने दोन वर्षांपूर्वी ‘ट्वेन्टी-२०’ अतिझटपट विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक २२७ धावा फटकाविल्या. अंतिम सामना जिंकून देणारी ६४ चेंडूंमधील ७५ खेळी ऐतिहासिक ठरली. एकदिवसीय सामन्यांमध्येही सहवागच्या साथीने गंभीरची बॅट तळपतेय. कसोटीत दोन हजार धावांचा टप्पा सर्वात जलदगतीने गाठणारा तो फलंदाज ठरला आहे. भारतीय सलामीची ही क्रांती सुरू झाली नऊ वर्षांपूर्वी. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि दिल्ली संघाचा सलामीवीर म्हणून गंभीर चमकला. चार हंगामांमध्ये साठहून अधिक धावांच्या सरासरीने गंभीरने धावांची बरसात केली. २००३ साली एकदिवसीय सामन्यात, तर पुढील वर्षी त्याने कसोटीमध्ये पदार्पण केले. परंतु सलामीच्या जागेसाठी तीव्र स्पर्धा असल्याने पुढील दोन वर्षे गंभीरचे स्थान डळमळीतच राहिले. २००७ च्या विश्वचषकातील अपयश गंभीरच्या पथ्यावर पडले. ‘ट्वेन्टी-२०’ विश्वचषक गाजविल्यानंतर ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिका जिंकून देण्यात गंभीरच्या दोन शतकी खेळी व भागीदाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याच वर्षी उत्तर प्रदेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधारपदाला साजेशी शतकी खेळी करून गंभीरने तब्बल १६ वर्षांनंतर दिल्लीला रणजी करंडक जिंकून दिला. ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’चा आधारस्तंभ ठरीत ‘आयपीएल’चा पहिला हंगाम त्याने गाजविला. गेल्या वर्षी एक हजारापेक्षा अधिक धावा झळकावून गंभीर आशियामधील सवरेत्कृष्ट सलामीवीर ठरला. २५ कसोटींमध्ये ५४ च्या सरासरीने गंभीरने दोन हजार दोनशे ७१ धावा करताना २०६ धावांच्या सर्वोच्च कामगिरीसह पाच शतके आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत. ७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा शतके व १५ अर्धशतकांच्या जोरावर अडीच हजार धावा आणि १२ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १२६ च्या स्ट्राइक रेटच्या धुवांधार फलंदाजीने ३२८ धावा अशी त्याची कामगिरी आहे. बुजऱ्या स्वभावाचा गंभीर खेळपट्टीवर मात्र अंगार ठरतो. अंगावर धावून येणारा ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला दिलेल्या प्रत्युत्तराने गंभीरच्या जिगरबाजपणाचे दर्शन घडले आहे. चांगला प्रारंभाने अर्धी लढाई जिंकली जाते, असे म्हणतात. म्हणूनच ‘टीम इंडिया’च्या फलंदाजीचे भवितव्य म्हणून गंभीरकडे पाहिले गेले नाही, तरच नवल!