Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

मुखवटय़ाद्वारे प्रचार राहुल गांधी प्रचाराला आले नाही म्हणून काय? त्यांचे मुखवटे तर आहे ना.

शिक्षकांनी मामा क्षीरसागरांचा आदर्श ठेवावा -डॉ. वांकर
आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

मामा क्षीरसागर यांच्या नावाने देण्यात आलेले पुरस्कार शिक्षण क्षेत्राला प्रेरणा देणारे असून शिक्षकांनी त्यांच्या आचार, विचारापासून प्रेरणा घेऊन शैक्षणिक क्षेत्रात काम करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. कुसुमताई वांकर यांनी केले. महाराष्ट्र आचार्य कुलाचे पहिले संयोजक पूजनीय मामा क्षीरसागर यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त मामा क्षीरसागर प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी डॉ. कुसुमताई वांकर बोलत होत्या. ज्येष्ठ गांधीवादी रामभाऊ म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर, महाराष्ट्र आचार्य कुलाच्या संयोजक प्रा. कमल ठकार, सवरेदय आश्रमचे सचिव डॉ. प्रकाश पाटील उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्य़ात गव्हाचे चांगले उत्पादन
आकडेवारी फसवी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

चंद्रपूर, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

जिल्ह्य़ात रब्बी हंगामात यंदा गव्हाचे उत्पादन चांगले झाले असून अपेक्षित हेक्टरी उत्पादन ८०० किलो आहे. एकूण सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १५ हजार २०० हेक्टर पैकी १ लाख ६ हजार ६ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यातही भाजीपाला पिके ३१०० हेक्टरवर लागवड करण्यात आलेली असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी यांनी दिली असली तरी, ही आकडेवारी फसवी असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. खरीप हंगामानंतर आता यंदा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरला असून यंदा रब्बीचे पीक बऱ्यापैकी येण्याची शक्यता आहे.

वर्धेत ‘अ‍ॅग्लॉन’च्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
वर्धा, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

सेवाग्राम आश्रमच्या परिसरात, श्रमदानाद्वारे एका खोलीचे बांधकाम करीत ‘अ‍ॅग्लॉन’ या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वैश्विक श्रमसंस्काराचा आदर्श घालून दिला. स्वीत्र्झलड मध्ये ‘अ‍ॅग्लॉन’ म्हणून सुप्रसिद्ध महाविद्यालयात विविध देशातील ३५० विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. जगाच्या विकसनशील देशात एखादा सामाजिक प्रकल्प उभारण्यासाठी सर्व विद्यार्थी मिळून मदतनिधी उभारतात. त्यातील १५ विद्यार्थ्यांची चमू विविध ठिकाणी जाऊन सेवाभावी प्रकल्पाची निर्मिती करीत असतात.

ठाणेगाव ग्रामपंचायतीवर चरडे गटाचे वर्चस्व
कारंजा घाडगे, ७ एप्रिल / वार्ताहर

ठाणेगाव ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष व वर्धा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शेषराव चरडे यांच्या गटाने सर्व ९ जागा जिंकून विरोधकांची दांडी उडविली. पाच वर्षांपूर्वी हातून गेलेली सत्ता खेचून आणून शेषराव चरडे गटाने रेवतकर गटावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. वॉर्ड क्र. १ मधून आनंद लक्ष्मणराव सोमकुळे ३७० मते घेऊन अनुसूचित जाती गटातून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी भागवत सोमकुळे २४० मते घेऊन तसेच गंगाधर सोमकुळे ३४ तर ताराचंद सोमकुळे यांना केवळ २० मते मिळाली. सर्वसाधारण गटातून चरडे गटाचे नरेंद्र नासरे यांनी ३५८ मते मिळवित ३०६ मते घेणाऱ्या किशोर रेवतकर या विरोधी गटप्रमुखाचा पराभव केला.

शंभर मेंढरांपेक्षा एक वाघ निवडा -काशीकर
चंद्रपूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभेत कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी हवा असून शंभर मेंढरांपेक्षा एक वाघ निवडून पाठवा, असे आवाहन आंतरराज्य शेतकरी समितीच्या माजी अध्यक्षा व माजी आमदार सरोज काशीकर यांनी केले. शेतकरी संघटना व स्वभापाचे उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या प्रचारासाठी वरोरा तालुक्यातील माढेळी येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी स्वतंत्र भारत पक्ष सातत्याने संघर्ष करत आहे.

वॉर्ड समितीच्या सभापतीपदावर आघाडीचे वर्चस्व
अमरावती महापालिका

अमरावती, ७ एप्रिल / प्रतिनिधी

महापालिकेच्या वॉर्ड समितीच्या सभापतीपदावर तीन महिला नगरसेवकांनी विजय मिळविला. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. भाजप-शिवसेनेला एकही पद मिळवता आले नाही. भाजपने मात्र त्याचे खापर शिवसेनेवर फोडले असून शिवसेनेचे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील मेहरे यांनी केला. दुसरीकडे शिवसेनेने मात्र हे आरोप नाकारले असून नगरसेवकांच्या अनुपस्थितीविषयी आधीच माहिती देण्यात आली होती, असे शिवसेनेने म्हटले आहे.

---------------------------------------------------------------------------

वेगवेगळ्या मागण्यांनी उमेदवार चक्रावले
वर्धा, ७ एप्रिल / प्रतिनिधी

निवडून आल्यानंतर खासदार निधीतील निम्मा वाटा मित्रपक्षासाठी राखून ठेवावा अशा व विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मदतीच्या वेगवेगळ्या मागण्यांनी उमेदवार चक्रावून गेले आहे.
मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दत्ता मेघेंना आताच खासदार निधीची वाटणी जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. खासदार झाल्यास प्राप्त निधीतील निम्मा हिस्सा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षित विकास कामांसाठी राखून ठेवण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शशांक घोडमारे यांनी जाहीरपणे केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलू नका, सन्मानाने वागवा, असेही सांगण्यात आले.

शेतकरी आत्महत्या..
नितीन तोटेवार

गेल्या दोन दशकांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्र आणि विशेषत विदर्भासाठी ज्वलंत प्रश्न ठरला आहे. मध्यंतरीच्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. हा प्रश्न सर्वच पातळ्यांवर चिंतेचा विषय झाला. राज्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कबुल करून पॅकेज व कर्जमाफी दिली. आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काय केले व काय नाही, यावर राज्यकर्ते व शेतकऱ्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. विदर्भात १९८० च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सुरुवात झाल्याचे बोलले जाते. १९९० च्या प्रारंभीपर्यंत सरकारने त्याची दखल घेतली नाही. १९९५ मध्ये बळीराजाने काँग्रेसला हात दाखवल्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली.

१२४ मतदान केंद्रे बदलली
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत नागपूर व रामटेक मतदारसंघातील १२४ मतदान केंद्रात बदल करण्यात आला आहे. यात ४६ समांतर मतदान केंद्रांचाही समावेश आहे. ३१ मार्चला या संबंधित मतदारसंघातील मतदान केंद्रांचा बदली प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. तो मंजूरही करण्यात आला. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण दराडे यांनी बदल झालेल्या नवीन मतदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे.

महिलाही मते देणार; पण स्वइच्छेने
नागपूर, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

नवरा सांगेल त्याच पार्टीला मतदान करण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसंदर्भात महिला चर्चा करू लागल्या आहेत. विहार, बचत गटाच्या सभा, मंदिरं आणि विविध पक्षांच्या सभांच्या माध्यमातून त्या मोठय़ा प्रमाणात निवडणुकांचे चर्वितचर्वण करताना दिसतात. दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्या आणि विहारांमध्ये सुलेखा कुंभारे यांचे नाव पुढे आहे. याच भागामध्ये भारिप बहुजन महासंघाच्या सभा मोठय़ा प्रमाणात होत आहेत. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते सकाळपासूनच मतदारांचा उंबरठा झिजवताना दिसत आहेत. एसएमएस आणि दूरध्वनीवरून मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे असले तरी घरी जाऊन संवाद साधणे त्यांना गळ घालणे सुरू आहे.

उमेदवारांचे असेही ‘दर्दभरे’ किस्से
न.मा. जोशी, यवतमाळ, ७ एप्रिल

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची नावे, त्यांच्या प्रचाराच्या तऱ्हा, कार्यकर्त्यांचा जोश, पक्षांतर गटबाजी ‘युती’ आणि आघाडीतील रूसवे-फुगवे इत्यादींचे मजेदार किस्से सांगण्याची आणि ऐकण्याची मौज सध्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात येत आहे. १९९६ मध्ये ११ व्या लोकसभेच्या वेळी काँग्रेसचे गुलाम नबी आझाद रिंगणात होते. ‘आप गुलाम हो या आझाद’ असा सवाल त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे राजाभाऊ ठाकरे यांनी विचारला होता तेव्हा ‘मैं नबी (परमेश्वर) का गुलाम हूं, और देशका आझाद नागरिक हूं’ असे मजेदार उत्तर नबी द्यायचे. याच मतदारसंघात जमानत जप्त झाली तरी चालेल पण, लढायचेच असे चंग बांधलेले काही उमेदवार असायचे. त्यात गुणाजी पांडे, सी.डी. रूईकर, जयनारायण अहीर अशी काही आठवणीतील नावे आहेत.

राष्ट्रवादी नेत्यांची गृहमंत्री जयंत पाटलांशी चर्चा
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ, ७ एप्रिल / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या निवडणूक प्रचारात ‘तटस्थ’ राहण्याची भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी गृहमंत्री जयंत पाटील यांची सोमवारी येथे भेट घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच निरुत्साह दाखवलेला आहे. टिंबर भवनात झालेल्या प्रचार सभेत तर राकाँचे जिल्हाध्यक्ष उत्तम शेळके आणि सचिव बाबासाहेब गाढे-पाटील यासारख्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

नागरी सोयींचा अभाव; पुनर्वसनग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार
कारंजा (घाडगे), ७ एप्रिल / वार्ताहर

येथील खैरी पुनर्वसनमधील नागरी सोईसुविधा पूर्ण करण्यास लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या निषेधार्थ येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान न करण्याचा निर्णय खैरी पुनर्वसनमधील नागरिकांनी घेतला आहे. कारंजा येथून १३ किलोमीटरवर असलेल्या कार नदी प्रकल्पामुळे ९ वर्षांपूर्वी धरणातील बुडीत क्षेत्रामुळे खैरीवासीयांचे पुनर्वसन कारंजा शहरालगत करण्यात आले.

सामान्यांच्या प्रश्नांकडे नेत्यांचे दुर्लक्ष -डॉ. नयना कडू
भंडारा, ७ एप्रिल / वार्ताहर

प्रत्येक निवडणुकीत राजकीय उमेदवार तीन रुपये किलो दराने गहू मिळवून देण्याचे आश्वासन देतात. मात्र, युवकांना काम, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव आणि गरिबांना आरोग्य सेवा अशा सामान्य प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे, असे प्रतिपादन डॉ. नयना कडू यांनी केले. येथील पाटीदार भवनात अपक्ष उमेदवार नाना पटोले यांच्या समर्थनार्थ प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

विमानतळांना प्राधान्य देणारे शेतकऱ्यांचे मसिहा कसे बनणार- शिशुपाल पटले
गोंदिया, ७ एप्रिल / वार्ताहर

गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ात शेतकरी व सर्वसामान्य माणूस दारिद्रय़ाच्या खाईत खितपत पडला असताना विमानतळांना प्राधान्य देणारे स्वत:ला शेतकऱ्यांचे मसिहा म्हणवत असतील, तर हे शुद्ध ढोंग असल्याचा आरोप शिशुपाल पटले यांनी केला. सडक/अर्जुनी तालुक्यात शनिवारी शिशुपाल पटले यांनी २२ गावांना भेटी दिल्या तर ९ ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. विद्यमान सरकारच्या शेतकरी धोरणावर घणाघाती टीका करीत शिशुपाल पटले म्हणाले, २५-३० वर्षांपासून लहान मोठे ६५ सिंचन प्रकल्प अत्यल्प निधीसाठी रखडले आहेत. शेतकऱ्यांना शेताला पाणी, धानाला भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही परंतु, शेतकऱ्यांच्या दु:खाशी काही देणेघेणे नसणारे विमानतळावर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करतात व तेच आज स्वत:ला शेतकऱ्यांचे मसिहा म्हणू पाहात आहेत, अशा ढोंगी पुढाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन यावेळी शिशुपाल पटले यांनी केले. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार शिशुपाल पटले दररोज प्रत्येक तालुक्यातील किमान २५ ते ३० गावांशी संपर्क करीत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यात बापाबोडी, घाटबोरी/कोहळी, सौंदड, राका/पिपरी, कनेरी, कोकणा, खोबा/चिंगी, डोंगरगाव/खजरी, खजरी, बोथली, म्हसवानी, खोडशिवनी, गिरोला/हेटी, कोसमतोंडी, चिचचोला, मुंडीपार आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी तालुका भाजपचे विनायकराव कापगते, अशोक लंजे, लक्ष्मीकांत धनगाये, देवचंद तरोणे, पद्मा परतेकी, शीला भेंडारकर, मारुती कोरे, कविता रंगारी, दुर्वास कापगते, राजेश परशुरामकर, सदाशिव शिवणकर, शिवसेनेचे सदाशिव विठ्ठले, अमिन शेख, समसुद्दीन राजानी, महादेव शिवणकर, श्रद्धा रामटेके, युवराज मेश्राम, कविता भिवगडे, वंदना डोये, डॉ. येळे, कल्पना उपरीकर आदी भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात मायावतींची व्हिडिओ ‘धूम’
चिखली, ७ एप्रिल / वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व त्यांचे कट्टर विरोधक भाजप-शिवसेना युतीचा प्रचार अगदी ‘हायटेक’ स्वरूपात शिगेला पोहोचला आहे. तालुक्यात या दोन्ही उमेदवारांची प्रचार यंत्रणा शिगेला पोहोचली असताना बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण मतदार व प्रामुख्याने उपेक्षित घटकांच्या भागात मायावती यांच्या भाषणांच्या सी.डी., डिव्हीडी दाखवून प्रचाराची ‘धूम’ केली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बसपच्या उमेदवाराने व त्यापेक्षाही कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे. उत्तरप्रदेशात बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेत आता मायावतींना पंतप्रधानपदी पाहण्याची स्वप्ने घेऊन बसप कार्यकर्त्यांनी दिखावू प्रचाराला कात्री लावत सरळ मतदारांच्या भावनांना हात घालण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक खेडय़ात मायावतींच्या सी.डी., डिव्हीडी पोहोचल्या असून विशेषत: मागासवर्गीय व अल्पसंख्य मतदारांच्या सभा घेऊन त्यांचा सरळ संवाद मायावतींशी घडवण्याचा प्रयत्न मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. दिवसभर हायटेक प्रचार सुरू असतांना रात्री निवांतपणे मायावतींची व्हिडीओ कॉन्फरसिंग प्रचाराची धूम विरोधकांना व प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.

विलासराव देशमुखांची आज सभा
चंद्रपूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार नरेश पुगलिया यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सभा उद्या, ८ एप्रिलला गांधी चौकात आोयजित करण्यात आली आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा वरोरा येथे नुकतीच पार पडली होती. या दोन्ही सभांना चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं आघाडीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची आज जाहीर सभा
चंद्रपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघ रिपाइं खोब्रागडे युतीचे उमेदवार देशक खोब्रागडे यांच्या प्रचारासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा उद्या, ८ एप्रिलला दुपारी ३ वाजता बाबुपेठमधील सिद्धार्थ स्पोर्टीग क्लब मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार देशक खोब्रागडे, मधू वानखेडे, बंडू नगराळे, कुशल मेश्राम, भारत थुलकर आदींनी केले आहे.
------------------------------------------------------------------------
प्रमोद शेंडे यांचा सत्कार
वर्धा, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आलेल्या ज्येष्ठ आमदार प्रमोद शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध नेत्यांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षांव झाला. काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे, सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांनी प्रचार दौऱ्याचा प्रारंभ शेंडे यांचा सत्कार सर्वप्रथम करीत सुरू केला. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय सिंह ठाकूर, जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे, प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात नगरसेवक मंडळी, सूतगिरणीचे हमीद अली सैय्यद गृहरक्षक समादेशक प्रवीण हिवरे व अन्य नेत्यांनी शेंडेंचे अभीष्टचिंतन केले. याप्रसंगी राज्यभरातील अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शेंडेंना शुभेच्छा दिल्या. इंदिरा सूतगिरणीचे वसंत तेलरांधे, बाबासाहेब वडतकर, बाबुलाल गणवीर, रामराव हटवार आदींनी शेंडेंचा सत्कार केला. प्रकृतीस्वास्थ्य व रखरखता उन्हाळा यामुळे प्रमोद शेंडेंनी प्रचाराची सूत्रे गटाकडे सोपवून अंतिम टप्प्यात प्रचार करण्याचा मनोदय दत्ता मेघेंकडे व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समितीसाठी मतदान
अकोला, ७ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीच्या १० सदस्यपदासाठी सोमवारी झालेल्या मतदानात २२४ सदस्यांनी मतदान केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडले. जिल्हा नियोजन समितीच्या १३ सदस्यांची बिनविरोध निवड याआधी झाली आहे. उर्वरित १० सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आले. या मतदानात जिल्हा परिषदेच्या ५१, महापालिका मतदारसंघातून ६९ आणि नगरपालिका मतदारसंघातून १०४ सदस्यांनी सहभाग घेतला. मतमोजणी ८ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन मतदानकेंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळात हे मतदान पार पडले. १० सदस्यपदांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून बुधवारी मतमोजणीनंतर या उमेदवारांच्या भाग्याचा कौल लागणार आहे.

चोराला अटक, १० मोटारसायकल जप्त
चंद्रपूर, ७ एप्रिल /प्रतिनिधी

बनावट चाबीचा वापर करून मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार बालाजी मारोती उपरे याला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याजवळून दहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. काही दिवसांपासून शहरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्य़ात कमालीची वाढ झाली होती. यापूर्वी काही मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केल्या होत्या. मात्र, आरोपी सापडलेला नव्हता. बालाजी मारोती उपरे रा. देवाडा असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे, उपविभागीय पोलीस अधिकारी पराग मनेरे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथकास मोटार सायकल चोरी करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराबद्दल माहिती मिळाली होती. सोमवारला सदर आरोपीने विक्री करण्याकरिता प्रियदर्शनी सभागृहाजवळील पाण्याच्या टॉकीजवळ दहा मोटारसायकल आणल्या होत्या. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, शिपाई दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, प्रमोद आदेवार, पंडित वऱ्हाटे, सुनील मुंडे, सुरेश केमेकर, चंदू नागरे, जयंत चुनारकर, साहिद शेख यांच्या विशेष पथकाने पाण्याच्या टाकी परिसरात सापळा रचला. बजाज पल्सर क्र. एमएच-३४ पी-१७२७, ४० हजार रुपये व दोन बनावट चाबीसह त्याला रंगेहाथ अटक केली. त्यानंतर त्याची विचारपूस केली असता सात मोटार सायकलची किंमत २ लाख १० हजारांचा माल जप्त करण्यात आला.

भगवंतराव अध्यापक विद्यालयाचे बोदलीत समाजसेवा शिबीर
गडचिरोली, ७ एप्रिल / वार्ताहर

भगवंतराव अध्यापक विद्यालयाचे समाजसेवा शिबीर बोदली या गावात नुकतेच झाले. या शिबिरात विविध उपक्रम राबवण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आत्माराम जाधव यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अबुझमाड शिक्षण संस्थेचे सचिव समशेरखां पठाण, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य लीना हकीम, बोदलीच्या सरपंच उषा नैताम, गुणवंत निकोडे, विश्वनाथ पेंदाम, रामा निकरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य आत्माराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना इच्छाशक्ती, नीतिमूल्ये, बचत, त्याग या विषयावर मार्गदर्शन केले. मदन टापरे यांनी विद्यार्थी जीवनात शारीरिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. समशेरखां पठाण यांनी समाजसेवा शिबिराच्या आयोजनचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविक प्राचार्य लीना हकीम यांनी केले. संचालन प्रा. पावडे यांनी तर आभार प्रा. ढोले यांनी मानले.

सामूहिक विवाहातून समाजव्यवस्था बळकट -आमदार अग्रवाल
गोंदिया, ७ एप्रिल/ वार्ताहर

समाजाला एका मंगळसूत्रात गुंफण्याचे कार्य सामूहिक विवाह सोहोळ्यामुळे होते. आर्थिक बचती बरोबरच सामाजिक व्यवस्था, बळकट होत असल्याने प्रत्येकाने सामूहिक विवाहाची कास धरावी, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले. बिरसोला येथे आयोजित माळी समाज सामूहिक विवाह सोहोळ्यात ते बोलत होते. सामूहिक विवाह सोहोळ्याचे हे दुसरे वर्ष असून सोहोळ्यात १५ जोडपी विवाहबद्ध झालीत. प्रसंगी मध्यप्रदेशच्या माजी आमदार पुष्पलता कावरे, जिल्हापरिषद सदस्य देवेंद्र मानकर, पंचायत समिती सदस्य बबीता देवधारी उपस्थित होते. समाज मंदिराच्या निर्मितीसाठी निधी आणण्यापासून तर समाजाला राजकीय क्षेत्रात पुढे वाढवण्याचे कार्यसुद्धा केले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माळी समाजाच्या विकासाच्या प्रयत्नासाठी कावरे यांचे त्यांनी अभिनंदन केले. प्रास्ताविक देवेंद्र मानकर यांनी केले. विवाह समितीच्या अध्यक्षा बबीता देवधारी, भीमसिंग रहांगडाले, मुनीराम पाचे, आत्माराम पाचे, तरुण देशमुख, रमेश लिल्हारे, पंचायत समिती उपसभापती प्रकाश रहमतकर, सरपंच रोहिदास कावरे, कासाचे सरपंच भरत पाचे, बनाथरचे सरपंच माने याप्रसंगी उपस्थित होते.

पुसदमधील दंगलीची सीबीआय चौकशी व्हावी -एडतकर
पुसद, ७ एप्रिल / वार्ताहर

पुसदमध्ये घडलेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात भावना गवळी आणि हरिभाऊ राठोड हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. या जातीय दंगलीची चौकशी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी या मतदारसंघाचे बसपचे उमेदवार अ‍ॅड. दिलीप एडतकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. आधीच्या खासदारांच्या कार्याचा बसपला निश्चित फायदा होईल. हरिभाऊ राठोड आता रेणके आयोगाच्या संदर्भात का बोलत नाहीत, तर श्रीकृष्ण आयोग, सच्चर आयोगाबाबत दुसऱ्या खासदाराला बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेने सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करून बसपची ताकद वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या तपास यंत्रणेवर विश्वास नसल्याने या जातीय दंगलीची सी.बी.आय.तर्फे चौकशीची त्यांनी मागणी केली.

शिक्षकांनी आचार विचार अनुकरणीय ठेवावे- निरंजन महाराज
वर्धा, ७ एप्रिल / वार्ताहर

आदर्श विद्यार्थी घडायला शिक्षक आदर्श असावा लागतो. म्हणून शिक्षकांनी त्यांचे आचार विचार अनुकरणीय ठेवण्याचा प्रयत्न करावा, असा हितोपदेश प्रवचनकार निरंजन महाराज यांनी केला.
जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी शंकरप्रसाद अग्निहोत्री हे होते. निरंजन महाराज यांनी याप्रसंगी मुलांना शाकाहारी बनवण्याचा सल्ला दिला. मांसाहारी व शाकाहारी यात जन्मत: भेद आहेत. मांसाहारी प्राण्यांचे डोळे जन्मानंतर सात दिवसांनी उघडतात तर शाकाहारी जीवाचे डोळे जन्मानंतर लगेच उघडतात. जिभेने पाणी पिणाऱ्या मांसाहारींना अंधारातही दिसते तर तोंडाने पाणी पिणारे शाकाहारी अंधारात पाहू शकत नाही, निसर्गत: असा भेद असून मनुष्याने शाकाहारीच राहावे, असे मत महाराजांनी व्यक्त केले. संस्थाध्यक्ष अग्निहोत्री यांचेही भाषण झाले. याप्रसंगी शिवकुमारी अग्निहोत्री, प्राचार्य दीपिका गार्डनर, डॉ. आसमवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

नदीत बुडून दोघांचा मृत्यू
अकोला, ७ एप्रिल/प्रतिनिधी

बार्शिटाकळी तालुक्यातील दोनद या गावी नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. दोनदला यात्रा सुरू असून यादरम्यानच हा प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विठोबा मुंडाले आणि वैशाली खोलगडे या दोघांचा दोनद येथे नदीत बुडून मृत्यू झाला. दोनदला यात्रेसाठी सध्या भाविकांची गर्दी लोटली आहे. यात्रेसाठीच गेलेले विठोबा मुंडाले आणि वैशाली खोलगडे यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. यामुळे यात्रेकरुंमध्ये खळबळ उडाली.