Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
विविध

दोन ‘बिहारीबाबूं’मधील युध्द रंगणार
नवी दिल्ली, ७ एप्रिल / पी.टी.आय.

‘शॉटगन’ हा जर ‘बिहारीबाबू’ असेल तर आपणही मूळ व शंभर टक्के बिहारी असून त्याचा अभिमान असल्याचे सांगत राजकारणाच्या आखाडय़ात आपले पाय खेचण्याची संधी आपण कोणाला अजिबात देणार नसल्याचे अभिनेता शेखर सुमन याने सांगितले. तर आपण कोणालाही घाबरत नसल्याचे ‘शॉटगन’ ने खास आपल्या शैलीत सांगत आपणच जिंकणार असा दावा केला.

विदेशी सैन्याला पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही - कुरेशी
इस्लामाबाद, ७ एप्रिल/पीटीआय

अल काईदा व तालिबानची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सुरू असलेल्या युद्धात परदेशी सैन्याला आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा पाकिस्तानने अमेरिकेला दिला आहे. आम्ही काही अमेरिकेला कोरा चेक दिलेला नाही, असेही पाक सरकारने स्पष्ट केले.

‘दहशतवाद विरोधी लढय़ात अमेरिकेने बिनशर्त पाठिंबा द्यावा’
इस्लामाबाद ७ एप्रिल/पीटीआय

दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिकेने पाकिस्तानला बिनशर्त पाठिंबा द्यावा असे मत पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी व्यक्त केले. अमेरिकेचे पाकिस्तान व अफगाणिस्तानसाठीचे खास दूत रिचर्ट होलब्रुक व अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी अ‍ॅडमिरल माईक म्युलेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी हे मत व्यक्त केले.

राष्ट्रपतींच्या अरुणाचल दौऱ्याला चीनचा आक्षेप!
नवी दिल्ली, ७ एप्रिल/ए.वृ.से.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला आक्षेप घेतल्याच्या घटनेनंतर आता चीनने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या अलीकडेच झालेल्या अरुणाचल दौऱ्यालाही आक्षेप घेतल्याचे समजते. श्रीमती पाटील यांनी गेल्याच आठवडय़ात अरुणाचल प्रदेशातील तवांगला भेट दिली होती. याबाबत अधिकृत असे काही सांगण्यात आले नसले तरी चीनने राष्ट्रपतींच्या तवांग भेटीची बाब भारताकडे उपस्थित केली आहे.

‘जय हो’ गाणे ‘ऑस्कर’ च्या योग्यतेचे नाही-जगजितसिंग
नवी दिल्ली, ७ एप्रिल/पी.टी.आय.

संगीतकार ए. आर. रेहमान यांना त्यांच्या स्लमडॉग मिलिनेयरमधील जय हो या गाण्याबद्दल ऑस्कर मिळाल्याबद्दल जगात त्यांचे कौतुक होत असेल, पण ते गाणे ऑस्कर पुरस्कार मिळण्याच्या लायकीचे नाही अशी परखड प्रतिक्रिया नामवंत गझल गायक जगजितसिंह यांनी व्यक्त केली आहे. भारतीय संगीतकाराला प्रथमच ऑस्कर पुरस्कार मिळाला हे नक्कीच भूषणास्पद आहे, पण ते गाणे इतका मोठा सन्मान मिळविण्याच्या नक्कीच योग्यतेचे नाही.

‘सत्यम’प्रकरणी राजूसह आठजणांविरूद्ध सीबीआयचे आरोपपत्र
हैदराबाद, ७ एप्रिल/पीटीआय

कोटय़वधी रुपयांच्या सत्यम घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभाग अर्थात सीबीआयकडून सत्यमचे संस्थापक बी. रामलिंग राजू यांच्यासह अन्य आठ जणांना आज आरोपी ठरविण्यात आले. भारतीय दंड संहितेतील फसवणूक आणि अफरातफरीशी संलग्न विविध कलमांखाली सीबीआयने आज येथील विशेष न्यायालयात हे ७६ पानी आरोपपत्र दाखल केले गेले. राजू यांच्या व्यतिरिक्त सत्यमचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि राजू यांचे बंधू रामा राजू, सत्यमचे मुख्य वित्तीय अधिकारी वदलमणी श्रीनिवास, त्याचप्रमाणे एस. गोपालकृष्णन आणि तल्लुरी श्रीनिवास हे प्राइसवॉटरहाऊस कूपर्सचे दोन निष्कासित लेखा परीक्षक, जी. रामकृष्णन, डी. वेकंटपती राजू आणि श्रीसालियम (सर्व सत्यमचे माजी अधिकारी) आणि राजू यांचे आणखी एक बंधू सूर्यनारायण राजू यांना सीबीआयने या प्रकरणी आरोपी ठरविले आहे. यापैकी सूर्यनारायण राजूवगळता उर्वरित सर्व आरोपी हे सध्या अटकेत आहेत. सीबीआयने पुरावे म्हणून बँकेतील उलाढालींचे अस्सल दस्तऐवज, ४३२ साक्षीदारांकडून नोंदविलेल्या साक्षी आणि अन्य ६५,००० पानांचा दस्तऐवज आरोपपत्रासोबत जोडला आहे.

निवडणूककामांसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये गजराज मदतीला
इटानगर, ७ एप्रिल/पीटीआय
अरुणाचल प्रदेशमधील लोहित व दिबांग खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस व दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या यामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत म्हणून निवडणूक कर्मचारी व साधनसामुग्रीची हत्तीवरून ने-आण करण्यात येणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ८२ टक्के वनक्षेत्र असून तेथे मुसळधार पाऊस पडतो. या राज्यामध्ये रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून तेथे वाहतुकीमध्ये अनेक अडथळे येतात. अरुणाचल प्रदेशचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ. किमी. असून या राज्याची सीमा चीन, म्यानमार व भूतान या देशांशी लागून आहे. अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगल असलेल्या दुर्गम भागात निवडणूक साधनसामुग्री व कर्मचारी यांची हेलिकॉप्टरने ने-आण वाहतूक करण्याचा विचार निवडणूक कार्यालय करीत आहे. अरुणाचल प्रदेशमधील अतिदुर्गम भागामध्ये काही ठिकाणी चार ते पाच दिवस पायपीट करून निवडणूक कर्मचाऱ्यांना पोहोचावे लागते. या भागात मतदानाची प्रक्रिया नीट पार पडावी यासाठी चोख व्यवस्था ठेवावी लागते. अरुणाचल प्रदेशमधील अतिदुर्गम भागातील मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे परत करण्याबरोबरच मतदान प्रक्रिया नीट पार पडल्याचे चित्रण केलेली व्हिडिओ फित व त्याबद्दलचा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

निवडणुका लढवणे संघाचे ध्येय नाही - सरसंघचालक
जयपूर, ७ एप्रिल / पी.टी.आय.
निवडणुका लढवणे किंवा कुण्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय नाही. सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी संघ समर्पित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. निवडणुकांचा हंगाम नेहमीच येतो, उमेदवार आश्वासनांची खैरात करतात, विजयी झाल्यानंतर बेपत्ता होतात आणि पुढच्या निवडणुकांच्या वेळीच उगवतात, अशी खोचक टिप्पणी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता सरसंघचालकांनी केली. जयपूरला आयोजित करण्यात आलेल्या रा.स्व. स्वयंसेवकांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते. हिंदुत्व ही भारताची ओळख असून देशवासीयांनी हिंदुत्वाचा अभिमान बाळगला पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी येथे केले. भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी आणि वाईट प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी काम करण्याची आवश्यकता असून मॉडर्न सोसायटीची स्वप्ने पाहतानाच पारंपरिक हिंदू संस्कृती आणि परंपरा यांची योग्य ती सांगड घालण्याची गरज आहे. यातून सामाजिक कल्याणाचा दुवा साधला जाईल, असे प्रतिपादन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जबाबदार आणि समर्पित नागरिक घडवण्याचे नेहमीच प्रयत्न केले आहेत. संघाच्या अनेक संस्था आणि संघटना देश-विदेशात हे काम मोठय़ा निष्ठेने करीत आहेत. तरीही जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा देशापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, असेही भागवत यांनी सांगितले.

ओबामा यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यास तुर्कस्तानमध्ये अटक
वॉशिंग्टन, ७ एप्रिल/पीटीआय
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीस तुर्कस्तान पोलिसांनी अटक केली. ओबामा यांनी नुकत्याच केलेल्या तुर्कस्तान दौऱ्यादरम्यान त्यांची हत्या करण्याचा या व्यक्तीचा डाव होता. यासंदर्भात अमेरिकेच्या सिक्रेट सव्‍‌र्हिसचे प्रवक्ते एड डोनोव्हन यांनी सोमवारी सांगितले की, ओबामा यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीस तुर्कस्तान पोलिसांनी गेल्या शुक्रवारी इस्तंबूल येथे अटक केली. या आरोपीबद्दल अधिक माहिती देण्यास मात्र डोनोव्हन यांनी नकार दिला. अमेरिकी अध्यक्षांच्या विदेशी दौऱ्यांमध्ये त्यांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे काम सिक्रेट सव्‍‌र्हिसकडे असते. ओबामा यांचा तुर्कस्तान दौरा सुरळीत पार पडला होता. तुर्कस्तानमध्ये ओबामा यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या व्यक्तीची अधिक माहिती तुर्कस्तान पोलिसांकडून सिक्रेट सव्‍‌र्हिसचे अधिकारी घेत आहेत.

७३ तामिळ बंडखोर ठार
कोलंबो, ७ एप्रिल/पीटीआय
एलटीटीईच्या ताब्यातील बहुतांश प्रदेशावर कब्जा मिळविल्यानंतर श्रीलंका लष्कराने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. तामिळी बंडखोरांनी आता मल्लाईत्तिवू या छोटय़ाशा टापूमध्ये आता आश्रय घेतला असून तेथून त्यांचा बीमोड करण्यासाठी श्रीलंका लष्कराने हाती घेतलेल्या धडक कारवाईदरम्यान नव्याने उद्भवलेल्या संघर्षांत ७३ तामिळ बंडखोर ठार झाले. या धडक कारवाईदरम्यान गेल्या पाच दिवसांत एकूण ५५० तामिळ बंडखोर मारले गेले. ठार झालेल्या या बंडखोरांच्या संख्येत दररोज भरच पडत आहे. एलटीटीईचा प्रमुख व्ही. प्रभाकरन याला पकडण्यासाठी आता श्रीलंका लष्कराने या परिसरात शोध मोहीम हाती घेतली. या भागात लष्कराने हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान तामिळी बंडखोरांचे आणखी मृतदेह हाती लागले. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा व दारूगोळा लष्कराने ताब्यात घेतला.

पंतप्रधांनांच्या आसाम दौऱ्यावर पावसाचे पाणी
दिब्रूगढ (आसाम), ७ एप्रिल / पी.टी.आय.
अतिवृष्टी आणि वादळी वारे यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या येथील प्रचार दौरा रद्द करण्यात आला. नियोजित दौऱ्याप्रमाणे सिंग यांची आज येथे जाहीर सभा होणार होती पण जोरदार पाऊस तसेच वादळी वारे यामुळे सिंग यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी तयार करण्यात आलेली धावपट्टी वाहून गेली त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सिंग येथे येणार होते पण वातावरणातील बदलामुळे अशा प्रकारचा प्रवास करणे धोक्याचे असते असे या हेलिकॉप्टरच्या चालकाने सांगितले.