Leading International Marathi News Daily
गुरुवार, ९ एप्रिल २००९

काँग्रेस, भाजपला धूळ चारा
मुंबई, ८ एप्रिल/प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्ष झाली तरीही देशातील दलित, शोषित, कामगार, शेतकरी सुखी नाहीत. येत्या निवडणुकीमध्ये इतर पक्ष तुम्हाला अनेक अमिषे दाखवतील, प्रसार माध्यमे तुमची मने बसपाबद्दल कलुषित करतील. मात्र या भूलथापांना बळी पडू नका. महाराष्ट्र व देशातील सर्वजन समाजाला सुखी व्हायचे असेल, कायद्याचे राज्य हवे असेल तर काँग्रेस, भाजपासह धनदांडग्यांच्या पैशांवर निवडणूक लढविणाऱ्या सर्व पक्षांना धूळ चारा व बसपाच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन बसपाच्या अध्यक्ष व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत केले.

काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
सांगलीत घोरपडे आता भाजप पुरस्कृत
नंदूरबारमध्ये शरद गावीत यांची उमेदवारी कायम

मुंबई, ८ एप्रिल / खास प्रतिनिधी
गेली चार दशके सातत्याने काँग्रेसच्या हमखास निवडून येणाऱ्या सांगली व नंदूरबार या दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने काँग्रेसला धक्का दिला आहे. नंदूरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या भावाने आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तर सांगलीत बंडखोरी केलेले काँग्रेसचे आमदार अजित घोरपडे यांना भाजपने आपला उमेदवार मागे घेत पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी पडद्याआडून घोरपडे यांना सारी रसद पुरविण्याची शक्यता आहे. एकूणच राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या दोन हक्काच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

सेवाग्राम आश्रम आर्थिक विपन्नावस्थेत..
विजय अजमिरे
आर्वी, ८ एप्रिल

महात्मा गांधी यांचा वर्धा जिल्ह्य़ातील सेवाग्राम आश्रम आर्थिक विपन्नावस्थेत सापडला असून हा आश्रम चालविण्यासाठी आर्थिक मदतीची जाहीर याचना व्यवस्थापनाने केली आहे.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान या संस्थेकडे सेवाग्राम आश्रमाचे व्यवस्थापन असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.म. गडकरी, सचिव सुगंत बरंठ, ज्येष्ठ गांधीवादी ठाकुरदास बंग आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी देशभर वितरित केलेल्या एका निवेदनातून सेवाग्राम आश्रमाची ही विदारक परिस्थिती समोर आली आहे.

स्फोटके शोधणारी यंत्रणा काढण्याचा तुघलकी निर्णय!
संदीप प्रधान
मुंबई, ८ एप्रिल

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या १६ महिने अगोदर कोणत्याही स्वरूपातील स्फोटके शोधून काढणारी चर्चगेट स्थानकात बसवलेली यंत्रणा काढून टाकण्यात आली तर छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात ही यंत्रणा बसविण्यास रेल्वे प्रशासनातील व पोलिसांमधील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला. २६ नोव्हेंबर रोजी अतिरेकी हल्ल्याच्या वेळी छत्रपती टर्मिनसवर ही यंत्रणा बसलेली असती तर निरपराध लोकांचे जीव वाचले असते.

विस्डेन ड्रीम टीममध्ये भारतीय पंचरत्न
धोनी कर्णधार
लंडन, ८ एप्रिल/पी.टी.आय.

क्रिकेट विश्वात आदराचे स्थान असणाऱ्या विस्डेन प्रकाशनाच्या वतीने प्रथमच विस्डेनची ड्रीम टेस्ट टीम जाहीर करण्यात आली असून या संघात पाच भारतीयांचा समावेश असून महेंद्रसिंग धोनीकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. शिवाय २००८ मधील जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागची निवड करण्यात आली आहे. ड्रीम टेस्ट टीममध्ये धोनीसह सेहवाग, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि झहीर खान अशा पाच भारतीयांचा समावेश आहे. विस्डेन ड्रीम टेस्ट टीम २००८- विरेंद्र सेहवाग (भारत), ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका), रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत), केविन पीटरसन (इंग्लंड), शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज), महेंद्रसिंग धोनी- कर्णधार (भारत), हरभजन सिंग (भारत), मिशेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया), डेव्ह स्टेन (दक्षिण आफ्रिका), झहीर खान (भारत).

निवडणुकीनंतरच्या आघाडीबाबत सर्व पर्याय खुले - पवार
भुवनेश्वर, ८ एप्रिल/ पीटीआय

गेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या दबावामुळे बिजद-डाव्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे टाळल्यानंतर आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या पक्षांच्या नेत्यांबरोबर ओरिसात सभा घेतल्या. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा द्यायला नकार दिला असला, तरी शरद पवार यांनी मात्र निवडणुकीनंतर आघाडी करण्याबाबत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. पवार यांनी सांगितले की, आतातरी मी काँग्रेसप्रणीत युपीए आघाडीबरोबर आहे पण निवडणुकीनंतरच्या आघाडीबाबत मी कुठलेही वचन देऊ शकत नाही, निवडणुकीनंतर काय घडेल हे मला माहीत नाही. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक व माकप नेते सीताराम येचुरी यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाची एकता व अखंडता अबाधित राखायची असेल, तर धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला हवे असे मतही पवार यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केले. निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र बसून केंद्रात सरकार स्थापनेची चर्चा करावी असेही त्यांनी सांगितले. बिजद काँग्रेसला पाठिंबा देणार नाही असे सांगताना नवीन पटनायक म्हणाले, की निवडणुकीनंतर काँग्रेसेतर व भाजपेतर आघाडीला आमचा पाठिंबा राहील. दरम्यान पवार यांनी आज ओरिसात नवीन पटनायक यांच्यासमवेत काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या.

लालूंविरुध्द मनेका गांधी यांची तक्रार दाखल
बदाऊन (उत्तर प्रदेश), ८ एप्रिल /पी.टी.आय.

आपण केंद्रीय मंत्री असतो तर वरुणला रोलरखाली चिरडले असते या लालू प्रसाद यादव यांच्या विधानाने संतप्त झालेल्या मनेका गांधी यांनी आज लालूंविरुध्द येथील पोलिसात गुन्हा दाखल केला. लालूप्रसाद यांनी हजारो लोकांसमोर वरुणला ठार मारण्याची धमकी दिली असून यावेळी काही अपशब्दही त्यांनी उच्चारले असल्याचे मनेका यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मंगळवारी लालूप्रसाद यांच्याविरुध्द किशनगंज पोलिसांत जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रश्नी निवडणूक आयोग कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

भाजपा, डाव्यांना सोनियांनी फटकारले
वाटाकरा (केरळ), ८ एप्रिल / पी.टी.आय.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अत्यंत हीन स्वरुपात आरोप करुन त्यांना दुबळे म्हणणाऱ्या भाजपा तसेच डाव्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे तसेच बेताल वक्तव्य करणे त्यांनी सोडून द्यावे अशा शब्दात कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या दोन्ही पक्षांना फटकारले. येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीने पाच वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. मनमोहन सिंग यांच्यावर भाजपा तसेच डावे पक्ष व्यक्तिगत स्वरुपाची टीका करीत असून असा स्वरुपाचा प्रचार लोकशाही प्रक्रियेला पोषक न ठरता बाधकच ठरतो याकडेही सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले.

निवडणुकीनंतर बसपाशी युती शक्य-जेटली
अलाहाबाद, ८ एप्रिल /पी.टी.आय.
निवडणुकीनंतर आवश्यकता वाटल्यास बहुजन समाज पक्षाशी युती शक्य असल्याचे भाजपाचे महासचिव अरुण जेटली यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राजकारणात केंव्हा काहीही घडणे शक्य आहे. गेल्या दोन वर्षांत आपली उत्तर प्रदेशात चांगली स्थिती झाली असल्याचे सांगून जेटली म्हणाले की ओरिसामध्ये बिजू जनता दलाने फारकत घेतल्याने आम्ही एक चांगला मित्र गमावला आहे. पण याची भरपाई आम्ही आसाममध्ये आसाम गण परिषदेशी युती करुन भरून केली असल्याचे जेटली म्हणाले.

‘आषाढी वारीदरम्यान पालखीचा मुक्काम विमानतळावर राहण्यासाठी प्रयत्न करणार’
फलटण, ८ एप्रिल/वार्ताहर

जून २००९ मध्ये निघणाऱ्या आषाढी वारीतील श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळय़ाचा या वर्षीचा फलटणचा मुक्काम विमानतळावरच राहील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबरोबरच भविष्यातील पर्यायी पालखी तळाबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळय़ातील मुक्काम व नियोजनासंदर्भात आळंदी देवस्थानचे विश्वस्त व महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उपविभागीय अधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झाली. त्या वेळी वरीलप्रमाणे नियोजन करण्यात आले. फलटणचा संस्थानकालीन सुमारे ४५ एकरांचा विमानतळ विकसित करण्यासाठी विमानतळ विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला असून, वनविभागाने विमानतळांपैकी काही क्षेत्र वनखात्याचे असल्याचे नुकतेच सांगून त्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी मागील महिन्यात चाऱ्या काढून वनीकरणाचा प्रय्तन चालविला आहे, तर विमानतळ विकास प्राधिकरणाने खासगी सुरक्षा यंत्रणेमार्फत विमानतळावरील प्रवेशास र्निबध घातले आहेत. त्यामुळे या वर्षी विमानतळावर पालखीचा मुक्काम असणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत होती.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी