Leading International Marathi News Daily
गुरुवार, ९ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘इस्रो’ने उभारलेली हवामान यंत्रणा वेधशाळेकडे सोपविणार !
अभिजित घोरपडे
पुणे, ८ एप्रिल

 

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे परिपूर्ण हवामान यंत्रणा असतानाही भारतीय अवकाश संशोधन केंद्राने (इस्रो) दोन वर्षांपूर्वी आपली स्वतंत्र स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली, पण आता त्याचे व्यवस्थापन शक्य होत नसल्याने ही सर्व केंद्रे हवामानशास्त्र विभागाकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘इस्रो’ला उपग्रहांच्या उड्डाणासाठी हवामानाच्या नोंदी व त्याबाबत पूर्वअंदाजाची आवश्यकता असते. उड्डाणाच्या वेळी हवामान हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे हवामान अनुकूल नसल्याने अनेकदा उड्डाणांच्या वेळासुद्धा बदलाव्या लागतात. त्यासाठी हवामानाची माहिती व अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून मिळवला जात असे. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ‘इस्रो’ने याबाबत हवामानशास्त्र विभागावर अवलंबून राहण्याऐवजी आपली स्वतंत्र हवामान यंत्रणा उभारण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण सहाशे स्वयंचलित हवामान केंद्रे देशभर उभारली. हवामानाच्या नोंदी घेणे व या यंत्रणेची देखभाल करण्याचे काम त्यांनी स्वत:कडेच ठेवले.
मात्र, आता या यंत्रणेची देखभाल करणे कठीण होत असल्याने ‘इस्रो’ने हवामान विभागाचे सहकार्य घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. प्रत्यक्षात हवामान विभागाचीसुद्धा स्वयंचलित हवामान केंद्रांची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यात भर टाकून वर्षभरात ६७५ हवामान केंद्र व १३५० स्वयंचलित पर्जन्यमापके बसविण्यात येणार आहेत. पुढच्या टप्प्यात आणखी सहाशे स्वयंचलित हवामान केंद्रे व २२०० पर्जन्यमापके उभी करण्यात येणार आहेत. हवामान विभागातर्फे इतक्या मोठय़ा यंत्रणेचे नियोजन कशाप्रकारे केले जाते, याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पुण्यात येऊन घेतली. त्यांच्या नोंदी अचूक राहाव्यात यासाठी काय प्रयत्न केले जातात, याची पाहणीसुद्धा या शास्त्रज्ञांनी केली. आता आपली यंत्रणासुद्धा हवामान विभागाकडे सोपविण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला इस्रोची केवळ २५ हवामान केंद्रे सोपविण्याची योजना होती, पण आता इस्रोची सर्वच्या सर्व सहाशे स्वयंचलित हवामान केंद्रे हवामान विभागाकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे हवामान विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे भूस्तरीय उपकरण विभागाचे संचालक डॉ. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इस्रोची यंत्रणा हवामान विभागाकडे सोपविण्याचा विचार सुरू आहे. खरे तर हवामान विभागाकडून हवामानाच्या नोंदी मिळविण्यासाठी ‘इस्रो’तर्फे सोडण्यात येणाऱ्या उपग्रहांची मदत घेतली जाते. या उलट हवामानाची माहिती व अंदाज हवामान विभाग पुरवितो. या कामाचा अनुभव असल्याने हे काम हवामान विभागाकडून चांगल्याप्रकारे केले जाईल.