Leading International Marathi News Daily
गुरुवार, ९ एप्रिल २००९
  राजकारणातील तरुणाई!
  थर्ड आय - भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..
  क्रेझी कॉर्नर - पेरेंट्स ओरिएंटेशन
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  दवंडी - मौसम निवडणुकांचा..!
  ग्रूमिंग कॉर्नर - तुमच्या मुलांना तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकवा
  यंग अचिव्हर्स - बम्बेल्बीची राणी
  आपल्या हक्कांबाबत कोण किती जागरुक
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर

मतदार राजा जागा हो!

वेदा : किती वेळ दार उघडायला? केव्हाची बेल वाजवतीये मी..
वैशाली : अग, मी पोळी टाकली तव्यावर आणि तू बेल वाजवलीस. दार उघडायला आले असते तर पोळी जळली असती.
वेदा : पण हा तर इथे बसला होता ना तंगडय़ा पसरून, त्याला काय झालं दार न उघडायला ?

 

विराज : हं, हे घे.
वेदा : काय आहे
विराज : पाणी. थंडगार पाणी. H2O. two molecules of hydrogen combine with one molecule of oxygen to form water. पाणी.. गरम डोकेको गार करनेका अक्सीर इलाज..
वेदा : विराज, पकवू नकोस हं, आधीच माझं डोकं फिरलय.
विराज : ते तर दिसतच आहे. आणि फॉर दॅट मॅटर तुझं डोकं कधी फिरलेलं नसतं? तू म्हणजे व्होल्कॅनो आहेस नुसता!
वैशाली : विराज, जरा गप्प बस नां..
वेदा : इतकी साधी गोष्ट कळेल तर तो विराज कसला? चोंबडा कुठला! ही अशी माणसं भारतात आहेत, म्हणूनच भारताची प्रगती होत नाहीये.
विजय : वेदा, अग, का तुझी एवढी चिडचिड होतेय? काय झालय? तू मतदार ओळखपत्र आणायला गेली होतीस ला? काय झालं त्याचं?
वेदा : काय होणार? आजची फेरीही फुकट. आधीच हे ऊन मी म्हणतय. घरातून बाहेर पडूच नाही असं वाटतय, आणि हे लोकं सारखे फे ऱ्या मारायला लावताहेत. अरे, यांना काय वाटतं, आम्ही काय रिकामटेकडे आहोत का?
विजय : पण आता काय कारण दिलय?
वेदा : फॉर्म चुकीचा भरला होता म्हणतात. मग हे यांना आधी कळलं नव्हतं का? इतकी वर्ष निवडणुका होताहेत, पण ओळखपत्र देण्याची ही प्रोसेस काही त्यांना सिस्टिमाईज करता येत नाही. what a shame!
विराज : तर काय. खरं तर आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेलीये, करा ना म्हणावं त्याचा वापर..आधीच लोकांचा मतदानाबाबत फारच उत्साह आहे, त्यात अशा कारणांनी भरच पडते.
वैशाली : लोकांनी मतदानाबाबत उत्साही राहावं अशी आजची परिस्थिती आहे का? काय फरक पडतो मतदान केल्या, न केल्यानं? कुणीही येऊ देत, सामान्य माणूस आहे तिथंच असतो. आपले प्रश्न कधी सुटतच नाहीत.
विराज : अरे, हो, पण म्हणून मतदान न करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे का?
वैशाली : हा उपाय नाही, मान्यय, पण कुणाला मत द्यायचं? मतदान करायला लायक उमेदवार तर असला पाहिजे ना! आज सगळ्या संधीसाधूंची बजबज आहे नुसती. एक काळ असा होता की, समाजाविषयी कळकळ असणारे, ध्येयवान, निष्ठावान राजकारणात होते..
विजय : ही विशेषणं तर आता भूतकाळातच जमा झालीयेत.
विराज : पण बाबा, ही परिस्थिती यायला आपणच जबाबदार आहोत असं नाही वाटत?
वेदा : ते कसं काय?
विराज : अग, सुशिक्षित, सुसंस्कारीत समाजानं राजकारणाकडे पाठ फिरवली म्हणून तर या संधीसाधूंचं फावलं ना!
विजय : आणि आता मतदानापासून दूर राहून हा वर्ग तीच चूक पुन्हा करतोय.
वेदा : म्हणूनच तर सध्या सगळीकडून ‘मतदार राजा, जागा हो’ असं आवाहन केलं जातय.
वैशाली : हो, निवडणुका होईपर्यंत मतदार ‘राजा’ असतो आणि निवडणुका संपल्या की ‘भिकारी’. ते कुठलं गाणं आहे हो या अर्थाचं?
विजय : मतलब निकल गया है तो जानते नहीं, यूँ जा रहे है जैसे की पहचानते नही..
वैशाली : अगदी बरोबर. असेच वागतात.
विजय : ते काहीही असलं तरी असा सारखा नकारात्मक विचार करून नाही चालत!
वैशाली : का नाही चालत? निवडणुका जवळ आल्यात तशी रस्त्यांची डागडुजी चाललीये, पाणी व्यवस्थित येतय, लोडशेडींग कमी झालय.. अगदी सहावा वेतन आयोगही लागू झाला..ही धूळफेक कशासाठी, हे न कळण्याइतके मतदार दूधखुळे वाटले का यांना? हा अशी लालूच दाखवायची, मतं खिशात घालायची आणि पुन्हा तोंड दाखवायचं ते पुढच्या निवडणुकीलाच. हे आता सगळ्यांना माहिती झालय. मग कोण कशाला मत देईल?
विराज : आई, अगं, सगळ्यांनी असा विचार केला तर कसं होईल?
वैशाली : आणि अगदी सकारात्मक विचार केला, मतदान केलं, उमेदवार निवडून दिला तरी काय झालय? आपले प्रश्न, समस्या दूर होणं तर दूरच, सरत्या दिवसागणिक भरच पडतेय.
विराज : आई, तू अगदी बहुतांश जनतेची प्रतिनिधी असल्यासारखी बोलते आहेस.
विजय : नाही हं विराज, बहुतांश जनतात आणि वैशालीत फरक आहे हं..दर निवडणुकीच्या आधी ती अशीच आगपाखड करते, पण मतदान टाळत नाही.
वेदा : असं होय, मला तर आईच्या बोलण्यावरून असं वाटलं होतं की आई मतदान करतच नसेल.
वैशाली : कसं शक्य आहे वेदा? कितीही मकारात्मक परिस्थिती असली तरी मतदान हे केलच पाहिजे. कारण आई-वडिलांनी मतदान केलं तरच मुलांवर मतदानाचे संस्कार होणार ना!
विराज : हे मात्र लाखातलं बोललीस. आजकाल ‘मी नाही बाई (किंवा बुवा) मतदान करत’ असं म्हणण्याची फॅशनच आली आहे. यात आपण काही तरी चूक करतो आहोत, असंही त्यांना वाटत नाही.
विराज : हे तर फारच गंभीर आहे. तसं असेल तर येणारा भविष्यकाळ अजूनच भीषण असेल.
वेदा : हो नं. त्यापेक्षा मतदान ही एक संधी आहे, असं समजून मतदान केलंच पाहिजे.
विराज : अंहं, नुसतं मतदान करून मोकळं नाही होता येणार! ज्याला आपण निवडून देतो, तो काम नीट करतोय का नाही, हे बघण्याची जबाबदारी कुणाची? सामान्य जनतेची; म्हणजे आपलीच..
विजय : खरंच, एकदा का या उमेदवारांच्या लक्षात आलं ना की, सामान्य जनतेचा आपल्यावर अंकुश आहे, तर तेही दुर्लक्ष करणार नाहीत.
विराज : तेव्हा मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस, असं न मानता सर्वानी मतदान केलच पाहिजे.
वेदा : मला तर वाटतं, मतदान सक्तीचच करावं. मतदान नाही केलं तर सरळ एक दिवसाचा पगार कापा. बघा, कसे झक्कत मतदान करतील सगळे..
विजय : सक्ती, कायदा सगळ्या गोष्टींना नाही पुरे पडू शकत. दारूबंदी आहे ना आपल्याकडे? मग काय चित्र दिसतं?त्यामुळे मतदानाबाबतीतही सक्तीपेक्षा लोकांच्या मानसिकतेतच बदल व्हायला हवा. मतदान करण्याची त्यांची त्यांनाच गरज भासायला हवी. आपल्या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी.
विराज : म्हणजे,
जबाबदार असाल तर, मत द्याल,
बेजबाबदार असाल तर घरी बसाल..
वेदा : विराज, गुड आयडिया..चल, आपण सगळे अशी स्लोगन्स तयार करूयात आणि सगळीकडे लावूयात. चल..
shubhadey@gmail.com