Leading International Marathi News Daily
शुक्रवार, १० एप्रिल २००९

टायटलर, सज्जनकुमार यांची अखेर माघार
नवी दिल्ली, ९ एप्रिल/खास प्रतिनिधी
पंचवीस वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे दिल्लीत उफाळलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार या काँग्रेसच्या विद्यमान खासदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकांतून माघार घेणे भाग पडले आहे. काँग्रेस पक्षाचे हित विचारात घेऊन टायटलर आणि सज्जनकुमार यांची उमेदवारी मागे घेण्यात येत असल्याचे आज सायंकाळी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी जाहीर केले. टायटलर आणि सज्जनकुमार यांची उमेदवारी मागे घेऊन काँग्रेस पक्षाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींतील कथित आरोपींना राजकीय शिक्षा देण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण केली आहे. दिल्लीतील दंगलग्रस्तांना मनमोहन सिंग सरकारने यापूर्वीच आर्थिक भरपाई दिली आहे.

पवार आज सोनियांबरोबर संयुक्त प्रचार सभेत!
संतोष प्रधान
मुंबई, ९ एप्रिल

सध्या यूपीए बरोबर असलो तरी निवडणुकांनंतर आघाडय़ांचे सर्व पर्याय खुले असल्याचे विधान करून काँग्रेसला सूचक इशारा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी भुवनेश्वरमध्ये सीताराम येचुरी व नवीन पटनायक या काँग्रेसविरोधी नेत्यांसह प्रचारात सहभागी झाल्यानंतर उद्य भंडाऱ्यात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर संयुक्त सभेत उपस्थित राहणार आहेत.

चंद्रा अय्यंगार यांच्या बेदरकार वृत्तीवर कोर्टाचे कडक ताशेरे
मुंबई, ९ एप्रिल/प्रतिनिधी

महिनाभरापूर्वीच राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर नेमल्या गेलेल्या व विद्यमान मुख्य सचिव जॉनी जोसेफ निवृत्त झाल्यावर त्या पदावरील नेमणुकीसाठी स्पर्धेत असलेल्या श्रीमती चंद्रा अय्यंगार यांच्यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून न्यायालयीन आदेशांची जराही बूज नसणाऱ्या व न्यायालयाविषयी काडीचाही आदर नसलेल्या अशा व्यक्तीकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदासारख्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविल्याने राज्याचे प्रशासनच पणाला लागणार आहे, असे तिखट भाष्यही केले आहे.

रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे येत्या सोमवारी दिल्लीत वितरण
नवी दिल्ली, ९ एप्रिल/खास प्रतिनिधी

भारतीय पत्रकारितेत सवरेत्कृष्ट आणि चमकदार कामगिरी बजावणाऱ्या आघाडीच्या पत्रकारांचा येत्या सोमवारी, १३ एप्रिल रोजी ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझ्म’ या वृत्तसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात येईल. ‘उत्कृष्ट पत्रकारितेची दखल घेणे हाच पत्रकारितेच्या संगोपनाचा सर्वोत्तम मार्ग आहे,’ असे मत या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करताना रामनाथ गोएंका स्मृती फौंडेशनचे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी व्यक्त केले. रामनाथ गोएंका फौंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे.

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे निधन
मुंबई, ९ एप्रिल / प्रतिनिधी

‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे आज सायंकाळी सांताक्रूझ येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सामंता यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे.

आगामी सरकार आमच्याशिवाय अशक्य
लालू, मुलायम पासवान यांचा संयुक्त सभेतील दावा

सैफई, ९ एप्रिल/पी.टी.आय.

आगामी निवडणुकांसाठी उत्तरप्रदेशात एकत्र आलेल्या लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग आणि राम विलास पासवान यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी घेतलेल्या पहिल्या संयुक्त सभेत केंद्रातील आगामी सरकार आमच्याशिवाय बनणे अशक्य असल्याचा दावा केला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांच्या बालेकिल्ल्यात घेण्यात आलेल्या प्रचंड सभेत, ‘राजद’, ‘सपा’ आणि ‘लोजप’ या तीन पक्षांच्या मदतीशिवाय केंद्रात कोणाचेही सरकार उभारले जाऊ शकत नाही, असे मुलायम यांनी म्हटले.

मुन्नाभाईने सोडली ‘गांधीगिरी’
बरेली, ९ एप्रिल/वृत्तसंस्था

‘टाडा’ खाली अटक केलेली असतानाच्या काळात आपल्याला पोलिसांनी खूप छळले होते असा आरोप अभिनेता संजय दत्त याने आज केला.‘टाडा’ हा अत्यंत कडक कायदा आहे. ‘टाडा’खाली अटक केलेल्या आरोपीला पोलीस अमानुषपणे मारहाण करतात. पोलिसांनी मलाही अशीच मारहाण केली होती असे संजय दत्त याने बरेली येथे समाजवादी पक्षाच्या प्रचारसभेत बोलताना सांगितले.जर ‘टाडा’खाली एखाद्या पोलिसाला अटक करण्याची संधी मला मिळाली तर त्याचा इतकी मारहाण करेन की तो ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामागे आपला हात असल्याची कबुलीही देईल, असे उपरोधिकपणे संजय दत्त याने सांगितले. संजय दत्त याची समाजवादी पक्षाच्या सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. लखनौ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी संजय दत्त उत्सुक होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला परवानगी नाकारली.

कवी अशोकजी परांजपे यांची आत्महत्या
औरंगाबाद, ९ एप्रिल/प्रतिनिधी

अनेक कर्णमधुर-भावमधुर गाणी लिहिणारे प्रसिद्ध कवी, नाटककार आणि लोककलेचे अभ्यासक अशोक गणेश परांजपे (वय ७०) यांनी आज दुपारी उस्मानपुरा भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी अडीच वाजता ही घटना उघडकीस आली. ‘अशोकजी’ या नावानेच ते प्रसिद्ध होते.संत एकनाथ रंगमंदिराच्या मागील बाजूस परांजपे यांचे घर आहे. तेथे ते त्यांच्या पत्नीसमवेत राहत. आज दुपारी एक वाजता ते त्यांच्या खोलीत गेले होते. अडीच वाजेपर्यंत ते बाहेर आले नाही. शेजाऱ्यांनी त्यांच्या खोलीत डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले. पोलीस पोहोचण्यापर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. परांजपे यांना अपत्य नाही. गेल्या चार वर्षांपासून त्यांची पत्नी कर्करोगाने आजारी आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या पुतण्याचे निधन झाले होते. तेव्हापासून ते मानसिकदृष्टय़ा खचले होते, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.अशोकजी यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. खोलीतील टेबलावर काही कागद होते. त्यावर २५ मार्चला एक कविता लिहिलेली असल्याचे दिसले. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अशोकजी परांजपे -अल्पचरित्र

सचिनच्या मेणाच्या प्रतिमेचे मुंबईत अनावरण
मुंबई, ९ एप्रिल / क्री. प्र.

लंडनमधील सुप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात प्रथमच एका भारतीय क्रीडापटूची मेणाची प्रतिमा चाहत्यांना पाहण्याची संधी मिळणार असून ही प्रतिमा दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आहे. येत्या १३ एप्रिलला पंचतारांकित हॉटेलमध्ये या प्रतिमेचे अनावरण केले जाणार आहे. प्रथमच या संग्रहालयातील एखाद्या पुतळ्याचे लंडनबाहेर अनावरण होत आहे. त्यासाठी तुसाँ संग्रहालयातून ही प्रतिमा मुंबईत आणली जाईल.या संग्रहालयाने सुमारे ७००० किलोमीटरचा प्रवास करून ही प्रतिमा भारतात आणण्याची तयारी केवळ एवढय़ा कारणासाठी दाखविली आहे की जेणेकरून सचिनशी प्रत्यक्ष भेट होऊ शकेल. ही प्रतिमा तयार करण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी लागला असून सचिनने दान केलेल्या कसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात ही प्रतिमा आहे.

लाहोरहून आला एअर इंडिया मुख्यालय उडवून देण्याचा ई-मेल
मुंबई, ९ एप्रिल / प्रतिनिधी

‘ताजमहाल’ हॉटेल उडवून देण्याची धमकी दिल्याच्या घटनेला काही दिवस उलटले नाही तोच आता नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया मुख्यालयही उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला सोमवारी आला आहे. हा ई-मेलही पोलिसांच्या सायबर सेलकडे चौकशीसाठी देण्यात आला असून तो लाहोरच्या आयपी अ‍ॅडेसवरून आल्याचे निष्पन्न झाले आहे. या ई-मेलनंतर एअर इंडिया मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय विमानतळावरील दक्षता यंत्रणांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतील ताजमहाल हॉटेल उडवून देण्याची धमकी देणारा तोडक्यामोडक्या इंग्रजीतला ई-मेल काही दिवसांपूर्वी चेन्नई येथील ‘ताज’ हॉटेलच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आला होता. त्यानंतर लगचेच दोन दिवसांनी त्याच आशयाचा ई-मेल मुंबईतील ताजमहाल हॉटेलच्या अधिकृत ई-मेलवर पाठविण्यात आला होता. हे दोन्ही ई-मेल इस्लामाबाद येथून पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या ई-मेलची चौकशी सुरू असतानाच आता एअर इंडियाच्या मुख्यालयाची इमारत उडविण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने पोलिसांनी तपासयंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एनडीटीव्ही जनमत कौल
राज्यात काँग्रेस आघाडीला ३० तर युतीला १८ जागा
मुंबई, ९ एप्रिल / प्रतिनिधी

एनडीटीव्हीच्या लोकसभा निवडणूक - २००९ च्या अंदाजानुसार महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाईच्या आघाडीला ३० जागा मिळण्याची शक्यता असून शिवसेना भाजप युतीला १८ जागा मिळतील. राज्यातील सर्वाधिक लोक प्रिय नेत्याचा कौल शरद पवार (२८ टक्के ) यांना दिला गेला आहे. त्याखालोखाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (२५ टक्के) लोकप्रिय आहेत. या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत सुमारे पाच टक्के मतांचा अधिक फायदा होण्याची शक्यता असून युतीची २ टक्के मते घटतील असा अंदाज आहे. लोकप्रिय नेत्यांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख असून त्यांना १५ टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. तर राज ठाकरे यांना १२ टक्के जनतेने लोकप्रियतेचा कौल दिला आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी