Leading International Marathi News Daily
शनिवार, ११ एप्रिल २००९

पारोळा येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट
२९ मृत्युमुखी

पारोळा, अमळनेर १० एप्रिल / वार्ताहर
पारोळा, अमळनेर १० एप्रिल / वार्ताहर
शहरालगतच्या फटाक्यांच्या कारखान्यात आज दुपारी अचानक झालेला जोरदार स्फोट व पाठोपाठ लागलेल्या भीषण आगीमुळे किमान २९ कामगार मृत्युमुखी पडले असून शेकडो जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, या आगीत काही बालकामगारांचा मृत्यू झाल्याचे येथील पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्याच्या आवाजाने तब्बल आठ किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरून गेला.


पवारांच्या उपस्थितीत सोनियांची ‘मनमोहन’ स्तुती!
प्रफुल्ल पटेलांनी साधली मध्यस्थाची भूमिका

संतोष प्रधान
साकोली (भंडारा), १० एप्रिल

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसविरोधी तसेच, डाव्या नेत्यांबरोबर प्रचार केलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आज व्यासपीठावर संयुक्तपणे प्रचार करून एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याची किमया साधली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मग संधी साधत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळीत पवारांना खिजविण्याचाच प्रयत्न केला.

विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता नाही - उद्धव
मुंबई, १० एप्रिल/प्रतिनिधी

केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी इतका भिकार कारभार केला असताना त्यांना पंतप्रधानपदाकरिता पाठिंबा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या केवळ वावडय़ा असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. शरद पवार यांच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे.त्यामुळे पंतप्रधानपदाकरिता त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाकरिता प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला.

भारताच्या नकाशावर ठाणे बॅडमिंटनचे ठळक अस्तित्व
सन्याल, देवलकर, प्राजक्ता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात
मुंबई, १० एप्रिल / क्री. प्र.
विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतानाच ठाण्यात अविरत सुरू असलेल्या बॅडमिंटन प्रशिक्षणाचा ध्वज सातत्याने फडकत ठेवण्याचे काम जिष्णू सन्याल, अक्षय देवलकर, प्राजक्ता सावंत अशा खेळाडूंनी केले आहे. २१ एप्रिल ते ५ मे या कालावधीत व्हिएतनाम व थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या रूपात हे खेळाडू पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ठाण्यातील बॅडमिंटन चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अकादमीच्या योजनेद्वारा अनेक गुणवत्तावान खेळाडू भारताला मिळाले. भविष्यातही अशीच गुणवान खेळाडूंची पिढी अशा योजनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार आहे. या योजनेचे हे यश लक्षात घेऊनच केवळ ठाणे परिसरातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडू येत असतात. आजच्या घडीला बॅडमिंटन हा खेळ खर्चिक बनला आहे. महागडी शटल्स, बूट, रॅकेट्स यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे हा खेळ मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरचा बनू लागला आहे.

शिवसेनेवर न्यायालयीन बेअदबीचा खटला दाखल करण्याचा विचार
मुंबई, १० एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हाती लागलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यापासून अ‍ॅड. अंजली वाघमारे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवाय इतर कोणत्याही वकीलाने त्याचे वकीलपत्र घेवू नये, यासाठी आंदोलन, दगडफेक, धमक्या आदी माध्यमांतून रितसर प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेविरोधात न्यायालयीन बेअदबीचा खटला दाखल केला जावू शकतो का, याचा विचार सध्या शासकीय पातळीवर सुरू आहे. त्यासाठी काही कायदेतज्ज्ञांकडे चाचपणीही सुरू असल्याचे समजते. कसाबवर भारतीय न्यायालयातच खटला चालविला जाणार आहे. केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या दृष्टीनेही कसाबच्या खटल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आसाममध्ये रेल्वेगाडीवर अतिरेक्यांचा गोळीबार
जवान शहीद, १४ जखमी
हफलाँग, १० एप्रिल/पीटीआय

आसाममध्ये एका धावत्या रेल्वेगाडीवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एक सीआरएफ जवान शहीद झाला व १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. आसामच्या उत्तर कचर जिल्ह्यामध्ये वाद्रानडिसा स्थानकाजवळ बदरपूर-लुमडिंग बराक व्हॅली एक्स्प्रेसवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. दिमा हलाम दाओगा या संघटनेतून फुटून निघालेल्या ज्वेल गारसोला या गटाच्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला. या गटाच्या अतिरेक्यांना ब्लॅक विडो या नावानेही ओळखले जाते. काही प्रवाशांना उतरायचे असल्याने या रेल्वेगाडीने वाद्रानडिसा स्थानकापाशी येताच आपली गती धीमी केली, त्याचवेळी रेल्वे फलाटाच्या एका टोकाशी असलेल्या अतिरेक्यांनी या रेल्वेगाडीवर गोळीबार सुरू केला. वाया संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनिल तिवारी हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना तो मरण पावला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये दोन सुरक्षा जवान, तीन महिला, एका बालकाचा समावेश आहे. गोळीबार करून अतिरेकी घनदाट जंगलात पसार झाले. हफलाँग येथून पोलीस पथके घटनास्थळी रवाना झाले. गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांचा कसून शोध घेतला जात आहे. ज्वेल गारसोला या गटाच्या अतिरेक्यांनी गेल्या गुरुवारी उत्तर कचर जिल्ह्यामध्ये निवडणूक निरीक्षकांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने या गोळीबारात जिवीतहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. उत्तर कचर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांसाठी १६ एप्रिलला होणार आहे. आसाममध्ये गेल्या सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये १० जण ठार झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच आज रेल्वेगाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार करण्याचा प्रकार घडला.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी