Leading International Marathi News Daily
शनिवार ११ एप्रिल २००९

ज्या ठिकाणी आपण राहत असतो मग ती उंच इमारत असो, लहान इमारत असो, बंगला असो, घर असो की, एखाद्या चाळीतील रूम असो किंवा एखादी झोपडी असो, अशा निवाऱ्याच्या ठिकाणी प्रथम गरज असते ती पाण्याची. ‘पाणी’ हे जीवन आहे, त्याशिवाय कोणताही जीव जगूच शकत नाही हे या पृथ्वीतलावरचे एक निर्विवाद सत्य आहे! कदाचित त्यासाठीच ईश्वराने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूंची निर्मिती केली असावी. ‘पाणी’ ही ईश्वराने दिलेली देणगी आहे व त्या देणगीवरच आजपर्यंत मनुष्य तरला आहे. पण मानवाने विचारांची दिशा बदलून आपल्यामध्ये बदल आणल्यानेच पाण्याचे नियोजन करण्यात तो कमी पडला वा नियोजनात अपयशी ठरल्याने ‘पाणीटंचाई’ निर्माण झाली.
पावसाळ्याचे चार महिने पडणारा पाऊस वर्षभर वापरावयाचे- असल्याने त्या पावसाच्या पाण्याचे व जमा करण्याचे नियोजन बरोबर होत नसल्यानेच पाण्याची टंचाई होणे स्वाभाविकच आहे. पाणी वापरण्याच्या नियोजनात दुर्लक्ष झाल्यानेच पाण्याची गंभीर समस्या या पृथ्वीवर निर्माण झाली आहे.
लोकसंख्या, शहरीकरण व तापमानात होत असलेली वाढ यामुळे होणाऱ्या हवामानातील बदलाने ‘पाणीटंचाई निर्माण होत असते. पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम हा मालमत्ता बाजारपेठेवर सतत व न चुकता होत असतो. याचे सुंदर व सहज

 

समजणारे उदाहरण द्यायचे झाले तर ‘मुंबई शहर’. पण अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी असते असे नाही व मुंबई, न्यूयॉर्क, लंडन म्हणजे सर्व जगच आहे असेही नाही. अशी परिस्थिती जगात फक्त मोजक्याच शहरांत पहावयास मिळते, पण इतरत्र परिसरात पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते. वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस कमी होत जाणारी जमिनीची जलधारण क्षमता हेच खरे तर या पाणीटंचाईचे मुख्य कारण आहे.
या पाण्याच्या समस्येचा आपण जर का नीट विचार केला तर आपणास असे आढळून येईल की, मुसळधार पडणारा पाऊस हा या धरतीवर असणाऱ्या व दररोज निर्माण होत असलेल्या असंख्य इमारती, अनेक रस्ते, रेल्वे, अस्तित्वात असलेले व निर्माण होत असलेले इन्फ्रास्ट्रक्चर्स, काँक्रीटने व्यापलेले सर्व क्षेत्र व असा सपाट पृष्ठभाग ज्यावरून ते पडणारे पावसाचे पाणी पडून ते रस्त्यावरून गटारीमध्ये, गटारीतून नाल्यामध्ये, लहानमोठय़ा ओहोळांतून नदीमध्ये, नदीमधून खाडीमध्ये व खाडीमधून समुद्रामध्ये जात असते व ते सर्व पावसाचे पाणी नेहमी वाया जात असते. कारण या धरतीवर जमिनीचा भाग सातत्याने कमी कमी होत चालला आहे.
जंगलाच्या ऐवजी काँक्रीटचे जंगल निर्माण होत आहे व पावसाचे पाणी जमिनीत जाण्यासाठी, जमिनीत शिरण्यासाठी खूपच कमी जागा- जमीन शिल्लक राहिली आहे. पण त्या शिल्लक राहिलेल्या जमिनीमध्ये तरी हे पडणारे पावसाचे पाणी जाणे गरजेचे आहे. ते पाणी गेल्याशिवाय व जमिनीमध्ये शिरल्याशिवाय जमिनीची जलधारण क्षमता वाढणार नाही व जमिनीत तयार होणारी पाण्याची पोकळी भरणार नाही, तर यासाठी हा विषय तातडीने हातात घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच मनुष्याकडे राहत नाही तर पाण्याचे नियोजन केल्यावाचून आता गत्यंतरच नाही. काँक्रीटीकरण हे एक प्रकारे नैसर्गिक स्रोतांवर अतिक्रमणच आहे. पावसाच्या पाण्याला जमिनीमध्ये जाणारा रस्ताच बंद केल्याने दिवसेंदिवस जमिनीची जलधारण क्षमता कमी होत आहे व त्यावर विचार होत नसल्याने खरी पाणीटंचाई सतत जाणवत राहत.
जमिनीची जलधारण क्षमता वाढवण्यासाठी कृत्रिमरीत्या जमिनीतील भूजलसाठय़ाची उंची वाढविण्यासाठी एक प्रकल्प हाती घेण्यात आला, त्या प्रकल्पाच्या प्रक्रियेलाच ‘रेन वॉटर-हार्वेस्टिंग अर्थात वर्षांजल संधारण असे म्हटले जाऊ लागले व आजच्या काळात खऱ्या तोडग्याचा शोध लागला असेही म्हटले जाऊ लागले. या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे जमिनीतील पाण्याची मात्रा नेहमी कायम ठेवता येत असल्याने व जलधारण क्षमता वाढवता येऊ लागल्याने पाणी टंचाईवर खऱ्या अर्थाने मात करता येऊ लागली आहे.
गच्चीवरून येणारे रेनवॉटर हे खाली येऊन इमारतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पडून ते इतस्तत: जात असल्याने, त्या वाहून जाणाऱ्या पाण्याला एक वेगळे वळण देण्यासाठी व ते पाणी जमिनीवर एकत्रितरीत्या करून इमारतीच्या बोअरवेलपाशी सोडल्याने ते पाणी थेट जमिनीत जाऊन तेथील जलधारण क्षमता वाढते. तसेच छपरावरून, पत्र्यांवरून, कौलांवरून पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीतून ज्या एका ठिकाणी पडते त्या ठिकाणी किंवा थोडय़ा बाजूला एक शोषखड्डा करून त्यामध्ये ते पाणी सोडल्यास घरच्या घरीसुद्धा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो.
रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या कार्यप्रणालीवर एक नजर टाकू या.
१) इमारतीच्या एका बाजूला असलेल्या जमिनींतर्गत ५ फूट x ५ फुटाचा व ५ फूट खोली असलेला एक शोषखड्डा बनवून त्याच्या चारही बाजूंनी एक शोष खड्डा बनवावा. तो गच्चीवरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या पाईपाशी जोडावा की ज्यामुळे गच्चीचे सर्व पाणी त्या पी.व्ही.सी. पाईपातून थेट शोषखड्डय़ातच पडले पाहिजे. त्याचबरोबर त्या शोषखड्डय़ावर सँडफिल्टर लावावे. त्यामध्ये सिंगल, छोटे रबल्स, पेबेल्स, ग्रॅव्हल्स असल्याने पावसाच्या पाण्यात मिसळलेला कचरा, धूळ या त्या सँडफिल्टरमध्ये शोषले जाऊन व त्यातून मिळणारे पाणी सँडफिल्टरला बसविण्यात आलेल्या परफोरेटेड पाईपद्वारे जमिनीत सोडले जाते व जमा झालेले सर्वच पाणी त्या शोषखड्डय़ात आल्याने त्या खालच्या जमिनीची जलधारण क्षमता वाढण्यास खूपच मदत होत असते. २) बोअरवेलजवळ एक चेंबर बनवून त्यात गच्चीवरून व घरावरून येणारे पाणी एकत्रितरीत्या करून पी.व्ही.सी. पाईपद्वारे सँडफिल्टर बसविलेल्या ठिकाणी ते सर्व पाणी बोअरवेलमध्ये सोडून आपण भूजल साठा वाढविण्यास मदत करू शकतो ३) उंच इमारती व अनेक इमारतींच्या प्रकल्पाच्या ठिकाणी ९ फूट x ९ फुटाचा व ९ फूट खोली असलेला एक शोषखड्डा खणून व त्या सभोवताली २ फुटाचे जाडी असलेले दगडी बांधकाम करून त्या खड्डय़ाच्या मधोमध ६ इंच व्यासाचे, १०० फुटांपर्यंत ड्रिल पिट करून तसेच या शोषखड्डय़ाच्या ५ फुटांवर चेंबर बनवून त्यामध्ये गच्चीवरून येणारे सर्व रेनवॉटर पाईपद्वारे आणून व त्यामध्ये सँडफिल्टर व नेटमधून जाणारे ते पाणी सरळ मोठय़ा खड्डय़ात जाऊन त्या ड्रिल पिटमधून जमिनीत जात असल्याने खूपच चांगल्या प्रकारे व योग्य रीतीने रेनवॉटर हार्वेस्टिंग करता येऊ शकते.
वरील मापाच्या शोषखड्डय़ाला सर्वात वरच्या बाजूला एक ओव्हरफ्लो पाईपसुद्धा लावता येत असल्याने शोषखड्डा पूर्णपणे भरल्यावर त्या ओव्हरफ्लो पाईपातून पाणी बाजूच्या गटारामध्ये सोडता येत असल्याने ते पाणी खड्डय़ाच्यावर येऊ शकत नाही. जमिनीमध्ये जमा होणारा हा पाण्याचा साठा हा त्या इमारतीच्या गच्चीच्या एकूण क्षेत्रफळावर व त्या-त्या वर्षी पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते. ४) प्लॉटच्या उतार भागामध्येसुद्धा एक शोषखड्डा करून त्यात सँडफिल्टर बसवून त्यात उतारावरून वाहत येणारे पावसाचे पाणी थेट जात असल्याने ते सर्व पाणी जमिनीत जाते व अशा उताराच्या ठिकाणीसुद्धा आपण रेनवॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीची जलधारण क्षमता वाढवू शकतो व पाण्याला योग्य दिशा देऊ शकतो. ५) पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये सुद्धा आपण रेनवॉटर हार्वेस्टिंग करू शकतो.
गटारामध्ये दर १० फुटानंतर ३ फूट लांबी व ४ फूट खोली असलेला एक शोषखड्डा करावा. पाणी सहजरीत्या जाण्यासाठी सिंगल, पेबेल्स, छोटे रूबल्स टाकावे. अशा प्रकारे हे खड्डे गटारीमध्ये दर १० ते १२ फुटांवर केल्याने बरेचसे वाहते पाणी टप्प्याटप्प्याने जमिनीमध्ये जिरवले जाऊ शकते व अशा प्रकारेसुद्धा जमिनीची जलधारण क्षमता आपण वाढवू शकतो.
वरील प्रकारे आपण रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पाण्याचे नियोजन करू शकतो व पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवायचे, पाणी अडवायचे व जेणेकरून ते पाणी वाहत जाऊ नये याची दक्षता घ्यावी, हाच खरा उद्देश या रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा आहे. या प्रकल्पाचे व त्याच्या प्रक्रियेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व या क्षेत्राशी संबंधित सर्व सरकारी खात्यांनी लोकजागृती करण्याची व लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे. आज प्रत्येक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे सक्तीचे केल्याने नवीन इमारतींना ते केल्यावरच, ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिले जाते. पण जुन्या इमारतीच्या ठिकाणी याबाबत काहीही जागरुकता दिसत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी सक्ती, कायदा व कानून या सर्वाची गरज नसावी व लोकजागृतीनेसुद्धा असे प्रश्न सुटले पाहिजेत, नाहीतर पुढचा काळ नक्कीच कठीण आहे असे समजायला हरकत नाही.
सुधीर मुकणे
लेखक संपर्क : ९८२१३८६६१४