Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

कुठल्यातरी खासगी नर्सिग होममध्ये बसून मी आशाळभूतपणे घडय़ाळाकडे पाहत असतो. माझ्या शेजारी एक बाई आपल्या दीड-एक वर्षांच्या मुलाला घेऊन बसलेली असते. खिन्न! त्या मुलाच्या चेहऱ्यावर वेदनेच्या खुणा जाणवत असतात. ते मूल रडत असतं. मला तेच जास्त त्रासदायक वाटत असतं. वेटिंग-रूममध्ये अनेक चेहरे असेच वेदनेने ग्रासलेले असतात. सगळेच काही रोगी नसतात. त्यापैकी काहीजण माझ्यासारखे- रोग्याच्या बरोबर आलेले. ती समोर बसलेली गुजराती बाई त्या मुलीची कोण असावी? मला तर्क करता येत नाही. तिच्या शेजारी बसलेलं ते जोडपं. त्या दोघांपैकी नक्की पेशंट कोण असणार? मी पुन्हा तर्क लढवू लागतो. परंतु यावेळीदेखील मला त्यात अपयश येतं. मी विचार करणं सोडून देतो.
नर्सची धावपळ सुरू असते. एकाच नर्सिग होममध्ये तीन वेगवेगळ्या डॉक्टरांची कन्सल्टन्सी असल्यामुळे वेटिंग-रूममध्ये खूप गर्दी झालेली. आज मानसोपचारतज्ज्ञांचा वार असल्यामुळे बहुतेक पेशंट हे मानसिक रोगाने त्रस्त.
मन.. मनाचा रोग. त्यालाही तोच रोग? प्रश्न, समस्या सर्वानाच असतात. मग प्रत्येकालाच ईसीटी ट्रीटमेंट द्यायची का? कल्पनेनंच माझ्या अंगावर काटा उभा राहतो.
नर्स त्या जोडप्यापैकी पुरुषाला इंजेक्शन देते.. अ‍ॅट्रोपीनचं. म्हणजे हासुद्धा मनाचा रोगी! चेहऱ्यावरून वाटत नाही. अजिबात नाही. काही वेळापूर्वी ते दोघे आले तेव्हा किती प्रसन्न दिसत होते!
माझं लक्ष पुन्हा पुन्हा ऑपरेशन थिएटरकडे जातंय. त्या मुलाला आत नेऊन दहा-बारा मिनिटे झालेली असतात. त्याच्या बाबांना काही जुजबी औषधं आणायला खाली पाठवलेलं असतं.
आता अ‍ॅट्रोपीन इंजेक्शनची पाळी त्या मुलीची असते. ती त्याला जोरदार विरोध करत असते. नर्स तिला दरडावते. ती मुलगी अंग आकसून घेते. तिच्याबरोबर असलेल्या बाईच्या चेहऱ्यावर नाराजी पसरते.
‘आपकी लडकी है?’ नर्स प्रश्न विचारते. माझ्याही मनात हाच प्रश्न आलेला असतो. मी तिथे कान देतो.
‘नहीं जी, हमारी कामवाली की है। बचपनसे हमने संभाली है।’
नर्स त्या मुलीचा हात पकडून स्पिरिट चोळते आणि खसकन् सुई खुपसते. माझ्या मनात त्या बाईविषयी कृतज्ञ भाव निर्माण होतो. खरंच कुणाची कोण आणि..?
मी तरी याचा कोण? मी आता मलाच प्रश्न विचारू लागतो. ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं जातं. स्ट्रेचरवरून त्याला आणलं जातं. आता त्याला कुठल्या वॉर्डमध्ये नेणार? माझी सराईत नजर शोध घेऊ लागते. आधीचे तब्बल पाच अनुभव माझ्या गाठीशी असतात. त्याला तीन नंबरच्या वॉर्डमध्ये नेण्यात येतं. मी सीटखाली ढकलून ठेवलेली त्याची चप्पल उचलतो. तीन नंबरच्या वॉर्डमध्ये प्रवेशतो आणि त्याचक्षणी माझ्या नाकात शिसारी आणणारा वास शिरतो.
मी वॉर्डमध्ये येईपर्यंत त्याला एका कॉटवर व्यवस्थितपणे निजवलेलं असतं. डॉक्टर निघण्याच्या बेतात असतात. ‘पंधरा-वीस मिनिटांनी तो शुद्धीवर येईल. अध्र्या तासानंतर त्याला कॉफी दे आणि मग घरी ने..’ डॉक्टर मला नेहमीप्रमाणे सल्ला देतात. मी कॉटवरच अंग चोरून बसतो.
समोरच्या कॉटवर लुंगी नेसलेला माणूस पाय वर करून झोपलेला असतो. मी त्याच्याकडे चोरटी नजर टाकतो. त्याच्या ‘नको’ त्या ठिकाणी बँडेज बांधलेलं असतं. खालच्या पॉटमध्ये रक्ताळलेले, पूने माखलेले कापसाचे बोळे पडलेले असतात. माझा हात आपसूक नाकाकडे जातो. पण मग मला माझीच शरम वाटू लागते. लहानपणी मांडीवर झालेलं गळू आठवतं. ते फुटल्यानंतर बाहेर पडलेला पू, रक्त आठवू लागतं. आईने हळुवारपणे कापसाने ते पुसल्याचं मला स्पष्ट दिसू लागतं.
तरीही मला खोलीमध्ये भरून राहिलेला तो वास असह्य़ होतो. मी आशेनं माझ्या शांतपणे निजलेल्या मित्राकडे पाहू लागलो. आता लवकरच तो अ‍ॅनेस्थेशियामधून बाहेर येईल. मग मी बाहेर नेऊन त्याला कॉफी पाजेन. खालच्या हॉटेलवाल्या पोराचं ऑर्डर्स घेणं सुरू असतं. मी खिशात हात घालून दोन रुपयाच्या दोन नोटा बाहेर काढतो. माझ्या हातात चाफ्याचं फूल येतं. सकाळीच एका लग्नसमारंभात मिळालेलं चाफ्याचं फूल! मी ते फूल मुठीत लपवतो आणि पोराला पैसे देतो.
‘थोडी देर के बाद एक नेसकॉफी लाना।’
तो पोरगा निघून जातो. याचे बाबा मला बघून वॉर्डच्या दिशेने येतात. ‘त्याला नेलंय वॉर्डमध्ये. तुम्ही इंजेक्शन व बँडेज दिलंत नर्सला?’ मी उगीचच चौकशी करतो.
‘दिली. डॉक्टर काय म्हणाले?’
‘नेहमीचंच.’ मी उगीच हसण्याचा प्रयत्न करतो. ‘तुम्ही बाहेरच थांबा. आत खूप वास येतोय. मी आहे त्याच्याजवळ. आता फक्त दहा-एक मिनिटे बाकी आहेत!’
बाबा पुन्हा वेटिंग-रूमच्या दिशेनं वळतात. मी हलकेच मूठ उघडतो. चाफ्याचं फूल काळपट झालेलं असतं. पण त्याचा सुवास मात्र मला मोहवत असतो. मी नाकाजवळ नेऊन ते हुंगतो. पुन्हा मी ते फूल मुठीत लपवून वॉर्डमध्ये परततो. तो अजून निपचित पडलेला असतो.
त्या बाईच्या नवऱ्याला वॉर्डमध्ये आणलं जातं. डॉक्टरांच्या मागोमाग ती येते. ती थोडी धीटच वाटते. याच्या शेजारच्याच कॉटवर तिच्या नवऱ्याला ठेवलं जातं. डॉक्टर गेल्यानंतर ती कॉटवर ऐसपैस बसते. समोरच्या पेशंटभोवती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बायकांचा गराडा पडलेला असतो. ती गर्दी पाहून नर्स वॉर्डमध्ये येते.
‘आवाज थोडा कमी करा, इतर पेशंटना त्रास होतोय,’ त्या बायकांना उद्देशून नर्स बोलते. ही नर्स माझ्या परिचयाची झालेली असते. माझ्याजवळून जाताना ती सहजपणे हसते. मीदेखील तिला प्रतिसाद देतो.
माझ्या शेजारची बाई वॉर्डमधील सगळी गडबड तिऱ्हाईतासारखी न्याहाळत असते. ती माझ्याकडे आपली नजर वळवते. आम्ही दोघं एकाच मन:स्थितीतून जात असतो.
‘तुम्ही यांचे..?’ ती मला प्रश्न विचारते.
‘मित्र..’ मी तुटक उत्तर देतो.
‘यांचे आई-वडील?’
‘यांचे बाबा बाहेर बसलेत!’
‘काय झालंय यांना?’ - तिचा तिसरा प्रश्न.
मी क्षणभर विचार करतो. इतर लोकांना जसं मी ‘आम्ही याला टायफॉईडवर इंजेक्शन देतोय,’ असं खोटं सांगतो, तसं तिला सांगून चालणार नसतं. कारण ईसीटी प्रक्रियेशी ती परिचित असते.
‘डिप्रेशन आलंय!’
‘कशामुळे?’
‘अ‍ॅक्च्युअली इट इज द केस ऑफ ब्रोकन लव्ह अफेअर.’ मी कबुलीजबाब देतो. आता हिने प्रश्न विचारणं बंद करावं, या हेतूने मीच तिला प्रश्न विचारतो, ‘तुमच्या यांना काय झालंय?’
‘संशय घेतात. त्यांना वाटतं की, सीबीआयची माणसं त्यांचा पाठलाग करताहेत. रस्त्यावरचे कुत्रेसुद्धा यांना पोलिसांचे कुत्रे वाटतात. एवढंच काय, रस्त्यावरचे दिवेसुद्धा आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी लावलेत असं यांना वाटतं.’ माझा चेहरा अधिकच प्रश्नार्थक बनतो.
‘खरं तर हे मोठय़ा कंपनीत ऑफिसर आहेत, पण अलीकडे यांचं कामात लक्ष लागत नाही. असंबद्ध बडबड करतात. खूप पितात. रात्री उशिरा घरी येतात..’ ती आपली भाबडी कर्मकहाणी मला हलक्या आवाजात सांगून टाकते.
तिचा नवरा हळूहळू अ‍ॅनेस्थेशियातून बाहेर येत असतो. ती डॉक्टरांना बोलवायला वॉर्डबाहेर जाते. मी तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. माणसाचा चेहरा दिसतो, पण मन? मनाला ना चेहरा, ना आकार. त्याचा रंग तरी कुणी पाहिलाय? पण मनाचा रंग गुलाबीही नसावा किंवा हळुवार मोरपिशीसुद्धा नसावा. मनाला रंग असलाच तर तो काळ्याभोर डोहासारखा असावा.
तिच्याबरोबर डॉक्टर येतात. ते तिच्या नवऱ्याची विचारपूस करतात, ‘आता ड्रिंक्स थोडी कमी घेत चला,’ अशी डॉक्टरी थाटातली प्रेमळ सूचना करतात आणि ते वॉर्डबाहेर जाऊ लागतात.
‘डॉक्टर,’ मी त्यांना हाक मारतो.
‘अरे, अजून हा शुद्धीवर आला नाही?’ डॉक्टर त्याचं नाडी- परीक्षण सुरू करतात.
‘शेजारचे पेशंट आता घरीसुद्धा जातील!’
डॉक्टर त्याच्या तोंडातून जाड प्लॅस्टिकची वक्राकार नळी बाहेर काढतात. चिकट झालेली ती नळी मी खालच्या पॉटमध्ये ठेवतो.
‘अजून थोडा वेळ वाट पाहा, नाहीतर मला बोलवा.’ डॉक्टर निघून जातात.
डॉक्टर गेल्याचं पाहताच त्या बाईचा नवरा तिच्यावर खेकसतो.
‘फालतू खर्च करतेस. काय झालंय मला?’
‘मुकाटय़ानं चहा पी व थोडा वेळ आराम कर.’ ती त्याच्या वरताण असते.
थोडा वेळ त्या दोघांच्या बोलण्याकडे केंद्रित झालेलं माझं लक्ष विचलित होतं. मी त्याच्याकडे पाहू लागतो. बाहेर आता अंधारून आलेलं असतं. शेजारच्या कॉटकडे मी चौकशी करतो-
‘किती वाजले?’
‘साडेसात.’
ती बाई पर्स उचलून घेते. खाली वाकून कॉटखाली ठेवलेल्या आपल्या नवऱ्याच्या चपला पुढे ओढते. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा जाणवतो. तो हलकेच कॉटवरून उठतो. ती दोघं निघून जातात. आता परत ती या हॉस्पिटलमध्ये कधी येईल? मला अस्वस्थ वाटतं. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी पुन्हा येणं म्हणजे?
हॉस्पिटलमध्ये सुखासुखी आणि आनंदानं येणारी माणसं खूपच कमी असतात. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, एमआर आणि तो खालचा हॉटेलवाला पोरगा- या साऱ्यांचं पोट पोसलं जातं ते या जगातल्या असंख्य रोगांमुळेच! कुणाला पोटाचा विकार, तर कुणाला पाठीचा. कुणाचा अपघात. तर कुणाचं तरी बाळंतपण. तर कुणाला झालेला असतो मनाचा रोग!
कुणालाही सांगू नये असं जे दु:ख मनाच्या कोपऱ्यात आपण डांबून ठेवतो, तेच नेमकं इथे चव्हाटय़ावर येतं. मी त्याच्या शांत चेहऱ्याकडे बघत राहतो.
ब्रोकन लव्ह अफेअर..
लव्ह अफेअर काय कुणी करत नाही? पण प्रत्येकजण ईसीटी घेऊन तुझ्यासारखा असा निपचित पडत नाही. शेवटी जे काही करायचं ते सामर्थ्यांनिशी! अगदी प्रेमसुद्धा! प्रेमभंगाचं दु:ख मनाच्या तळाशी साचवत गेलास आणि आता डॉक्टर तुझ्या मनाचा तळ शोधताहेत!
दोन महिन्यांपूर्वी तीन दिवस हा असाच निपचित पडलेला असतो- इथल्याच एका कॉटवर. डॉक्टर निदान करतात- मेंटल अ‍ॅटॅक आलाय. घरातील मंडळी चिंतातुर होतात. शेवटी ईसीटी दिला जातो. पुढील दोन दिवसांत हा पुन्हा चालू-फिरू लागतो; परंतु ही ट्रीटमेंट थांबणारी नसते. डॉक्टरांच्या मते, पुन्हा ईसीटी चालू करावा लागणार असतो.
मी कॉटवरून उठतो. वेटिंग-रूममध्ये येतो. त्याच्या बाबांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असते. मी डॉक्टरांच्या केबिनकडे वळतो. डॉक्टर बिलं तयार करत असतात.
‘डॉक्टर, जरा येऊन पाहता?’
‘पाच मिनिटांत येतो.’ डॉक्टर आपल्या कामात गर्क होतात.
पाच मिनिटांनी डॉक्टर येतात. पुन्हा एकदा नाडी-परीक्षण होतं. ते आपली चावी काढतात, त्याच्या तळव्यांवरून फिरवतात. त्याचे पाय आकसले जातात. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आशा दिसू लागते. पण याचे डोळे बंदच असतात. चेहरासुद्धा शांत असतो.
डॉक्टर असहाय होतात. इतक्यात नर्स तांब्यातले थोडेसे पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडते. त्याच्या पापण्या हलल्यासारख्या वाटतात. पण नंतर तीसुद्धा हालचाल मंदावते.
डॉक्टर वॉर्डच्या बाहेर येतात. मी आणि त्याचे बाबाही लगबगीने त्यांच्या मागोमाग येतो.
‘ही इज रेझिस्टिंग हिमसेल्फ. आय एम हेल्पलेस. तो अ‍ॅनेस्थेशियातून बाहेर आलेला आहे. पण तो स्वत:चाच प्रतिकार करतो आहे. तुम्ही काही वेळ थांबा. तो बोलू लागला की त्याला माझ्या केबिनमध्ये आणा.’
डॉक्टर निघून जातात. सव्वाआठ वाजून गेलेले असतात. बाबांना दुकान बंद करण्यासाठी जाणं भाग असतं. दर वेळेपेक्षा आज हा थोडासा वेगळा वागत असतो. घडय़ाळाची गणितं चुकलेली असतात.
‘तुम्ही जा. हा शुद्धीवर आला की मी घरी घेऊन येईन त्याला.’ मी बाबांना आश्वासन देतो. बाबा निघून जातात. मी वॉर्डमध्ये परततो. आता वॉर्डमधल्या दरुगधीचीही मला सवय झालेली असते.
त्याचा ओलसर चेहरा मी रुमालाने पुसून काढतो. त्याच्याजवळ बसतो. त्याचा हात हातात घेतो. बराच वेळ मी त्याचा हात कुरवाळत राहतो. त्याचं आवडतं गाणं माझ्या ओठी येतं- ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है।’ मला ठाऊक असतं की, माझ्या गाणं गुणगुणण्याने त्याची शुद्ध परतायला हा काही सिनेमा नाही. माझ्यासमोर सत्य निपचित पडलेलं असतं. त्याला स्वप्नंदेखील पचवता आलेली नसतात.
मी माझं चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागतो. ‘आपल्याला घरी जायला उशीर होतोय. उठ आता!’ हलकेच हा आपली कूस बदलतो. माझा चेहरा थोडासा उजळतो.
हळूहळू हा हालचाल करू लागतो. त्याच्या तोंडून ‘पाणी’ असा अस्पष्ट आवाज येतो. त्याचे ओठ सुकलेले असतात. त्याने सकाळी अकरा वाजल्यानंतर काहीही खाल्लेलं नसतं की पाणीही प्यायलेलं नसतं.
हा उठण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला हाताचा आधार देऊन उठवतो आणि पाणी पाजतो.
मी त्याला कॉटवर बसवतो. याचे पाय खाली मोकळे सोडतो आणि हळूच कॉटखालची चप्पल ओढतो. मला घरचे वेध लागलेले असतात.
माझ्या खांद्याचा आधार घेऊन हा वॉर्डबाहेर येतो. मी याला वेटिंगरूममध्ये नेतो. आता तिथली गर्दी ओसरलेली असते. आम्हाला ऐसपैस बसता येतं. हा अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहत असतो.
मी याला डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेतो आणि एकटाच तिथून बाहेर येतो. डॉक्टरांचं अस्पष्ट बोलणं ऐकू येत असतं. माझ्या मनात घरी जायला किती वाजतील, याचे अंदाज सुरू असतात.
दहाएक मिनिटांनी हा बाहेर येतो. त्याच्या हातात बिल असतं. त्याला बाकावर बसवून मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरतो.
‘डॉक्टर, हे अजून किती दिवस चालणार?’
‘ते त्याच्यावर अवलंबून आहे. पण अजून दोन तरी ईसीटी द्यावे लागतील. त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बरी झालेली नाही.’
मी खिशातले पैसे त्यांच्यासमोर ठेवतो. डॉक्टर बिलाचे पैसे घेऊन उरलेले मला परत देतात. मी निमूटपणे ते खिशात घालतो.
‘आता परवा पुन्हा साडेपाच वाजता. अकरानंतर त्याला काही खायला प्यायला देऊ नका.’ माझं त्यांच्या नेहमीच्या सूचनांकडे लक्षही जात नाही. माझ्या मेंदूवर ‘आता परवा पुन्हा साडेपाच वाजता..’ हेच शब्द प्रहार करत असतात.
मी केबिनबाहेर येतो. तो बाकावरून उठतो. माझ्या खांद्यावर हात टाकतो. परवा पुन्हा यायचं त्यालाही ठाऊक असतं. आम्ही दोघं नर्सिग होमच्या पायऱ्या सावकाश उतरत असतो. परवा याच पायऱ्या पुन्हा एकदा आम्हाला चढायच्या असतात.
संतोष पाठारे
santosh_pathare1@yahoo.co.in