Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

कुणास विकतो कोण मिठाई
उपऱ्या वदनी भिक्षांदेही
करुणेचे नच इथे सत्र
हलवायाच्या घरावरी हे असे ठेविले तुळशीपत्र

मध्यमवर्गीय माणसाचा नाकर्तेपणा मर्ढेकरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केला आहे. ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ ही म्हण आपण बोलण्याच्या ओघात सहज वापरतो. मर्ढेकरांप्रमाणेच पु. ल. देशपांडे यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात ‘हलवायाचा मुडदा’ या शब्दावर श्लेषात्मक कोटी करून विनोद केल्याचे आपल्या स्मरणात आहे. मर्ढेकर व पुलंनी हलवायाला असे वाङ्मयीन स्थान दिले आहे. स्वीट्सचे स्वीट मार्ट, स्वीट्स सेंटर अशी चकचकीत दुकाने येण्यापूर्वी हलवायाचे असे एखादे स्वीट्सचे दुकान खेडय़ापाडय़ातच नाही, तर शहरातही असायचे. साधारण बाजार भरतो अशा गावात असे हलवाई असायचे. विविध आकारांच्या कढया, त्यावर आदळणारे झारे, पळ्या-चिमटय़ाऐवजी मोठमोठी फडकी व जमिनीच्या खाली खोदलेली चुलाणाची भट्टी, तेला-तुपाचा वास, जिलेबी सोडण्यासाठी कापडाला किंवा नारळाच्या कवटीला छिद्र पाडून त्यातून सोडलेले जिलेबीचे पीठ, शेवेच्या मोठमोठय़ा पराती, बुंदीच्या अतिगोड ओलसर लाडूचा वास.. असा सगळा पसारा हलवायाच्या घरात डोकावले तर सहज दिसायचा. खरं तर आत डोकवायचीही गरज नसे. दरवाजाच्या बाहेरच पत्रा किंवा छपराची थोडी बैठक केलेली असे. ही सगळी भट्टी फुलत असे. पण ही भट्टी रोज मात्र फुलत नसे. आठवडय़ाचा बाजार किंवा आजूबाजूच्या गावची जत्रा-यात्रा असेल तर बाजाराच्या किंवा यात्रेच्या आदल्या दिवशीच ती फुलत असे. बाकी दिवस त्याचा हा सगळा बारदाना स्तब्ध असे.
बाजाराच्या दिवशी ऐन बाजारात त्याचे हे दुकान व दुकानाच्या बाजूला जिलेबी किंवा इतर पदार्थाची कढई चालू असते. हलवायाचे कळकट कपडे, तेलकट चेहरा, पण हास्य मात्र तुपट! आणि वर्तमानपत्राच्या पुडीत गुडीशेव, गुडदाणी, शेव, जिलेबीसारखा पदार्थ बांधून, वर अडकवलेल्या दोऱ्याच्या बंडलमधील दोऱ्याने करकचून आवळत तो गिऱ्हाईकाकडे हे पुडे टाकत राहतो. तोंडातील तंबाखूमुळे त्याचा चेहराही असाच पुडय़ाच्या आकारासारखा होतो. शहरवस्तीत क्वचित मिळणारी गुडीशेव व गुडदाणी हे पदार्थ खेडय़ातील हलवायाकडे हमखास मिळतील.
हलवायाचे असे स्मरण होण्याचे कारण म्हणजे आजकाल खेडय़ापाडय़ांत यात्रांचा सीझन चालू आहे. यात्रा म्हटली की, ग्रामदैवत, मिरवणूक, रंगीबेरंगी फुग्यांची, खेळण्यांची, चष्म्यांची, मिठाईची दुकाने, चित्रकथी, बॉक्समधला (बायोस्कोप) सिनेमा आणि मोटारसायकलवर किंवा ऐटीत बसून फोटो काढून देण्यासाठी आलेली फोटोची दुकाने, देवादिकांच्या तसबिरी विकणारे, भांडी घेऊन तांबट, कासारांनी मांडलेली दुकाने आणि विकत घेता आल्या नाहीत तरी मोकळ्या खिशात हात घालून या गोष्टी पोटभर न्याहाळून पाहणारी मंडळी, नुकतीच विकत घेतलेली बासरी नीट वाजवता येत नसल्यामुळे नुसता फुक फुक आवाज करत जाणारी मुलं, कुठं फुग्यांचा, शिट्टीचा, फुग्यांचा, भोंग्याचा, खेळण्याचा आवाज. सगळे आवाज एकत्र केले तर होणारा गलका व त्या गलक्यात रमून, गढून गेलेले केवळ ते गावच नव्हे, तर यात्रेच्या निमित्ताने इतर गावांतून आलेली पाहुणे मंडळी, नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेली भक्तमंडळी, आराधी, पोतराज, देवीचे भक्त, हमाम्यात सहभागी होण्यासाठी आलेली पहिलवान मंडळी, तमाशा फडातील सगळा ताफा, बँड, पिपाण्या, ताशा यांच्या आवाजात मिरवणुकीने दर्शनासाठी येणारी मंडळी.. या सगळ्या आवाजांत घुमत राहतो तो हलवायाच्या भट्टीचा हा वास.
यात्रा म्हणजे जेथे पशुबळी दिला जात नाही, असा उत्सव. तर जत्रेत पशुबळी देणे वा मांसाहाराला प्रतिष्ठा असते. कालभैरव अथवा भैरवनाथ, हनुमान अशा बहुविध उच्च देवतांच्या यात्रा, तर मरीआई, तुकाई वा अशा इतर देवतांच्या जत्रा साजऱ्या केल्या जातात. काही ठिकाणी ‘उरूस’ म्हणण्याचीही प्रथा आहे. हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांच्या दग्र्याचे असे उरूस अनेक गावांत ग्रामदैवतेच्या यात्रेइतकेच भक्तिभावाने केल्याचे आपण पाहतो.
ग्रामीण संस्कृतीत ग्रामदेवतेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. गावातील प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त, प्रारंभ ग्रामदेवतेच्या मंदिरातून केला जातो. गावाचं रक्षण करणाऱ्या या देवतेविषयी मना-मनांत आदरयुक्त श्रद्धास्थान असते. या देवतेचे वर्षभरात जे उत्सव साजरे होतात, त्यात ‘यात्रा’ हा महत्त्वाचा उत्सव.
रानातील कामांतून मिळणारी फुरसत, सुगी झाल्यामुळे हातात आलेला पैसा आणि उत्सवाची परंपरा यामुळे यात्रेच्या काळात गाव कसा मोहरून जातो! पालखी, छबिना, बैलगाडय़ांच्या शर्यती, कुस्त्यांचे हमामे, लेकी-सुनांमुळे गजबजलेले घर. नवस फेडल्यामुळे हलके झालेले मन ‘चैनी’चा आस्वाद घ्यायला उत्सुक झालेले असते. यात्रेच्या काळातील वर सांगितलेली सगळी गंमत हीच ग्रामीण कष्टकऱ्यांच्या जीवनातील ‘चैन’! तीही देवाला साक्षी ठेवून.. देवाच्या नावानेच.
नोकरीनिमित्त गावाबाहेर पडलेला माणूस यानिमित्ताने हमखास गावी भेटणार. तो आला नाही तर गावातल्या मंडळींची नाराजी त्याला ओढून घ्यावी लागते.
यात्रेपूर्वी यात्रेसाठी जमा केली जाणारी वर्गणी, तमाशे ठरविणे, गावोगावच्या वस्तादांना (पहिलवानांना) निमंत्रणे पाठविणे, मंदिरांची व सर्वच गावाची स्वच्छता, वाद्ये, बँड, लेझीम, ढोल, अबदागिरे, चौऱ्या ढाळणारे मानकरी, पालखीचे मानकरी, शंख वाजवणारे गोसावी या सगळ्यांचा मेळ बसविणे, यात गावातील कारभारी मंडळी व्यस्त असतात.
आजकाल गावात विविध पक्षांचे कारभारी असतात. त्यांचे राग-लोभ या यात्रेच्या निमित्ताने कधी उफाळून येतील व वातावरण गरम होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे छोटय़ा गावातील यात्रेतही आजकाल पोलीस बंदोबस्त असतो. काही ठिकाणी तमाशाऐवजी सिनेमा दाखविण्याची पद्धत सुरू झाली आहे. यात्रेचे स्वरूप असे आधुनिक होत चालले आहे.
यात्रेचे स्वरूप असे बदलत असले तरी या यात्रेतील ‘हलवाई’ मात्र आहे तसाच आहे. गुडीशेव आणि गुडदाणी हे पदार्थ खायचे असतील तर अशा यात्रेतच फिरायला हवे.
एकूणच आजच्या खेडय़ापाडय़ांत उत्सव आणि आठवडी बाजार या दिवशी दिसणारी हलवायाची दुकाने आज तरी शहरवस्तीप्रमाणे मॉडर्न झालेली नाहीत. ग्रामदेवतेला वाजत जाणारी गुळाची शेरणी, लिंबाचा पाला हातात घेऊन दंडवत घालत जाणारी भक्तमंडळी आणि प्रसाद म्हणून हलवायाच्या दुकानातून खरेदी केली जाणारी मिठाई यामुळे ग्रामयात्रा परिपूर्ण होते. शहरवस्तीत झालेल्या मोठमोठय़ा हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांमुळे हलवायांचे धंदे गावापुरतेच सीमित झाले. लग्नकार्यात केटर्सच्या भूमिकेत हलवाई फारसे गेले नाहीत, तरी स्वस्त, कमी दरात गरीबांची जीभ तिखट-गोड करणारी ही हलवाई मंडळी कष्टकऱ्यांना तरी हवी आहेत. त्यांच्या घरावर तुळशीपत्र नकोच आहे.
अरुण जाखडे
arunjakhade@padmagandha.com