Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

सिनेमावाले व राजकारणी यांची मैत्री, युती, संबंध, हितसंबंध, आकर्षणहा काळासोबत रंग बदलत आलेला खेळ आहे. कधी एखाद्या कलाकाराला राजकारण्यांशी असलेली जवळीक बाधली, तर कधी राजकारण्यांनी आपल्या सोयीनुसार एखाद्या कलाकाराला वापरलेसुद्धा आहे; पण सोबतच्या छायाचित्रातील ‘दोस्ताना’ खूप खरा आहे.. राजकारणी आणि सिनेमावाले यांच्यात अंतर असण्याच्या काळातील (वा आपापल्या भूमिकांशी प्रामाणिक असल्याच्या दिवसांतील) आहे. कधीचा काळ होता माहित्येय? विजय आनंदने राजकारण्यांवर तोंडसुख घेण्यापूर्वीचा, शत्रुघ्न सिन्हाने भाजपशी जवळीक करण्यापूर्वीचा आणि राज बब्बरने समाजवादी पक्षात पाऊल टाकण्यापूर्वीचा. छायाचित्रात तिघेही राजासाब विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सहवासात अतिशय आनंदी दिसत आहेत ना? त्यांचा तो आनंद खराच होता. त्यांच्यासोबत राजबंश व अरविंद सिन्हा आहेत. १९८९ सालचे- म्हणजे २० वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र आहे.
राजकारणाचा अभ्यास असणाऱ्यांना एव्हाना लक्षात आले असेल की, अमिताभ बच्चनचे खासदारपद वादळी ठरल्याचे व त्याच्यावर बोफोर्सप्रकरणी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाचे ते दिवस होते. आणि त्यात विश्वनाथ प्रतापसिंग यांनी त्याच्यावर मोठीच तोफ डागलेली. त्यावर्षी बऱ्याच राजकीय खेळी झाल्या. निवडणूकही झाली. त्यात सिंग यांच्याभोवती निर्माण झालेली वादळंही बरीच होती. अशातच त्यांच्या एका मुंबईभेटीत राज बब्बरने सिंग यांच्यासाठी निर्माता-दिग्दर्शक आत्माराम यांच्या घरी खास ‘खाना’ आयोजित केला. लगोलग प्रसार माध्यमांतील आम्हा काही निवडक पत्रकारांना आमंत्रणेही आली. अशा पाटर्य़ामध्ये बऱ्याचदा राजकारण्यांचा राजकीय चेहरा ठळकपणे जाणवतो. परंतु विश्वनाथ प्रताप सिंग याला चक्क अपवाद ठरले. त्यांच्या तोंडून एकही राजकीय विधान ऐकायला मिळाले नाही. त्याऐवजी ते रमले काव्य- हास्य- व्यंग यांत. (म्हणजेच फिरकी घेण्यात!) आपल्या कौतुकाच्या पार्टीत आपले राजकीय अस्तित्व दाखवून देण्यापेक्षा आपल्यातील ‘रसिक’ता जागी ठेवत त्यांची ती छोटीशी पार्टीदेखील यादगार ठरवली. छायाचित्रातील सर्वाचे चेहरे आजही तितकेच बोलतात, यातच सारे आले. वीस वर्षांत राजकारण व सिनेमावाले यांच्या नात्याची समीकरणे बदलली. विश्वनाथजी व विजय आनंद काळाच्या पडद्याआड गेले, पण ती पार्टी आठवणीत राहिली- कायमची!
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com