Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

मराठेशाहीच्या अंतरंगात डोकवायला लागलो, की हा प्रवास सातारा आणि कोल्हापूर या दोन ऐतिहासिक शहरांत येऊन थांबतो. सातारा तर यामध्ये मराठेशाहीतील थोरली पाती! छत्रपती शिवरायांनी या परिसरात गडकोटांच्या साहाय्यानेच स्वराज्य उभे केले. तर छत्रपती शाहूमहाराजांनी पुढे या साताऱ्यालाच आपल्या राजधानीचा मान दिला. हा मराठेशाहीचा चेहरा घेतलेल्या या शहरातच या पाऊलखुणा सांगणारे एक संग्रहालय उभे आहे- छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालय!
साताऱ्यात असे संग्रहालय असावे, अशी अनेकांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर यशवंतराव चव्हाण आणि राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या पुढाकाराने १९६६ साली अशा संग्रहालयाची स्थापना झाली. पुढची चार वर्षे वस्तू जमविण्यात गेल्यावर १३ जानेवारी १९७० रोजी औपचारिक अर्थाने सातारचे हे संग्रहालय इथल्या भूमीचा- मराठय़ांचा इतिहास बोलायला लागले.
आकाराने छोटे, पण अनेक दुर्मिळ वस्तूंनी भारलेले असे हे संग्रहालय! शिलालेख, पत्रव्यवहार, चित्रे, छायाचित्रे, शस्त्रास्त्रे, नाणी, दुर्मिळ वस्तू, भांडी, कलाकृती आदींमधून इथे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास उलगडतो.
दाराशीच परिसरात मिळालेले शिल्पावशेष, शिलालेख भेटतात. नळदुर्ग किल्ल्यातून आणलेल्या दोन तोफा इथेच मांडल्या आहेत. या तोफांवर बारकाईने पाहिले तर वाघ, मासे, रानडुक्कर, सर्प आदी प्राणी दिसतात. गंमत अशी, की यातील त्या अक्राळ-विक्राळ सर्पाला इथे छोटे पायही दाखवले आहेत. आता हा कल्पनाविलास की सापांच्या उत्क्रांतीतील एखादा संदर्भ, हे कळत नाही. पण अनेकदा यामुळे अशी साधने इतिहासाबरोबरच अन्य विषयांसाठीही संदर्भ ठरतात.
इथेच प्रवेशदारी जात्यांच्या अनेक चाकांपासून आगळी सजावट केली आहे. काळाचे हे चक्र आपण तीन-चारशे वर्षे मागे न्यायचे आणि संग्रहालयात दाखल व्हायचे.
पहिलाच भाग शस्त्रांचा! खरे तर हे ‘शिव’मंदिर! दाराशी स्वागताला जय-विजय. पुढे आतमध्ये सर्वत्र सभामंडपाप्रमाणे कोरीव खांब, हंडय़ा-झुंबरांची मांडणी, भोवतीने सर्वत्र मराठय़ांचा पराक्रम पाजळणारी हत्यारे आणि या साऱ्याच्या मधोमध पुढय़ात एका उंच आसनावर छत्रपती शिवरायांचे ते मूळ तैलचित्र!
तैलचित्राखालील आसन-गादीला थोडेसे बारकाईने न्याहाळायचे, कारण हे ‘तख्त’ काही साधेसुधे नसून ते प्रत्यक्ष महाराजांच्या वापरातील आहे. त्याच्या पुढय़ातच राजांचा गड आणि गडांचा राजा ‘राजगड’ची प्रतिकृती, ते सतरावे शतक घेऊन पुढे येते. हे सारे पाहायचे आणि मग त्या हत्यारांकडे वळायचे.
वेगवेगळय़ा आकारांतील तलवारी, पाते लवलवणारे दांडपट्टे, शत्रूचा काटा काढणाऱ्या कटय़ारी, वाघनखे, खंजीर, अंकुश, धनुष्यबाण, भाले, कुऱ्हाडी, ढाली, शिरस्त्राणे, चिलखते, बंदुका आणि अशाच कितीतरी! लढाईचा हा सारा मामला! मातीसाठी लढणारी ही हत्यारे पाहायची आणि सळसळत्या रक्ताने पुढत्या मोहिमेवर निघायचे!
अभिलेख आणि चित्रलेखांचा हा विभाग! ‘प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु..’ या शिवमुद्रेनेच स्वागत होते. मग महाराजांची जन्मकुंडली, वंशवृक्ष, जीवनपट असा सारा शिवकाळ इथे होतो. याला त्यांच्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचीही जोड दिली आहे. जागोजागी सापडलेले शिलालेख आणि अनुवादही इथे लावले आहेत.
म्हसवडचे राजेमाने यांनी त्यांच्याकडील काही जुन्या वस्तू संग्रहालयाला दिल्या. या वस्तूंमध्ये एक गोष्ट होती ती छत्रपती शिवाजीमहाराजांच्या उजव्या हाताचा ठसा! एखाद्या देवाच्या तसबिरीप्रमाणे काचबंद असणाऱ्या या मुद्रेकडे पाहताना आपल्या हातांना कंप फुटतो.
हीच गोष्ट ती त्या सोन्याच्या मुद्रांची! वेगवेगळय़ा राजांचे, पत्रव्यवहारात ‘लेखन आरंभ’ आणि ‘लेखन सीमा’ सांगणारे हे शिक्के आणि मोर्तब जेव्हा पाहतो, तेव्हाच ‘शिक्कामोर्तब’ हा मराठीतील शब्दही त्याचा अर्थ सांगतो.
पुढे चित्रशैलीचे दालन येते. मराठे म्हटले, की फक्त ढाल-तलवारी आणि त्यांच्या लढाया एवढेच कानी येते. पण या काळानेच ‘मराठा चित्रशैली’ची कलाजगताला भेट दिली. या संग्रहालयाचाच भाग असलेली साताऱ्याच्या राजवाडय़ातील ‘मराठा आर्ट गॅलरी’ पूर्णपणे या मराठा चित्रशैलीवर आधारित आहे. कधीकाळी १८४४ मध्ये त्या राजवाडय़ाबरोबर काढलेली ही भित्तिचित्रे या संग्रहालयामुळे आजही त्यांच्या रंग-चित्रांसह जिवंत वाटतात.
या संग्रहालयाच्या उभारणीत तत्कालीन संचालक मो. गं. दीक्षित आणि सहायक अभिरक्षक मधुकर इनामदार यांचा मोठा वाटा आहे. गावोगावी फिरून त्यांनी संग्रहालयासाठी वस्तू गोळा केल्या. या मोहिमेतच त्यांना साताऱ्याजवळच्या वडगाव येथील जयराम स्वामी मठातील भित्तिचित्रांविषयी समजले. ही शिवकालीन वास्तू अखेरच्या घटका मोजत होती. तिच्याबरोबर तिथे काढलेली मराठा शैलीतील आद्यचित्रेही धोक्यात आली होती. शेवटी इनामदार आणि त्यांचे सहकारी प. ना. पोतदार, हुसैन आदींनी चित्रांच्या या भिंतीच कापून या संग्रहालयात आणल्या. संस्कृती जतनाचे हे खरेखुरे काम! पण त्यासाठी असेच कर्तव्यदक्ष, उत्साही अधिकारीही असावे लागतात. वेळीच केलेल्या या प्रयत्नांनी सतराव्या शतकातील ती दुर्मिळ भित्तिचित्रे सातारच्या या संग्रहालयात आजही सुरक्षित आहेत.
चैत्रगौरीच्या पडद्यावरील चित्रकाम, काचचित्रे, लघुचित्रे, व्यक्तिचित्रे, रागमालाचित्रे ही या चित्रदालनाची आणखी काही वैशिष्टय़े! कोणा बजाबा बाळाजी नेने नावाच्या प्रतिभासंपन्न चित्रकाराने एकोणिसाव्या शतकात काढलेली महाराष्ट्र स्थलदर्शनमालेतील रेखाचित्रे आज इतिहासासाठी संदर्भ-साधन ठरत आहेत. खरे तर जतनसंस्कृतीतून संग्रहालयातील प्रत्येकच वस्तूला ही किंमत येत असते.
या चित्रांशेजारीच वस्त्र आणि मध्ययुगीन वस्तूंचे दालन आहे. शाहू महाराजांच्या अंगरख्यावरील मानचिन्हे, छत्रपती प्रतापसिंह यांचे छत्र, नाना फडणीसांचा अंगरखा, जरीच्या साडय़ा, पैठणी, उंची तलम वस्त्रे, मराठेशाही पगडय़ा असा कपडय़ांचा जामानिमा इथे पुढे येतो.
दुर्मिळ वस्तूंचीही हीच गंमत! मराठेशाहीतील नाण्यांचे प्रकार, शिवराई ते सुवर्ण होनांचा तो प्रवास, बुद्धिबळ, सोंगटय़ा, गंजिफ्यांचे खेळ, देवतांच्या धातूंच्या मूर्ती, लामणदिवे, वाद्ये, मोजमापे, नक्षीची भांडी, कुंकवाचे करंडे, काचेच्या हंडय़ा, पिकदाणी, पानाचे डबे, अडकित्ते, कातडी बुधले, रिकिबी, जरीचे खोगीर, लगामांचे प्रकार आणि अशाच कितीतरी वस्तू पुढे येतात. गतकाळाशी नाते सांगत यातली प्रत्येक वस्तू आणि हे संग्रहालय शिवकाळाची संस्कृती सांगत असते.. छत्रपती शिवरायांचे ते स्वराज्य दाखवत असते. सातारची ही गादी इतिहासातील मराठेशाही जागवत असते.
(छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय, सातारा. हे संग्रहालय कार्यालयीन वेळेत सर्वासाठी अल्पदरात खुले आहे. संपर्क- प्रवीण शिंदे- दूरध्वनी- ९४२२१२६२१९.)
अभिजित बेल्हेकर
abhibelhekar@gmail.com