Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

पारो बुढी तिच्या फाटक्या घरात यकटीच ऱ्हात व्हती. तिले चांगलं पार्वती नाव ठिवलं व्हतं मायबापायनं. पार्वतीची आधी पारोती झाली आणि मंग फक्त पारोच राह्यलं. आतातं सगळे तिले पारो बुढीच म्हणतेतं. पारोच्या पोराचं नाव हाणुमंता. गेल्साली हाणुमंताचं दोन एकर शेत सावकारानं हाडपलं आन हाणुमंतानं गळ्याले फास लावून घेतला. हाणुमंता मेल्यावर लय कोणकोणते साहेब आल्ते घरी. त्यायनं हाणुमंताच्या बायकोले पैसेबी देल्ले म्हण्ते. पण हाणुमंताची बायको पैसे आन दागिने घिऊन लेकरायसकट माहेराले गेली नं तिकडचीच झाली. पारो बुढी यकटीच राह्यली. फुटका चष्मा घालून बुढी गावात हिंडे आन लोकायचे भांडे घासून दोन टायमाचं कसंतरी भागवे. परवा रात्री बुढी घरी आली आन भाकरी थापाले म्हणून तिनं जवारीचं पीठ परातीत वतलं. तं शेजारच्या झोपडीतला सुदामा वरडला, ‘आवं बुढे, भाकर कायले थापतं? परचार सभा हायेनं चौकात, तिथंसा जवन तं फूकटच हाये आपल्याले!’ बुढीनं परातीतलं पीठ डब्यात वापस वतलं आन तिच्या गालाले भल्ली मस्त खळी पडली. फुटक्या चष्म्याची काच ठिगळ लावलेल्या लुगडय़ाच्या पदरानं पुसता पुसता पारो बुढी वरडली, ‘सुदाम्या, कायची सभा हाये रे बाबा?’ सुदामा झोपडीतून भायेर आला आन चिमटीत नाक पकडून त्येनं आधी फुर्रफुर्र केलं. मंग पैजाम्याले बोटं पुसंत बोल्ला, ‘आवं बुढे विलेक्षण हाये ना, त्येच्या परचाराची सभा हाये. मंघाचतं सांगून गेले पोट्टे, का आज तिकडं जवनभी मिळंल म्हणून!’ बुढी मनातून लय हारखली. कमरंला खोचलेली चंची हातानं वढून तिनं तयहातावर काळा तंबाखू घेतला, मंग चुन्याची डबी काहाढून चुना घेतला आन मळा लागली. तंबाखू मळून झाल्यावर तिनं सुदाम्यापुढं हात केला आन दोघानंबी चिमूट चिमूट दाढंखाली धरली. मंग पच्कन थुकत सुदाम्या बोल्ला, ‘सह्याद्रीच्या बातम्या संपल्या की जाऊ, मी तुले आवाज देतो’ झोपडीच्या भाईर उभी असलेली खाट बुढीनं आडवी केली, तिच्यावर गोधडी आंथरली आन बसली. सुदाम्याच्या घरून तिले सह्याद्रीचा आवाज आला- आजच्या ठळक बातम्या.. तिले आठवलं, हाणुमंतानं गळ्याले फास लावला तवा त्याचं नाव बी बातम्यात सांगतलं व्हतं.. बुढीनं चष्मा काढला. चष्मा पुसावा का डोये पुसावे, तिले समजेना..

सुदाम्यानं पारो बुढीले तिचा हात धरून सभेले नेलं. आसपासच्या ल्हान ल्हान खेडय़ा-पाडय़ांमधले शे-दोनशे लोकं जमले व्हते. लाऊडस्पीकरबी लावलेला व्हता. त्याच्यावर साबरमतीके संत तुने कर दिया कमाल.सुरू व्हतं..मंग दोन-चार गाडय़ा आल्या. समदी माती आन कचरा उडून लोकायच्या डोयांमधी गेला. त्या गाडीतून कोणीतरी साहेब उतरला तं त्याले लोकायनं हारगिर घातले. मंग लोक जिंदाबाद, जिंदाबाद वरडले तं पारो बुढीनंबी यकदा जिंदाबाद म्हणलं, पण तिचा आवाज भाईर पडला नाही, कावुनका तिले लागली व्हती भूक! मंग त्यो साहेब हातात भोंगा धरून काय काय बोल्ला. ‘त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, गरिबांची पिळवणूक केली, आम्हालाच मते द्या..’ भाषण झालं आन मंग सगळ्यायले प्लास्टिकचे चौकोनी डबे वाटले. त्यात गरमगरम फोडणीचा भात व्हता.सुदाम्या बुढीले बोल्ला का ह्या भाताले बिर्याणी म्हणतेतं. बुढीनं मिटक्या मारत भात खाल्ला. यक डबा सोबत घरलेबी घेतला. खाल्लेल्या डब्यावरचा कागद एका हातात जपून ठिवत बुढीनं सुदाम्याले विचारलं, ‘चांदीचा कागद व्हय कारे सुदाम्या?’ सुदाम्या हासला आन म्हणाला, ‘मॅड झाली का वं बुढे? चांदीचा कागद वाटाले मोगलाई लागली का?’ मंग बुढीनं कागद चुरगाळून फेकून देल्ला. त्यवढय़ात लय गलका झाला. सुदामा वरडला, ‘आवं बुढे घूस गर्दीत, साहेब पैसे वाटा लागला वाटते!’ पारो बुढी घुसली गर्दीत. यका कार्यकर्त्यांनं बुढीले सायबापुढे उभी केलं आन बोलला, ‘हिच्या पोरानं गेल्साली आत्महत्या केल्ती,शेतात गयफास लावून घेतला त्येनं.!’ सायबानं बुढीच्या हाती हजाराची नोट ठिवली आन बुढीच्या पाया पडला, ‘आई आशीर्वाद आसुद्या तुमचा!’ बुढीनं त्याच्या पाठीवर हात ठिवला आन हजाराची नोट चंचीत टाकून चंची हातात घट्ट धरली. घरी गेल्यावर बुढी कंदीलाच्या उजेडात नुसती नोट पाहात बसली होती. घासलेट संपून कंदील इझला तवाच झोपली बुढी

बुढीले नवीन चष्मा घ्याचा व्हता, लुगडं घ्याचं व्हतं आन हाणुमंताच्या फोटोले फ्रेम बसवाची होती. बुढी तालुक्याच्या बाजाराले गेली आन हात हालवत, उदास मनानं वापस आली. चष्मेवाला, लुगडंवाला कोनीबी तिच्यावर इस्वास ठेवला न्हाय. ‘कायवं बुढे, हाजाराची खोटी नोट देतं का आम्हाले!’ ‘नायरे बाबा, खरी नोट हाय,मले सायबानं देल्ली’ आसं बुढीनं रडू रडू सांगितलं, पण कोणालेबी ते खरं वाटलं न्हाई. ‘तुह्याजवळ हाजाराची नोट कशी यील वं?’ आसं समदे म्हणे. रडकुंडीले यिऊन बुढी यका चहाच्या टपरीजवळ बाकडय़ावर बसली. लई कल्ला झाला म्हणून तिनं पाह्यलं, तं नोटा वाटणारा साहेब हात जोडून रस्त्यानं चालला व्हता. बुढी घुसली गर्दीत, त्याच्यापुढं जाऊन उभी राह्यली आन हात जोडून बोल्ली, ‘चिल्लर देनं रे बाबा हजाराची मले, नोटीले कोनी हातच लावत न्हाय!’ कार्यकर्त्यांनी तिला ओढून दूर केलं! सायबाले आठवंना का या बुढीले आपन कुटं पाह्यलं.!