Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

बीजिंगमध्ये पार पडलेलं गेल्या वर्षीचं ऑलिम्पिक आठवतंय. माझ्या स्मरणात ते विशेषत्वानं राहिलं आहे ते तीन-चार कारणांमुळे. त्या ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच वर्षांनी भारतानं सुवर्णपदक पटकावून पदक-तालिकेत स्थान पटकावलं होतं, हे जसं एक कारण; तसंच भारताच्या लोकसंख्येच्या एक-शतांशापेक्षाही कमी लोकसंख्या असणाऱ्या आणखी पाच-पंचवीस देशांनी त्या पदक-तालिकेत भारतापेक्षा वरचं स्थान पटकावलं होतं, हे दुसरं कारण.
पण याहीपेक्षा महत्त्वाची आणखी दोन कारणं होती. पैकी एक- यात दोन आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिटस्नी बजावलेली उत्तुंग कामगिरी! त्यांतला एक होता अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्पस् आणि दुसरा जमेकाचा युसेन बोल्ट. मायकेलनं जलतरणातला एकाच वर्षी सात सुवर्णपदकं पटकावण्याचा आजवरचा विक्रम मोडला होता, तर बोल्टनं धावस्पर्धेत एकाच वर्षी तीन सुवर्णपदकं पटकावून नवा विक्रम रचला होता.
मी त्यावेळी अमेरिकेत होतो. फेल्पस् आणि बोल्टचा तो विक्रम सारी अमेरिका आणि जमेका डोळ्यांत प्राण आणून पाहत होती, हे मी अनुभवलं आहे. जमेकाचं यश एवढय़ापुरतंच वैशिष्टय़पूर्ण नव्हतं. सहभागी २०४ लहान-मोठय़ा देशांमध्ये जमेकानं ६ सुवर्ण, ३ रौप्य व २ ब्राँझ पदकं पटकावून तेरावा क्रमांक मिळवला होता.
जमेका माझ्या लक्षात होता तो आणखी एका कारणानं. माझ्या कॉलेजच्या दिवसांत जेम्स बॉण्डचे जेवढे म्हणून चित्रपट मी पाहिले होते, त्यातले ‘लिव्ह अ‍ॅण्ड लेट डाय’, ‘डॉक्टर नो’, ‘फॉर युवर आईज ओन्ली’, ‘दि मॅन विथ द गोल्डन गन’, ‘ऑक्टोपसी’ हे चित्रपट इयान फ्लेमिंगच्या ज्या कादंबऱ्यांवर बेतलेले होते, त्या साऱ्यांना जमेकाची पाश्र्वभूमी होती आणि फ्लेमिंगही बराच काळ जमेकात राहिलेला होता.
* * *
असा हा जमेका ‘टिकलीएवढा देशां’च्या संकल्पनेत बसणारा आहे, हे गेल्या वर्षी अमेरिकेला जाईपर्यंत स्ट्राइक झालं नव्हतं. हा देश खरं पाहता वेस्ट इंडियन बेटांपैकी एक. कॅरेबियन समुद्रात ब्रिटिश राष्ट्रकुलात मोडणारे जे देश आहेत, त्यापैकीच हा एक. इथे घटनात्मक राजेशाही आहे व संसदीय लोकशाहीही.
हा देश ११ हजार ५२५ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा. लोकसंख्या २० लाखांपेक्षा थोडी अधिक. दंतुर किनारपट्टीचा हा देश. स्वाभाविकपणेच इथल्या सागरकिनाऱ्यावर नैसर्गिक बंदरं अनेक. जमेकाची राजधानी किंग्जस्टन. हे जगातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर.
एकेकाळी हा देश ‘लॅण्ड ऑफ वुड अ‍ॅण्ड वॉटर’ म्हणूनच ओळखला जात असे. ‘जंगल व पाण्याचा प्रदेश’ हे त्याचं सोप्या भाषेतलं वर्णन. स्वातंत्र्यानंतर गेल्या ५० वर्षांत जमेकात जंगलही फारसं राहिलेलं नाही आणि इथल्या नद्याही तुलनेनं लहान असल्यानं पाण्याचा- म्हणजे समुद्राच्या पाण्याचा म्हणावा असा देश- हेच त्याचं स्वरूप बनलं आहे.
जमेका वसला आहे पनामा कालव्याच्या शिपिंग लेनमध्ये. उत्तर अमेरिकेतल्या तसेच लॅटिन अमेरिकेतल्या बाजारपेठांना हा कालवा- ही शिपिंग लेन जवळ असल्यानं किंग्जस्टन बंदरात कंटेनरची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असते. गेल्या काही वर्षांत तर या बंदराच्या कंटेनर टर्मिनलचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. किंग्जस्टनकडे येणाऱ्या विशाल व अतिविशाल कंटेनरना मार्गदर्शन करण्यासाठी जमेकानं दहा द्वीपगृहांचं जाळंच या परिसरात उभारलं आहे.
किंग्जस्टनसारखीच पोर्टमोर, स्पॅनिश टाऊन, मँडेव्हिले, ओशो रिओज, पोर्ट अ‍ॅण्टोनिओ, मॉण्टेगो बे ही जमेकातली महत्त्वाची शहरं आहेत. त्यातही सेण्ट अ‍ॅनस्मधला डन रिव्हर फॉल, सेण्ट एलिझाबेथमधला वाय एस फॉल, पोर्टलॅण्डमधला ब्ल्यू लगून, पोर्ट रॉयल ही पर्यटकांना आकर्षित करणारी आणखी काही ठिकाणं जमेकात आहेत. अ‍ॅटलांटिक महासागरातल्या वादळटापूत जमेका येतो. त्यामुळे लहान-मोठय़ा वादळांचा पाळणा तिथे दरवर्षीच हलतो. असं असूनही जमेकाचं आकर्षण कमी होताना दिसत नाही.
२००१ च्या जनगणनेप्रमाणं जमेकाची लोकसंख्या ही बहुतांश आफ्रिकन वंशाची आहे. त्यांचं प्रमाण ९१ टक्के. अन्य वंशीय जमैकन सहा टक्के. उरलेल्या तीन टक्क्यांत भारतीय, चिनी, ब्रिटिश, आयरिश व जर्मन. इथं चीन, हैती, क्युबा, कोलंबिया व लॅटिन अमेरिकेतून स्थलांतर मोठय़ा संख्येत होत असतं. सध्याच २० हजार लॅटिन अमेरिकन, ७ हजार अमेरिकन जमेकात राहताहेत. पण त्याचबरोबर गेल्या काही दशकांमध्ये हजारो जमैकनही स्थलांतरित होऊन इंग्लंड, अमेरिका, कॅनडात जाऊन स्थायिक झाले आहेत.
ख्रिश्चॅनिटी हा जमेकाचा मुख्य धर्म. त्याचे समर्थक सुमारे ६५ टक्के. त्याखेरीज उरलेल्यांमध्ये इस्लाम, बहाई, बौद्ध आणि हिंदू आहेत. अत्यल्प प्रमाणात ज्यूही आहेत. डॉक्टर बर्ड हा जमेकाचा राष्ट्रीय पक्षी. लिग्नम व्हिटे हे राष्ट्रीय फूल. ब्लू महोई हे राष्ट्रीय झाड. अ‍ॅकी आणि सॉल्टफिश ही राष्ट्रीय डिश. तर ‘आऊट ऑफ मेनी, वन पीपल’ हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य. विविध वंश आणि संस्कृतींमधली एकता हा त्याचा गर्भितार्थ. ‘अनेकता में एकता’, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाशी साधम्र्य सांगणारं असं हे बोधवाक्य.
* * *
जमेकातील पायाभूत प्रवास-सुविधांमध्ये रस्ते वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, नौका वाहतूक आहे आणि हवाई वाहतूकही आहे. पण जमेकाची अंतर्गत वाहतूक व्यवस्था सर्वाधिक अवलंबून आहे, ती रस्ते वाहतुकीवर. जमेकात रस्त्यांचं जाळं आहे १३,०४९ मैलांचं. त्यातले ९,३२१ मैल लांबीचे रस्ते बांधून काढलेले आहेत. रेल्वे वाहतुकीला मात्र जमेकात महत्त्वाचं स्थान नाही. एकेकाळी १६९ मैल लांबीचे लोहमार्ग जमेकात होते. पण आता त्यातले जेमतेम ३५ मैल वापरात उरले आहेत आणि त्याचाही प्रामुख्याने वापर केला जातो तो बॉक्साइटची ने-आण करण्यासाठीच.
नॉर्मन मॅनले इंटरनॅशनल एअरपोर्ट- किंग्जस्टन आणि सैंगस्टर इंटरनॅशनल एअरपोर्ट- माँटेगो हे जमेकातले दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ. अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी स्थानिक खासगी कंपन्यांची विमानं आहेत.
जमेकाचं वेगळेपण आहे ते गुन्हे-जगतात! संयुक्त राष्ट्रसंघाच्याच आकडेवारीप्रमाणं गेली अनेक र्वष सर्वाधिक खुनांसाठी जमेका जगात कुप्रसिद्ध राहिलेला आहे. जमेकाचे माजी पंतप्रधान पी. जे. पॅटर्सन यांनी हे आव्हान अभूतपूर्व असल्याचं म्हटलं होतं. २००५ साली जमेकात १६७४ खून झाले होते. दर लाख लोकसंख्येमागं हे प्रमाण ५८ इतकं होतं. २००८ सालात तर समलिंगी संबंध राखणाऱ्यांविरोधात संतप्त नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना अमेरिकी प्रशासनालाही हादरवून टाकणाऱ्या ठरल्या होत्या.
* * *
जमेकात संसदीय लोकशाही आहे. पण मुळात हे राष्ट्र ब्रिटिश राष्ट्रकुलातलं असल्यानं इथं स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही येऊनही घटनात्मक राजेशाही कायम आहे. राणी एलिझाबेथचंच राज्य इथं चालतं. तिच्या वतीनं काम पाहण्यासाठी पंतप्रधानांच्या सल्ल्यानं गव्हर्नर जनरलची नियुक्ती केली जाते. पॅट्रिक अ‍ॅलन हे जमेकाचे विद्यमान गव्हर्नर जनरल, तर ब्रूस गोल्डिंग हे पंतप्रधान.
१६ व्या शतकात स्पॅनिशांनी इथं वसाहत स्थापन केली. मूळ आरावाक इंडियनांची हकालपट्टी करून स्पॅनिशांनी आफ्रिकेतील नीग्रो गुलामांना आयात करण्यास सुरुवात केली. १६६५ मध्ये जमेका इंग्रजांच्या ताब्यात गेला. १६७० मध्ये स्पॅनिशांनी इंग्रजांचा हक्क मान्यही केला. ब्रिटिश इथं आले, त्यांनी ऊस, कोको, कॉफी, केळी यांची लागवड सुरू केली. १८३४ मध्ये गुलामगिरी कायद्याने संपुष्टात आणली. जमेकातले नीग्रो गुलाम स्वतंत्र झाले, पण जमीनमालकांना मजुरांची गरज होतीच. मग चिनी-भारतीय नोकरांची आयात सुरू झाली.
१९३० च्या जागतिक आर्थिक मंदीचा फटका जमेकालाही बसला. जगभर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. ब्रिटिश वसाहतींमध्ये तर ते मोठय़ा प्रमाणावर होते. ४४ साली स्वायत्त राज्यकारभाराची घटना जमेकात बनविण्यात आली. ७८ साली जमेका वेस्ट इंडिज राष्ट्रसमूहात सामील झालं; पण तीनच वर्षांत ते बाहेरही पडलं. ६ ऑगस्ट १९६२ ला मात्र जमेकाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा प्राप्त झाला.
नवीन राज्यघटनेप्रमाणं जमेकात द्वि-सदनी संसद निर्माण झाली. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् (कनिष्ठ सभागृह) आणि सिनेट (वरिष्ठ सभागृह) १९९२ ते २००२ अशी सलग दहा वर्षे पॅटर्सन यांनीच पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्यांची कारकीर्द संपुष्टात आली ती मार्च २००६ मध्ये. त्याआधीच फेब्रुवारी २००६ मध्ये पोर्शिया सिम्पसन- मिलर या सत्तारूढ पीपल्स नॅशनल पार्टीच्या अध्यक्ष बनल्या होत्या. पॅटर्सन यांनी सत्ता सोडल्यावर पोर्शिया मिलरच जमेकाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या; पण त्यांची कारकीर्दही अल्पायुषी ठरली.
सप्टेंबर २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जमेका लेबर पार्टीनं ब्रूस गोल्डिंग यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला. जमेकात द्विपक्षीय लोकशाही आहे. पीपल्स नॅशनल पार्टी आणि जमेका लेबर पार्टी हे ते दोन पक्ष. नॅशनल डेमोक्रॅटिक मुव्हमेण्ट या पक्षानं गेल्या दशकात जन्म घेतला असला तरी सप्टेंबर २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ८ लाखांच्या मतदानात त्या पक्षाला पाचशेपेक्षा जेमतेम थोडी जास्त मतं मिळाली होती. त्यामुळे त्या पक्षाचं स्थान आज तरी नगण्यच आहे.
जमेका येत्या ६ ऑगस्टला ४७ वर्षांची वाटचाल पुरी करून ४८ व्या वर्षांत प्रवेश करील. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे वेध गोल्डिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लागले आहेत. मजबूत अर्थव्यवस्था, स्वायत्त सरकार, बेरोजगारीचं निर्मूलन या दिशेनं वाटचालीस प्रारंभ झाला आहे.
प्रिन्सिपॅलिटी ऑफ लिख्टेनश्टाईन
राजधानी -किंग्जस्टन
क्षेत्रफळ - ११५२५ चौरस किलोमीटर
लोकसंख्या - अदमासे २० लाख
धर्म - ख्रिश्चन
स्वातंत्र्यदिन - ६ ऑगस्ट १९६२
राजाधिष्ठित संसदीय लोकशाही
सुधीर जोगळेकर
sumaja51@gmail.com