Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

वादळी व काहीसं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व लाभलेले समाजवादी कार्यकर्ते डॉ. अरुण लिमये (१९३८-१९८२) यांच्या २६ व्या स्मृतीवर्षांनिमित्त ‘डॉ. अरुण लिमये : आठवणींचा कॅलिडोस्कोप’ या त्यांच्या आप्तस्वकीयांनी जपलेल्या त्यांच्या हृद्य आठवणींच्या संग्रहाचे प्रकाशन आज, १२ एप्रिल रोजी पुणे येथे होत आहे. त्यानिमित्त-
रूढार्थाची जीवनसरणी सोडून आणीबाणीपायी घडलेल्या तुरुंगवासापासून, अर्धवट वयात आतून उभा दावा मांडणाऱ्या ल्युकेमियापासून, वैद्यकीय क्षेत्रातल्या भ्रष्टाचारापर्यंत आणि अकाली मृत्यूपर्यंत अनेक पातळ्यांवर लढत राहिलेल्या लिमये यांची अखेरच्या दिवसांतली ही एक दुर्मिळ आठवण- एक उपचारक व्यावसायिक, युक्रांदचा कार्यकर्ता, समाजसेवक, रुग्ण, लेखक (क्लोरोफॉर्म, लाखमोलाचा जीव) आणि सुहृद अशा त्याच्या नाना रूपांतून कायम उठून दिसायचा तो त्याच्यातला हाडाचा कार्यकर्ता.
बी. प्रेमानंद या ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (FIRA)’च्या अध्यक्षांनी चालविलेल्या Indian Sceptic या छोटेखानी मासिकाच्या मार्च २००७ च्या अंकात त्यांनीच लिहिलेल्या लेखांकाचे हे स्वैर भाषांतर वाचा.. ‘..२५ वर्षांपूर्वीची गोष्ट. श्रीलंकेतून प्रगटलेला एक बुवा आपल्या माथ्यावर १०१ नारळ फोडून दाखवण्याचे जाहीर कार्यक्रम करत असे. आपण ईश्वरी कृपेमुळे फक्त हे नारळपाणी पिऊन जगतो, असा त्याचा दावा होता. अंधश्रद्धांना सातत्याने पुष्टी देणाऱ्या एका साप्ताहिकाने या नारळीबाबाला भरपूर प्रसिद्धी दिली आणि ‘इंडियन कमिटी फॉर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेमस् ऑफ द पॅरानॉर्मल’ या बी. प्रेमानंद आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या संघटनेला जाहीर आव्हान दिलं की त्यांनी चमत्कारी बाबांप्रमाणे डोक्यावर नारळ फोडून दाखवावेत. प्रेमानंदजींनी आठवडय़ाभरात आपल्या दहा-बारा कार्यकर्त्यांना हे तंत्र शिकवले. त्यांनी यशस्वीरीत्या प्रात्यक्षिक केलेच; शिवाय ऐन वेळी त्या भोंदू साधूच्या मऊ नारळांच्या बॅगेची नेहमीच्या कडक नारळांनी भरलेल्या बॅगेशी अदलाबदल करून त्याचा पुरता भांडाफोड केला. त्यानंतर सतत महिनाभर त्यांनी हे नारळफोडीचे व इतर प्रयोग करून अख्खा केरळ विंचरून काढला.
वृत्तपत्रांनी आपापली धार्मिक धोरणं बाजूला ठेवून या उपक्रमाला अमाप प्रसिद्धी दिली. परिणामी, त्याला ग्रामीण भागांतून आणि शहरांतून अनुक्रमे पाच हजार ते पन्नास हजार लोकांची झुंबड उडे. एका लहानशा नाटय़प्रवेशाने आरंभ करून मग प्रेमानंदजी आणि त्यांचे पन्नास कार्यकर्ते रिंगणात उतरत. त्यानंतर खांद्यांना हुक्स लावून मोटरगाडी ओढत नेणं, शंखातून, हातांतून अंगारा काढणं इ. ‘चमत्कार’ दाखवल्यावर शेवट होई, पेटलेल्या निखाऱ्यांवरून अनवाणी चालत जाण्याच्या सर्वात प्रभावी प्रयोगाने. यात प्रेक्षकांतले पुरुष, बायका, लहान मुलंही उत्साहाने भाग घेत. कार्यक्रमाचा पूर्णविराम प्रेमानंदजींच्या खास आव्हानाने होई- ‘कोणाही गुरूने वा साधूने वा इसमाने पुढे यावं, चमत्कार करून दाखवावा व एक लाख रुपये जिंकावेत.’
मग त्यांच्याकडे देशभरातून कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणपत्रांचा पाऊस पडला. आमंत्रणांना ठोक उत्तर जाई, ‘किमान एका पंधरवडय़ात सहा कार्यक्रमांचं संयोजन केल्यास आमंत्रण स्वीकारता येईल.’
..त्यातच एक पत्र होतं, एका पुणेकराचं. त्याला प्रतिसाद आला नाही, तेव्हा एखाद्या धर्मवेडय़ाचा आपल्याला जाळ्यात ओढण्याचा डाव असावा, अशी प्रेमानंदजींना शंका आली. पण लवकरच ती अकारण ठरली. पत्रलेखक होते, त्यावेळी कर्करोगग्रस्त असलेले डॉ. अरुण लिमये.
प्रस्तुत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमामुळे अरुणभाई इतके प्रभावित झाले की, त्यांनी ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संस्था व स्थानिक शिक्षणसंस्थांची सांगड घालून सक्रिय सहकार्य मिळवले आणि महाराष्ट्रभर तीन महिन्यांची एक विज्ञानयात्रा आखली. तीन दिवसांतला पहिला दिवस प्रेमानंदांसाठी ठेवलेला असे.
अरुण लिमये त्या वेळी ल्युकेमियावर निघालेल्या प्रायोगिक औषधांचा उपचार करून घेणाऱ्या तीनशे रुग्णांपैकी एक होते आणि त्यांच्यापैकी सहास एक, या प्रमाणात रुग्ण जिवंत होते!
‘डॉ. लिमये यांना खरं तर संसर्गाच्या भीतीमुळे आमच्याबरोबर येण्याची वैद्यकीय बंदी होती,’ प्रेमानंदजी लिहितात, ‘पण मी लाख मनाई करूनही ते दौऱ्यात बरोबर राहिले. त्यांनी त्या वेळी दिलेल्या उत्तराने मला निरुत्तर केलंच; ते मला कायमचा चटकाही लावून गेलं- ‘लोकांच्या अंधश्रद्धांचं उच्चाटन करावं, त्यांच्या चमत्कारांवरचा विश्वास दूर करायचा मार्ग शोधावा, याचा मला आयुष्यभर ध्यास लागलेला होता. तुम्ही घरा-घरांत पोहोचून माझं स्वप्न साकार केलंत. आता मी कोणत्याही क्षणी मरायला तयार आहे.’
झालं तसंच. थोडय़ाच दिवसांत अत्यवस्थ अरुणना गाडीत घालून रातोरात मुंबईच्या रुग्णालयात दाखल करून लगेच दौरा गाठायची पाळी प्रेमानंदजींवर आली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ते कार्यक्रमाद्वारे अंधश्रद्धांचा बिमोड करत असताना त्यांना एक चिठ्ठी मिळाली- ‘डॉ. लिमये मुंबईत निधन पावले असून त्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रम बंद करावा व ताबडतोब अंत्यदर्शनासाठी रवाना व्हावं.’ प्रेमानंद पुढे लिहितात- ‘मी ती सूचना नाकारली. कार्यक्रम चालू ठेवलाच. उलट ‘द शो मस्ट गो ऑन’ या धारणेतून त्या दिवशी नेहमीपेक्षा जस्तच कार्यक्रम केले. ही मोहीम अखंड चालू राहावी हीच अरुणभाईंची शेवटची इच्छा होती, हे मी माझ्या सहकाऱ्यांना पटवलं आणि तोच धडाका आता-आतापर्यंत म्हणजे मला कर्करोगाने गाठेपर्यंत चालू ठेवला. डॉ. कोव्हूर आणि डॉ. लिमये हे माझे प्रेरणास्रोत होते. अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रमांची अखंड पुष्पमाळ घालून मी डॉ. लिमये यांना श्रद्धांजली वाहिली.’
सांप्रतच्या कठीण समयी सुबत्तेच्या आणि माध्यमांच्या जोरावर पुनश्च बोकाळलेल्या अंधश्रद्धावादाची आणि जातीपंथाच्या भेदांमुळे उफाळलेल्या उग्रवादाची कोंडी फोडण्यासाठी सत्तरीतल्या, व्याधीमुक्त आणि सदा झुंजार अरुण लिमये यांनी आपली कृतिशीलता कशा प्रकारे पणाला लावली असती, काही कल्पना करता येते?
पद्मजा फाटक (मजेत)