Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

संजय भास्कर जोशी यांची ‘श्रावणसोहळा’ ही नवी कादंबरी ‘पद्मगंधा प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध होत आहे. या कादंबरीतले एक प्रकरण

प्रिय चि. नम्रता,
हे माझे तुला पहिलेच पत्र, किती दिवस झाले कुणाला असं पत्र वगैरे लिहून. पण परवा घाईत होतीस आणि आपल्या श्रावणसोहळ्याचं सगळं डिटेल ईमेलमध्येच पाठव म्हणालीस म्हणून हे पत्र पाठवत आहे. हे ‘आपल्या’ श्रावणसोहळ्याचं म्हणालो, त्याचं क्षणभर मलाही आश्चर्य वाटलं, पण बघता बघता तुझा श्रावणसोहळा आपला श्रावणसोहळा झाला खरा. माझं मलाही कळलं नाही हे कसं झालं ते. पण जेमतेम काही महिन्यांपूर्वी मी इतका वैतागलो होतो जगण्याला, की विचारू नकोस. तू भेटल्यावर मात्र मजा आली. अन् आता हा श्रावणसोहळा. बराच विचार केला मी. सोहळा, सण, उत्सव हेच बरोबर होईल तुझ्या डिपार्टमेंटला सजवायला. कारण सजवणं या शब्दातच सोहळा करणं येतं बघ. तुझा तो कोण विद्याधर आहेना. त्याला बरोब्बर कळलंय हे बहुतेक. ए नमू, मत्सर वगैरे नाही हं तुझ्या त्या विद्याधरचा. असा बॉस मिळायला पण नशीब लागतं बरं का. नवरा, बॉस आणि मित्र हे नशिबानंच चांगले मिळतात बघ. कधी वाटतं आमच्या मालतीला माझ्याहून अधिक चांगला नवरा मिळायला हवा होता. माझ्या चक्रम आणि एका रेषेतल्या आयुष्यात पोतेरं झालं तिचं. पण ते जाऊ दे. तुला निदान चांगला बॉस मिळाला, मित्रही असतील बरेच. मला मित्र समजतेस की नाही कोण जाणे. नवरा मात्र चांगला मिळेल तुला. दळवी नावाचा एक मित्र होता माझा. वारला बिचारा. तो म्हणायचा, उशिरा मिळालेलं ज्ञान काही उपयोगाचं नाही. तो मरण्यापूर्वी मला नव्हतं समजलं, की त्याचं चुकीचंच होतं. उशीर असा कधी नसतोच. मलाही बऱ्याच गोष्टी उशिरा समजताहेत. काही बाबतींत उपयोग होतो, काही बाबतींत होत नाही. आता गेलेली मालती काही परत येणार नाही, पण बाकी बरंच काही असतंच आजूबाजूला. तू म्हणायचीस ना, काही असं आजूबाजूला होतच राहणार, कशा कशापासून आपण पळून जाणार. ते मला भारी आवडायचं, हळूहळू ते नीट कळत आणि पटत गेलं बघ, म्हणजे गंमत आहे की नाही. मोठा म्हणून मी तुला काही शिकवायचं तर हे उलटंच झालं की नाही. मजाय त्यातही. श्रावणाचं काय असतं, नम्रता, की आपण सजवला नाही तरी तो सजलेला असतोच. श्रावण सजवणं म्हणजे आपण सजणं. श्रावणसोहळा म्हणजे फक्त आपणच श्रावण होण्याचा सोहळा. बाकी तू म्हणतेस तसं आजूबाजूला काय काय घडतं, होत असतंच, नाही का?
आज दुपारी तू तुझ्या प्रमोशनची बातमी दिलीस तेव्हा वयानं असेल कदाचित पण माझेच डोळे भरून आले बघ. काही तरी मिळवणं हे फार सुंदर असतं बघ पोरी. माहिताय तुला नाही आवडत असं म्हाताऱ्यासारखं तुला पोरी म्हणलेलं. पण असू दे एखाद्या वेळी. फार बरं वाटलं तुझं पहिलं यश पाहून. आपण नुसतेच असे इथे स्क्रीनवर बोलत राहिलो. कधी भेटलोच नाही. भेट कधी होईल की नाही तेही सांगता येत नाही. चकित झालीस ना? थांब सांगतो. तू तुझ्या प्रमोशनचं सांगून धक्का दिलास ना. आता मीही एक धक्का देतो. आपण श्रावणसोहळा तर जिंकणारच, नमू, पण गमतीतदेखील मला आता तुझ्याबरोबर गोव्याला काही येता येणार नाही. कारण मला पुरुषोत्तमचं पटलं. मी त्याच्याबरोबर अमेरिकेला जायचं ठरवलंय, हो. अगं श्रावण नसतील म्हणत, पण श्रावण काय तिथे नसेल होय? बघू तिथल्या मातीत इथली रोपं कशी रुजतात ते. आभाळ काय इथून तिथून सारखंच गं.
सोबतच्या कागदावर माझ्या मनातल्या श्रावणसोहळ्याची चित्रं पाठवतोय. ती बघून तुला समजेल कसा तुमचा डिपार्टमेंटचा एरिया सजवायचा ते. पुढच्या सात तारखेला आम्ही निघणार अमेरिकेला जायला. एकदा वाटलं तुला एकदा पाहिलं, भेटलं असतो तर बरं झालं असतं. पण दुसरीकडून वाटतं हेच बरंय.
काळजी घे, अजून काय सांगणार? आजूबाजूला काय काय होतच राहील, पण तू मात्र आपले श्रावणसोहळे सजवत राहा बरं का गं नमू. एक सांगतोच, मालती बायको असूनही ती मरेपर्यंत कधी तिला सांगितलं नाही ती मला किती आवडायची ते. तू तर माझी चिमुकली मैत्रीण आहेस. तुला सांगितलंच नाही असं व्हायला नको म्हणून सांगतोच. तू मला भारी आवडतेस बरं का गं नम्रता. भलतीच गोड छोकरी आहेस तू. दैवयोगानं भेटलीस. हसत, खेळत, भांडत, रडत, रडवत, चिडत, चिडवत राहिलीस. आपण काय पुन्हा इथे भेटणार नाही असं मुळीच नाही. इंटरनेटचं ते बरं.. मी इथे काय अन् अमेरिकेत काय, एकूण एकच. आता जितका जवळ अन लांब तितकाच तिथेही जवळ अन् लांब. पण आज हे सारं बोलावं, सांगावं असं वाटलं खरं. म्हणून बोललो. उद्याचं काय? आजचे सोहळे आजच करावेत हे मात्र पटलंय मला आता. म्हणून आता वाटलं तर तुला सांगूनच टाकलं, तू किती आवडतेस ते. कोण जाणे तुझ्या पिढीचा असतो तर याला प्रेम वगैरेसुद्धा म्हणालो असतो. तसंच काहीसं आहे बघ ते. प्रेम हा सुद्धा सोहळाच की गं. असो.
काळजी घे. अन् सुखात राहा.
तुझा लाडका ओल्डी गोल्डी मित्र,
निरंजन

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे संग्राह्य़ पुस्तक
मानवनिर्मित उपग्रहांनी मे महिन्याच्या सुरुवातीपासून काढलेल्या अरबी समुद्रावरील ढगांच्या छायाचित्रांच्या मदतीने जून महिन्यातील पावसाळ्याच्या आगमनाची तारीख ठरवतात किंवा कावळा फक्त काव काव करतो व ओबडधोबड घरटे बांधतो अशा प्रकारची आपली सर्वसामान्य जाणकारी असते; परंतु उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय पावसाळ्यातील पहिल्या पावसाच्या आगमनाच्या तारखेबरोबर त्या आगमनाची वेळसुद्धा सहा-सात महिने अगोदर ठरवता येते व त्या ठरावीक दिवशी पावसाला सुरुवात होते ही माहिती आपल्याला नसते. मार्गशीर्ष महिन्यातील एका ठरावीक दिवसापासून आपल्या डोक्यावरील आकाशाचे निरीक्षण कोठल्याही यंत्र तंत्रांशिवाय करून अगदी कोणालाही पावसाची प्रारंभ वेळ सहा महिने अगोदर समजू शकते. कावळा काव काव प्रमाणे तीसहून जास्ती प्रकारचे ‘क’युक्त आवाज काढत असतो. कावळा कृककृक, कारकोर, क्हरे क्हरे असे वेगवेगळे आवाज करून मानवाला उपयुक्त असे संकेत- संदेश देत असतो. कावळ्याने घराजवळ झाडावर काटक्यानी तयार केलेल्या घरटय़ाच्या निरीक्षणावरून शेतीच्या पुढील हंगामात धान्योत्पादन वाढेल की कमी होईल आणि पिकणाऱ्या धान्याची गुणवत्ता कशी असेल हे ओळखण्याच्या सोप्या पण शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. त्या सर्व पद्धती सर्वसामान्य माणूससुद्धा यांत्रिक, तांत्रिक वा संगणकीय उपकरणाशिवाय उपयोगात आणू शकतो. ही सर्व माहिती मनोरमा प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ‘आचार्य वराहमिहिर’ या पुस्तकातून आपल्याला मिळते. हे पुस्तक कॅप्टन आनंद जयराम बोडस यांनी लिहिले आहे.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात मध्य भारतात होऊन गेलेल्या आचार्य वराहमिहिरांच्या विज्ञानविषयक संस्कृत भाषेतील ग्रंथाच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. आचार्य वराहमिहिरांच्या ग्रंथाचा वीस वर्षांहून अधिक काळ अभ्यास करत असताना त्यातील वैज्ञानिक प्रयोग पद्धतींच्या खरेपणाची खात्री पटवून घेऊन हे लिखाण केलेले आहे. आधुनिक प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लेखकाला वराहमिहिरांचे प्राचीन ग्रंथ अभ्यासावे असे वाटण्याची कारणे पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितली आहेत. त्या निवेदनापासूनच वाचकांची विज्ञानविषयक व प्राचीन ज्ञानाविषयक उत्सुकता जागृत करून आजच्या काळातही उपयोगी होणाऱ्या शास्त्रीय माहितीचे मोठे भांडार प्रकाशात आणायचे यशस्वी काम हे पुस्तक करते. आवश्यक ती संस्कृत भाषेतील अवतरणे देऊन सोप्या, सरळ ओघवत्या मराठीतून शास्त्रीय विवेचन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. हे सर्व विवेचन प्रगत तंत्रज्ञान शिकणाऱ्या युवकांना उपयोगी पडणारे आहे. सर्वसामान्य वाचकांची ज्ञानाची भूक सहज गप्पागोष्टी कराव्या अशा शैलीने भागवण्यात आली आहे.
हवामानशास्त्र, मूर्तीशास्त्र, खनिजशास्त्र, धातूशास्त्र, भूगर्भजलशास्त्र, गृहरचनाशास्त्र, शेतशास्त्र, मानवीदेहशास्त्र, पक्षीभाषाशास्त्र, खगोलशास्त्र अशा अनेक वैज्ञानिक विषयांचे संशोधन करून आचार्य वराहमिहिरांनी सोप्या संस्कृतात ग्रंथ लेखन करून ठेवले. त्या ग्रंथाचे मराठीकरण कॅप्टन बोडसांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता उपलब्ध झाले आहे. मूळ संस्कृत ग्रंथाचे हे शब्दश: भाषांतर नसून हे एक अर्थवाही भाष्य किंवा समालोचन आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे संग्राह्य़ असे हे पुस्तक आहे.
आचार्य वराहमिहिर,
कॅप्टन आनंद ज. बोडस
मनोरमा प्रकाशन,
मुंबई, पृष्ठे- २५०
मूल्य- १५० रुपये

संस्थानी कारभाराचा सांधा बदलताना
आपल्या देशामध्ये पूर्वापार राजेरजवाडय़ांची सत्ता चालत आली आहे. या राजेरजवाडय़ांच्या मनमानी आणि एककल्ली कारभारामुळे परकीयांना आपली वसाहत येथे स्थापन करण्यास वेळ लागला नाही. समाजातील जाती-पोटजातीचे फुकाचे मोठेपण आणि सत्ताधीशांचे एककल्ली राजकारण यातूनच ब्रिटिशांना आपल्या देशात पाय रोवण्याची संधी मिळाली, पण समाजापासून आणि जनतेपासून फटकून राहणाऱ्या संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये एक होते बडोद्याचे संस्थानिक! त्या काळी म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या खंडप्राय देशातील प्रगत संस्थानांपैकी एक होते बडोदा संस्थान आणि त्याचे संस्थानिक गायकवाड घराणे.
सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि अनेक सामाजिक बदलांची नांदी घडवून आणली, पण सयाजीराव गायकवाडांनी ही नांदी घडवली ती त्या संस्थानाच्या सुधारणावादी संस्कृतीचा कळस होता असे मानायला हरकत नाही. बडोदे संस्थानला लाभलेले गायकवाड घराणे हे अन्य संस्थानिकांपेक्षा वेगळे होते. घराण्यात अंतर्गत वाद, कलह होतेच पण समाज जागतिक स्तरावर किती पुढारलेला आहे, याची नोंद वेळोवेळी घेत, नव्या बदलांचे स्वागत या घराण्याने केले आहे. इतकेच नाही तर प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या साधनांचा उपयोग आपल्या राज्यात कसा करता येईल, याबाबतही विचार होत असे. ब्रिटिशांनी १८५३ मध्ये भायखळा म्हणजे मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सुरू केली ती प्रामुख्याने दळणवळण अधिक गतीने व सुलभ व्हावे यासाठी! पण यामुळेच या शहराच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटिशांचा अंमल सर्व संस्थानांवर नव्हता. ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली आणि त्यातून साधली जाणारी प्रगती पाहून बडोदा संस्थाननेही स्वत:च्या संस्थानात रेल्वे सुरू केली. अर्थात तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे सुरू न होता ट्राम सुरू झाली.
सयाजीराव गायकवाड दत्तक म्हणून या संस्थानाच्या राजेपदी बसण्यापूर्वीचा चार-पाच वर्षांपूर्वीचा काळ हा संस्थानी राजकारणाच्या धामधुमीचा काळ होता. खंडेराव गायकवाड आणि मल्हारराव गायकवाड या भावंडांमध्ये धुसफूस सुरू होती. खंडेराव पोटाच्या विकाराने आजारी होते तर मल्हाररावांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. या दोन भावंडांच्या वादात दरबारी अधिकारी आणि काही प्रतिष्ठित जनता यांच्यातही दोन भाग पडले होते. खंडेरावांच्या निधनानंतर मल्हारराव सत्तेवर आले. खंडेरावांच्या काळात तेथे असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे वर्चस्व दरबारावर होते, ते काही प्रमाणात कमी झाले. ब्रिटिशांच्याच मदतीने बडोदा संस्थानात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न कूर्मगतीने सुरू होता किंबहुना तो थांबलाच होता. अशा वेळी या कामी ‘नारायण’ संस्थानच्या मदतीला आला.
शुभदा गोगटे यांची ‘सांधा बदलताना’ ही कादंबरी या बडोदा संस्थानच्या एकूण सामाजिक- राजकीय परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी आहे. १८६० ते १८७५ या संपूर्ण कालावधीतील बडोदा संस्थानमधील सामाजिक चित्र उभे करतानाच सरकारी पातळीवर कोणतीही योजना कशी राबवली जाते, त्यात कोणकोणते अडथळे येतात, ते अडथळे कसे दूर होतात याचेही बारकावे वाचायला मिळतात. डभोई ते करजण हा २० मैलांचा रेल्वेमार्ग सुरू व्हावा यासाठी बडोदे संस्थान ‘नारायण’च्या मदतीने प्रयत्न करत असतानाच काही विघ्नसंतोषी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मदतीने कसा अडसर आणतात, हेही वाचायला मिळते.
नारायण हा सर्वसामान्य मराठी कुटुंबातला मुलगा. रेल्वे इंजिनांच्या आवडीमुळे तो रेल्वेत कामाला लागतो. घरच्या पातळीवर तत्कालीन संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे पत्नीचा झालेला छळ तो सहन करू शकत नाही आणि तो विभक्त होतो. पण बऱ्याच वर्षांनी तो घरी येतो तेव्हा घराचे बदललेले रूप पाहून तो अचंबित होतो, पण नंतर पुन्हा आपल्या प्रपंचाकडे वळतो आणि एक नवे आव्हान त्याला बडोदे संस्थानमध्ये रेल्वे सुरू करण्याच्या निमित्ताने मिळते. या कादंबरीत नारायणचे घर आणि नंतर बडोदे संस्थानमधील त्यांची कामगिरी याचा सांधा साधताना लेखिकेची लेखनगती वेगवेगळ्या पातळीवर होते आणि मध्ये सांधा बदलताना नाही तर निखळलेला वाटतो, पण ओघवत्या लेखनशैलीमुळे हे वाचकांच्या विशेष लक्षात येणार नाही. कादंबरीतील सर्वच पात्रे बदलत्या परिस्थितीत स्वत:मध्ये बदल करताना आढळतात. म्हणजेच ते त्यांच्या जीवनाचा सांधा बदलतात. सरळमार्गी जीवन जगताना अनेकदा असा सांधा बदलणे अपरिहार्य असते. त्यातूनच जीवन प्रगतीकडे नेता येते.
संस्थानिक आणि ब्रिटिश रेसिडेंट यांच्यातील तो संघर्षांचा काळ होता. १८५७ मध्ये झालेल्या उठावामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. ब्रिटिशांचा प्रभाव वाढू लागला होता. मल्हारराव गायकवाड यांच्या काहीशा छंदीफंदी स्वभावामुळे वैतागलेल्या रेसिडेंटने अखेर मल्हाररावांना सत्ताभ्रष्ट केले आणि दत्तक विधानाच्या माध्यमातून सयाजीराव गायकवाड सत्तेवर आले. या सर्व प्रकारात डभोई-करजण रेल्वे सुरू झाली खरी, पण नारायणला पुन्हा आपल्या जागी परतावे लागले. मोठय़ा उत्साहाने संपूर्ण कुटुंबासहित बडोद्याला आलेल्या नारायणला तसेच त्याच्या कुटुंबाला परतावे लागते. आपल्या संयुक्त कुटुंबापासून दूर जाताना नारायणने सांधा बदलला, बडोदे संस्थानची नोकरी पत्करताना त्याने दुसऱ्यांदा सांधा बदलला आणि शेवटी सत्तासंघर्षांतून आपल्याच गावी परतताना त्याला पुन्हा सांधा बदलावा लागला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर असा नारायणचा सांधा बदलला, त्याचीच ही कहाणी!
प्रसाद मोकाशी
सांधा बदलताना
शुभदा गोगटे
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे : ३३०
मूल्य : २५० रुपय