Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

रात्री झोपल्यावर तहान लागलीच तर हाताशी असावा म्हणून मी उशालगतच्या टेबलावर पाण्याचा लोटा भरून ठेवतो. मी कसला ठेवतो म्हणा! आमची बायकोच शक्यतो आठवणीने ठेवते. कालच्या रात्रीतही तिने तसाच लोटा भरून टेबलावर ठेवला. त्यावर झाकण ठेवले. एक काचेचा ग्लास उपडा करून ठेवला. हा तिचा नित्यनेम आहे. बहुतेकींचा असतो. अस्मादिकांनी कधी तरी रात्री झोपेतून उठून ग्लासभर पाणी ओतून घेतले. त्यातले अर्धा ग्लास पिऊन टाकले आणि अर्धा ग्लास तसाच टेबलावर ठेवून दिला (झाकण न ठेवताच). या अध्र्या ग्लासाला आम्ही अर्धा भरलेला ग्लास म्हणतो. बरं असतं म्हणतात तसं म्हणणं. तोच ग्लास रिकामा अर्धा असला तरी तसं म्हणायचं नसतं. ते नकारात्मक वृत्तीचं लक्षण आणि त्यालाच अर्धा भरलेला म्हणणे हे सकारात्मक दृष्टीचं लक्षण, असं आम्ही कुठे तरी वाचलं होतं. आम्हाला ते पटलंही होतं. अध्र्या रिकाम्या ग्लासाला अर्धा भरलेला म्हणत फुकटचं समाधान पदरात पाडून घ्यायला आम्ही तेव्हापासून शिकलो होतो. तेव्हापासून आम्ही सदैव समाधानीच असतो.
तर झालं काय, तो काचेचा ग्लास अर्धा पाण्याने भरलेला होता. सकाळी उठून बघतो तो त्यात दोन मुंगळे पाण्यावर तरंगताना दिसले. दोघेही या जगात नव्हते. म्हणजे या जगात होतेच. परंतु जिवंत नव्हते. ते स्वर्गवासी झालेत असं म्हणावं तर कुणास ठाऊक! शक्यता असू शकते आणि नसूही शकते. पुन्हा वाटले स्वर्ग-नरक माणसांसाठी असतो की पशू-प्राणी कीटकांसाठी? मुंगळ्यांसाठी काय? शक्यता नाकारता येत नाही. असे फालतू प्रश्न उगाचच पडून गेले. एरवी आम्हाला कोणते चांगले प्रश्न पडणार म्हणा? ते जाऊ द्या. (असले प्रश्न जाऊ देण्यासाठीच असतात, किंबहुना ते प्रश्न नसतातच मुळी!) आमच्या मनाला जे वाटलं ते कुणी कसं थांबविणार? जे काय तुटक तुटक वाटत गेलं त्याची एक साखळी होत गेली. तशीच जागोजागी खंडलेली. कविसंमेलनात आयोजकाने भाडय़ाने आणलेला माईक कवीच्या हातात यावा आणि दर एका ओळीच्या शेवटी बंद पडून तिसऱ्या ओळीच्या मधल्या शब्दांवर सुरू व्हावा म्हणजे जसं होईल, तशी आमच्या मनातल्या विचारांची अवस्था होत होती. विचार झटकून टाकावे तर तेही जमत नव्हते.
ते दोन्ही मुंगळे एकाच वेळी पाण्यात बुडून मेले होते की कसे? याला काय कारण? याच्या शक्यतेविषयीचा तर्क मी करू लागलो. एकदा वाटले. त्यांचे पाय घसरून ते पाण्यात पडले असावेत. च्यायला! पाय घसरणे? मुंगळ्यांना कुठे पाय असतात? जरा वेळाने ध्यानात आले, असतात तर मुंगळ्यांना पाय असतात. हा पाय असतात, पण पावलं नसतात. पाऊल वाकडं पडलं की पाय घसरला असं म्हणतात. यात पायाला किंवा पावलांना काही इजा होत नसते. इजा होते ती इतर अवयवांना. उदाहरणार्थ मनाला. आता मुंगळ्याचं काय माणसासारखं आहे का? पाऊल वाकडं पडायला? माणसं काय कुठेही घसरतील. पण या घसरण्याला ती मजा नाहीच. हे घसरणं अगदीच मिळमिळीत झालं. पाऊल वाकडं पडून जे पाय घसरणं असतं ते खरं झणझणीत. ते असो. मुंगळ्यांचा पाय घसरण्याची शक्यता आम्ही फेटाळून लावली. शक्यता वर्तविणे आणि ती फेटाळून लावणे हे एकाच हाती असल्यामुळे ते सहज शक्य झाले. मुळात मुंगळ्याच्या बाबतीत ही असली शक्यता वाटून घेणे हेच कसे शक्य आहे? परंतु ज्या ज्या काही शक्यता वाटून घेण्याजोग्या वाटल्या त्या त्या वाटून घेण्याची आम्हाला सवयच जडली आहे. जे जे काही घडू नये असं वाटत असतं ते घडलं की ते शेजारी राष्ट्रानं केल्याची शक्यता वर्तवायचीच असते आणि अशी शक्यता दुसऱ्या राष्ट्राने नाकारून फेटाळून लावायची असते हे राष्ट्रा-राष्ट्रातील परराष्ट्रविषयक धोरणाच्या पुस्तकातलं महत्त्वाचं कलम आहे, असं म्हणतात.
आणि म्हणून आम्हीही अशा शक्यता पडताळून पाहण्याचा सपाटाच लावला. एक शक्यता अशीही असू शकते! कशी? ग्लासातलं पाणी पिण्यासाठी अनेक मुंगळे या ग्लासाभोवती जमा झाले असतील. वर चढले असतील आणि मी पुढे की तू पुढे? अशा स्पर्धेमुळे त्यांच्यात रेटारेटी झाली असेल. लोकल गाडय़ांच्या प्लॅटफॉर्मवर जसा बाया-माणसांचा लोंढा आत शिरण्यासाठी अहमहमिकेनं रेटारेटी करतो, धडपडतो त्यातलाच एखाद दुसरा म्हातारा किंवा लहान मुलगा खाली पडतो. तसेच काहीसे या मुंगळ्यांचेही झाले असावे. त्या गदारोळात हे दोन मुंगळे बिचारे ग्लासातल्या पाण्यात पडले असावेत आणि काठ बराच उंच असल्यामुळे त्यांना वपर्यंत येणे जमले नसावे. गुळगुळीत काठावरून कसं चढतील? पावलं असती तर कदाचित शक्य झालं असतं! आणि हे घडता घडता इतर मुंगळे पब्लिकसारखे तेथून पळ काढते झाले असावेत. त्या मुंगळ्यांना वाचविण्यासाठी कुणीच प्रयत्न केला नसावा. हे मुंगळे ओरडले असतील काय? च्यायला! काही तरीच वाटतं. मुंगळे कधी ओरडतात का? आणि ते लाख ओरडतील, तरी आम्हाला ते ऐकू येईल काय? शक्यता नाही वाटत. ही शक्यता, ती शक्यता असं करतानाच माझा बराच वेळ निघून गेला. मला असेही वाटून गेले की, अनेक मुंगळे पाण्यासाठी नंबर लागावा म्हणून वर चढून पुढे पुढे सरकताना एकमेकांचे पाय ओढण्याचा पराक्रम करीत असतील. तंगडीत तंगडी अडकवून दुसऱ्यांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न करीत असतील. असं असण्याची शक्यता आहेही आणि नाहीपण! नाही अशासाठी की पुढे जाऊ बघणाऱ्यांचे पाय ओढणे हीसुद्धा एक कला आहे. सगळ्यांनाच ती साध्य होत नाही आणि ही कला फक्त माणसांनाच माहिती आहे. (त्यात स्त्रिया, पुरुष सगळे आले.)
अशा शक्यतांमागून शक्यता पडताळताना मी आणखी एका शक्यतेच्या मुळाशी आलो. वाटलं, ही सरळ सरळ आत्महत्या तर नसावी. आता दोघांची आत्महत्या म्हणजे ती सामूहिक आत्महत्या म्हणावी लागेल. आता ते दोघे म्हटल्यावर नेमके कोण? हा प्रश्न तर शिल्लक उरतोच. असे वाटले, ते मित्रही असू शकतात. परीक्षेचे निकाल लागल्यावर असं घडतं. पुन्हा हा खुळचट विचार मनात आला होता. मनात म्हटले, अरे बाबा, मुंगळ्यांना कुठली परीक्षा आणि कसला रिझल्ट? काहीतरीच आपलं आणि ते मित्र-मित्र तरी कशावरून? शक्यता आहे ते मित्र-मैत्रीणसुद्धा असू शकतील. होय, हीच शक्यता जास्त. प्रेमवीर आणि प्रेमिका असणेच जास्त सोयीचे. आत्महत्येला शोभून दिसणारे तेच अधिकृत उदाहरण ठरू शकते. काय काय असू वा नसू शकते, या तर्कांच्या सतत घुसळण्यामुळे माझ्या मेंदूचा नुसता भुगा झाला होता. पुन्हा मी पूर्वपदावर आलो. वाटलं तिचं त्याच्यावर प्रेम असेल. त्याचाही तिच्यावर जीव जडला असेल. दोघांनी जीवनभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या असतील. ते अनेकदा मोहरले असतील. बहरले असतील. अंकुरले असतील. खूप खूप पुढे गेले असतील. दोन्हीकडची घरची माणसं मात्र त्याचवेळी खूप मागे असतील आणि एकदा पुढचे मागचे एकत्र आले असतील. ठरल्याप्रमाणे जातीपाती, नकार, विरोध, गरीब-श्रीमंती, खानदान सगळे मानपान उगाळून झाले असतील आणि त्याची परिणती या आत्महत्येत झाली असेल. शक्यता मुळीच नाकारता येत नाही. मी खूश झालो. म्हटले हीच शक्यता आहे खात्रीची. आणि लगेच दुसऱ्या क्षणी सपाट झालो. मनातल्या मनात म्हणालो, ‘मुंगळे मुंगळे आहेत ती माणसं नव्हेत. मुंगळ्यांना असल्या प्रेमाच्या फालतू गोष्टीत रस नसतो.’
या शक्याशक्यतेच्या गदारोळात मला ऑफिसला जायला मात्र उशीर झाला आणि एकाच जागी विचार करीत बसल्याने पायाला मुंग्या आल्या!
सदानंद सिनगारे

गाढवाला गुळाची चव नसते. कशावरून?
- बी. जे. शेख, अंधेरी

तुमचा तुमच्या पूर्वसूरींच्या अनुभवावर विश्वास नाही का?

देवापुढे व डॉक्टरकडे जाताना जोडे बाहेर काढावे लागतात. एखाद्या नवीन राजकीय पक्षात जाताना?
- अरविंद करंदीकर, तळेगाव, दाभाडे

अनवाणी जावे. आत गेल्यावर जोडे मिळतातच!

प्रेमात पडून लग्न करावं की लग्न करून प्रेम करावं?
- अशोक घेवडे, हडपसर.

आयुष्यात काही मोलाचे काम करायचे असेल तर प्रेम आणि लग्न दोन्हीपासून दूर राहा.

‘सोशल वर्क’ महाविद्यालयातील मुली जास्त भाव का खातात?
- बळवंत चांदेकर, वरोरा

बिचाऱ्या अर्धपोटी रहात असणार!

तुझी नि माझी गंमत काकोबा.. ऐक सांगतो कानात.. आपण दोघे..
- सतीश कदम, माहीम

दुरून बोलुया. शेंबुड तुझिया नाकात!

तुम्ही केलेल्या विनोदावर तुमची बायको हसते का?
- अनंत सहस्रबुद्धे, अमरावती

अहो माझीच काय, सगळ्यांच्याच बायका हसतात.

भाजीत मीठ कमी पडले तर काय करावे?
- अशोक परब, ठाणे

मिठाचे दुकान उघडेपर्यंत बसून रहावे.

लालूंनी रेल्वेला नफा मिळवून दिला. ते पंतप्रधान झाले तर देशही फायद्यात येईल का?
- अमोल टोणपे

ते पंतप्रधान झाल्यावर देश टिकला तर नक्कीच फायद्यात येईल.

पत्रिकेऐवजी आयक्यू टेस्ट घेऊन लग्न जमवायची पद्धत आली तर काय होईल?
- सुगंधा उकिडवे, पार्ले

मुलांना फारच प्रॉब्लेम येईल!(तुम्हाला हेच उत्तर अपेक्षित आहेना?)

लोक लग्न कशासाठी करतात?
- संतोषकुमार कात्रे

मुलांना आई-बाबा मिळावेत म्हणून!

डॉक्टर : माझ्याकडे तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे आणि एक अत्यंत वाईट बातमी आहे.
रोगी : ठीक, तर मग मला प्रथम वाईट बातमी सांगा.
डॉक्टर : प्रयोगशाळेतून तुमचा अहवाल आला आहे आणि त्यानुसार तुमच्याकडे फक्त २४ तास आहेत.
रोगी : काय? मी फक्त २४ तास जगणार ? यापेक्षा आणखी वाईट बातमी ती काय असणार?
डॉक्टर : नाही, ही बातमी माझ्याकडे काल आली आणि तेव्हापासून मी तुम्हाला शोधतो आहे.

पोलीस : काय रे. काल रात्री तू दारू पिऊन धुडगूस घातलास अशी तुझ्या पत्नीची तक्रार आहे.
दारूडय़ा : साहेब मी धुडगूस घातला हे कदाचित खरे असेल; पण मी नक्कीच दारू प्यालो नव्हतो.
पोलीस : कशावरून ?
दारूडय़ा : कारण मी दारू प्यालो, की माझी पत्नी धुडगूस घालते, मला वावच नसतो.

एक प्राध्यापक सभेत ‘दारूचे दुष्परिणाम’ यावर बोधपर भाषण देत होते. त्या वेळी त्यांनी एक दारूने भरलेला ग्लास मागविला व त्यात एक जिवंत गांडूळ टाकला. गांडूळ त्यात लगेच मृत पावला. तो ग्लास प्रेक्षकांना दाखवित त्यांनी विचारले, ‘यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल?’
कोपऱ्यात बसलेला एक प्रेक्षक उभा राहिला व म्हणाला ‘प्राध्यापकसाहेब दारूमुळे पोटातले जीवजंतू मरून जातात.

सदूने नवीन गाडी घेतली. दुसऱ्याच दिवशी तो गाडी घेऊन निघाला. एका सिग्नलपाशी त्याने गाडी थांबविली व गाडीतून उतरून वाहतूक पोलिसाकडे गेला व त्याने विचारले, ‘उजवीकडे वळण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?’ पोलीस त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला, त्या वेळी सदूने कोपऱ्यातील पाटीकडे बोट दाखविले. त्यावर लिहिले होते- ‘फ्री लेफ्ट टर्न’.

वाजपेयी आणि बुश एका पार्टीत हजर होते दोघेही एका बाजूला गप्पात मशगुल झाले होते. त्याच वेळी एक गृहस्थ तेथे आला व म्हणाला, ‘आपण वाजपेयी आणि बुश आहात ना? तुम्ही येथे काय चर्चा करता आहात?’
बुश म्हणाले, आम्ही तिसऱ्या महायुद्धाची योजना आखत आहोत. त्यावर वाजपेयी म्हणाले, ‘आम्ही दोन कोटी पाकिस्तानी आणि एका सायकल दुरुस्त करणाऱ्याला मारणार आहोत.’ तो गृहस्थ अचंबित होत विचारता झाला, ‘एका सायकल दुरुस्त करणाऱ्याला मारणार आहात?’ त्यावर बुशकडे वळून वाजपेयी म्हणाले, ‘पाहिलंत! दोन कोटी पाकिस्तान्यांबद्दल कोणालाही काही वाटत नाही’
- संजीव केंकरे, लालबाग, मुंबई

Some Important Laws
Which Newton Forgot to State...

LAW OF COFFEE: As soon as you sit down for a cup of hot coffee, your boss will ask you to do something which will last until the coffee is
cold.
****
LAW OF QUEUE: If you change queue, the one you have left will start to move faster than the one you are in now.
****
LAW OF TELEPHONE: When you dial a wrong number, you never get an engaged tone.
****
LAW OF MECHANICAL REPAIR : After your hands become coated with grease, your nose will begin to itch.
****
LAW OF THE WORKSHOP: Any tool, when dropped, will roll to the least accessible corner.
****
LAW OF THE ALIBI: If you tell the boss you were late for work, because you had a flat tire, the next morning you will have a flat tire.
****
LAW OF THE BATH : When the body is immersed in water, the telephone rings.
****
LAW OF ENCOUNTERS: The probability of meeting someone you know, increases when you are with someone you don't want to be seen with.
****
LAW OF THE RESULT: When you try to prove to someone that a machine won't work, it will!
****
LAW OF BIOMECHANICS: The severity of the itch is inversely proportional to the reach.
****
THEATRE RULE: People with the seats at the furthest from the aisle arrive last.
रीचा जैन