Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

सारा दुष्टपणा दुर्योधनावर ढकलून ‘आपण कर्तव्याचे पालन करीत आहोत’, ही कुरुवृद्ध-नीती श्रीकृष्णाला मान्य नव्हती. म्हणूनच दुर्योधनाच्या कपटाचा पाढा श्रीकृष्णाने सर्वासमोर वाचला; नि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कुरुवृद्धांना, द्रोण, कृपाचार्य गुरूंना खडसावून सांगितले, ‘तो प्रत्यक्ष अपराध करणारा म्हणून जितका दोषाला पात्र आहे तितकेच तुम्हीही त्याच्या अपराधाकडे केवळ स्वस्थपणे पाहणारे व स्वत:च्या सामर्थ्यांचा उपयोग न करणारे म्हणून दोषी ठरत नाही काय? तुमचे स्वत:चे कर्तव्य कठोरपणे पाळण्यास तुम्ही सिद्ध झाले पाहिजे. आपल्या कुळाच्या संरक्षणासाठी मी माझ्या मामाला-कंसाला ठार मारले. हे राजा, तसे करण्यास मी तुला सांगत नाही. हे राजा धृतराष्ट्रा, तुझा पुत्र तुझ्या आज्ञेत नसेल तर त्याला बंदी करून पांडवांशी संधी कर, यानेच तुझा प्रामाणिकपणा सिद्ध होईल. कुलनाशही त्यामुळे वाचेल.’
राजा द्रुपदाचा दूत कौरव सभेत जाऊन अपयशी होऊन आल्यानंतर योग्य रीतीने संधी घडवून आणण्यासाठी राजनीतीतज्ज्ञ श्रीकृष्णाने शिष्टाई करावी असे युधिष्ठिरासहित पांडवांना व बलरामालाही वाटत होते. दोघांचा मान राखण्यासाठी संधी प्रित्यर्थ कौरवसभेत जाण्याचे श्रीकृष्णाने ठरवले. कार्तिक शुद्ध द्वादशीला रेवती नक्षत्रावर युधिष्ठिराचा निरोप घेऊन सर्वसिद्धतेनिशी प्रयाण केले.
ज्यांनी आपल्या भावांशी सतत कपट कारस्थाने केली आहेत, अशा असत्य प्रवृत्तीच्या महाभयंकर कौरवांच्या सभेत जात असल्याची पूर्ण जाणीव श्रीकृष्णाला होती. पहिला मुक्काम वृकस्थळी होता. तेथे दुर्योधनाच्या अनेक सचिवांनी सोन्याचे रथ, घोडे, अगणित संपत्ती देऊन श्रीकृष्णाचा सत्कार केला. पण कपटी दुर्योधनाचा डाव ओळखणाऱ्या श्रीकृष्णाने हसतमुखाने त्याचा अव्हेर केला. कोणाकडेही न उतरता, भोजनास न जाता सर्वाना राजकारण धुरंधर श्रीकृष्णाने प्रीतिभोजन दिले. श्रीकृष्णाच्या रथात शिध्यासह सर्व सामग्री होती. शत्रू वा परमुलखात किती नि कशी सावधगिरी घ्यायची याचा हा वस्तुपाठच आहे. नागपूरकर भोसल्यांचे सेनापती भास्करराम कोरटकर यांनी अलिवर्दी खानाला बंगालमध्ये त्राही भगवन् करून सोडले तेव्हा त्याने मेजवानीला बोलावून त्यांची व त्यांच्या साथीदारांची विश्वासघाताने हत्या केली. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या पथकाने योग्य सावधगिरी घेतली नव्हती का? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करतो अजूनही. अर्थात इतिहासात अशी कैक उदाहरणे आहेत.
हस्तिनापुरी येताच राजा धृतराष्ट्राच्या महाली जाऊन राजनीतीतज्ज्ञ श्रीकृष्णाने राजाची भेट घेतली. भीष्म, द्रोण, कृपाचार्य आदी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. श्रीकृष्णाने राजाची प्रथम भेट घेऊन, अभिवादन करून कुशल विचारले व इतरांच्या योग्यतेनुसार, वयानुसार सर्वाना अभिवादन करून लोकरीतीचे परिपालन केले. राजाने रत्नजडित सिंहासनावर श्रीकृष्णाला बसवून विधिवत् पूजा केली. सन्मान केला. त्या साऱ्याचा स्वीकार करून हसत हसत उतरण्याच्या व्यवस्थेसंबंधी काहीही बोलण्यास कोणालाही वेळ न देता आत्या कुंतीला भेटण्याच्या निमित्ताने विदुराच्या घरी श्रीकृष्ण गेलासुद्धा. दु:शासनाच्या महाली श्रीकृष्णाला उतरवण्याचे बेत राजनीतिकुशल श्रीकृष्णाने उधळून लावल्याने धृतराष्ट्राला हात चोळत बसावे लागले.
कुंतीचा निरोप घेऊन दुर्योधनाची खासगी भेट घेण्याचे बुद्धय़ाच श्रीकृष्णाने योजले. अलौकिक शोभा असलेल्या दुर्योधनाच्या राजभवनात हजारो राजे, कौरव, भीष्म, द्रोण हजर होते. श्रीकृष्ण येताच दुर्योधनाने त्याची पूजा केला. उत्तम सत्कार करून दुर्योधनाने श्रीकृष्णाला भोजनाचे निमंत्रण दिले. श्रीकृष्णाने नाकारले. छद्मीपणाने दुर्योधन म्हणाला, ‘तुमच्यासाठी इच्छेनुसार भोजन, वस्त्रालंकार, उतरण्याची व्यवस्था सर्व काही आम्ही परोपरीने करीत असता प्रत्येक गोष्ट तुम्ही नाकारीत आहात. कौरव, पांडव दोघांचेही तुम्ही सहाय्यक आहात. धृतराष्ट्राचा तू लाडका आहेस. धर्म, अर्थ तुला चांगलाच कळतो.’ श्रीकृष्णाने धीरगंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली, ‘मी येथे दूत म्हणून आलो आहे. दूत आपल्या कामात सफल झाले तरच सत्कार घेतात. मी ज्या कार्यासाठी येथे आलो आहे ते सफल झाल्यावर हवे तेवढे मी सत्कार घेईन.’ दुर्योधन म्हणाला, ‘तुझे आमचे काही वैर नाही. कार्यात तू सफल झालास न झालास त्याचा सत्काराशी काही संबंध नाही. तुझा आमचा संघर्ष नसताना तुला असे वागणे शोभत नाही.’ हे ऐकताच श्रीकृष्ण प्रसन्न हसत म्हणाला, ‘मनाची लहर गोंधळ, बुद्धिवाद, लोभ वा कपट कोणत्याही कारणाने मी धर्म सोडणे कदापि शक्य नाही. दोन कारणांस्तव लोक एकमेकांकडे भोजन करीत असतात. एकमेकांवर प्रेम असले तर किंवा आपत्ती असेल, गरज असेल तर. तुझ्यात आमच्यात मुळीच प्रेम नाही नि मी कोणत्याही आपत्तीत नाही. मी तुझ्याकडे भोजन करणार कसे? तुझ्यात आमच्यात कोणते वैर आहे? ऐक तर सर्वगुणसंपन्न, नेहमी प्रिय करणाऱ्या, धृतराष्ट्राच्या आज्ञेत वागणाऱ्या तुझ्या बंधूंचा पांडवाचा तू अकारण जन्मापासून द्वेष केलास, वैर केलेस. पांडव नेहमी धर्मानुसार वागत आले. जो पांडवांचा द्वेष करतो तो माझाही द्वेषच करतो. तूच काय पण तुमच्या येथील कोणाचेही अन्न मी खाण्याच्या योग्यतेचे नाही. मी जेवावे अशा योग्यतेचे फक्त एक विदुराचे घर आहे.’ श्रीकृष्णाने राजभवन सोडले- विदुराच्या घरी येताच त्यांच्या पाठोपाठ द्रोण, भीष्म, कृपाचार्य आदी मोठमोठी मंडळी विदुराच्या घरी आली व आपल्याकडे उत्तरण्याचा आग्रह करू लागली. तेजस्वी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, ‘तुमच्या सद्भावनांबद्दल मी धन्यवाद देतो. तुमचे सत्कार मिळाले. तुम्ही जाऊ शकता.’
भीष्म, द्रोण यांचे अन्न ग्रहणासही अपात्र ठरवून त्यांना जो मानसिक धक्का बसला त्यातच त्यांचे तेजोहरण झाले. या अपमानापेक्षा मृत्यू बरा असे त्यांना वाटू लागले असले पाहिजे. अन्यायाचीच आपण पाठराखण करीत आहोत याची खंत त्यांना वाटू लागली असली पाहिजे. अर्थस्य पुरुषो दास: म्हणणारे भीष्म नि द्रोण फक्त शरीरानेच कौरव सैन्यात होते.
राजसभेत श्रीकृष्ण येताच त्याच्या तेजापुढे सारे राजमंडळ निस्तेज झाले. सर्वागाचे कान करून नि डोळे श्रीकृष्णावर रोखून त्यांचे भाषण ऐकण्यास सारे आतुर झाले. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, ‘हे राजा धृतराष्ट्रा! क्षत्रिय वीरांचा विनाश टळावा, कौरव-पांडवांमध्ये शांतता नांदावी व संधी व्हावा म्हणून मी बुद्धय़ा येथे आलो आहे. लोक कौरवांचा राजा म्हणून तुलाच ओळखतात. तुझ्या पुत्रांनी राजकीय नीतिमत्तेकडे पाठ फिरवून नृशंसाप्रमाणे वर्तन केले नि करीत आहेत. आज शांतता केवळ दोन व्यक्तींच्या हाती आहे. तू आणि मी. तू आपल्या पुत्रांना आवर, मी पांडवांना आवरतो. तुझ्या मुलांनी तुझ्या आज्ञेत राहण्यात हित आहे. वस्तुत: या राज्यावर केवळ त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना इंद्रप्रस्थास हाकून लावले. तेथे पराक्रमाने त्यांनी स्वत: साम्राज्य उभे केले तर तुमची मने मत्सराने जळाली. तुम्ही त्याला फसवून लुबाडले. द्रौपदीची विटंबना केली. हेही पांडवांनी सहन केले. अनर्थाला अर्थ नि अर्थाला अनर्थ समजणे अत्यंत चुकीचे आहे. तुझ्या लोभी-पुत्रांना आवर. तुझी इच्छा असली तर पांडव तुझी सेवा करतील. तुझी तशीच इच्छा असली तर युद्धासही ते सिद्ध आहेत. युद्ध व शांतता यापैकी तुला जे हवे असेल ते तू पत्कर. शांततेचे वाटेकरी व्हायचे की महान विनाशाच्या अपकीर्तीचे वाटेकरी हे तुझे तू ठरव.’
धृतराष्ट्रालाच उद्देशून भाषण केल्यामुळे त्यालाच उत्तर देणे भाग होते. एरवी सारे स्वार्थ दुर्योधनाकरवी पदरात पाडून घेणारा धृतराष्ट्र दुर्योधनालाच दोष द्यायला लागला व कृष्णाला म्हणाला, ‘माझा हा मुलगा पापी, दुष्ट, दुरात्मा आहे. तो कोणाचेही ऐकत नाही. तूच त्याचे मन वळव नि विश्वशांतीचे फळ पदरात पाडून घे.’ धृतराष्ट्राच्या बोलण्याने दुर्योधन कसा आहे हे जगाला कळले. श्रीकृष्णाच्या दृष्टीने वध्य असलेला जगाच्या दृष्टीनेही वध्य ठरला यामुळे त्याच्या पक्षातील सामथ्र्यवान वीरांच्या अंत:करणात न्यूनगंड निर्माण झाला. हेच तर साधायचे होते श्रीकृष्णाला. दुर्योधनाला उद्देशून श्रीकृष्ण म्हणाला ‘भीष्म, द्रोण, गांधारी आदींची तू आज्ञा पाळ. सर्वानुमते तू संधी करून शांतीची संधी साध. लोभाने धर्माचा त्याग करू नकोस. उत्तर गोग्रहण प्रसंगी एकटय़ा अर्जुनाने तुमचा पराभव केला. आता तर त्यांच्या सहाय्याला मी आहे. व्यर्थ इतक्या लोकांना खाटकाप्रमाणे ठार मारविण्यापेक्षा तुला एक विजयाची सोपी युक्ती सांगतो. केवळ अर्जुनाचा एकटय़ाचा द्वंद्वयुद्धात पराजय करू शकेल असा एक वीर शोधून काढ. विजय तुमचा आहे. अन्यथा पांडवांना उचित सन्मान देऊन संधीला सिद्ध हो.’
धृतराष्ट्रासह सारेच दुर्योधनाला दोष देऊ लागल्यामुळे साहजिकच दुर्योधन चिडला. अत्यंत अहंकारी दुर्योधनाने रागाने बेभान होऊन प्रतिप्रश्न केला. या युधिष्ठिराला द्युताची हौस म्हणून आनंदाने, इष्र्येने आमच्याबरोबर द्यूत खेळला नि पराभव झाला त्याला मी कसा जबाबदार नि माझा अपराध काय? सुईच्या अग्रावर राहणारी भूमीसुद्धा देणार नाही हा माझा कृतनिश्चय आहे.’ श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाला ‘तू मत्सराने पेटून कपटाने द्युताचा कट रचलास, तुम्ही महासाध्वी द्रौपदीचे वस्त्रहरण केलेत, विटंबना केलीत. पांडव वनांत जाण्यास निघतानाही तुम्ही त्यांचा घोर अपमान केलात. भीमावर लहानपणी विषप्रयोग केलात. वारणावतात लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केलात हे तुमचे अपराध सर्वासमक्षच मी सांगू इच्छितो. तुझ्या सहाय्यकांनाही हे सारे ज्ञात व्हायलाच हवे. पांडवांना मारण्यासाठी एकही उपाय तुम्ही शिल्लक ठेवला नाहीत तरी तू माझा अपराध काय असे विचारतोस. भीमाला लहानपणी विषप्रयोग, लाक्षागृहांत जाळून मारण्याच्या कटाबद्दल भीष्म व द्रोणांना माहीत असेलच असे नाही.’
सारा दुष्टपणा दुर्योधनावर ढकलून आपण कर्तव्याचे पालन करीत आहोत, ही कुरुवृद्ध-नीती श्रीकृष्णाला मान्य नव्हती. म्हणूनच दुर्योधनाच्या कपटाचा पाढा श्रीकृष्णाने सर्वासमोर वाचला; नि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कुरुवृद्धांना, द्रोण, कृपाचार्य गुरूंना खडसावून सांगितले, ‘तो प्रत्यक्ष अपराध करणारा म्हणून जितका दोषाला पात्र आहे तितकेच तुम्हीही त्याच्या अपराधाकडे केवळ स्वस्थपणे पाहणारे व स्वत:च्या सामर्थ्यांचा उपयोग न करणारे म्हणून दोषी ठरत नाही काय? तुमचे स्वत:चे कर्तव्य कठोरपणे पाळण्यास तुम्ही सिद्ध झाले पाहिजे. आपल्या कुळाच्या संरक्षणासाठी मी माझ्या मामाला-कंसाला ठार मारले. हे राजा, तसे करण्यास मी तुला सांगत नाही. हे राजा धृतराष्ट्रा, तुझा पुत्र तुझ्या आज्ञेत नसेल तर त्याला बंदी करून पांडवांशी संधी कर, यानेच तुझा प्रामाणिकपणा सिद्ध होईल. कुलनाशही त्यामुळे वाचेल.’
श्रीकृष्णाच्या प्रभावाखाली येऊन पित्याने आपल्याला बंदी करण्यापूर्वी आपणच श्रीकृष्णाला बंदी करावे म्हणून चांडाळचौकडी राजसभेबाहेर पडली नि खलबत करीत असता हा डाव सात्यकीने ओळखला. त्याने श्रीकृष्णाला सचेत केले. विदूर, धृतराष्ट्राकडे वळून सात्यकी म्हणाला, ‘लोभाच्या आहारी गेलेले हे पापात्मे पुंडरीकाक्ष श्रीकृष्णाला बंदी करू इच्छित आहेत.’
हे ऐकताच सभेत गोंधळ माजला. आपल्या जागी स्वस्थ बसलेल्या श्रीकृष्णाने थोडय़ा वेळाने सभेला, धृतराष्ट्राला सांगितले, ‘हे राजन, तुझे पुत्र मला बंदी करतात की मी त्यांना, हे तू क्षणांत पाहू शकशील आणि मी या पाप्यांना बंदी करून पांडवांच्या स्वाधीन केल्याने ते दुष्कृत्यही होणार नाही. पण मी दूत म्हणून आलो आहे. माझा तोल मी जाऊ देणार नाही; पण सर्वनाश व्हावा अशीच दुर्योधनाची इच्छा आहे. त्याची तीच इच्छा फलद्रुप होऊ दे.’ (दुर्योधनाला कृष्णाने दिलेले यादव सैन्यच सभोवार होते, ते श्रीकृष्णाचीच आज्ञा पाळणार. ब्रिटिशांची तैनाती फौज ब्रिटिशांनाच धार्जिणी तसेच हे. एवढय़ाचसाठी कृष्णाने दुर्योधनाला सैन्य दिले होते. युद्धातसुद्धा पांडवांशी सैन्य लढले पण श्रीकृष्णाचे रक्षण करूनच. शिवाय गुप्त बातम्या सैन्याकडून कृष्णाला कळत.)
धृतराष्ट्राने दुर्योधन व त्याच्या सहकाऱ्यांना बोलावले. श्रीकृष्णाने यज्ञाचा उरलासुरला अंकुरही जळून जावा या उद्देशाने आपले विख्यात विश्वरूप प्रकट केले. धृतराष्ट्राला दिव्यचक्षू देऊन दाखवले. राजसभा साऱ्या गोंधळात बुडाली असता दारुकाने सज्ज ठेवलेल्या रथात श्रीकृष्ण आरुढ झाला. कौरवांच्या लक्षात आले आपल्या हातून बाण निसटला. सारा दोष दुर्योधनाला देत धृतराष्ट्र कृष्णाला म्हणाला, ‘मी परतंत्र आहे निर्दोष आहे.’ श्रीकृष्ण सभेला म्हणाला, ‘धृतराष्ट्राच्या पारतंत्र्यात दुर्योधनासारख्या सत्ताधाऱ्यांशी कसे वागायचे ते आम्ही ठरवू. आता आमच्याकडे दोष नाही. युधिष्ठिराकडे जाण्यासाठी मी तुमचा निरोप घेतो.’ कुंतीकडे जाऊन तिला आश्वासन देऊन तिचा निरोप घेतला. पांडवांकडे जाण्यास निघाला. जाता जाता कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगून भेदनीतीचा उच्चांक गाठला. कर्ण उद्ध्वस्त झाला. कृष्णाला म्हणाला, ‘उगाच भावांशी वैर केले. साध्वी द्रौपदीला क्लेष दिले. ही पृथ्वी भीष्म, द्रोणादींच्या पतनाने सुखी होईल. आमच्या रक्ताने तिचे अवभृथ स्नान होईल. माझ्या हातून खूप पाप घडले. आता मित्रद्रोहाचे आणखी पाप नको. म्हणून मी कौरव पक्षांतच राहीन. नेता कृष्ण, योद्धा अर्जुन, राजा युधिष्ठिर असेच आदर्श चिरकाळ राज्य व्हावे, असे कर्ण म्हणू लागला. अर्जुनाने युद्धांत मला ठार मारण्यानेच माझ्या पापाचे प्रायश्चित होईल, माझ्यावर प्रेम असेल तर तेच होऊ दे.
राज्यशास्त्रनिपुण, राजकारणी धुरंधर श्रीकृष्ण कौरवसभेत संधी प्रित्यर्थ आला नि संधी न होताच पांडवांकडे परत गेला म्हणून पुष्कळांना वाटते, श्रीकृष्ण शिष्टाई असफल झाली. परंतु शिष्टाई करण्याचे श्रीकृष्णाचे उद्देश वेगळे होते. १) भीष्म-द्रोणाच्या समक्ष कौरवांच्या सर्व पापांचा पाढा जाहीर वाचून आपल्या दृष्टीने वध्य असलेला दुर्योधन-कौरव जगाच्या दृष्टीने वध्य ठरवणे. २) आपण अन्यायी पक्षात आहोत याची जाणीव उपस्थितांना करून देऊन त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे. ३) कौरवच युद्धखोर आहेत हे सिद्ध करणे. ४) युधिष्ठिर, बलराम यांच्या इच्छेला मान देणे. ५) लोकापवाद टाळणे. ६) कौरव सैन्याचे बलाबल अजमावणे. ७) पांडवांच्या सामर्थ्यांचा धाक निर्माण करणे. ८) जनमत सदगुणी पांडवांच्या बाजूने वळवणे. ९) भीष्म, द्रोण यांचे तेज हरण करणे. १०) कौरव सैन्यांत न्यूनगंड निर्माण करणे. ११) कर्णाला जन्मरहस्य सांगून त्याला भ्रांतचित्त करणे या सर्व गोष्टीत श्रीकृष्ण यशस्वी झाला. मुत्सद्देगिरीत अव्वल श्रीकृष्णच! धर्मराज्याच्या स्थापनेमध्ये कोणतीही तडजोड नाही. म्हणूनच सद्गुणी पांडवांचे, धर्मराज्याचे, राष्ट्राचे हित डोळ्यांत तेल घालून जपले. पावलोपावली धोके असताना विलक्षण सावधगिरी घेतली. महाभारताचे हे युद्ध विस्तारवादासाठी नसून न्यायासाठी आहे हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या राष्ट्राचे हित पाहणे हे प्रत्येक राजदूताचे कर्तव्य असते. अन्य देशांत आपले राजदूत असतात ते खरोखरीच आपले कर्तव्य चोख बजावतात का, हा प्रश्न महाभारत काळातील नसून सार्वकालिक आहे, अगदी आजसुद्धा.
भारतावर ब्रिटिशांचे राज्य असेतोवर त्यांनी भारत-चीनमधील तिबेटचा स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे बफर म्हणून उपयोग केला. या ब्रिटिशांच्या सुज्ञ धोरणाला तत्कालीन राजदूत डॉ. के. एम. पण्णीकर यांनी त्यांच्या कम्युनिस्ट विचारामुळे सुरुंग लावला. चीन-भारत यामधील कराराचा मसुदा बनवताना हे स्वतंत्र राष्ट्र (sovereign) असा शब्द न वापरता अंतर्गत स्वायत्तता (suzerainty) शब्द म्हणजेच चीनच्या सत्तेखालील प्रदेश अशी वाक्यरचना केली. त्यावर नेहरूंच्या भारत सरकारने डोळे झाकून सह्या केल्या. तिबेट आपोआप चीनच्या घशांत घातला. चीनने तिबेट पादाक्रांत केला तेव्हा दलाई लामाला आश्रय देण्यापलीकडे भारताला निषेधसुद्धा करता आला नाही. आपण हिंदी चिनी भाई भाई या घोषणा देत असतानाच १९६२ साली चीनने कित्येक हजार किलोमीटर भारताचा प्रदेश भारतात घुसून पादाक्रांत केला. हजारो किलोमीटर दूर असलेल्या शत्रूला राजदूत पण्णीकरांनी sovereign ¨FZ suzerainty करून (म्हणजेच ध चा मा करून) आपल्या दाराशी आणले. तोच चीन आज अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगत आहे. हे सारे संकट फितुर राजदूत पण्णीकरांमुळे भारतावर ओढवले आहे. जागतिकीकरणामुळे देशाच्या सीमारेषा पुसट झाल्याच्या गप्पा मारल्या जातात पण भारत सोडून कुठलाही देश आपल्या देशाच्या रेषा पुसट करताना दिसत नाही. चीनचा विस्तारवाद चालू आहे. बांगला देश नि पाकिस्तानची घुसखोरीही वेगाने चालू आहे. चीनने भारताचा कैक हजार किलोमीटर भाग घेतल्यावर माजी पंतप्रधान नेहरू म्हणाले, ‘तेथे गवताची काडीसुद्धा उगवत नाही.’ म्हणून आपल्या भूभागावर पाणी सोडायचे का? जागतिकीकरणाने सीमारेषा पुसट होतात हे तत्त्वज्ञान चीनला, पाकला, बांगला देश यांना पटवून कोण देणार?
विस्तारवादासाठी नाही पण न्याय्य हक्कांसाठी आणि मानवतेच्या मूल्यसंरक्षणासाठी राजनीती धुरंधर श्रीकृष्णाच्या विचारांचीच अंमलबजावणी करणे अगत्याचे ठरणार आहे.
उषा गिंडे


प्रश्नमंजूषा क्रमांक ६
(राजहंस प्रकाशनाच्या सहकार्याने)

१. विक्रम सेठ यांच्या ‘अ सुटेबल बॉय’ या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद कोणत्या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केला?
अ. मौज ब. राजहंस क. पॉप्युलर ड. मेहता
२. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या लेखकाचे हे नाटक आहे-
अ. ककल्ड ब. प्रतिस्पर्धी
क. डॉल्स हाऊस ड. बेड टाइम स्टोरी

३. ‘कोबाल्ट ब्ल्यू’ या कादंबरीच्या लेखकाचे हे नाटक आहे-
अ. सिगारेट्स ब. गारवा
क. फ्रीझमध्ये ठेवलेले प्रेम
ड. साठेचं काय करायचं?

४. ‘जी. ए. कुलकर्णी यांची वैयक्तिक व वाङ्मयीन जीवनकथा’ असे उपशीर्षक असणारी चरित्रात्मक कादंबरी कोणती?
अ. डोहकाळिमा ब. गूढयात्री
क. सांजसावल्या ड. चंदनाचे खोड

५. म. द. हातकणंगलेकर यांनी संपादित केलेल्या जी. ए. कुलकर्णी यांच्या कथासंग्रहाचे नाव काय?
अ. डोहकाळिमा ब. गूढयात्री
क. सांजसावल्या ड. चंदनाचे खोड

खालील पात्रे ज्या नाटकात आहेत त्या नाटकाचे लेखक कोण?
६. प्रज्ञा, केबी, जगदीश, बीसी
अ. प्र. ल. मयेकर, ब. रत्नाकर मतकरी
क. श्याम मनोहर ड. पु. ल. देशपांडे

७. खुदाबक्ष, पद्माकर, भगीरथ, गीता
अ. अण्णासाहेब किर्लोस्कर ब. देवल
क. शिरवाडकर ड. गडकरी

८. कमलाकर आराध्ये, विमला आराध्ये, कचऱ्या धिवार, देवयानी
अ. रत्नाकर मतकरी ब. संजय पवार
क. शं. ना. नवरे ड. मामा वरेरकर

९. भुजंगनाथ, भद्रेश्वर, वल्लरी, कांचनभट
अ. देवल ब. गडकरी
क. किर्लोस्कर ड. आचार्य अत्रे

खालीलपैकी कोणते नाटक दिलेल्या नाटककाराचे नाही?
१०. महेश एलकुंचवार
अ. वाडा चिरेबंदी ब. आत्मकथा
क. दीपस्तंभ ड. मग्न तळ्याकाठी

११. मकरंद साठे
अ. ठोंब्या ब. सापत्नेकराचं मूल
क. ते पुढे गेले ड. कोण म्हणतं टक्का दिला?

१२. रत्नाकर मतकरी
अ. आरण्यक ब. अजून यौवनात मी
क. प्रतिबिंब ड. वाऱ्यावरचा मुशाफिर

प्रश्नमंजूषा क्रमांक ५ चे विजेते
प्रथम पारितोषिक : १००० रूपये
नीतिन प्रभाकर वैद्य, सोलापूर
द्वितीय पारितोषिक : ५०० रूपये
सुनंदा माधवराव वैद्य, धुळे
तृतीय पारितोषिक : ३०० रूपये
प्रो.पद्मजा केळकर-प्रभुणे, बारामती

विजेत्यांना ‘राजहंस’ प्रकाशनातर्फे बक्षिसे दिली जातील.
अकरा किंवा त्याहून जास्त उत्तरे बरोबर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना राजहंस प्रकाशनातर्फे सवलत कुपनांची भेट दिली जाईल.

स्पर्धेचे नियम
प्रवेशिकेवर स्वत:चे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक, वय, ई-मेल ही माहिती लिहिलेली असावी.
प्रवेशिकेवर प्रश्नमंजूषा क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख असावा.
प्रवेशिका प्रश्नांची उत्तरे स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहिलेली असावी.
प्रश्नांची उत्तरे पाठविण्याची शेवटची तारीख
१८ एप्रिल,२००९
प्रवेशिका खालील पत्यावर पाठवाव्यात.
लोकमुद्रा प्रश्नमंजूषा,
लोकसत्ता, एक्सप्रेस टॉवर्स,
पहिला मजला,
नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

प्रवेशिका ०२२ २२८४ ६२ ७७ या
फॅक्स क्रमांकावर अथवा
prashnamudra@gmail.com
या ई मेल वरही पाठवता येतील

तुम्हीही ठरवा तुम्ही कसे वाचक आहात
बरोबर उत्तरे

६ पेक्षा कमी - सामान्य, अजून खूप वाचा.
६,७ - चांगले वाचक, पण अजून वाचा.
८,९ - उत्तम वाचक, वाचत राहा.
१०,११ - श्रेष्ठ वाचक, असेच वाचा.
१२ - महावाचक

अकरा प्रश्नांची उत्तरे अचूक देणारे वाचक
अरविंद श्रीधर पुजारी, सोलापूर, विजय वामनराव दळवी, अकोला

 

शेखर छत्रे यांनी विचारलेल्या ‘वैद्यकीय क्षेत्रामध्ये + हे चिन्ह अधिकृत आहे का? किंवा + हे चिन्ह काही डॉक्टरमंडळी वापरतात ते का? या प्रश्नाचे उत्तर

वैद्यकीय क्षेत्रामध्ये + हे चिन्ह रेडक्रॉस संघटनेचे द्योतक मानले जाते. ही संघटना जागतिक स्तरावर रक्तदान, रक्त संक्रमण यासाठी काम करते. युद्धजन्य परिस्थिती, अपघात, नैसर्गिक आपत्ती अशा ठिकाणी ही संस्था कार्यरत असते. रेडक्रॉसचे + चिन्ह डॉक्टर मंडळींसाठी वापरू नये असा दंडक आहे. वैद्यकीय सेवेचे बोधचिन्ह वेगळे आहे.
डॉ. अनिल मडके,
सांगली

पांढऱ्या कागदावर किंवा कापडावर लाल अक्षरात + अशा चिन्हाची निवड १८६४ साली जिनिव्हा येथे प्रामुख्याने Protection Symbol (अभयचिन्ह) म्हणून करण्यात आली. रेडक्रॉस हे चिन्ह दोन रेघांनी बनलेले नसून ते + पाच चौकोनांनी बनलेले आहे. युद्धामध्ये जखमी झालेल्या कैद्यांना/ नागरिकांना औषधोपचाराला घेऊन जाताना हे चिन्ह वापरत असत. पूर्वी युद्धात हॉस्पिटल, चर्च इ. इमारतींवर + हे चिन्ह पांघरले जाई, ज्यायोगे ‘या इमारतीवर बॉम्ब टाकू नये’ असा इशारा विमानचालकाला मिळत असे. त्यामुळे पांढऱ्या कपडय़ावर/ कागदावर लाल रंगातील + चिन्हाला सर्व जगभरात Protection Symbol म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर या चिन्हाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात सर्रास होऊ लागला. परंतु हे नियमाला धरून नाही आहे आणि आता या चिन्हाऐवजी वेगळ्या चिन्हाचा विचार चालू आहे असे कळते. काहीजण विनोदाने या चिन्हाकडे ‘रुग्ण आडवा झोपलेला आणि डॉक्टर तपासणीकरता उभा!’ अशा अर्थानेही बघतात.
भालचंद्र गोखले,
माहीम

नुसते + चिन्ह वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नाही. ते फक्त अधिक/ बेरीज करण्याचे चिन्ह झाले. मात्र पांढऱ्या पाश्र्वभूमीवर लाल रंगात हे बेरजेचे चिन्ह ‘रेड क्रॉस सोसायटीचे चिन्ह आहे. १८६७ पर्यंत 'Society for the Relief of Wounded Combatants' नावाने असलेल्या संस्थांचे नेदरलॅण्ड सरकारने ‘रेड क्रॉस सोसायटी’ असे नामकरण (नामांतर?) केले. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करून वैद्यकीय मदत करणे हे मूळ उद्दिष्ट त्यावेळी होते. मग जखमीच्या सोबत रुग्णसेवा झालं. मानसशास्त्रात Law of Association आहे त्यात एक शब्द समजला की त्यावरून त्याच्याशी संबंधित दुसरी गोष्ट लगेच आठवते. ‘शाहजहान’चे नाव उच्चारताच ‘ताजमहल’ आठवणे किंवा क्रिकेटची बॅट दिसल्यावर ‘सचिन’ आठवणे अशासारखा तो रूढ झालेला प्रकार असतो. रुग्ण-जखमी यांच्याशी संबंध ‘रेड क्रॉस’ने सूचित होतो; म्हणून काळाच्या ओघात ते डॉक्टरी चिन्ह असल्यासारखे मानून काही डॉक्टर ते चिन्ह वापरू लागले.
वास्तविक डॉक्टरी चिन्ह हे पूर्णपणे वेगळे आहे. ग्रीक पौराणिक कथांमधील अपोलो याचा पुत्र अ‍ॅसक्लेपिअस याला ‘बरे करणारी औषधाची’ देवता मानले आहे. त्या देवतेच्या काठी भोवती एकमेकांना विळखा घातलेले दोन साप (Aesculapian Snake) असे डॉक्टरांचे खरे वैद्यकीय क्षेत्राचे चिन्ह आहे.
मनोहर निफाडकर,
बरोडा