Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

सुटीचा मोसम सुरू होतोय नि उन्हाळ्याचाही.. जीवाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे तुमच्या सुटीच्या उत्साहावर काही परिणाम झालेला नाही ना? होऊ पण देऊ नका. भरपूर खेळा नि भरपूर खा - प्या. हो, या उन्हाळ्यात खाण्यापेक्षा सारखं पित राहावंसं वाटतं, नाही? उन्हाच्या झळा सोसताना घसा सारखा ओला करावासा वाटतो. मैदानात दुपारी खेळताना सोबत नेलेली पाण्याची बाटली कधीचीच रिकामी होते नि सारखी घशाला कोरड पडते आणि मग त्यातल्या त्यात जवळ राहणाऱ्या कुठल्यातरी मित्राच्या घरून सारखं पाणी आणतो नाही तर सारखं दार खटखटवत आई किंवा आजी -आजोबांना ‘पाणी दे..’चा नारा देत त्रस्त करतो.
काही बहाद्दर तर फ्रीजमधल्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या रित्या करतात, नाही तर कोपऱ्यावरच्या भैय्याचा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा त्यांना खुणावत राहतो. पण तुम्हीच सांगा बरं. हे तुमच्या प्रकृतीला योग्य का? सॉफ्ट ड्रिंक्स, आईस्क्रीम नि बर्फाच्या गोळ्याने सर्दी - पडसं होऊन तुम्हांला तुमच्या सुटीचा बोजवारा करायचाय का ? नाही ना, मग. या उन्हाची तलखी शान्त करायला आहे आपल्याकडे इतरही सही उपाय. हो आणि तेही एकदम. ठंडा ठंडा .. कूल कूल..
आणि तेही तुम्ही घरच्याघरी बनवू शकाल असे! मात्र यातील काही पदार्थ बनविताना मात्र घरातल्या मोठय़ांची मदत जरूर घ्या हं.. आणि मग ही थंडगार पेयं स्वतही प्या आणि बाहेरून कुणी उन्हातून आलं, की त्यांनाही सव्‍‌र्ह करून त्यांची शाबासकी मिळवा. सुटीचा फायदा तुम्हांला असाही करता येऊ शकतो, बरं का बालदोस्तांनो!
तहान भागविण्यासाठी फळांहून उत्तम आणखी काहीही नाही. त्या त्या मोसमातील फळं आवर्जून खावीत, अशी तुम्हांला घरातील मोठी माणसं सांगत असतील ना, तुम्हांला ते योग्यच आहे. चवदार आणि आरोग्यदायी अशा फळांना म्हणूनच पर्याय नाही. ही फळं किंवा फळांच्या रसाने तहान तर भागतेच, पण त्याचबरोबर क्षार आणि जीवनसत्त्वंही मुबलक प्रमाणात मिळतात. तुमची शक्कल लढवून तुम्ही तमची फ्रूट प्लेट किंवा फ्रूट ज्युस चवदार, अधिक कलरफूल आणि दिसायलाही अगदी फक्कड करू शकता. उन्हाळ्यात लिंब, कलिंगड, आंबा, अंजीर, संत्र, मोसंबी, काकडी, डाळिंबं ही फळं अवश्य खा. अद्याप स्ट्रॉबेरीही बाजारात मिळतेय, त्यांचाही वापर तुम्ही करू शकाल. या काही कूल रेसिपीज, ज्या तमम्ही घरी करू शकाल-
कलिंगडाचे गोळे
कलिंगडाचा लाल रंग कुणालाही भुरळ घालेल असाच! कलिंगडाच्या बिया काढून घ्या. आईस्क्रिम स्कूप अथवा डावाने आईस्क्रीमसारखा गोलाकार काढून घ्या. हे गोळे जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. तहान भागविण्यासाठी या थंडगार लाल गोळ्याहून अधिक चांगलं दुसरं काही असू शकतं का? तुम्हीच सांगा बरं!
कलिंगडाचा ज्यूस
कलिंगडाच्या बिया काढून नुसता गर घ्यावा. त्यात पाणी नि साखर घालून मिक्सरमधून फिरवा. चवीसाठी त्यात थोडे मीठ घाला. सव्‍‌र्ह करताना त्यात किंचित लिंबाचा रस व आल्याचा रस घालून ढवळा. ग्लासात वर कलिंगडाचे दोन-तीन तुकडे घाला.
लिंबू नि कोकम सरबत
लिंबाचं नि कोकमाचं सरबत बनवणं तर एकदम सोपं असतं. या दोनही गोष्टी घरी उपलब्ध असतातच. कोकमाचा तयार अर्क मिळतो. तो नसला तर आमसुलं गरम पाण्यात बुडवून नंतर पिळून त्याचा रसा काढा. लिंबाचं अथवा कोकमाचं सरबत बनवताना त्यात साखर नि मीठ टाकलं की काम फत्ते !
कैरीचं पन्हं
उन्हाळ्यात तुमच्या घरी पन्हं आवर्जून बनवलं जातंच असेल. तुम्हीही हे चवदार पन्हं नक्की बनवू शकाल. मात्र कैऱ्या उकडताना घरातल्या मोठय़ा व्यक्तींची जरूर मदत घ्या. अर्धा किलो कैऱ्या स्वच्छ धुऊन, उकडून घ्या. सालं काढून कैरीचा गर काढून घ्या. जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घाला. त्यात सहा ग्लास पाणी घाला आणि साखर विरघळेपर्यंत ढवळा. स्वादासाठी वेलची आणि केशर घाला आणि थंडगार सव्‍‌र्ह करा.
संत्र, गाजर व टोमॅटो ज्यूस
संत्र, गाजर व टोमॅटो यांचं मिश्र सरबतही तुम्ही अगदी आरामात बनवू शकाल. हे सरबत करताना संत्र्याच्या बिया काढून टाका. गाजर किसून घ्या नि टोमॅटोचे तुकडे करा. टोमॅटो, गाजर, संत्र्याचे तुकडे, साखर, मीठ नि लिंबाचा रस एकत्र करा आणि मिक्सरमधून फिरवा. नंतर रस गाळून घ्या. त्यात चिमूटभर मिरीची पावडर टाका.
मँगो मिल्कशेक
मँगो मिल्कशेकचं नाव काढल्यावर जीभ खवळली की नाही? दोन हापूस आंब्याचा रस काढा. त्यात एक लीटर दूध, अर्धी वाटी मलई आणि पाव वाटी साखर घालून मिक्समधून फिरवा आणि थंड झाल्यावर सव्‍‌र्ह करा.
सफरचंदाची कोशिंबीर
तुम्हाला या उन्हाळ्यात आगळीवेगळी अशी कोशिंबीर खावीशी वाटली, तर सफरचंदाची कोशिंबीर नक्कीच ट्राय करा. यात दोन सफरचंदांची सालं काढून ती किसून घ्यावीत. त्यात चवीपुरतं मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर, एक-दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि दही घाला. ते एकत्र कालवून थंड सव्‍‌र्ह करा.
दही घुसळून लस्सी बनवायचा प्रयोग तुम्ही करत असालच. अननसाची लस्सी बघायचीय करून? यासाठी अननसाचा ग्लासभर रस काढा आणि चार ग्लास गोड ताकात हा रस मिसळा. त्यात साखर, वेलची पावडर, केशर घालून रवीनं घुसळा आणि सव्‍‌र्ह करा. आवडत असल्यास यात बर्फाचे तुकडे आणि मलई वरून पेरू शकाल.

तज्ज्ञ काय म्हणतात ?
सुटय़ांमध्ये मुलांची हौस पुरवण्याकरता कोला, वेफर्स, समोसा, आईस्क्रीम चॉकलेट, रेडी टु इट अन्नपदार्थाचा मारा मुलांवर होतो. या पदार्थामुळे आहारातील साखर नि मीठ याचे प्रमाण नको तितके वाढते. म्हणूनच त्यावर नियंत्रण ठेवायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रमाणात पाणी प्यायलाच हवं. सध्याच्या उन्हाळ्यात जर आरोग्य राखायचं असेल, तर भरपूर पाणी पीत राहा. जेव्हा चिडचिड आणि अस्वस्थ झाल्याचं जाणवतं, तेव्हा तर आधी पाणी प्या. हो, आणि पाणी म्हणजे शुद्ध पाणी. पाण्याची कसर फळांचा ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स भरून काढू शकत नाही. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की कॉफी आणि कोलामुळे डिहायड्रेशन होतं.
- स्वाती पोपट वत्स, शिक्षणतज्ज्ञ

मुलांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात प्रथिनं, उष्मांक, कबरेदकं, जीवनसत्त्वं तसेच अँटिऑक्सिडंट्सची गरज असते. योग्य आहारामुळे चयापचय क्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. उन्हाळ्यात फळांचा आहारात मोठय़ा प्रमाणावर समावेश करायला हवा. फळं अथवा फळांच्या रसात अ आणि क जीवनसत्त्वं, पाणी तसेच फायबरचं प्रमाण अधिक असतं. फळं खाल्ल्याने दात आणि हिरडय़ाही मजबूत होतात.
-सोली जेम्स, मुख्य आहारतज्ज्ञ,
रहेजा रुग्णालय

काय बालमित्रांनो, ज्या मोठय़ा सुटीची तुम्ही आतुरतेने वाट बघता, त्या सुटीचा तुमचा नेमका प्लान काय, हे जाणून घेण्याची आम्हाला फार उत्सुकता आहे. काय काय करायचं ठरवलंय, या सुटीत? आपल्या काही बालदोस्तांनी काय काय सॉलिड योजना आखल्या आहेत! ऐश्वर्या जाणार आहे, भोसला मिलिटरी स्कूलमध्ये एका कॅंम्पला.. सैनिकांचं विश्व तिला अनुभवायचं आहे. सोहम आनंदवनात जाऊन बाबा आमटे यांनी उभारलेली सृष्टी बघणार आहे. तनया यंदा दोन किल्ल्यांवर राहायला जाणार आहे. तिच्यासोबत तिच्या आणखी चार शाळकरी दोस्तांचा आणि सर्वाच्या पालकांचा असा मोठा ग्रुप तिने केलाय. सारे मिळून किल्ल्यावर धम्माल करणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून त्या सर्वानी त्या किल्ल्यांचा बराच अभ्यास केलाय. मल्लिका यंदाच्या सुटीत तिच्या वयाच्या अंध मुलांसाठी लहान मुलांची छानछान पुस्तकं वाचून, त्याच्या कॅसेट्स बनवून त्यांच्या ‘टॉकिंग लायब्ररी’साठी पाठवणार आहे. ओमने ठरवलंय त्याच्या शाळेच्या नव्या इमारतीसाठी आपणही काही फंड जमा करायचा, त्यासाठी तो शिकलेल्या काही कलावस्तू बनवून त्या विकणार आहे..
म्हणजे, ही सगळी मुलं खेळ, छंद यांसाठी सुटीचा पुरेपूर उपयोग करणार आहेतच, पण शिवाय काहीतरी वेगळंही अनुभवणार आहेत. त्याची आखणी त्यांनी केली आहे. तुमचं काय? तुम्हीही असं काही ठरवलंय का? तुमच्या योजना आम्हा कळवा बरं. म्हणजे इतरांनाही नव्या आयडिया मिळतील. तुम्ही या सुटीत काय करायचं ठरवलंय, ते ८-१० ओळींत आम्हाला लिहून पाठवा. निवडक पत्रं आम्ही जरूर प्रसिध्द करू.
आमचा पत्ता- लोकरंग-बालरंग, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, पहिला मजला, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१. पत्रं पाठवण्याची शेवटची तारीख- १५ एप्रिल.

फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने जो भूभाग बळकावला होता, त्यातला एक भाग म्हणजे पाँडेचेरी.
आपल्या मुंबईच्या जेमतेम पाऊणपट असलेलं (४९२ चौ.कि.मी.) तथाकथित पाँडेचेरी राज्य खरं तर एखाद्या मोठय़ा शहराएवढंही नाही, तरीही त्याला दर्जा आहे तो एका राज्याचा!
या राज्यात पूर्वी फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या कारइक्कळ, माहे आणि यानम या वसाहतींचाही समावेश आहे! पाँडेचेरीहून सुमारे दीडशे कि.मी. अंतरावर असलेले ‘कारइक्कळ’ तामिळनाडूत आहे, तर थेट पश्चिम किनाऱ्यावर - केरळातल्या तेल्लिचेरीच्या दक्षिणेला असलेले ‘माहे’ पाँडेचेरीपासून आकाशमार्गानंही सहा-सातशे किमी दूर आहे. पाँडेचेरीहून असाच शेकडो किमी दूर असलेला तिसरा तुकडा ‘यानम’ आंध्र प्रदेशात आहे. पाँडेचेरी म्हणजे अशी त्रिस्थळी यात्रा! प्रत्यक्षात पाँडेचेरीचं क्षेत्रफळ आहे जेमतेम २९३ चौरस कि.मी.
अशा या टीचभर प्रदेशात फ्रेंच संस्कृतीची जोपासना केली जाते, तिथले लोक फ्रेंच भाषा बोलतात असे खूपसे गैरसमज पसरले आहेत, पण प्रत्यक्षात तसं काहीही नाही. तिथली सामान्य माणसं आसपासच्या लोकांप्रमाणेच तमिळ बोलतात!
पाँडेचेरीवर फ्रेंचांचा दीर्घकाळ अधिकार असल्यामुळे त्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या इमारतींवर फ्रेंच स्थापत्यशास्त्राची छाप आहे.(फ्रेंचांच्या अधिपत्याखाली असताना इण्डो-चायनामधल्या स्थापत्यावरही फ्रेंच स्थापत्याचा स्पष्ट असा ठसा दिसतो. असं दिसायचं कारण म्हणजे फ्रेंचांच्या वसाहतींमध्ये बांधकामांचे नियम फ्रेंचांचेच-फ्रान्समधलेच होते. बांधकामाचे इतके काटेकोर नियम आपल्याकडे पूर्वी कधी नव्हते नि आजही नाहीत.)
प्रख्यात विद्वान, देशभक्त अरविंद घोष हे जेव्हा अध्यात्माकडे वळले, ‘योगी अरविंद’ झाले, तेव्हा त्यांनी पाँडेचेरीत आपला आश्रम स्थापला. त्यांच्या शिष्या माताजी आश्रमाची सर्व व्यवस्था पाहात असत. माताजी या जन्मानं फ्रेंच होत्या. त्यामुळे तिथल्या सर्वच गोष्टींवर फ्रेंच संस्कृतीचा, भाषेचा ठसा उमटणं स्वाभाविकच होतं. अरविंदांच्या आश्रमाचा परिसर अरविंद-व्हीय म्हणून प्रसिद्ध आहे. अरविंदांच्या प्रभावामुळे या लहानशा गावातही जगभरातले नामांकित विद्वान, अभ्यासक, पर्यटक, प्रवासी अशा अनेकांची इथं सातत्यानं ये-जा होत असते, इथे असंख्य विषयांवर उच्च दर्जाचे दर्जेदार कार्यक्रम, छोटे-मोठे अभ्यासक्रम वर्षभर चालतात. मित्रांनो, तुम्हीही एकदा पाँडेचेरीला भेट देऊन याच!
(समाप्त)
अविनाश बिनीवाले

एक अरुंद ग्लास घ्या. वरच्या कडेपासून सुमारे १ सें.मी. जागा उरेल एवढे पाणी त्यात भरा. पाण्यावर एक बूच ठेवा. ते ग्लासच्या कडेला जाऊन चिकटेल. तुम्ही ते बूच ग्लासच्या मध्यभागी ठेवण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते तेथे राहणार नाही. ते एका कडेला जाऊन बसेल. चित्र (१). बूच काढून ग्लास पाण्याने काठोकाठ भरा. अशा स्थितीत पाण्याची पातळी ग्लासच्या काठाच्या थोडीशी वर राहते. आता बूच हळूच पाण्यावर सोडा. या वेळी मात्र बूच ग्लासाच्या मध्यभागी येऊन तरंगेल. चित्र (२). या वेळी बूच ग्लासच्या कडेला ठेवायचा प्रयत्न केलात तरी पुन्हा ते मध्यभागी येऊन थांबेल. असे का होते?
चित्र (१) मध्ये पाण्याची पातळी वरील बाजूकडे अंतर्गत होती. म्हणजे मध्यभागी खोलगट व ग्लासच्या कडेला उंच. चित्र (२) मध्ये पाण्याची पातळी वरील बाजूकडे बहिर्वक्र आहे. म्हणजे मध्यभागी उंच व ग्लासच्या कडेला खाली. बूच हे पाण्याच्या उंच पातळीकडे जाऊनच तरंगत राहते. हा पाण्याचा पृष्ठीय ताणाचा परिणाम आहे.
डॉ. अरविंद गुप्ता, आयुका.

साहित्य - नारळाची करवंटी, सँड पेपर, ड्रील मशीन, जुन्या औषधांच्या बरण्यांची बुचं, गोंद, अ‍ॅक्रिलिक कलर्स, पेन्सिल इ.
कृती - नारळाची करवंटी सँड पेपरने चांगली तासून घ्या. पूर्ण पृष्ठभाग गुळगुळीत करा. करवंटीचे डोळे ड्रिल मशीनने फोडून मोठी छिद्र करा. आता या करवंटीला कासवाच्या पाठीप्रमाणे अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवा. हे वाळल्यावर औषधाच्या बरण्यांची चार बुचं पाय म्हणून खाल्याच बाजूला चिकटवा. पुढील बाजूला एखादे निमुळत्या तोंडाचे झाकण लावा. त्यामुळे आपण त्याला तोंडाप्रमाणे रंगवू शकू.
डोळे दुसऱ्या कागदावर काढा आणि चिकटवा किंवा बाजारात तयार मिळणारे लुकलुकणारे डोळे लावलेत, तरी उत्तम.
शेपटीलासुद्धा एखादे निमुळते बूच चिकटवा किंवा कागदाची छोटीशी पट्टी लावा. म्हणजे झाला आपला स्टँड तयार.
अर्चना जोशी