Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

गावसकर यांनी मोफत सल्ले देत फिरण्यापेक्षा कुठेतरी शाश्वत असे क्रिकेट मार्गदर्शन केंद्र उभारावे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तीच खरी क्रिकेटची सेवा ठरेल. क्रिकेटचे समालोचन ही क्रिकेटसेवा नाही. क्रिकेट समालोचनाद्वारे संदेश देणाऱ्यांना महत्त्व देणारे भारतीय क्रिकेट बोर्ड आणि काही पदाधिकारी, देशात निवृत्तीनंतर क्रिकेटची सेवा करणाऱ्यांना महत्त्व देत नाही, हेच दुर्दैव आहे.
सुनील गावसकर आणि वाद यांचे सख्य आहे. क्रिकेट खेळत असताना जेवढे वाद त्यांनी केले नसतील त्यापेक्षा अधिक वाद त्यांच्या निवृत्तीनंतरच्या कारकिर्दीत झाले. अलिकडे शाहरूख खान या आयपीएल लिगमधील एका संघाच्या मालकाला सल्ला देण्याची दुर्बुद्धी त्यांना झाली. सुनील गावसकर यांचा परदेशी प्रशिक्षकांना भारतीयांनी अवास्तव महत्त्व दिल्याचा मुद्दा ठीक आहे. त्यांनी उर्मट ऑस्ट्रेलियन खेळाडू व बेलगाम प्रशिक्षकांचे कान वेळोवेळी उपटले आहेत. परदेशी आणि प्रामुख्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील व्यक्तींना फाजील महत्त्व देण्याचा त्यांचा विरोधही आपण समजू शकतो. पण शाहरूख खानला त्याने करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या संघाबाबत सल्ला देण्याची त्यांची कृती अनाकलनीय आहे. त्या कृतीबद्दल गावसकर यांचा आदर करणाऱ्या शाहरूख खानने पलटवार केल्यास गैर काय?
गावसकर यांनी शाहरूखला सल्ला देता देता बुकॅनन या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकांना तोंडसुख घेतले आहे. किंबहुना शाहरूखला लक्ष्य करून त्यांनी टीकेच्या फैरी बुकॅनन यांच्यावरच झाडल्या आहेत. अनेक कप्तान नेमण्याची बुकॅनन यांची कल्पनाच मुळात चुकीची आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स हा शाहरूख खानचा खासगी संघ आहे. तो देशाचा, राज्याचा अथवा शहराचेही प्रतिनिधित्व करीत नाही. या संघावर करोडो रुपयांची गुंतवणूक ही शाहरूख खानची आहे. त्यामुळे या संघाबाबत, संघाच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार शाहरूख खानचा आहे. त्याने प्रशिक्षककपदी नेमलेल्या बुकॅनन यांची आहे.
एका खासगी संघाच्या या निर्णयांबद्दल खरं तर गावसकर यांनी तोंड उघडायला नको होते. त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ त्यांनी या खासगी संघाला करून देण्याऐवजी मुंबईपासून भारतातल्या कोणत्याही संघाला करून दिला असता तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते.
गावसकर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाची मुंबई संघाला गेल्या कित्येक वर्षांपासून गरज भासते आहे. मुंबई संघ ३-४ वर्षांपूर्वी तर बाद फेरीआधीच गारद झाला होता. तेव्हा मुंबईला, मुंबईच्या तरुण खेळाडूंना मदतीचा हात देण्याची गरज होती. तेव्हा गावसकर पुढे सरसावले असते तर ते अधिक योग्य ठरले असते. मुंबईने केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची ती त्यांना एक नामी संधी होती.
अशा अनेक संधी गावसकर यांनी दवडल्या आहेत. मार्गदर्शन करायचे आहे तर मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीमधल्या मुलांना का नाही. सल्ला द्यायचाच असेल तर सध्या चेअरमन असलेल्या बोर्डाच्या तांत्रिक समितीला द्या. त्या व्यासपीठावरून गावसकर यांनी आपल्या बुद्धीचा वापर का केला नाही?
त्याआधी बंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे प्रमुखपद त्यांच्याकडे होते. त्यावेळी बंगलोरवासियांना जेव्हा सत्यसाईबाबांचे दर्शन व्हायचे तसेच दर्शन गावसकरांचे या नॅशनल क्रिकेट अ‍ॅकॅडमीला व्हायचे. गावसकरांच्या विपुल ज्ञानाचा लाभ त्यावेळी उदयोन्मुख भारतीय क्रिकेटपटूंना झाला असता तर आज जो भारतीय संघ दिसत आहे. त्यापेक्षा अधिक सक्षम भारतीय संघ दिसला असता. कदाचित ऑस्ट्रेलियाला मागे टाकून आपण अव्वल स्थानही पटकावले असते.
या जर तरच्या गोष्टी आहेत. गावसकरांनी शाहरूखला फुकटचा सल्ला देण्याऐवजी भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंना चार गोष्टी शिकविल्या असत्या तर त्याचा भारतीय क्रिकेटला अधिक लाभ झाला असता. मुंबईच्या नवोदितांना मार्गदर्शन करण्यासाठी गावसकरांना निश्चितच संधी उपलब्ध आहे.अशा मार्गदर्शनाची आणखी एक सुवर्णसंधी गेली २० वर्षे त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहे. क्रिकेटपटू घडविण्यासाठी गावसकर यांना वांद्रे पश्चिम येथे महाराष्ट्र सरकारने दोन एकरचा भूखंड दिला होता. त्या गोष्टीला २० वर्षे उलटून गेली. राज्य सरकारच्या त्या स्वप्नाचा लवकरच रौप्यमहोत्सवही होईल. सरकारचे हे स्वप्न तरी गावसकरांनी सत्कार करून दाखवावे. वर्षांपूर्वी त्या भूखंडासाठी लागू असलेल्या साऱ्या अटी शासनाने मागे घेतल्या. आता नियम व अटींचा अडथळादेखील नाही. तरीही अजून गावसकरांना तेथे क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी मुहूर्त का मिळत नाही? खरं तर कोणत्याही प्रकल्पासाठी शासनाने निश्चित अवधी दिलेला असतो. गावसकरांच्या या प्रकल्पासाठी तो नियमही शिथील केलेला दिसतोय. त्यावर गावसकरांनी आपल्या क्रिकेट अनुभवाची बाग फुलवावी.
मोफत सल्ले देत फिरण्यापेक्षा कुठेतरी शाश्वत असे क्रिकेट मार्गदर्शन केंद्र त्यांनी उभारावे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तीच खरी क्रिकेटची सेवा ठरेल. क्रिकेटचे समालोचन ही क्रिकेटसेवा नाही. क्रिकेट समालोचनाद्वारे संदेश देणाऱ्यांना महत्त्व देणारे भारतीय क्रिकेट बोर्ड आणि काही पदाधिकारी, देशात निवृत्तीनंतर क्रिकेटची सेवा करणाऱ्यांना महत्त्व देत नाही, हेच दुर्दैव आहे.
भारतीय क्रिकेटच्या जडणघडणीत सध्या अशा व्यक्तींचाच हातभार लागत आहे. भारतीय क्रिकेटच्या जवळ असलेल्या, त्याची जाण असलेल्या अशा अनेकांना क्रिकेट बोर्ड लांब ठेवते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, अनिवासी भारतीय असलेल्या रवी शास्त्री, सुनील गावसकर यांच्याकडे भारतीय क्रिकेटच्या भवितव्याची जबाबदारी टाकते. १८० दिवसांपेक्षा अधिक काळ भारताबाहेर राहणाऱ्या रवी शास्त्रींकडे बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे प्रमुखपद सध्या देण्यात आले आहे. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. रवी शास्त्री यांनी आतापर्यंत या अ‍ॅकॅडमीला किती योगदान दिले? काही बैठका घेऊन अशा क्रिकेट अ‍ॅकॅडमींमध्ये भारताची उद्याच्या क्रिकेटपटूंची पिढी घडेल काय?
तीच गोष्ट गावसकरांची. त्यांनाही किती वेळ देता येईल? भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ असणारे गावसकर आणि आजचे गावसकर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. गावसकर फलंदाज म्हणून महान होते. पण मार्गदर्शक म्हणून त्यांची नंतरची भूमिका काय? भारताच्या क्रिकेटचे त्यांना सध्या किती ज्ञान अवगत आहे. विविध प्रांतातले, खेडेगावातून आलेले किती खेळाडू त्यांनी पाहिले आहेत?
तरीही अशा लोकांवर जबाबदारी टाकण्याचा बोर्डाचा हट्ट आहे. गावसकरांनी भारतीय क्रिकेटसाठी खरोखरच काहीतरी करायचे असल्यास आपली अ‍ॅकॅडमी आधी सुरू करावी. क्रिकेट बोर्डाच्या गुणवत्ता शोध मोहीम प्रकियेत स्वत:ला सामावून घ्यावे. पैशाचा लखलखाट असणाऱ्या आयपीएल क्रिकेट लिगमधल्या खासगी संघांना फुकाचे मार्गदर्शन करू नये.
शाहरूख खानचा कोलकाता नाईट रायडर्स संघ याची खरं तर राज्याच्या, शहराच्या अथवा देशाच्या संघाशी काहीही संबद्ध नाही. त्यांनी संघ उभा केल्यामुळे जगातील अन्य खेळाडूंप्रमाणे भारताच्या ज्येष्ठ व नवोदित खेळाडूंना पैसा मिळाला हे सत्य आहे. मात्र आयपीएलच्या या सर्व ‘फ्रॅन्चायझीं’नी त्याद्वारे आपण भारतीय क्रिकेटचा विकास करीत आहोत अशा भ्रमात राहू नये. शाहरूख खान, विजय मल्या, प्रिती झिंटा, नेस वाडिया, शिल्पा शेट्टी आदींनी आर्थिक फायद्यासाठीच आयपीएलमध्ये पैसे गुंतविले आहेत. क्रिकेटच्या विकासाचा त्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. क्रिकेटचा विकासच करायचा असेल तर एमआरएफ पेस फौंडेशनसारखी एखादी प्रशिक्षण योजना कायमस्वरुपी राबवावी. त्यामुळे क्रिकेटचा खरोखरच फायदा होईल. लपलेली गुणवत्ता पुढे येईल. त्या गुणवत्तेला आकार देता येईल. भारतीय संघाची ताकद त्यामुळे वाढायला लागेल. केवळ करमणुकींकरिता आयपीएल लढतींसाठी संघ तयार करून क्रिकेट वाढणार नाही. त्यापेक्षा क्रिकेट बोर्डाच्या मदतीसाठी क्रिकेट प्रशिक्षणाकरिता त्यांनी हातभार लावणे उचित ठरेल.
विनायक दळवी

काळानुसार अपेक्षांचे ओझे वाढल्यावर आता जबाबदारीची जाणीवही हरभजनला आली आहे. गतवर्षी अनिल कुंबळेने पत्करलेल्या निवृत्तीनंतर आता हरभजन कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रांतांमध्ये भारतीय क्रिकेटच्या गरजा पूर्ण करीत आहे.
‘दूसरा’ हे ऑफ स्पिनर हरभजन सिंगचे प्रभावी अस्त्र.. परंतु हे ‘दुसरे’पण पालीसारखे त्याच्या नावाला चिकटले होते.. गेली १०-१२ वष्रे भारतीय फिरकीची धुरा सांभाळताना अनिल कुंबळेसोबत ‘दूसरा’ कोण, हा प्रश्न उपस्थित व्हायचा तेव्हा आपसूकच हरभजन सिंगचे नाव पुढे यायचे.. २००८च्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दिल्ली कसोटीत कुंबळेच्या अचानक निवृत्तीनंतर मात्र हे दुसरेपण केव्हाच गळून पडले.. आता भारतीय फिरकी म्हणजे हरभजन हे समीकरण रुढार्थाने सिद्ध झाले आहे.. परंतु हा बदल काही जादुची कांडी फिरवल्यागत एका रात्रीत झालेला नाही.. भज्जीच्या तपश्चर्येचे हे फळ आहे.. त्यामुळेच वेगवान गोलंदाजीचे नंदनवन अशी आख्यायिका असणाऱ्या किवीभूमीवरील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने २१.३७च्या सरासरीने सर्वाधिक १६ बळी मिळविले..
हरभजनची क्रिकेट कारकीर्द म्हणजे अनेक चढ-उतारांची एक रोचक कादंबरी आहे. १९९८मध्ये त्याचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला. परंतु गोलंदाजीच्या वादग्रस्त शैलीमुळे त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. यातून तो जेमतेम सावरल्यावर २००३मध्ये बोटाच्या दुखापतीने पछाडले. मग २००८ या वर्षांने भज्जीचा अगदी पिच्छा पुरविला. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सिडनी कसोटीमध्ये अ‍ॅन्ड्रय़ू सायमंडस्ची वर्णद्वेशी चेष्टा केल्याबद्दल आयसीसीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला. हे ‘मर्कट’ प्रकरण अतिशय गाजले होते. यावर पडदा पडतो न पडतो तोच एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पध्रेतील सामन्यानंतर एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावल्याप्रकरणी बीसीसीआयने हरभजनवर कठोर कारवाई केली. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांप्रमाणेच भारताच्या एकदिवसीय संघातूनही बंदीची कारवाई त्याच्यावर झाली. या अनेक वादळांच्या तडाख्यातून तावून सुलाखून आता भज्जीच्या कारकीर्दीला एकप्रकारे गांभीर्य आले आहे.
आजच्या तरुणाईला भावणारा आक्रमकपणा.. मैदानावर चेष्टा-मस्केरीचा खेळकरपणा आणि गोलंदाजी असो वा फलंदाजी जबाबदारी खांद्यावर घेऊन निधडय़ा छातीने सामोरे जाण्याची भिडस्त वृत्ती हेच भज्जीचे ‘पॅशन’ झाले आहे.
काळानुसार अपेक्षांचे ओझे वाढल्यावर आता जबाबदारीची जाणीवही हरभजनला आली आहे. गतवर्षी अनिल कुंबळेने पत्करलेल्या निवृत्तीनंतर आता हरभजन कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रांतांमध्ये भारतीय क्रिकेटच्या गरजा पूर्ण करीत आहे.
मागील चार परदेशातील कसोटी सामन्यांचा आढावा घेतला तरी दोनदा हरभजनने भारतीय विजयात सिंहाचा वाटा उचलल्याचे प्रत्ययास येते. यापैकी पहिली कामगिरी कुंबळेसोबतची आणि दुसरी कुंबळे युगाच्या अस्तानंतरची. २८ वर्षीय हरभजनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गॅले येथे सामन्यात दहा बळी मिळविण्याची किमया साधली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील या विजयामुळे भारताला मालिका बरोबरीत सोडविण्यात यश आले होते. तथापि, नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचे आणखी एक उदाहरण देता येईल. न्यूझीलंडसारख्या वेगवान खेळपट्टय़ांवर त्याने भारतीय फिरकीची मर्दुमकी दाखविली. नव्हे दुसऱ्या डावात ६३ धावांत सहा किवी फलंदाज तंबूत धाडत भारताच्या न्यूझीलंडभूमीवरील कसोटी विजयाचा सुवर्णाध्याय लिहिला.
न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी दुर्दैवाने अनिर्णीत राहिली. पावसाने भारताच्या विजयावर पाणी फेरेपर्यंत आपण दुसऱ्या डावात आठ किवी फलंदाजांना बाद केले होते. यापैकी चार बळी भज्जीच्या नावावर होते. बांगलादेश वगळता प्रत्येक कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्राविरुद्ध हरभजनने पाच बळी मिळविले आहेत.
कुंबळेच्या निवृत्तीनंतरच्या काळातील सहा कसोटी सामन्यांचा आढावा घेतल्यास हरभजनच्या नावावर ३१ बळी आहेत. दुसऱ्या बाजूने दर्जेदार फिरकीची साथ नसतानाही ‘मॅच-विनर’ म्हणून हरभजनने स्वत:ची निर्माण केलेली ओळख निश्चितच कौतुकास्पद आहे. याचप्रमाणे फलंदाजीतही त्याने या सहा कसोटीत २३३ धावा जमवून आपली अष्टपैलू उपयुक्तता सिद्ध केली आहे. वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने साकारलेले अर्धशतक संघासाठी उपयुक्त फलंदाजीचे दर्शन घडविणारे होते. २००१साली एका मुलाखतीत हरभजनने आपल्याला अष्टपैलू क्रिकेटपटू व्हायचे आहे, असा मनोदय व्यक्त केला होता. त्याच्या सध्याच्या कामगिरीकडे पाहता भज्जीचे ते स्वप्न आता सत्यात अवतरते आहे, हेच लक्षात येते.
७७ कसोटी सामन्यांच्या दांडग्या अनुभवानिशी सुमारे एक तप भारतीय फिरकीचा वारसा चालविणाऱ्या हरभजनला अद्याप बरीच वष्रे खेळायचे आहे. कसोटी क्रिकेटची भाषा आता हरभजनला चांगलीच ज्ञात झाली आहे. त्याच्या खात्यावर आता ३३० बळींची नोंद आहे. भारतीय गोलंदाजांच्या पंक्तीत आता फक्त अनिल कुंबळे आणि कपिल देव हरभजनच्या पुढे आहेत. बळींची ही भूक दिवसेंदिवस वाढतेच आहे. जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजविणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगही हरभजनच्या ऑफ स्पिन गोलंदाजीला घाबरून असतो. कारण सुमारे दहा वेळा भज्जीने पाँटिंगला तंबूची वाट दाखविली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे भज्जीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील गोलंदाजीच्या बळींचा ५०, २५० आणि ३५० हा टप्पा पाँटिंगच्याच विकेटनिशी साजरा केला आहे.
फक्त पाँटिंगच नव्हे तर अख्खा ऑस्ट्रेलियन संघ हरभजनला टरकून असतो. याचे कारण म्हणजे भज्जीची ऑफ स्पिन गोलंदाजी आणि त्याचा आक्रमक स्वभाव. हरभजनने सर्वाधिक ७९ बळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ मैदानावर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध फक्त बॅट आणि बॉल या हत्यांरानिशीच नव्हे तर टोमणे मारणे, उणीदुणी काढणे यांसारख्या मनोधर्य खच्ची करणाऱ्या अस्त्रांचाही लीलया वापर करण्यासाठी प्रचलित आहे. पण हरभजनच्या आक्रमक स्वभावापुढे हे ग्रेट वॉरियरसुद्धा दचकून असतात.
आता हरभजनला आत्मविश्वासासोबतच आपल्या बलस्थानांचीही पूर्ण जाणीव झाली आहे. त्यामुळे तो लवकर निराश होत नाही. आपल्या भावनिक आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवल्यामुळे अर्धी लढाई तो तिथेच जिंकतो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी हरभजनची चांगलीच मैत्री आहे. त्यामुळेच कदाचीत तो मुंबई इंडियन्स संघाचाही एक भाग आहे. आता टीम इंडियासह सारेच क्रिकेटविश्व आयपीएलच्या दुसऱ्या पर्वासाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या पर्वाचा आक्रमक स्वभावामुळे बट्टय़ाबोळ झाल्यानंतर आता दुसऱ्या पर्वात तमाम क्रिकेटरसिकांच्या हरभजनकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. पण इतके मात्र निश्चित की कुंबळेनंतर ‘दूसरा’ कोण याचे उत्तर हरभजनने आपल्या मॅचविनिंग कामगिरीने सर्वानाच दिले आहे. त्यामुळेच हे दुसरेपणाचे आवरण गळून पडून आता तेजस्वी पहिलेपण स्वीकारत ‘भज्जी’ नावाचा तारा तेजाने लखलखत आहे.
प्रशांत केणी

‘न्यूझीलंडमधील कामगिरीने आम्ही एक आदर्श घालून दिला आहे. पण त्यामुळेच भविष्यात जो भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाईल, त्या संघावर विजयाचे दडपण असेल. या दौऱ्यात भारतीय संघाने खूप काही कमावले आहे, पण ते टिकविणे हे मोठे आव्हान आहे,’
- महेंद्रसिंग धोनी.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलेले वास्तवाची जाणीव करून देणारे असे हे मत. गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना धोनीने भारतीय संघाची धुरा स्वीकारल्यापासून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांनाही तोडीसतोड उत्तर देण्याची ताकद असलेला एकमेव संघ म्हणून ज्याचा उदय झाला, तो म्हणजे भारतीय संघ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची क्रमवारीही तेच दर्शविते आहे. त्यातच न्यूझीलंडविरुद्धचे दिमाखदार यश भारताच्या या यशाला वेगळे परिमाण देणारे ठरले आहे. पण धोनीच्या उपरोक्त प्रतिक्रियेवरून हेदेखील ध्यानात घ्यावे लागेल की, भारतासाठी भविष्यकाळ सोपा नाही. ते भान आता भारतीय संघाला यायला हवे. धोनीने न्यूझीलंडच्या भूमीतील कामगिरीनंतर हुरळून न जाता आपल्या संघसहकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांची जाणीवही या निमित्ताने करून दिली आहे. पण स्वत: धोनीलाही भविष्यातील भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्के व्यावसायिक बनण्याची गरज आहे. कर्णधाराबरोबरच सर्वच खेळाडूंमध्ये अशी व्यावसायिकता भिनल्यास भारतीय संघ प्रदीर्घ काळ वर्चस्वाची चव चाखू शकेल.
तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताच्या व्यावसायिकतेत कुठेतरी उणीव दिसून आली. भारतीय संघाला विजयाची नामी संधी आलेली असताना पावसाच्या आगमनामुळे या संधीवर पाणी फेरले गेले, हे खरे असले तरी पावसापेक्षा भारताने दुसरा डाव घोषित करण्यास लावलेला विलंब ही संधी हुकण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू झाली. अशी चर्चा होण्यास वावही होता. कुणाचेही शतक किंवा विक्रम होण्याची शक्यता नसताना हा डाव ४३४ धावसंख्येपर्यंत का लांबवण्यात आला, हे अनाकलनीय होते. या विलंबामुळे भारताला कमी वेळ उपलब्ध झाला. पावसाची शक्यता जर धोनीने फारशी मनावर घेतली नसेल तर ते व्यावसायिक खेळाडूचे लक्षण म्हणता येणार नाही. एरव्हीही आपण मालिका जिंकणारच होतो, पण २-० अशा फरकाने जिंकण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वेगळी प्रतिमा निर्माण होऊ शकली असती. अल्पसंतुष्ट राहणे ही व्यावसायिक कर्णधाराची ओळख मानता येणार नाही. न्यूझीलंडचा माजी खेळाडू मार्टिन क्रो यानेही धोनीने जी डोळेझाक केली, ती लक्षात आणून दिली आहे. पहिल्या डावात यजमानांना १९७ धावांत उखडल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांची तीच गत करता येईल, हा विश्वास धोनीकडे नव्हता की काय, असा प्रश्न त्याने लांबविलेल्या डावामुळे सहज मनात येतो. असो. मालिका तर भारताने जिंकली, पण भारताला १००वा कसोटी विजय मात्र साकारता आला नाही, त्याची रुखरुख कायम मनात राहील. हा विजय साकारता आला असता तर क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाला टक्कर देणे भारताला सहज शक्य होऊ शकले असते, ती संधीही हुकली.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाने श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील साऱ्याच मातब्बर संघांना आपली ताकदीची चुणूक दाखवून दिली. ग्रेग चॅपेल यांच्या कालखंडात गलितगात्र झालेला भारतीय संघ पुन्हा नव्या जोमाने सज्ज होऊ लागला. संघातील ज्येष्ठ खेळाडूंसह तरुण, उदयोन्मुख, ताज्या दमाचे खेळाडू असा सुरेख मिलाफ झाल्याचेही हे निदर्शक म्हणावे लागेल. संघातील ज्येष्ठ आणि कनिष्ट खेळाडूंदरम्यान हा आपुलकीचा सेतू प्रस्थापित केल्याचे श्रेय बरेचसे धोनीचे आहे. भारतीय संघाने कसोटी मालिकेत मिळविलेल्या यशात याच ‘नातेसंबंधांचा’ मोठा वाटा आहे. गौतम गंभीर, इशांत शर्मा, झहीर खान या तरुण खेळाडूंसह सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिलेले तोलामोलाचे योगदान हा भारतीय संघाच्या मालिकाविजयाचा पाया म्हणता येईल. पण हा समन्वय साधला जात असताना एक शक्यता मनात डोकावते, ती म्हणजे सचिन, द्रविड आणि लक्ष्मण यासारख्या सीनियर खेळाडूंचा हा जवळपास अखेरचा न्यूझीलंड दौरा. कालांतराने ही मंडळी या क्रिकेटपासूनही दुरावतील. त्यांची उणीव संघाला नक्कीच जाणवेल. त्यांची जागा भविष्यात घेऊ शकतील, अशा खेळाडूंची फळी सज्ज असायला हवी. त्याची तयारीही निवड समितीला धोनीचे मत लक्षात घेऊन आताच करायला लागेल. अन्यथा, या विजयरथाला लगाम घालणे प्रतिस्पध्र्याना फारसे कठीण जाणार नाही. ऑस्ट्रेलियन संघात पूर्वी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, गिलख्रिस्ट अशी मातब्बर मंडळी असताना प्रतिस्पध्र्याचा टिकाव लागणे कठीण जात असे. मात्र ही मंडळी एकापाठोपाठ एक निवृत्त झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची पकडही बरीचशी ढिली पडली. भारताला हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
या दौऱ्याच्या निमित्ताने भारताला गौतम गंभीर आणि झहीरच्या रूपात हुकमी एक्के लाभले. गंभीरने संपूर्ण मालिकेत केलेल्या जवळपास साडेचारशे धावा त्याच्या कामगिरीचे यथार्थ दर्शन घडवितात. गंभीरच्या रूपात भारताला एक विश्वासार्ह असा सलामीवीर सापडला. न्यूझीलंडमधील कामगिरीने त्याने कसोटी संघातील आपले स्थान पक्के केले आहे. आता ही जागा भविष्यात स्वत:पाशीच ठेवण्याची खबरदारी त्यालाच घ्यावी लागणार आहे. भारतापुढे असलेला सलामीचा प्रश्न तूर्तास तरी सुटल्यासारखा वाटतो आहे. झहीरने संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून वेगळे परिमाण मिळवून दिले आहे. प्रतिस्पध्र्याची आघाडीची फळी कापण्याची जबाबदारी त्याने एकहाती लीलया उचलली. पण त्याला तेवढय़ाच तोडीची साथ दुर्दैवाने लाभू शकली नाही. खरे तर इशांत शर्माच्या रूपात त्याला ती साथ लाभणे आवश्यक होते, पण ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये दुखापतग्रस्त झालेला इशांत आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. त्याच्यासारख्या खेळाडूला जर ट्वेन्टी-२० सामन्यांत न खेळविता कसोटीसाठी राखून ठेवले असते तर दोन्ही टोकांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना भंडावून सोडण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडता आले असते.
एकूणच न्यूझीलंड दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटचा एक नवा आविष्कार पाहायला मिळाला आहे. ती प्रतिमा भविष्यात टिकविणे आता याच संघापुढील आव्हान असेल. धोनीला स्वत:चेच शब्द विसरून चालणार नाहीत.
महेश विचारे