Leading International Marathi News Daily
रविवार , १२ एप्रिल २००९

मी प्रविण महाजन बोलतोय..
हे आत्मचरित्र नाही. माझे बचावपत्रही नाही. माझी कैफियत नाही, त्याचप्रमाणे माझ्याबद्दल करुणा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्नही नाही. मग हे लहानसे पुस्तक कशाबद्दल आहे?
ही माझी ‘स्मृती-छायाचित्रे’ आहेत. म्हटले तर एक कौटुंबिक छायाचित्रांचा अल्बम आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, परिचितांना असा अल्बम दाखवतो. कौतुकाने आणि उत्साहाने. परंतु माझा हा अल्बम तसा कौतुकाने दाखविण्यासारखा नाही. अभिमान वाटण्यासारखा खचितच नाही. ही स्मृतीचित्रे पाहून, म्हणजे आठवून, मला यातना होतात. मन उदास होते. अगोदरच तुरुंगात भेडसावणाऱ्या एकटेपणाला या आठवणींनी अधिकच मन:क्षोभाच्या ऊष्ण कोठडीत ढकलले जाते; पण या सर्व स्मृती पुन: पुन्हा एखाद्या डॉक्युमेण्टरी फिल्मप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून जात असतात.

‘कम्युनिस्टांकडून धर्मनिरपेक्ष शक्तींचे खच्चीकरण’
कोची, ११ एप्रिल / पी. टी. आय.

भाजपप्रणीत जातीयवादी सरकार स्थापन करण्यास डावे पक्ष व तिसरी आघाडी मदत करीत असून धर्मनिरपेक्ष ताकदीचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप आज येथे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला. कम्युनिस्टांनी इतिहासाच्या चुकीच्या बाजूचे वारंवार समर्थन केले, असेही पंतप्रधान सिंग यांनी सांगितले. डाव्या आघाडीवर वा तथाकथित तिसऱ्या आघाडीवर जोरदार हल्ला चढविताना त्यांनी सांगितले की, ही आघाडी केंद्रात सत्तेवर कधी येणार नाहीत केवळ धर्मनिरपेक्ष शक्तींची मते विभाजित करण्याचे काम ही आघाडी करीत आहे. यामुळेच ते केवळ भाजपला बळकट करीत आहेत.

‘क्या मैं बुढीया दिखती हँू?-प्रियांका
अमेठी, ११ एप्रिल / पी.टी.आय.

‘क्या मै बुढीया दिखती हँू, असा खोचक सवाल प्रियांका गांधी यांनी विचारत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेस ही १२५ वर्षांची जख्खड म्हातारी आहे या टीकेला सणसणीत उत्तर दिले. लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ात सध्या विविध नेत्यांमध्ये वाकयुध्द रंगत आहे. काँग्रेस हा पक्ष १२५ वर्षांचा असून त्याचे नेतृत्वही तसेच असल्याची मल्लीनाथी मोदी यांनी केली होती. या पक्षाकडून आता कोणतेही चांगले व विधायक काम होणार नाही तसेच त्यांच्याकडे युवानेतृत्वही नसल्याचे मोदी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. तसेच केवळ ३० वर्षे वय असलेल्या भाजपमध्ये युवाचैतन्य असल्याचेही त्यांनी नमूद करीत हाच पक्ष सत्तापट उत्तम तऱ्हेने चालवेल असेही मोदी यांनी यावेळी सांगितले होते. जर मोदी आणि अडवाणी हे स्वत: ला तरुण समजत असतील तर चांगलेच पण मग मी काय म्हातारी दिसते काय? असा टोला प्रियांकाने लगावला. प्रियंका ही शुक्रवारपासून प्रचारात सक्रिय झाली आहे.

निवडणूक कामामुळे शेडय़ूल्ड सहकारी बॅंकाही बंद पडणार?
मुंबई, ११ एप्रिल/प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या संचालनासाठी सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक प्राध्यापकांना जुंपणाऱ्या निवडणूक आयोगाने, यावेळेस सहकारी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनाही जुंपायचे ठरवले असून त्याचा फटका ठाणेजिल्ह्यातील सहकारी बॅंकांच्या कामकाजाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या सहकारी बॅंकांना निवडणूक आयोगाचा हा फटका बसणार असून प्रामुख्याने डोंबिवली नागरी सहकारी बॅंक व कल्याण जनता सहकारी बॅंक या ठाणे जिल्ह्यातील दोन सहकारी बॅंकांपुढे कामकाज कसे चालवायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे.

बैतुल्लाचे आयएसआयशी संबंध?
न्यूयॉर्क, ११ एप्रिल/पीटीआय

लाहोरजवळच्या पोलीस केंद्रावर हल्ला केल्याचा दावा करणारा पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख बैतुल्ला मेहसूद याचे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचे वृत्त न्यूजवीकने दिले आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची हत्या करण्याचे किंवा त्याला पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र आयएसआयमधील सूत्रांनी त्याला याची माहिती दिल्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासह अनेक हत्याकांड व हल्ल्यात सहभागी झालेल्या बैतुल्लाला अटक करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक मोहिमा हाती घेतल्या होत्या. मात्र आयएसआयमधील सूत्रांमुळे तो प्रत्येकवेळी यातून बचावला आहे. तेहरीक-इ-तालिबानचे नेतृत्व करणारा बैतुल्ला २००७ मध्ये प्रकाशझोतात आला. आयएसआयशी संबंध असल्यामुळे तो प्रत्येकवेळी त्याच्याविरुद्धच्या मोहिमेतून सहीसलामत सुटला असल्याचे सांगण्यात येते.

खेळ मांडियेला एव्हरेस्टवरी..
ट्वेन्टी-२० सामन्याचे ‘मिशन इम्पॉसिबल’

काठमांडू, ११ एप्रिल / पीटीआय
क्रिकेटची लोकप्रियता आता माऊंट एव्हरेस्ट उंची गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. जगातील सर्वोच्च शिखर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या माऊंट एव्हरेस्टला सर करून आता ५६ वष्रे उलटल्यावर पहिला क्रिकेटपटू ते पादाक्रांत करण्याच्या निर्धाराने पुढे सरसावल्यास आश्चर्य वाटू नये. या मागची ग्यानबाची मेख तर पुढे आहे. उत्तर नेपाळकडील हिमालयाच्या प्रांतात एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपासून १३५ किमी खाली गोराक शेप येथे निधी गोळा करण्याच्या हेतूने एक ट्वेन्टी-२० सामना होऊ घातलाय. ३० ब्रिटिश हौशी क्रिकेटपटू आणि २० सहाय्यक कर्मचारी या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी सरसावले असून, आज त्यांनी आपल्या अभियानाला सुरुवातही केली आहे.

व्यवस्थापन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांला रॅगिंगमुळे दृष्टीदोष
कोइम्बतूर, ११ एप्रिल/पी.टी.आय.

तीन हजार रुपये दिले नाहीत म्हणून ‘बीबीएम’या व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या अखिल या तरुणाला रॅगिंगला तोंड द्यावे लागले आणि त्यात त्याच्या डोळ्यावर बुक्का मारला गेल्याने त्याला दृष्टीदोष निर्माण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर रॅगिंगविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोइम्बतूरमधील पीएसजी कला व विज्ञान महाविद्यालयात शिकणारा अखिल हा केरळातील प्रसिद्ध कादंबरीकार सुनिल परमेश्वरन यांचा मुलगा आहे. तो खाजगी वसतिगृहात रहात आहे.

गजानन कीर्तिकरांचा उमेदवारी अर्ज वैध
मुंबई, ११ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी राहिलेल्या असल्याने तो अवैध ठरवावा, ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आणि कीíतकर यांचा अर्ज वैध ठरवला. कीर्तिकर यांनी ३ - ए या अर्जावर सही केलेली नसल्याची तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर कीर्तिकरांच्या अर्जाबाबत निवडणूक अधिकारी काय निर्णय देणार, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

भगव्या शक्तींना रोखण्यात काँग्रेस अपयशी
भाकपची टीका
नवी दिल्ली, ११ एप्रिल / पी. टी. आय.
भगव्या शक्तींला रोखण्यास काँग्रेस कायम अपयशी ठरत असल्याचे सांगितले. तसेच भारत - अमेरिका यांच्यातील अणू करार संमत करणे हा पंतप्रधानांनी वैयक्तिक मुद्दा बनविला होता, असा आरोप आज भाकपने केला. भारत-अमेरिका अणू करार संमत न झाल्यास पंतप्रधानांनी पद सोडण्याचा इशारा दिला होता यावरूनच त्यांनी हा वैयक्तिक मुद्दा बनवून काँग्रेसवरच दबाव आणला होता, असे भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश करात यांनी सांगितले. भाजपला रोखण्यासाठी केवळ बिगर काँग्रेस असणारी तिसरी आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगून तिसरी आघाडी ही धर्मनिरपेक्ष शक्तींमधील पर्याय आहे, असे करात यांनी स्पष्ट केले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी