Leading International Marathi News Daily
रविवार , १२ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्वरात ॐकार भेटला गा..’
प्रतिनिधी

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी.. पंडित विश्वमोहन भट यांची मोहनवीणा.. रतीश तागडे यांचे वायोलिन.. पंडित श्रीकांत देशपांडे यांचे किराणा घराण्यातील सूर.. पंडित संजीव अभ्यंकर यांचे हिंदुस्तानी संगीत.. पंडित राजन साजन मिश्रा यांचे मनमोहक सूर.. पंडित भवानी शंकर यांचे पखवाज वादन.. अन् विजय घाटे यांची तबल्यावरची थाप.. या संगीतोत्सवात एक संध्याकाळ न्हाऊन निघाली. निमित्त होते जेष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘वलय फाऊंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष

 

कार्यक्रमाचे.
कावेरी आगाशे आणि शितल कोलवालकर यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या भजनावर कथ्थक नृत्य सादर करुन कार्यक्रमाची आगळीवेगळी सुरुवात केली. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक रागांच्या डीव्हीडीचे जेष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या दरम्यान प्रकाशन करण्यात आले. ‘वलय फाऊंडेशन’ आणि ‘शेमारु’ यांनी तयार केलेल्या या डीव्हीडीच्या प्रकाशन सोहळ्यात पं. विश्वमोहन भट, पं. श्रीकांत देशपांडे, पं. संजीव अभ्यंकर, पं. राजन साजन मिश्रा, पं. भवानी शंकर, विजय घाटे, रतीश तागडे मंचावर उपस्थित होते. यावेळी ‘वलय फाऊंडेशन’तर्फे पं. भीमसेन जोशी यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार पं. श्रीकांत देशपांडे यांनी पंडितजींच्या वतीने स्वीकारला.
पंडित श्रीकांत देशपांडे यांनी किराणा घराण्यातील संध्याकाळचा राग पेश केला. यानंतरच्या दुसऱ्या पुष्पात वायोलिनवादक रतीश तागडे यांनी सादर केलेला राग यमन आणि ‘माझे माहेर पंढरी’ या भजनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर पं. संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेला गोरख कल्याण राग आणि ‘आज माये मोहन खेलत होरी’ या गीताने रसिकांची मने जिंकली. पं. विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणेने सर्वाना मोहीनी घातली. त्यांना विजय घाटे यांनी तबल्यावर साथ दिली. नंतरच्या सत्रात पं. राजन साजन मिश्रा यांच्या गीतांनी रसिकांना खिळवून ठेवले. ज्या जुगलबंदीची रसिक वाट पाहत होते ती घटीका समीप आली. नंतरच्या सत्रात पं. भवानी शंकर यांचे पखवाज आणि विजय घाटे यांचा तबला यात जुगलबंदी रंगली. या जुगलबंदीने रसिकांची मनमुराद दाद मिळविली. अखेरच्या सत्रात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन झाले. चौरसिया यांनी आपल्या खास शैलीने रसिकांची सांगितिक रात्र रंगविली.
संगीत क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ‘वलय फाऊंडेशन’चा हा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील सहभागी सर्व दिग्गजांनी आपले सादरीकरण पं. भीमसेन जोशी यांच्या चरणी अर्पण केले. या कार्यक्रमानंतर जेष्ठ कवी विं. दा. करंदीकर यांनी भीमसेन जोशी यांच्यासाठी लिहिलेल्या कवितेतील स्वरात ‘ॐकार भेटला गा..’ या पदांची प्रचिती आली.
शास्त्रीय संगीतासाठी एक वाहिनी हवी - पं. विश्वमोहन भट
‘आज तुम्ही सर्व प्रेक्षक टीव्हीवरील ९२ वाहिन्यांवरील कार्यक्रमांचा त्याग करुन हा कार्यक्रम पाहावयास आलात त्याबद्दल आपले आभार’, अशी कोपरखळी पं. विश्वमोहन भट यांनी सभागृहात मारली. त्याचबरोबर शास्त्रीय संगीतासाठी स्वतंत्र वाहिनी असावी, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.