Leading International Marathi News Daily
सोमवार, १३ एप्रिल २००९

आता, मी प्रकाश महाजन बोलतोय..
मुंबई, १२ एप्रिल / प्रतिनिधी

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या खूनप्रकरणी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला त्यांचा भाऊ प्रवीण महाजन याने लिहिलेल्या आणि अद्याप अप्रकाशित असलेल्या ‘माझा अल्बम’ या पुस्तकात प्रमोद महाजन यांच्याविषयी लिहिण्यात आलेला मजकूर हा धादांत खोटा असल्याचे स्पष्ट करून प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत त्या मजकुराचे जोरदार खंडन केले. इतकेच नव्हे तर प्रमोद महाजन यांच्याबद्दल करण्यात आलेले लिखाण हे त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार असून त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही प्रकाश महाजन यांनी या वेळी केला. प्रवीण यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अप्रकाशित भाग प्रसिद्ध होताच आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर तातडीने प्रकाश महाजन यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. संपूर्ण महाजन कुटुंबीयांच्या वतीने आपण खुलासा करीत आहोत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेल्या मजकुरामधील काही बाबींचा उल्लेख प्रकाश महाजन यांनी केला आणि त्याबाबतचे स्पष्टीकरणही दिले.

‘माझा अल्बम’ सत्यच - सारंगी महाजन
नागपूर, १२ एप्रिल/ प्रतिनिधी

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्त्येचा आरोप असलेले त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या ‘माझा अल्बम’ या सध्या अप्रकाशित असलेल्या पुस्तकातील घटना पूर्णपणे सत्य असल्याचा दावा करून या मजकुराचा कुणीही राजकारणासाठी वापर करू नये, असे आवाहन त्यांच्या पत्नी सारंगी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.‘माझा अल्बम’ प्रवीण महाजन यांच्या स्मृती असून त्या त्यांनी नासिक आणि आर्थररोड तुरुंगात शब्दबद्ध केल्या आहेत. त्याची हस्तलिखित प्रत माझ्याकडे (सारंगी महाजन) उपलब्ध आहे. या लेखाचा काही भाग आज वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. ‘माझा अल्बम’ लवकरच पुस्तक रूपात प्रकाशित होत असून यासाठी अनेक प्रकाशकांनी संपर्क साधला आहे. या लेखातून कोणत्याही राजकीय पक्षाला, संघटनेला किंवा व्यक्तीला दुखावण्याचा वा कोणाची बदनामीचा हेतू नाही. यातील घटनाक्रम पूर्णपणे सत्य आहे. यातील घटनांचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रवीणचे आत्मकथन म्हणजे कट - गोपीनाथ मुंडे
औरंगाबाद, १२ एप्रिल/खास प्रतिनिधी

प्रवीण महाजन याचे आत्मकथन बदनामीकारक असून, हा एक कट आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व (कै.) प्रमोद महाजन यांचे मेव्हणे गोपीनाथ मुंडे यांनी आज व्यक्त केली. मुंडे आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर होते. मुंडे म्हणाले, ‘या पुस्तकात काही तथ्य नाही. मुळात हे पुस्तक त्याने (प्रवीण) लिहिले की नाही हे तपासावे लागेल. जेलमध्ये असताना एखादा कैदी पुस्तक कसा लिहू शकतो आणि त्याने लिहिलेले पुस्तक वर्तमानपत्रात जाते कसे?’’तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक कागदपत्रावर प्रमाणित शिक्का असतो. या पुस्तकावर जेलने प्रमाणित केलेले नाही, असे सांगून श्री. मुंडे, ‘‘प्रमोद महाजन हत्या खटल्यात मी साक्षीदार असल्याने या संदर्भात अधिक काही भाष्य करणार नाही.’’

वडिलांवरील सर्व आरोप धादांत खोटे- पूनम महाजन
मुंबई, १२ एप्रिल / प्रतिनिधी

माझ्या वडिलांवर करण्यात आलेले सर्व आरोप धादांत खोटे आहेत. तसेच फारसे महत्त्व द्यावे, असे हे लिखाणही नाही, अशी प्रतिक्रिया दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी आज दिली. प्रवीण महाजन यांच्या अप्रकाशित पुस्तकातील आरोपांबद्दल पूनम महाजन यांनी वरील प्रतिक्रिया दिली. महाजन यांच्या खुनाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत आपण फारसे काही बोलू शकत नाही, असेही पूनम महाजन यांनी स्पष्ट केले.

एक दिवस राहुल गांधी पंतप्रधान होईल - प्रियांका
अमेठी १२ एप्रिल/पीटीआय

राजकारणात येण्यास माझा मुळीच विरोध नाही असे प्रियांका गांधी यांनी आज सांगितले. एक दिवस माझा भाऊ राहुल पंतप्रधान होईल अशी आशाही प्रियांका यांनी व्यक्त केली. दरम्यान काँग्रस पक्षाने त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या वक्तव्याचे स्वागत केले असून त्या केव्हा राजकारणात येणार याबाबत मात्र कुठलेही सूतोवाच केलेले नाही. वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आता माझे वय वाढत चालले आहे व कधीच राजकारणात येणार नाही, असे म्हणणे योग्य वाटत नाही, त्यामुळे राजकारणात येणारच नाही असे नाही. आतापर्यंत राजकारणात येण्याबाबत स्पष्ट नकार देणाऱ्या प्रियांका यांनी यावेळी मात्र स्पष्ट नकार दिला नाही ही विशेष बाब मानली जात आहे. प्रियांका यांनी आतापर्यंत त्यांच्या मातु:श्री सोनिया गांधी व बंधू राहुल गांधी यांच्या प्रचारात भाग घेण्याची भूमिका पार पाडली आहे. याचवेळी त्या असेही म्हणाल्या की, मी राजकारणात येणारच नाही, असे नाही पण येईनच असेही नाही. अमेठी मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवीत असलेला माझा भाऊ राहुल हा पंतप्रधानपदासाठी पात्र आहे पण आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आली तर मनमोहनसिंग हेच पंतप्रधान होतील. माझ्या भावावर माझी पूर्ण श्रद्धा आहे, त्यामुळे तो एक दिवस पंतप्रधान होईल व त्या पदाला न्याय देईल. मनमोहनसिंग हे कमकुवत पंतप्रधान आहेत या भाजपच्या टीकेला उत्तर देताना प्रियांका म्हणाल्या की, मनमोहनसिंग हे पंतप्रधानपदाला पात्र आहेत. देशाने त्यांच्या क्षमता पाहिल्या आहेत त्यामुळे ते कमकुवत मुळीच नाहीत. प्रियांकाच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले की, त्या काँग्रेसच्या मोठय़ा कुटुंबाचाच भाग आहेत, त्यांच्या आताच्या वक्तव्यावरून त्या कुठले पद स्वीकारतील की नाही हे सांगणे कठीण आहे.

भाजपची खरी प्रतिमा उघड
झाली; काँग्रेसची प्रतिक्रिया
नवी दिल्ली, १२ एप्रिल/पी.टी.आय.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या आरोपांनी भाजपची खरी प्रतिमा लोकांसमोर उघड झाली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसतर्फे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी आज व्यक्त केली. लालकृष्ण अडवाणी यांनी भ्रष्टाचारासंदर्भात आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नयेत; भ्रष्टाचाराची परिसीमा भाजपच्या नेत्यानेच गाठली आहे; हे प्रवीण महाजन यांच्या लेखनातून स्पष्ट होते. प्रमोद महाजन यांना अडवाणी यांनीच मोठे केले आणि त्याच प्रमोद महाजनांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला, नीतीमूल्ये पायदळी तुडवली हे प्रवीण यांच्या आरोपांमधून स्पष्ट होत आहे, असेही सिंघवी म्हणाले.

‘ओडीआरएफ’ मानवी हक्कावर कार्य करणार
मुंबई, १२ एप्रिल / प्रतिनिधी

अमेरिकेतील आंबेडकरवादी लोकांनी स्थापन केलेल्या ओम्नी डेव्हलपमेंट रिलीफ फंड (ओडिआरएफ ) या संस्थेची देशातील शाखा मंगळवारी, १४ एप्रिल रोजी स्थापन होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सुरू होणाऱ्या या संस्थेच्या वतीने दलितांच्या मानवी हक्काबाबत कार्य करण्यात येणार आहे. अमेरिकेत मानवी अधिकाराबाबत या संस्थेने मोठे कार्य केले आहे. जातीवाद आणि वर्णभेद व्यवस्था नष्ट व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्राताही दलितांच्या मानवी अधिकाराचे रक्षण करण्यासाठी या संस्थेने कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिल रोजी दादर येथील आंबेडकर भवन येथे या संस्थच्या स्थापनेची घोषणा करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. मराठवाडय़ातील कार्यकर्ते गणपत भिसे ‘ अॅट्रासिटी कायदा आणि दलितांचे मानवी अधिकार’ या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. हा कार्यक्रम सध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे.

प्रवीणकडून आई-मुलाच्या नात्याचा खून- विनोद तावडे
मुंबई, १२ एप्रिल/प्रतिनिधी

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा खून करून प्रवीणने काही वर्षांपूर्वी भावा-भावांच्या नातेसंबंधांची हत्या केली होती. मात्र आज ‘माझा अल्बम’ या अप्रकाशित पुस्तकातील जो भाग प्रसिद्ध झाला आहे तो पाहता प्रवीणने आई-मुलाच्या नात्याचाही खून केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर हे लिखाण प्रकाशित करणे हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही तावडे यांनी केला.तावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण महाजन याचे लेखन प्रसिद्ध होणे हा केवळ योगायोग नसून ते राजकीय षडयंत्र आहे. यामागे कुणाचा मेंदू व हात आहे ते जनतेला सांगण्याची गरज नाही.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी