Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
अग्रलेख

हिमालयाची सावली

 

या वर्षी चैत्रामध्येच वैशाख अवतरल्याचा दाहक अनुभव येत असतानाच निवडणुकीच्या मोसमाबरोबर, दीड महिन्यांनी येणाऱ्या मान्सूनची चिंताही योजनाकारांना आणि शेतकऱ्यांनाही वाटू लागली आहे. नवीन सरकार आणि मान्सून साधारण पंधरवडय़ाच्या अंतराने येणार असल्यामुळे आणि त्या सरकारचे भवितव्यही काही प्रमाणात त्या मान्सूनच्या हातात असल्यामुळे ही चिंता आजच वाटणे स्वाभाविक आहे. डॉ. मनमोहन सिंग सरकारने शेती नियोजनासंबंधात घेतलेल्या धोरणाबरोबरच जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याबाबतही पावले उचलण्याचे आष्टद्धr(२२४)वासन आंतरराष्ट्रीय संस्थांना दिले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे होणारे हवामानबदल रोखणे व त्यामुळे मान्सूनमध्ये होणारे विपरीत बदल रोखणे हे त्या नियोजनावरच अवलंबून आहे. काही भाकितांनुसार मान्सूनच्या काळात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचे वितरण विषम असेल. दुष्काळी भागातील पाऊस कदाचित कमी होईल, तर अतिवृष्टीच्या भागात त्याचे प्रमाण वाढेल. बदलत्या परिस्थितीत मान्सूनबाबतचे दुसरे भाकीत मात्र काळजी करायला लावणारे आहे. त्यानुसार उत्तर गोलार्धात, विशेषत: अटलांटिक महासागरात काही बदल होऊन कदाचित भारतीय मान्सूनची तीव्रता अतिशय कमी होऊन भारतासह आशिया खंडाला दीर्घकालीन दुष्काळाचा सामना करावा लागेल. इतिहास काळात साधारणत: ८२०० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती उद्भवल्याचे पुरावे मिळाले आहेत. ती कदाचित पुन्हा अवतरेल, असा इशाराच शास्त्रज्ञांच्या एका गटाने दिला आहे. परंतु मान्सून अर्थात मोसमी वाऱ्यांचे वय किती?.. हवामानशास्त्रज्ञ व पर्यावरणशास्त्रज्ञांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न! तशी मान्सूनच्या निर्मितीला सुरुवात झाली ती कोटय़वधी वर्षांपूर्वी. मात्र, त्याला आतासारखे नेमके- ठाम स्वरूप साधारणत: ८० लाख वर्षांपूर्वी लाभल्याचे मानले जाते, पण हा काळ त्यापेक्षा खूपच मागे जात असल्याचे पुरावे गोव्यातील राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी) व ब्रिटनच्या काही शास्त्रज्ञांनी शोधले आहेत. हा काळ साधारणत: दीड कोटी वर्षांइतका (१.३९ कोटी ते १.५४ कोटी वर्षे) मागे जात असल्याचे त्यांना हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावर केलेल्या संशोधनावरून समजले. विशेष म्हणजे त्याचा संबंध हिमालय पर्वताची उंची वाढण्याशीसुद्धा आहे! त्यामुळे मान्सूनने आतापर्यंतच्या समजुतीपेक्षाही कितीतरी जास्त काळापासून आपल्या प्रदेशाची साथ केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमालय ही जगातील सर्वात तरुण पर्वतरांग असल्याचे मानले जाते. तिच्या निर्मितीची प्रक्रिया साधारणत: सात-साडेसात कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. तिची प्रत्यक्ष उंची वाढण्यास सुरुवात झाली ती पाच-साडेपाच कोटी वर्षांपूर्वी. पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या हालचालींचा तो परिणाम आहे. पृथ्वीला ढोबळ मानाने तीन आवरणे आहेत- गाभा, मध्यावरण आणि सर्वात बाहेरचे भूकवच. हे भूकवच बारा ते शंभर किलोमीटर जाडीचे आहे. ते अखंड नसून, अनेक भूखंडांमध्ये विभागलेले आहे. त्याच्याखाली द्रवरूपातील लाव्हारस आहे. या लाव्हारसावर हे भूखंड तरंगतात आणि विविध दिशांना सरकतातसुद्धा! या भूखंडांची हालचाल अविरतपणे, पण अतिशय संथगतीने (वर्षांला केवळ काही इंच इतक्या संथपणे!) सुरू असते. अशाच एका भूखंडावर भारताचा भूभाग आहे. त्याच्या उत्तरेला दुसऱ्या एका भूखंडावर रशिया-आशियाचा (युरेशिया) भाग आहे. या दोन्ही भूखंडांच्या मध्ये पूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. पण भारतीय भूखंड युरेशियाच्या दिशेने सरकल्याने या टेथिस समुद्रातील गाळाचे खडक वर उचलले गेले. त्यातून हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय भूखंड अजूनही युरेशिया भूखंडाकडे सरकत असल्याने हिमालयाची उंची वाढतच आहे. ही उंची वाढताना दीड कोटी वर्षांपूर्वी हिमालय विशिष्ट टप्प्यात पोहोचला. त्या उंचीमुळे मान्सूनला आजचे ठाम असे स्वरूप प्राप्त झाले. हिमालयाच्या वाढत्या उंचीबरोबरच मान्सूनने भारतीय उपखंडात जम बसवला. याच मान्सूनने भारतीय उपखंडाचे हवामान, भूगोल-भूरचना, जैवविविधता व संस्कृतीचीसुद्धा खऱ्या अर्थाने जडणघडण केली आहे. हिमालय व भौगोलिकदृष्टय़ा त्याच्याच पर्वतरांगेचा एक भाग असलेले तिबेटचे पठार यांच्या उंचीमुळे मान्सूनच्या निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. शिवाय भारताच्या दक्षिणेकडील समुद्रावरून बाष्प घेऊन येणारे मान्सूनचे वारे याच हिमालयाने अडविल्याने भारताला वैशिष्टय़पूर्ण मोसमी हवामानही लाभले. भारतात चार महिन्यांच्या विशिष्ट कालावधीत असलेला पावसाळा हीसुद्धा याच मान्सूनच्या वाऱ्यांची (म्हणजेच अप्रत्यक्षपणे हिमालयाचीच!) देणगी. असा पावसाळा आणि त्याच्या अनुषंगानेच विकसित झालेले ऋतुचक्र, जीवसृष्टी, विविध परिसंस्था यासुद्धा त्याचीच देणगी ठरतात. आता मान्सूनच्या निर्मितीचे वय आतापर्यंतच्या समजुतीपेक्षा जवळजवळ दुप्पट मागे गेल्याने या गोष्टी विकसित होण्याची प्रक्रिया जुनी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जगाच्या इतर भागातही मान्सूनचे वारे आढळतात. तरीसुद्धा मान्सून म्हटले की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो आशियाई मान्सून, त्यातही प्रामुख्याने भारतातील मान्सूनच. कारण इतर कोणत्याही भागातील मान्सूनमध्ये आपल्याइतकी तीव्रता व नेमकेपणा पाहायला मिळत नाही. त्याला कारणीभूत ठरले आहे भारताचे वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थान व भूरचना. विषुववृत्ताच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण जमीन, हिमालय-तिबेटसारखे उंचावलेले प्रदेश, येणाऱ्या वाऱ्यांना अडवून ठेवणारी पर्वतांची रचना या गोष्टी जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही भारतीय उपखंडाइतक्या चांगल्याप्रकारे आढळत नाहीत. त्यामुळेच भारतीय मान्सूनला अनोखेपण लाभले आहे. याच वाऱ्यांनी या प्रदेशात नियमित व भरवशाचा पाऊस दिला आणि या पावसाने अनेक प्राचीन संस्कृतींना जन्म दिला. इतकेच नव्हे तर या वाऱ्यांची चांगल्याप्रकारे माहिती झाल्यावर त्यांचाच उपयोग करून घेतल्यामुळे प्राचीन काळात व्यापाराचीसुद्धा भरभराट झाली. कारण मान्सूनचे वारे वर्षांच्या विशिष्ट काळातच भारताच्या दिशेने येतात आणि त्यानंतर आले त्या मार्गाने माघारीसुद्धा परततात. त्यांच्या वाहण्याच्या दिशेचा विचार करून दोन हजार वर्षांपूर्वीच देशोदेशीच्या खलाशांनी विशिष्ट कालावधीत जहाजे समुद्रात उतरवली आणि या वाऱ्यांवर स्वार होऊन त्यांनी भारताशी असलेला व्यापार मोठय़ा प्रमाणात वाढवला. कारण या वाऱ्यांचे वैशिष्टय़ माहीत झाल्यावरच त्यांचा योग्य तो वापर करून घेता आला. त्या काळी शिडाची जहाजे हाकण्यासाठी वारा हेच मुख्यत: ऊर्जेचे साधन होते. त्यामुळे त्या काळी व्यापार चालला आणि वाढला तोसुद्धा मान्सूनच्याच आधाराने! या मान्सूनच्या वाऱ्यासोबत भारतात व्यापारी आले, तसेच विविध संस्कृती येथे येऊन रुजल्या. विविध धर्मसुद्धा याच वाऱ्याच्या आधारानेच भारतात येऊन पोहोचले. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन संस्कृती व त्याच्या पुढे-मागे इतरही अनेक संस्कृतींशी भारताचे संबंध वाढले. त्यातही याच वाऱ्यांचा प्रमुख वाटा होता. मान्सूनची आपल्या प्रदेशातील योगदानाची ही परंपरा आजही कायम आहे. कारण आधुनिक काळातसुद्धा आपली शेती, उद्योग, पाण्याची उपलब्धता, अर्थव्यवस्था आणि संपूर्ण जीवन याच मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे निदान भारतभूमी व आसपासच्या प्रदेशासाठी अजून तरी तोच भाग्यविधाता ठरलेला आहे. मान्सूनचे वय निश्चित झाल्यामुळे त्याने जास्त काळापासून आपल्या प्रदेशाची साथ केल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमालयाची उंची दिवसेंदिवस वाढतच असल्याने (हा वेग सध्या वर्षांला सरासरी अर्धा ते एक सेंटिमीटर इतका आहे) हा मान्सून आपल्याला आणखी कोटय़वधी वर्षांपर्यंत साथ देण्याची सध्या तरी शक्यता आहे. पण हे सर्व नैसर्गिकरीत्या घडत असताना आता हवामानबदलाच्या संकटामुळे ही स्थिती बदलेल की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण सध्या जागतिक तापमानवाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. हवामानात बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे इतक्या जुन्या काळापासून आपली साथ करणाऱ्या मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे बदल रोखायचे म्हटले तरी पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींवर किंवा हिमालयाच्या उंचीत वाढ-घट होण्यावर आपले नियंत्रण नाही. नजीकच्या भविष्यातही ते नसेल. त्याऐवजी इतर मार्ग अनुसरावे लागतील. त्यासाठी ऊर्जेचा अतिवापर, साधनसंपत्तीची उधळपट्टी, नैसर्गिक परिसंस्था व स्रोतांवरील अतिक्रमण या गोष्टींना फाटा द्यावा लागेल. नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करणारी जीवनपद्धती बदलावी लागेल. उत्तरेत ठाण मांडून बसलेला हिमालय आणि दीड-दोन महिन्यांनंतर आपल्याकडे येऊ घातलेल्या मान्सूनच्या साक्षीने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावाच लागेल!