Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

सुरक्षित असूनही असुरक्षित!
अनिकेत साठे

बारामतीनंतर राष्ट्रवादीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणजे दिंडोरी असे प्रशस्तीपत्रक खुद्द शरद पवारांनी दिल्यामुळे प्रारंभी सहजसोपे वाटणारे येथील समीकरण पक्षांतर्गत नाराजी, सेना-भाजप युतीचे आव्हान आणि माकपच्या उमेदवारीमुळे बऱ्याच प्रमाणात अवघड बनल्याची जाणीव आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना होऊ लागली आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नरहरी झिरवाळ आणि सेना-भाजप युतीचे विद्यमान खा. हरिश्चंद्र चव्हाण आणि आदिवासीबहुल पट्टय़ात आपला गड कायम ठेवणारे डाव्या आघाडीचे आ. जिवा पांडु गावित यांच्यात मुख्य लढत होणार आहे. बसपा व भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार प्रभावशाली नसले तरी त्यांना मिळणारी मते आघाडीचीच असणार हे उघड आहे.

आहेत भुजबळ तरी..!
अभिजीत कुलकर्णी

मातब्बर राजकीय घराणी, हेवीवेट उमेदवार यांच्यामुळे एरवी त्या त्या मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरत असतात. मात्र, सगळेच प्रमुख उमेदवार नवखे असताना देखील नाशिकची निवडणूक यंदा साऱ्या राज्यभर औत्सुक्याचा विषय ठरली आहे, ती छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरविल्यामुळे. मराठा, मनी, मसल आणि मनसे असे चार ‘एम’ फॅक्टर्स या निवडणुकीत कळीची भूमिका पार पाडत असल्याने दिवसागणिक येथील गुंतागुंत वाढत चालली आहे.

स्थानिक आघाडय़ा बिघडविणार राष्ट्रीय पक्षांची समीकरणे
चारुदत्त कहू

२००० ला अस्तित्वात आलेले झारखंड राज्य सामाजिक आणि विकासाच्या दृष्टीने मागास राहिले असले तरी तडजोडीच्या तत्त्वशून्य राजकारणात या राज्याने सर्व राज्यांना पिछाडीवर टाकलेले आहे. गेल्या आठ वर्षांत या राज्यातील नेते आणि पक्ष अनेक वेळा फुटले आणि तितक्याच वेगाने जवळही आले. राज्याच्या स्थापनेपासून झारखंडने आतापर्यंत सहा मुख्यमंत्री अनुभवले. झारखंडमध्ये सध्या लागू असलेली राष्ट्रपती राजवट अस्थिर राजकारणाचीच परिणिती आहे. याच तडजोडीच्या राजकारणाचे पडसाद येत्या १६ आणि २३ एप्रिलला दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.

अजेंडा तेंडुलकरांचा..
कॉमन मॅनच्या हितरक्षणाचा!
पुणे, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी
‘मी आपणाकडे मत मागत नाही. काहीही मागत नाही. मी पुढारी नाही की नेता. कुणाचा अनुयायीसुद्धा नाही. परंतु, सध्या मला एक प्रश्न भेडसावतो आहे. तो तुमच्यापुढे विचारार्थ ठेवत आहे. अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयता, घराणेशाहीच्या आपण कृष्णविवरामध्ये अडकत चाललो आहोत काय?.. या सर्वाचा आपल्या बुद्धीने विचार करून निष्कर्ष काढा नि सावध व्हा. मगच मतदान करा..’ ..एरवी कुंचल्याच्या मार्मिक रेषांनी बोलणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची लेखणी आता सुनावत होती.

शरद पवार पंतप्रधान होऊच शकत नाहीत -उद्धव ठाकरे
अमरावती, १३ एप्रिल / प्रतिनिधी

मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, ही शिवसेनेची इच्छा असली तरी यावेळी दुर्दैवाने एकही मराठी नेता त्या पदापर्यंत पोहोचेल, असे दिसत नाही. शरद पवार तर कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. सर्वेक्षणांचे निकाल काहीही येवोत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सत्तेवर येणार आहे. भाजपसोबत २० वर्षांची मैत्री आहे, ती तुटणार नाही. आम्ही कुंपणावरचे खेळाडू कधीच नव्हतो, राहणारही नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केले.

प्रक्षोभक आणि हीन दर्जाच्या प्रचारावर निवडणूक आयोगाची तीव्र नापसंती
नवी दिल्ली, १३ एप्रिल/पीटीआय

राजकीय पक्षांचे नेते प्रचारादरम्यान अत्यंत हीन दर्जाची आणि प्रक्षोभक वक्तव्ये करीत असल्याबद्दलच्या असंख्य तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या असून, आयोगाने त्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक नेत्याने खऱ्या अर्थाने आणि प्रामाणिकपणे आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले आहेत.या तक्रारींची तातडीने दखल घेऊन, आयोगाने सर्वच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांबरोबर संपर्क साधून, प्रचारादरम्यान खुलेआम होत असलेल्या पैशाच्या वाटपावरही कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार दिवसागणिक शिगेला पोहोचणार आहे हे लक्षात घेऊन आयोगाने म्हटले आहे की, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाचे राजकीय नेते त्यांच्या जाहीर सभांमध्ये अत्यंत हीन दर्जाची आणि भडक भाषणे करतात. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे चारित्र्यहनन करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. अशा वक्तव्यांमुळे जातीय विद्वेष भडकतो. सामाजिक सलोखा नष्ट होतो. विविध धर्म, जात आणि समाजातील नागरिकांच्या मनात विद्वेष निर्माण व्हायला आपसूकच पूरक परिस्थिती निर्माण होते. म्हणून आचारसंहितेचे प्रामाणिकपणे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराची आहे, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. आयोगाकडे भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि इतर काही पक्षांच्या नेत्यांविषयी पैसे वाटत असल्याच्या, प्रचारात प्रक्षोभक वक्तव्य करत असल्याच्या असंख्य तक्रारी आल्यानंतर राजकीय नेत्यांना अशी समज देणे क्रमप्राप्त झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.