Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
लोकमानस

अत्त दीप भव
बाबासाहेब,

 

आमच्या पिढय़ांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व त्या अधिकाराची शाश्वत व्यवस्था तुम्ही पूर्ण करून गेलात. पण इथल्या माणसांच्या रक्तात भिनलेलं आणि मेंदूत भिनवलेलं जातीद्वेष व तिरस्काराचं विष आमच्या शरीरावर व मनावर अजूनही उमटत आहे. आमच्या विचारांचा, वर्तनाचा उथळ नाकर्तेपणा तुम्हाला सांगताना संकोच वाटतो. पण याही पलीकडे तुमच्यानंतर आमच्या वाटचालीचे षंढत्व तुमचं कर्तृत्व पेलू शकल नाही. वामनदादा कर्डक म्हणतात,
भीमा तुझ्या विचारांचे जर
चार लोक असते
तर, तलवारीचे तयांच्या
नैरेच टोक असते..

कदाचित वामनदादांना आमच्या गुणांचा अंदाज अगोदरच आला होता.
बाबासाहेब, भारतातल्या ग्रामीण भागातील सामाजिक व्यवस्था आजही जातिप्रधान आहे. समानतेची जीवन पद्धती प्रस्थापितांना रुचत नाही. त्यातूनच दलित या चौकटीत असणाऱ्यांना चौकटीच्या बाहेरचे जगणे जगू दिले जात नाही. तरुणांचे डोळे काढणे, सार्वजनिक हत्येतून मेलेल्यांना पुन्हा जाळणे आणि स्त्रियांची धिंड काढणे, असे गावपातळीवर घडवले जाणारे प्रसंग आम्ही आजही अनुभवत आहोत. प्रतिकारांची दिशा आम्हाला अजून कळलेली नाही. गाव ही मानवी विकासाची पहिली अवस्था. ती अवस्था अजून आमच्यासाठी परिवर्तनशील अवस्थेत संक्रमित होऊ शकलेली नाही.
.. आमच्या देशातले प्रश्न कधी राजकीय पक्षांचे, कधी धर्माचे तर कधी धर्मातर्गत विषमतेचे असतात. ते कधी कधीच मानवी मूल्यांचे होतात. इथली माणसं आधी जातीला, धर्माला आणि अलीकडे पक्षाच्या बांधीलकीतून माणसांना ओळखतात, माणसं माणूस म्हणून माणसांना अजिबात ओळखत नाहीत, ही विदारक सत्यता जागतिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात पाहावयास मिळते.
इथल्या बहुतेकांच्या मेंदूचा बोनसाय झालाय. आमची समाजव्यवस्था मानसिक अपंग असल्याने जागतिकीकरणाच्या प्रवाहासोबत चालू शकत नाही. जगातल्या अनेक प्रगत देशांनी धार्मिक तत्त्वे माणुसकीच्या पातळीवर आणली. बराक ओबामांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड ही काळ्या-गोऱ्या वंशवादाच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करणारी आहे.
बाबासाहेब, तुमच्यानंतर तुमच्या स्वप्नांचा भारत तयार करणे तर दूर, आम्हाला अस्तित्वाचे संघर्ष रोज पेलावे लागत आहेत. स्व-उत्थानाची चळवळ मुळातच दिशाहीन आणि स्वार्थप्रधान असल्याने ती दडपण्यास इतरांना फार कष्ट करावे लागत नाहीत. आमच्यातलाच वैचारिक व सामूहिक फुटीरतावाद आमच्या शोषणाला कारणीभूत ठरत आहे. समाजात उघड उघड दिसणारे प्रासंगिक अन्याय, अत्याचार, मानहानी, बलात्कार, शोषण हे व्यापक षड्यंत्राचे निदर्शक असल्याचे जाणवते.
समाजातील जातीय व्यवस्था ज्यांनी निर्माण केल्या तो समूह बदलत्या परिस्थितीमध्ये स्वत: बदलतो आहे. जातीय व्यवस्थेर्तगत शोषण करणारी समूहांची जमात बदलली एवढाच एक खांदेपालट झाला. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही लोकशाही रुजलेल्या देशात आमची जात जात नाही आणि जाऊही दिली जात नाही. मूळ गायरान जमीन कसण्यावरून झालेल्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असली तरी माणसांच्या बदल्यात माणूस घेऊन भोतमांगेंची सांसारिक आयुष्याची लक्तरे पूर्ववत होणार नाहीत. खैरलांजीची शिक्षा गाजत असतानाच पुन्हा त्या पद्धतीची अमानवीय कृती शिंदी व पाल या गावी घडत असेल तर त्यामागे केवळ जातीय द्वेषच नाही तर पुन्हा गुलामी लादणारी समाजातील छुपी व्यवस्था व राजकीय सौदेबाजी दलितांच्या जिवावर उठली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
तुमच्यानंतर दलितांची एक पिढी जातिद्वेषाने अत्याचारित व शोषित म्हणून जगत आली आणि दुसरी पिढी झालेला अन्याय, अत्याचार, शोषण याविरुद्ध न्याय मागण्यासाठी जी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेऊ लागली ती कायद्याच्या वेगवेगळ्या कलमाखाली तुरुंगात डांबली गेली. पोलीस स्टेशनच्या हजऱ्या भरण्यात तरुण कर्तृत्वाचा काळ घालवत आहे. एकूणच दलित चळवळीची अवस्था बांध फुटलेल्या जलाशयासारखी झाली आहे. अखंड प्रवाहातून सुटलेले पाणी जसे वाटेल तसे, वाटेल तिथे वेगाने पसरून अनेक धारांनी वाहत जाते व शेवटी त्यातील पाण्यापासून चिखल, दलदल तयार होते व काही पाणी नद्या-नाल्यात वाहून जाते आणि काही पाणी जमिनीत लवकर मुरून जाते. त्या फुटलेल्या पाण्याचा उपयोग होत नाही. एक सलग एकत्र असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला वेग व ऊर्जा असते. तो वेग व ऊर्जा या छोटय़ाछोटय़ा प्रवाहांमध्ये नसतो. कालांतराने पुढे त्या प्रवाहाची निशाणीही शिल्लक राहात नाही. तुम्ही होतात तेव्हा बाबासाहेब, दलितांच्या अस्तित्वाला, संघर्षांला आणि कर्तृत्वाला वेग व ऊर्जा होती. ती तुमच्यानंतर गटागटात विभागली गोली.
बाबासाहेब, माणसं संपतात, पण संघर्ष कधी थांबत नाही. आम्हाला आता संघर्षांच्या पद्धती बदलाव्या लागतील, याची जाण येऊ लागली आहे. आधी आमच्या विचारात, वर्तनात बदल करावा लागेल. दलित म्हणून झालेले अन्याय, अत्याचार, शोषण, बलात्कार याचा आक्रोश म्हणून रस्त्यावर उतरून तोडफोड, मोर्चे, आंदोलने, घेराव व रस्ता रोखून, शासकीय नुकसान करून समाजातील इतर घटकांचा रोष ओढवून आम्हाला न्याय मिळणार नाही. आपले हक्क व न्याय मागण्यासाठी संबंध नसलेल्या लोकांना वेठीस धरूनही चालणार नाही. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ याची प्रचीती न देता संयम आणि प्रसंगाची सावधानता जाणूनच पावले उचलावी लागतील. तुम्ही आम्हाला बुद्धाचा मार्ग दाखवला आहे!
प्रा. जोगेंद्र आर. गायकवाड, बीड

१४ एप्रिल १९४४ ची शौर्यगाथा
आठवणीत कायमच्या कोरल्या गेलेल्या त्या स्फोटामध्ये शेकडय़ाने माणसे मृत्यू पावली.. खुद्द अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांचा त्यात समवेश होता.. न भूतो न भविष्यति अशा त्या आगीशी झगडताना जनतेसाठी प्राण वेचलेल्या वीरांची नावे भायखळा येथे व व्हिक्टोरिया गोदीतील स्तंभावर कोरलेली आजही दिसतात. दरवर्षी १४ एप्रिल रोजी त्यांना मानवंदना दिली जाते. त्या स्फोटामध्ये सहा टर्नटेबल लॅंडर नाश पावली. ११० फूट लांबीची फक्त एक स्वयंचलित टर्नटेबल लॅंडर वाचवण्यात चीफ ऑफिसर कूम्सना यश आले!
तो दिवस होता १४ एप्रिल १९४४चा. दुपारी व्हिक्टोरिया डॉक क्र. ३ मध्ये उभ्या असलेल्या ‘फोर्ट स्टिकन’ या बोटीला आग लागली. भायखळा येथून अनेक बंब वेगाने गोदीकडे झेपावले. चीफ ऑफिसर कूम्स व डेप्युटी पामर हजर झाले. प्रथम सहा होज लाइनने नौकेच्या आत पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. तरी धूर कमी होईना. प्रत्यक्ष आग लागलेल्या ठिकाणी पाणी पोहोचत नव्हते. सेपरेट पॅसेजमध्ये घातक स्फोटके ठेवलेली होती, हे नंतर कळले. ते युद्धाचे दिवस असल्यामुळे गोदीत येणाऱ्या दारूगोळ्याबाबत गुप्तता पाळली जात होती. गोदीमध्ये भरपूर दारूगोळा होता.
१२ वाजल्यापासून आमची माणसे आगीशी झगडत होती. नौकेचे पत्रे तापू लागले. डेकवर उभे राहून काम करणे कठीण झाले. डेप्युटी पामर चार जणांना घेऊन नौकेच्या हॅचमध्ये उतरले आणि पहिला स्फोट झाला. काळ्या धुराचे डोंगर आकाशात झेपावले. सर्वजण त्या काळ्या धुरात लपेटले गेले. इतक्यात दुसरा स्फोट होऊन नौका दुभंगली. स्फोटाच्या वाटेतील शेडस् सपाट झाल्या. स्फोटाचा तडाखा मशीद बंदर स्टेशनपर्यंत पोहोचला!
ठिणग्या उडून आणखी आगी लागल्या. त्यांची व्याप्ती वाडीबंदरपासून कर्नाक ब्रिजपर्यंत होती. गोदीमधील कित्येक बोटी त्यात सापडल्या. त्या समुद्रात हलवल्या गेल्या व त्यावरील कर्मचाऱ्यांनी आगी विझवल्या. गोदीला स्मशानाचे रूप आले. क्रेन कोसळली होती. फ्रिअर रोडवर विजेचे खांब आडवे झाले होते. ठिकठिकाणी प्रेते आणि जखमी विखुरलेले होते! एक मैलाच्या परिसराची नाकेबंदी करून १५ दिवसांच्या झटापटीनंतर आग आटोक्यात आली. त्या भागात ज्यांची दुकाने होती, त्यांना फक्त नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सोडले. लष्कर, नौदल, अग्निशमन दल, पोलीस सर्वानी उसंत न घेता, न खातापिता काम केले पण समन्वय व सुसूत्रतेअभावी लगेच यश आले नाही. ते हृदयद्रावक आक्रोश अग्निशमन दलाच्या प्रत्येक स्टेशनने ऐकले! स्फोट अनुभवलेला मी आज शेवटचाच असावा, कारण माझे वय ८७ आहे..!
अच्युत दीक्षित, डोंबिवली
निवृत्त ऑक्झिलियरी फायर सव्‍‌र्हिस