Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

सातारा मतदारसंघाचे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यासाठी हेलिकॉप्टर वापरण्यास सुरुवात केली आहे. देशभर केवळ मोठे पक्षीय नेतेच बहुधा हेलिकॉप्टर वापरतात. मात्र साताऱ्यात प्रथमच उमेदवार आपल्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करीत आहे.

सांगलीत काँग्रेस प्रचारासाठी महिमा, ऊर्मिलाही येणार
सांगली, १३ एप्रिल / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार खासदार प्रतीक पाटील यांच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांपेक्षा अभिनेत्यांच्या आवाहनाला अधिक प्रतिसाद मिळेल, या अपेक्षेने हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार प्रचारासाठी येत आहेत. त्यात महिमा चौधरी, ऊर्मिला मातोंडकर व साजिद खान यांचा समावेश आहे.

बदलत्या युगात विद्यापीठांनी संशोधन, गुणवत्तेवर भर द्यावा -डॉ. पटेल
सोलापूर, १३ एप्रिल/ प्रतिनिधी

ज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडत असून आज नवीन वाटणारे तंत्रज्ञान काही दिवसांतच जुने ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठांनी संशोधन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर द्यावा, असे आवाहन गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एस. पटेल यांनी केले. सोलापूर विद्यापीठाचा चतुर्थ पदवीदान समारंभात दीक्षान्त भाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे होते. या वेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. एम. एस. शेजूळ, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. जे. साळुंखे आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी ज्ञानदंड हाती घेऊन परीक्षा नियंत्रक डॉ. साळुंखे हे होते.

स्वातंत्र्याच्या साठीनंतर आज क्रांतिवीराला राष्ट्रीय सन्मान
गणेश जोशी
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना नवी दिल्लीत मंगळवारी ‘पद्मभूषण’ किताब प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्त.. स्वातंत्र्यलढय़ात अनेकांनी आपले बलिदान दिले. स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी ज्यांनी पुन्हा एकदा दुसरा लढा उभारला अशा क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीराला स्वराज्याच्या प्राप्तीनंतर तब्बल ६० वर्षांनंतर पद्मभूषण पुरस्काराने मंगळवारी गौरविण्यात येत आहे. त्यांचा हा गौरव स्वातंत्र्य चळवळीतील प्रातिनिधीक स्वरूपाचा गौरवच म्हणावा लागेल.स्वातंत्र्यलढय़ात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमधील एक निधडय़ा छातीचा व साहसी देशभक्त म्हणून नागनाथअण्णांची ओळख आहे.

मंडलिकांची बेताल वक्तव्ये सहन करणार नाही- निकम
कोल्हापूर, १३ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

खासदार मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या धडाडीबरोबरच त्यांच्या विचारातील विसंगतीही आम्ही पाहिली आहे. परंतु त्यांच्या कर्तृत्वाची उंची आणि वय लक्षात घेऊन आम्ही आजवर ही विसंगती सहन केली. पण आता आमच्या राष्ट्रीय नेत्यावर त्यांनी बेताल वक्तव्ये सुरू केल्यामुळे ही विसंगती आता सोसणार नाही, असे त्यांना खडसावून सांगण्याची वेळ आली असून यापुढे त्यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

मिरजेत महाआघाडीची काँग्रेसशी ‘कट्टी फू’
मिरज, १३ एप्रिल / वार्ताहर

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निवडणूक आघाडी झाली असली, तरी मिरज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विकास महाआघाडीने काँग्रेसशी ‘कट्टी फू’ करीत अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांच्या विजयासाठी स्वत:ला वचनबद्ध केले. मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या वाचनालयात विकास महाआघाडीच्या १७ नगरसेवकांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.
सांगली महापालिकेतील विकास महाआघाडीचे गटनेते सुरेश आवटी यांच्यासह महापौर मैनुद्दीन बागवान, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मकरंद देशपांडे, पांडुरंग कोरे व श्रीमती अश्विनी कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

कळंबीमध्ये ८५ जणांना गॅस्ट्रोची लागण
मिरज, १३ एप्रिल / वार्ताहर

दूषित पाणी वापरल्याने कळंबी गावात गॅस्ट्रोची साथ सुरू झाली असून ८५ जणांना लागण झाली आहे. सोमवारी आरोग्य विभागाने गावात तातडीने बचावकार्य हाती घेतले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले. तानंग प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून कळंबी गावाला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवून वापरण्यासाठी ग्रामस्थ पाणी साठवून ठेवतात. साठविलेल्या पाण्याचा वापर केल्याने रविवारी रात्रीपासून अनेकांना उलटय़ा व जुलाब याचा त्रास होऊ लागला. सोमवारी सायंकाळपर्यंत ८५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. गटविकास अधिकारी रमेश जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी ए. पी. वाघमारे व तालुका आरोग्य अधिकारी एन. एच. शिंदे आदींनी गावात भेट देऊन पाहणी केली.

हमालांच्या संपाने गूळ मार्केट ठप्प
कराड, १३ एप्रिल/ वार्ताहर

तालुकास्तरावरील बलाढय़ कराड गूळ मार्केटमधील हमालांनी हमालीच्या दरात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बेमुदत संप पुकारल्याने या गूळ मार्केटमधील दररोजची सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. गूळ मार्केटमध्ये शुकशुकाट राहताना, गूळ उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. कोल्हापूर गूळ मार्केटच्या दरानुसार इथेही हमाली देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यां हमालांची एकमुखी मागणी आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली असल्याचे समजते.

आडदराचा पेरा साधण्याची खंडेराजुरीत भाकणूक
मिरज, १३ एप्रिल/वार्ताहर

दसऱ्यापासून पाऊस मुबलक असला तरी दुबार पेरणीचा धोका असल्याने भाकणूक सोमवारी पहाटे खंडेराजुरीच्या ब्रह्मनाथ यात्रेत करण्यात आले. पीकमान मध्यम असून, जनावरांना रोगराई यंदा सतावणार नाही. मात्र आडदराची (आद्रा) पेरणी लाभदायी ठरेल, असेही भाकितावेळी सांगण्यात आले. मिरज शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील खंडेराजुरी येथील ब्रह्मनाथ यात्रेत दरवर्षी चैत्राची पौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या अनुराधा नक्षत्रावर ही भाकणूक असते. ब्रह्मनाथाचे ७० वर्षांचे वयोवृद्ध भक्त बंडा रूपनूर यांनी ही भाकणूक वर्तवली. खंडेराजुरीसह लिंगनूर, मालगाव, शिरोळ, टाकळी, बोलवाड, देशिंग व हेरवाड आदी गावांतील ७० हून अधिक धनगरी ढोलवादक श्रींच्या पालखीसमोर होते. पहाटे दोन वाजता श्रींच्या पालखीची प्रदक्षिणा सुरू झाली. भाकणुकीठी लिंगनूर, रेंदाळ, रूकडी व माणगाव आदी गावचे हजारो भाविक आले होते.

सांगलीत भरदिवसा घरात घुसून लूटमार
मिरज, १३ एप्रिल/वार्ताहर

घरात घुसून दूरदर्शन शो-केसमधील दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडय़ा लंपास करण्याचा प्रकार सोमवारी भरदिवसा घडला. अज्ञात चोरटय़ाने नऊ महिन्यांच्या बालकास ओलिस ठेवून महिलेच्या डोळ्यांदेखत पलायन केले. श्रीमती नीता गणेश भोसले (रा. वेताळनगर, वखारभाग) यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. घराशेजारी असणाऱ्या जनावरांच्या गोठय़ात ही महिला आज दुपारी दीड वाजता गेली होती. त्यावेळी एक अनोळखी तरुण घरात घुसला. त्याने आतून कडी घातली. या महिलेच्या लक्षात ही बाब येताच तिने दार ठोठावले. घरातील महिला सावध झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने दार उघडले. त्यावेळी त्याच्या हातात नेकलेस, गंठण व चार बांगडय़ा असा ऐवज होता. त्याशिवाय या महिलेचा नऊ महिन्यांचा मुलगाही त्याच्या हाती होता. त्यामुळे या महिलेने आरडाओरड केली नाही. याचा लाभ घेत केवळ दोन तोळ्याच्या दोन बांगडय़ा घेऊन या तरुणाने मुलाला दारात ठेवून पलायन केले.

घोरपडेंच्या प्रचारात राजेंद्रअण्णा देशमुख
आटपाडी, १३ एप्रिल/वार्ताहर

सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांच्या प्रचाराच्या तयारीला लागण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. आटपाडी येथे झालेल्या या बैठकीस अमरसिंह देशमुख, आनंदराव पाटील, रामभाऊ खोत व भारत पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पाणी प्रश्नावरून अजित घोरपडे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले. निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांत कामाची विभागणी करण्यात आली. निवडणूक प्रचारासाठी दि. १६ किंवा १७ एप्रिल रोजी अजित घोरपडे हे आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादिवशी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. मोटारसायकल रॅली व भव्य मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीनेही या बैठकीत नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र पातळीवरून मदत मिळावी व पाणी प्रश्नासाठी लढवय्या उमेदवार असावा, या दृष्टीने आटपाडी तालुक्यातून अजित घोरपडे यांना चांगले मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

शशिकला मडकी व थावरे मानवभूषण पुरस्काराचे मानकरी
सोलापूर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

श्री सिद्धेश्वर सर्व सेवा संघातर्फे देण्यात येणारा मानवभूषण पुरस्कार यंदा कन्नड लेखिका शशिकला मडकी व हभप दा. का. थावरे यांना जाहीर झाला आहे. तसेच प्रा. नीलिमा माळगे-नारायणन यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष एन. बी. शरणार्थी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ईरेश स्वामी यांच्या हस्ते या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण १४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता होटगी रस्त्यावरील आप्पासाहेब काडादी नगरात काशी विश्वेश्वर मंदिराच्या सभागृहात करण्यात येणार आहे. सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास माजी महापौर नलिनी चंदेले, आमदार विजय देशमुख, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, शैलेश पाटील-चाकूरकर हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. पुरस्काराच्या मानकरी श्रीमती मडकी यांनी कन्नडसह मराठी व हिंदी भाषांत कविता, चरित्र, तुलनात्मक अध्ययन, अनुवाद, योगसाधना, अध्यात्म आदी विषयांवर ३५ ग्रंथांची निर्मिती केली आहे. तर हभप थावरे यांनी संतसाहित्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा केली आहे.

रासपचे उमेदवार वाघ यांना अटक
सातारा, १३ एप्रिल/ प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब गंगाराव वाघ यांना सन २००३ मधील आंदोलनातील गुन्ह्य़ाप्रकरणी वाठर स्टेशन (ता.कोरेगाव) पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली व वैयक्तिक हमीपत्रावर सोडून देण्यात आले असून, जामीन देण्यास बजावण्यात आले आहे. भाऊसाहेब वाघ यांच्यावर सन २००३ मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक काळे (वाठार स्टेशन) यांनी त्यांना आज सकाळी अटक केली. विखळे येथे लोकांना पाणी मिळत नाही या कारणावरून सदर आंदोलन छेडले गेले होते. त्यांच्यावर अशाप्रकारचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

शिंदे आणि पवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे- काळे
पंढरपूर, १३ एप्रिल/वार्ताहर

पंढरपूर तालुक्यात आज झालेल्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्रांतीमध्ये राष्ट्रीय नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी पंढरपूरच्या विकासाचे दालन खुले करून देणारी आहे. पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी केलेल्या कामाची परतफेड करण्याची संधी मतदारांना या निवडणुकीत मिळाली आहे. त्यामुळे पवार व शिंदे यांच्या कामाची परतफेड करण्यासाठी तालुक्यातील मतदारांनी सज्ज रहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले. यावेळी आमदार सुधाकरपंत परिचारक, ज्येष्ठ नेते यशवंतभाऊ पाटील, पांडुरंगचे संचालक दिनकर मोरे, सभापती रामभाऊ बागल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील हरितक्रांती झाली असून उजनी, निरा भाटगर व भीमा नदीच्या पाणी पुरवठय़ामुळे तालुक्यात साखर कारखानदारी व इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे. असे काळे यांनी सांगितले.

सोलापुरात शेतकरी संघटना सुशीलकुमारांच्या पाठीशी
सोलापूर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला खरा; परंतु त्यांच्या प्रचारासाठी बेकायदेशीर सभा घेतल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या स्थानिक नेत्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर यांच्यासह गुंडू पाटील, वसंतराव पाटील आदींनी शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेसाठी कार, टाटा सुमो, कमांडर, जीप अशा विविध वाहनांतून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होटगी येथे आले होते. परंतु या सभेसाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती.

एसएनडीटी सिनेटवर अरुण शेठ यांची निवड
सांगली, १३ एप्रिल / प्रतिनिधी

श्री गुजराती सेवा समाज व महाविद्यालयीन स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण अमुलख शेठ यांची मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयाच्या सिनेटपदी (विधी सभा) नुकतीच निवड करण्यात आली आहे. सांगलीतील प्रसिध्द व्यापारी असलेल्या अरुणशेठ यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील द्रष्टेपण, गुजरातमधील शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य तसेच महिलांना विविध प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.