Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

‘कंदहार’च्या वेळीच अडवाणींमधील लोहपुरुष वितळला - पंतप्रधान
मुंबई, १३ एप्रिल / खास प्रतिनिधी
कंदहार विमान अपहरणाच्या वेळीच लालकृष्ण अडवाणी यांच्यातील लोहपुरुष वितळला, असे टीकास्त्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सोडले. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अडवाणी सातत्याने डॉ. मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान असल्याची टीका करीत असतानाच ‘ अडवाणी यांच्या बोलण्यातील आवेश कृतीत जाणवत नाही’, असा जोरदार हल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी चढविला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील नामवंतांशी संवाद साधण्याबरोबरच पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी अडवाणी व भाजपलाच लक्ष्य केले होते.

परराज्यांतील लोकांना मुंबईत येण्यास कायदा करून प्रोत्साहन द्यावे
जागतिक बँकेची शिफारस
संदीप प्रधान
मुंबई, १३ एप्रिल

मुंबईसारख्या शहरात देशातील मागास राज्यांतील लोकांनी स्थलांतरित व्हावे याकरिता सरकारने कायदे करावे व लोकांना प्रोत्साहन द्यावे, अशी शिफारस जागतिक बँकेने आपल्या ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट २००९’ मध्ये केली आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असताना व शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोंढे रोखण्याची जोरदार मागणी आपल्या वचननाम्यात केलेली असताना जागतिक बँकेचा अहवाल स्फोटक ठरणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

भारतीय मान्सूनचे अस्तित्व दीड कोटी वर्षांपासून!
अभिजित घोरपडे
पुणे, १३ एप्रिल

भारतीय उपखंडातील वैशिष्टय़ असलेला मान्सून अर्थात मोसमी वारे तब्बल दीड कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे पुरावे मिळाले असून, तेव्हापासून तो आपल्या प्रदेशाची साथ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हा काळ केवळ ऐंशी लाख वर्षांचा मानला जात होता, पण या नव्या संशोधनामुळे तो दुपटीने मागे गेल्याचे उघडकीस आले आहे. गोव्यातील राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतील (एन.आय.ओ.) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एस. कृष्णा तसेच, ब्रिटनमधील साऊथम्पटन विद्यापीठाचे प्रा. जॉन बुल आणि इडनबर्ग विद्यापीठाचे प्रा. रॉजर स्क्रूटन यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनात यावर प्रकाश टाकला आहे.
(अग्रलेख : हिमालयाची सावली)

‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार प्रदान
करण थापर, पी. साईनाथ सर्वश्रेष्ठ पत्रकार
नवी दिल्ली, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी

प्रख्यात टेलिव्हिजन समालोचक आणि मुलाखतकार बीबीसी न्यूजचे करण थापर तसेच मॅगासेसे पुरस्कार विजेते, दैनिक हिंदूूचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार समारंभात २००७-०८ सालचे सर्वश्रेष्ठ पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला. आज सायंकाळी दिल्लीतील ताज पॅलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या हस्ते देशातील २६ सर्वोत्तम पत्रकारांना २६ विविध विभागांतील रामनाथ गोएंका पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. (सविस्तर वृत्त)

‘सत्यम’वरील ताब्यात टेक महिंद्रची सरशी; लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो पिछाडीवर
मुंबई, १३ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची कंपनी टेक महिंद्र लिमिटेडची घोटाळेग्रस्त सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडवर ताबा मिळविण्यात आज अखेर सरशी झाली. अभियांत्रिकी क्षेत्रातील बलाढय़ कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेडला तिने पिछाडीवर टाकले. सत्यममधील ३१ टक्के भागभांडवल ताब्यात घेण्यासाठी टेक महिंद्रच्या प्रति समभाग ५८ रुपये अशा सर्वोच्च दराला देकार मिळाला असून, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि विल्बर रॉस या अन्य प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यासाठी अनुक्रमे प्रति समभाग ४५.९० रुपये आणि २० रुपये अशी बोली लावली होती, असे आता समजते.

सख्खा भाऊ बोलू लागला - पवार
नाशिक, १३ एप्रिल / खास प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला त्यांचा सख्खा भाऊ प्रवीण हाच आता बोलू लागल्यामुळे या पक्षाविषयीच वेगळं वातावरण बघायला मिळत आहे, अशी मर्मभेदी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे एका प्रचारसभेत बोलताना केली. प्रवीणच्या बहुचर्चित अल्बममधील प्रसिद्ध झालेल्या मजकुराच्या आधार घेत अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. प्रमोदजी आज हयात नाहीत, पण त्यांचा सख्खा भाऊ बोलू लागल्यामुळे भाजपविषयी वेगळं वातावरण बघायला मिळत आहे. प्रमोदजींची भावजय देखील हे सगळं सत्य असल्याचे साऱ्या जगाला सांगत आहे. देशातील खासदारांना परदेशवारीसाठी दिलेल्या विशेष पासवर दुसऱ्याच्या बायका घेवून जाणाऱ्यांमध्येही भाजपचेच खासदार सापडले. या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चिला गेलेला ‘कबुतरबाजी’ हा शब्द आपण प्रथमच ऐकला. पैसे घेतल्याच्या कारणावरून पक्षाध्यक्षपद गमविणारा बंगारु लक्ष्मण यांच्यासारखा प्रमुख नेता हा देखील त्यांचाच होता, असेही ते म्हणाले.

प्रियांका राजकारणात आल्यास आनंदच-राहुल
कोची, १३ एप्रिल/पीटीआय

प्रियांका राजकारणात आल्यास आनंद होईल, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत व्यक्त केले. राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात, या प्रियांका यांच्या विधानाबाबत विचारता ते म्हणाले, प्रियांकाच्या विधानाचा विपर्यास केला गेला असावा. ती असे काही बोलणे शक्य नाही. कारण आमच्या घराण्याच्या मते राजकारणाद्वारे देशसेवा साधायला महत्त्व आहे पदाला नाही. मी पंतप्रधान बनणे वा न बनणे हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मात्र, प्रियांका राजकारणात आल्यास आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. प्रियांका राजकारणात आल्यास आपल्याला खूप मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कंदहारप्रकरणात अतिरेक्यांना सोडले जाणार असल्याचे मला माहित देखील नव्हते, असा दावा अडवाणी करीत आहेत. याचा अर्थ एकतर ते सत्य दडवित आहेत अथवा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर त्यांचा विश्वास नव्हता हे कबुल करीत आहेत, असेही गांधी म्हणाले.

‘सेन्सेक्स’चा सहा महिन्यात प्रथमच ११ हजाराला स्पर्श
मुंबई, १३ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

सुट्टय़ांचा महिना असलेल्या एप्रिलमधील सरलेल्या सात दिवसांतील व्यवहारात शेअर बाजाराने वरच्या दिशेने राखलेल्या सातत्याने ‘सेन्सेक्स’ने आज ११ हजार अंशापुढे मजल मारली. गेल्या सहा महिन्यांत प्रथमच ‘सेन्सेक्स’ पुन्हा एकदा ११ हजाराचा स्तर पाहिला. मात्र बाजार बंद होता होता तो १०,९६७.२२ अंशांवर स्थिरावला, तरीही मागील म्हणजे गुरुवारच्या स्तरापेक्षा ‘सेन्सेक्स’ने आजच्या व्यवहारात १६३ अंशांची कमाई केली होती. जगभरात सर्वत्रच भांडवली बाजारांना गेल्या महिन्याभरात पुन्हा उधाण आले असून, त्याची री ओढत किंबहुना त्याहून सरस आघाडी मुंबई शेअर बाजाराने घेतलेली दिसते. गेल्या काही दिवसात पाठ फिरविलेल्या विदेशी वित्तसंस्थांकडून होत असलेल्या प्रमुख समभागांच्या तुफान खरेदीचीही सेन्सेक्सच्या सध्याच्या आगेकूचीला साथ मिळत आहे. एप्रिल महिन्यांतील व्यवहार झालेल्या सहा दिवसांमध्ये विदेशी वित्तसंस्थांनी तब्बल १,७०० कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे. धातू कंपन्या, स्थावर मालमत्ता तसेच बँकांच्या समभागांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोठी मजल मारली असून, आजच्या व्यवहारातही हे समभाग प्रकाशझोतात होते.

८१९ उमेदवार रिंगणात
सर्वाधिक पुण्यात तर सर्वात कमी साताऱ्यात
मुंबई, १३ एप्रिल / खास प्रतिनिधी

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत आज २८ जणांनी माघार घेतल्याने राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये १९६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये आता ८१९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
पहिल्या टप्प्यात येत्या गुरुवारी १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात २४६ उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला मतदान होणाऱ्या २५ मतदारसंघांमध्ये ३७७ उमेदवार रिंगणात असून, मुंबई व ठाण्यातील दहा मतदारसंघांमध्ये १९६ उमेदवार रिंगणात आहेत. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४१२ उमेदवार िरगणात होते. या वेळी मात्र उमेदवारांची संख्या दुपटीने वाढली आहे. सर्वाधिक ३६ उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात असून सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार सातारा मतदारसंघात आहेत. रेशनकार्डसह १४ कागदपत्रे पुरावा म्हणून मतदानाच्या वेळी ग्राह्य़ धरला जाईल. त्याशिवाय रोजगार हमी योजना व आरोग्य कार्ड पुरावा मानला जाणार आहे.

पश्चिम उपनगरात ५० टक्के पाणीकपात
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी
अंधेरी येथील वेरावली जलाशय क्रमांक एक आणि दोनच्या जलवाहिन्यावर ९०० मिलीमीटर व्यासाच्या छेद जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने पश्चिम उपनगरातील वांद्रे ते जोगेश्वरी दरम्यान १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. हे छेद जोडणीचे काम तात्काळ करणे गरजेचे आहे. हे काम १५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. १६ एप्रिल रोजी पहाटे हे काम पूर्ण होणार आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी