Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

‘मुझे तो जिंदगीभर की पडी है’
घ्कार्यकर्ते. त्यांना सध्या काय काय ऐकून घ्यावं लागतं. उमेदवार सांगतात, ‘जोरात जा.’ नेते म्हणतात, ‘कामाला लागा.’ नळदुर्गचा असाच एक कार्यकर्ता कामाला लागला. रस्त्याने जाताना त्याने एका मतदाराला थांबवले आणि कानात सांगितले, ‘इस बार घडी को देख!’ मतदार उसळून म्हणाला, ‘खाया तूने और मेरे को बोलता है घडी को देख बोलके. जबसे पैदा हुआ हूँ तबसे घडी को देख रहा हूँ. पैदा हुआ अब तक वैसाही हूँ. घडी देख के भागता हूँ सुबह; घडी देख केही रात में सो जाता हूँ. अब घडी को नही देखुंगा! तू अकेला देख घडी. घडी घडी है भूख बडी है. अब इलक्शन खडी है. मुझे तो जिंदगी भर की पडी है.’

महाराष्ट्र चमत्कार करील - शरद पवार
जालना, १३ एप्रिल/वार्ताहर

या निवडणुकीत महाराष्ट्र देशात चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज घनसावंगी येथील सभेत वर्तविले. श्री. पवार म्हणाले, ‘‘निवडणूक देशाचे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरविणारी आहे. मागील पाच वर्षे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना केली. आम्ही सर्वानी पाच वर्षे प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला.या काळात उद्योगधंदे वाढले, बाहेरच्या देशांशी व्यापार वाढला, गव्हाचे उत्पादन गेल्या ६० वर्षांत झाले नव्हते इतके झाले.

लखलख चंदेरी (२)
बीजिंगमध्ये पोहोचलो तेव्हा तापमान ४८ अंश होतं. म्हणजे ऐन हिवाळ्यात असतं त्यापेक्षा खूपच जास्त! त्या वेळी तिकडे तापमान उणे ३० ते ४० अंश सेल्सिअस इतकं खाली घसरतं. आता हिवाळा सरत आला होता; परंतु अजून वसंताची सुरुवात व्हायची होती. राजधानी बीजिंग (उच्चार बेऽजिन) एक प्रचंड शहर आहे. पण जिकडे नजर टाकावी तिकडे निष्पर्ण झाडे-उभ्या केलेल्या खराटय़ांसारखी. पानगळीमुळे हिरवा रंग अगदी अभावानेच दिसत होता. वातावरण ढगाळ असल्यामुळे ऊन नव्हतं आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे वातावरणाला येणारी सोनेरी झळाळीही नव्हती. इथल्या इमारती हाँगकाँग-शांघायसारख्या नटलेल्या नव्हत्या.

प्रचार आज थांबणार, दुरंगी लढतीचेच चिन्ह
नांदेड, १३ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या पंधरवडय़ापासून सुरू असलेला प्रचार उद्या (मंगळवारी) सायंकाळी थंडावणार आहे. नांदेड मतदारसंघात पहिल्या टप्प्यात, म्हणजे गुरुवारी (दि. १६) मतदान होणार आहे. या मतदारसंघातून एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत भारतीय जनता पक्षाचे संभाजी पवार व काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात होण्याची चिन्हे आहेत. गेल्या १५ दिवसांपासून विविध नेत्यांच्या जाहीर सभा, गावा-गावात बैठका, कोपरा सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उमेदवारांनी क्लृप्त्या लढवल्या. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांची मनधरणी करताना तसेच मतदारांचे मन वळविताना सर्व उमेदवारांची दमछाक झाली.

परभणीत चुरस वाढली!
परभणी, १३ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता होत आहे. या निवडणुकीत फारशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या नाहीत. स्थानिक प्रश्न आले नाहीत. उमेदवारांनी एकमेकांचे उणेदुणे न काढता बहुतांश काळ नाराज्या काढण्यात व जुळवाजुळवी करण्यात घालवला. या निवडणुकीत मोठा गाजावाजा करून बहुजन समाज पक्षाने उमेदवार आखाडय़ात उतरविला; परंतु मायावती यांचा ‘सोशल इंजिनीअरिंग’चा फाम्र्युला मतदारांच्या गळी उतरविण्यास फारसे यश आले नाही.

--------------------------------------------------------------------------

माझी भूमिका
लोकसभेमध्ये जाण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांची ही थेट भेट. वाचकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना नेमके पाच प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या उत्तरातून त्यांची निवडणुकीकडे, राजकारणाकडे आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी उघड व्हावी. लातूरच्या या चार उमेदवारांशी संवाद साधला आहे प्रदीप नणंदकर यांनी.
जयवंत आवळे (काँग्रेस)
१) काँग्रेसच्या अखिल भारतीय निवड समितीने मला निवडणुकीत उभे करण्याचे सूचित केले. सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर राज्यात मी सर्वाधिक ज्येष्ठ व अनुभवी असा मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ता आहे. पंचवीस वर्षे आमदार, त्यातील पाच वर्षे कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहिले. पक्षाने संधी दिली म्हणून निवडणूक रिंगणात आहे.
२) प्रचाराचा प्रमुख मुद्दा विकासाचा आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मेहनत घेतली आहे. मिरज-पंढरपूर रेल्वे रुंदीकरण, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, उद्योगधंद्यात वाढ हे प्रश्न मार्गी लावणे हे प्रचारातील मुद्दे आहेत.

लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयवंत आवळे यांना.
कार्यालयीन कामकाज चालू असताना प्रामाणिक अधिकाऱ्यालाही टवाळखोर सामाजिक कार्यकर्त्यांचा भयंकर त्रास होऊ लागला आहे. हे थांबविण्यासाठी आपण कोणते पाऊल उचलणार?
सुनील थोटे, नळगीर, उदगीर. आज शेतकऱ्यांना दान नको, मान हवा आहे. लाचारपणाचे जिणे नको, भक्कम आधार हवा आहे. त्यासाठी खत, बी-बियाणे व औषधात होणारा भ्रष्टाचार थांबवणार का? अंबादास गायकवाड, उदगीर.

आमचा जाहीरनामा
गांधींचे ‘रामराज्या’चे स्वप्न राजकारणामुळे धुळीस मिळाले

भारत स्वतंत्र होऊन ६२ वर्षे झाली. पण या देशात स्वराज्यातून ‘सुराज्य’ यावे, ‘रामराज्य’ व्हावे हे राष्ट्रपिता गांधींचे स्वप्न राजकारणामुळे धुळीस मिळवून टाकले. खरोखरच त्यांचे हे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर या देशाचा सामान्य नागरिक या नात्याने मला असे वाटते की, ज्याला लोकसभेवर निवडून द्यावयाचे आहे असा ‘खासदार’ सुजाण, सुशिक्षित आणि सुसंस्कृत तर असावाच; शिवाय निकोप लोकशाहीवर श्रद्धा असणारा, भारतीय संविधानाची कदर करणारा राष्ट्राच्या श्रेष्ठ परंपरांची जाण असणारा असावा.

कार्यकर्त्यांची माती अन् नेत्यांची युती
लातूर, १३ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रीय व राज्यस्तरीय निवडणुकीत यश मिळविण्यासाठी विविध पक्षांच्या ‘समविचारी पक्ष’ या नावाखाली आघाडय़ा होत असल्या तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र यात गोची होते.
लातूर मतदारसंघासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाची आघाडी असून, ही जागा काँग्रेस लढवीत आहे. आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक काल काँग्रेस कार्यालयात घेण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकून संपर्कमंत्री दिलीप देशमुख निरुत्तर झाले.

वरपूडकर-बोर्डीकरांच्या संयुक्त प्रचारामुळे संभ्रम दूर
बोरी, १३ एप्रिल/वार्ताहर

कार्यकर्त्यांंचे मत विचारात घेऊन आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद न साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण काल श्री. वरपूडकर व श्री. बोर्डीकर यांनी बोरी परिसरात संयुक्त बैठका घेतल्यामुळे प्रचार कुणाचा करायचा या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

विकासासाठी गोपीनाथ मुंडे यांनाच साथ द्या - पंडित
बीड, १३ एप्रिल/ वार्ताहर

सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जातीचा मुद्दा पुढे करून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत आहे. पण जिल्ह्य़ाच्या विकासासाठी गोपीनाथ मुंडे यांनाच साथ द्या, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी पाटोदा, शिरूर तालुक्यातील गावात भेटी देऊन मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या जातीयवादी प्रचाराचा खरपूस समाचार घेतला. श्री. पंडित म्हणाले की, सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, दहशतवाद, पाणीटंचाई हे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे सोडून जातीपातीचा प्रचार करत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे व मत मिळविण्याचे षडयंत्र केले आहे. पण जिल्ह्य़ाचे भूमिपुत्र गोपीनाथ मुंडे हेच विकासाला गती देऊ शकतात व त्यांच्यामुळेच विकास होईल; त्यामुळे मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीयवादी प्रचाराला थारा न देता विकासाभिमुख नेतृत्वाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पाटोदा तालुक्यातील निरगुडी, डोंगरकिन्ही, पिंपळवंडी, अंमळनेर आदी भागात त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला.

पोटा रद्द केल्याने अतिरेकी मोकाट - पूनम महाजन
भोकरदन, १३ एप्रिल/ वार्ताहर

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पोटा कायदा रद्द केल्याने अतिरेकी मोकाट सुटले. देशाची सुरक्षितता व अखंडितता अबाधित राखण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना विजयी करावे, असे आवाहन पूनम महाजन-राव यांनी आज केले.
भा. ज. प.ने आयोजित केलेल्या महिलांच्या मेळाव्यात पूनम म्हणाल्या की, देशाची धुरा प्रगल्भ अशा लालकृष्ण अडवाणी यांच्याच हाती हवी. मनमोहनसिंगसारखा परावलंबी पंतप्रधान व कोणत्याच प्रश्नांची जाण नसणाऱ्या सोनिया गांधी या देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. अडवाणी पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदी यांच्या हाताने अफजलगुरु यास भर रस्त्यावर फाशी देऊ, असेही पूनम महाजन या वेळी म्हणाल्या.

‘साहेब, माझा प्रश्न मिटवा अन् पुढे जावा!’
सुधीर गंगणे, औसा, १३ एप्रिल

तालुक्यातील उजनी येथील प्रचारसभेनंतर पुढील सभेसाठी राज्यमंत्री जगजितसिंह राणा व कार्यकर्ते निघाले. ‘साहेब, जिल्ह्य़ातील पाणीसाठा वाढला आहे. माझ्या नळाला पाणी येत नाही. कधीपासून येणार? माझा प्रश्न मिटवा अन् पुढे जावा!’ असा सवाल करीत एकाने निघालेला हा ताफा अडविला! यामुळे ३०-३५ मोटारींच्या ताफ्याने १० मिनिटांची चक्क विश्रांती घेतली. उजनी येथील प्रचारसभेत राज्यमंत्री जगजितसिंह राणा म्हणाले, ‘‘शैक्षणिक, औद्योगिक, रोजगार, दळणवळण, ऊर्जा, कृषी या क्षेत्रात जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास झाला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाचा पाणीप्रश्न मिटवावा यासाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी २१ टीएमसी पाणी सतत पाठपुरावा करून जिल्ह्य़ात आणले आहे. जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.’’
उपस्थितांच्या आभारानंतर प्रचारसभा झाली आणि ताफा पुढील सभेसाठी निघाला. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. उमाकांत चव्हाण यांनी निघालेल्या ताफ्याला ‘साहेब, थांबा’ची हाक दिली व हनुमान मंदिरासमोर ताफा थांबवला! ‘‘साहेब. माझ्या घरी नळाला पाणी येत नाही. कधीपासून येणार हाय?’’, असा सवाल करीत भरधाव वेगात निघालेला ताफा १० मिनिटे थांबवला आणि ‘माझा प्रश्न मिटवून पुढे जावा,’ असे राज्यमंत्र्याला सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच योगीराज पाटील व दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थीने तरुणाला बाजूला नेऊन नेते आणि कार्यकर्त्यांनी वाट करून दिली आणि ताफा पुढील सभेसाठी निघाला.

काँग्रेसची प्रचाराची सांगता सभा लोह्य़ात घेण्याची परंपरा खंडित
हरिहर धुतमल, लोहा, १३ एप्रिल

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या (मंगळवारी) संपत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या प्रचाराची सांगता लोह्य़ातील जाहीर सभेने व्हायची. ती परंपरा या निवडणुकीत खंडित झाली. कारण लोहा आता लातूर मतदारसंघात आहे आणि तेथे दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मराठवाडय़ाचे भगीरथ डॉ. शंकरराव चव्हाण यांचे लोह्य़ाशी जिव्हाळ्याचे संबंध. काँग्रेसच्या प्रचाराची शेवटची सभा लोह्य़ात कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत होत असे. त्या सभेसाठी पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील, व्यंकटराव मुकदम, विठ्ठलराव पवार, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी आदी उपस्थित असत. गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री अशा पदांवर असतानाही डॉ. चव्हाण यांच्या उपस्थितीत लोह्य़ात नांदेड मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची सांगता होत असे. त्यांच्या पश्चात ही परंपरा कायम राहिली होती.

शेतकरी-शेतमजुरांचा मतदानावर बहिष्कार!
मानवत, १३ एप्रिल/वार्ताहर

शहराच्या पूर्व भागास आंबेगाव रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले असल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाताना त्रास होत आहे. रस्ता नसल्याने शेतमजूरदेखील सापडत नसल्याने आंबेगाव रोड भागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी १६ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार एन. टी. ठाकरे यांना देण्यात आले.
धनगर गल्ली, लाड गल्ली, कुरेशी मोहल्ला या भागातील जवळपास १०० ते १५० शेतकरी-शेतमजुरांचा मोर्चा मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर नेण्यात आला व त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात २००५ च्या अतिवृष्टीमध्ये रस्ता वाहून गेला व याचदरम्यान प्रभु दगडोबा बारहाते बैलगाडीने शेतातून घरी परतताना पुरात वाहून गेले आणि त्यांना जीव गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेला. यानंतर त्या रस्त्याचे कामच झाले नाही. म्हणून या कुटुंबांनी मतदान न करण्याचा निर्धार केला आहे.

देशात दंगली घडविण्याचे काम भाजपानेच केले -दिलीपराव
निलंगा, १३ एप्रिल/ वार्ताहर

सत्तेच्या स्वार्थासाठी विविध जाती धर्मात तेढ निर्माण करून राममंदिरासारखा भावनिक मुद्दा उपस्थित करीत देशात दंगली घडविण्याचे काम भारतीय जनता पक्षानेच केल्याचा आरोप क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील निटूर येथे आज झालेल्या सभेत श्री. देशमुख बोलत होते. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्र्यंबकदास झंवर, आंबुलगा कारखान्याचे संचालक अशोक पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंडितराव धुमाळ, डॉ. शरद पाटील निलंगेकर, उमेदवार जयवंत आवळे यांनी पानचिंचोली, निटूर, आंबुलगा, औराद शहाजनी इत्यादी ठिकाणी प्रचारदौरा केला.
---------------------------------------------------------------------------

औरंगाबाद किंवा जालन्यात सोनियांची सभा होणार
औरंगाबाद, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी येत्या रविवारी (दि. १९) किंवा सोमवारी (दि. २०) पुन्हा राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात सोनिया गांधी तीन सभा घेणार आहेत. नंदूरबार व धुळे यापैकी एक, जालना किंवा औरंगाबाद यापैकी एक आणि तिसरी सभा पुणे येथे होणार आहे. मराठवाडय़ात चार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे औरंगाबाद किंवा जालना सभा होईल.

विकास व रोजगार निर्मिती करणाऱ्या जनसुराज्य पक्षाला साथ द्या - आवळे
उदगीर, १३ एप्रिल/ वार्ताहर

जयवंतराव आवळे यांनी मागील काळात सत्तेच्या माध्यमातून जनतेचा विकास न करता स्वत:चा स्वार्थ साधला. वडगाव विधानसभा मतदारसंघाने नाकारलेला उमेदवार काँग्रेसने लातूरकरांच्या माथी थोपला. त्यांना परत वडगावला पाठवून विकासाचे राजकारण करणाऱ्या ‘जनसुराज्य’च्या तुकाराम गन्न्ो यांना निवडून द्या, असे आवाहन वडगावचे आमदार राजीव आवळे यांनी पत्रपरिषदेत केले. जनसुराज्य पक्षाची स्थापना विनय कोरे यांनी सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर समाजातील बेरोजगारांना काम देण्यासाठी केली आहे. आम्ही घोषणाबाजी न करता कृतीवर भर देतो असे सांगून आमदार आवळे यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या उमेदवाराला निवडून देणार का, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या रिमोटवर चालणारा आहे. काँग्रेसने जयवंत आवळे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना रिंगणात उतरविले आहे. देशमुखांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या बाहेरच्या उमेदवाराला न स्वीकारता समाजाच्या घटकाचा विकास करून रोजगार निर्मिती करणाऱ्या जनसुराज्य पक्षाला साथ द्या, असे आवाहन श्री. आवळे यांनी केले. या पत्रकार बैठकीस माजी आमदार मनोहर पटवारी, तुकाराम गन्न्ो आदी उपस्थित होते.

मुंडे-जयसिंगरावांच्या आजच्या सभेबद्दल औत्सुक्य
बीड, १३ एप्रिल/वार्ताहर

तब्बल ११ वर्षांनंतर भाजप नेते गोपीनाथ मुंडे व जयसिंगराव गायकवाड यांची संयुक्त प्रचारसभा उद्या (दि. १४) होत आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांबद्दल काय बोलतात याची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रमोद महाजन, आमदार गोपीनाथ मुंडे व जयसिंगराव गायकवाड हे तिघे मित्र होते. युतीच्या काळात मुंडे उपमुख्यमंत्री तर गायकवाड राज्यमंत्री होते. मात्र १९९८ च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन गायकवाड यांनी निवडणूक लढविल्यानंतर १९९९ च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात खासदार गायकवाड यांना संधीही मिळाली. मात्र दरम्यान स्व. महाजन व मुंडे यांच्याबरोबर मतभेद झाल्याने त्यांनी जिल्ह्य़ात स्वतंत्रपणे काम सुरू केले. त्यातूनच २००४ च्या निवडणुकीत गायकवाडांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी महाजन-मुंडे यांच्यावर आरोपाच्या अनेक फैरी झाडल्या. या राजकीय उलथापालथीनंतर परत खासदार गायकवाड शिवसेनेत दाखल झाले आहेत. युतीचे उमेदवार म्हणून आमदार मुंडे निवडणूक लढवीत असल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी खासदार गायकवाड यांच्याबरोबर उद्या सकाळी पत्रकार बैठक व त्यानंतर ऊसतोड कामगारांचा मेळावा व इतर प्रचार सभा होणार आहेत. तब्बल ११ वर्षांनंतर मुंडे-गायकवाड संयुक्तपणे प्रचारात भाग घेणार असल्याने ते काय बोलतात याची उत्सुकता आहे.

वडिलांना बदनाम करणारे लिखाण आताच कसे बाहेर आले? - पूनम
नांदेड, १३ एप्रिल/वार्ताहर

‘‘माझे वडील प्रमोद महाजन यांना बदनाम करणारे लिखाण निवडणूक काळातच कसे बाहेर पडले?’’, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या तरुण नेत्या पूनम महाजन-राव यांनी आज केला.
सिडको येथील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पूनम म्हणाल्या, ‘‘कारागृहातून बाहेर पडलेल्या या कथित आत्मचरित्राबद्दल माझे काका प्रकाश महाजन यांनी पुरेशी माहिती मांडल्याने याबाबत अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. राज्यात भा. ज. प.ची स्थिती उत्तम आहे. ज्या राज्यात भा. ज. प.ची सत्ता आहे तेथे सुबत्ता आहे. बीडमधून गोपीनाथ मुंडे दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील. खासदार जयसिंगराव गायकवाड शिवसेनेत आल्याने युतीला निश्चित फायदा झाला आहे. ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांची भेट पूर्वनियोजित होती.’’

‘परभणीत परिवर्तन हो!’
गंगाखेड, १३ एप्रिल/वार्ताहर

महासत्ता होण्याची क्षमता असलेला देश अतिरेक्यांच्या हाती देऊन स्वत:चा विकास वर्षांनुवर्षे साधण्यासाठी धडपडणाऱ्या सत्ताधारी काँग्रेसने ‘जय हो’ची फसवी घोषणा दिली आहे. मतदारांनी त्यांच्या भुलथापांना बळी न पडता ‘परिवर्तन हो’चा जयघोष करावा व बहुजन समाज पक्षाच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस आमदार डॉ. के. के. सच्चान यांनी आज केले. शहरातील रघुवीर जीनिंग प्रांगणावर परभणीतील ब. स. प.च्या उमेदवार राजश्री जामगे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी झालेल्या सभेत श्री. सच्चान बोलत होते. ब. स. प. ब्राह्मण भाईचाराचे प्रदेशाध्यक्ष सतीश चतुर्वेदी, उमेदवार राजश्री जामगे, पक्षनेते भीमराव हत्तीअंबिरे, जिल्हाध्यक्ष देवराव खंदारे, प्रदेश प्रतिनिधी गोपीनाथ कांबळे आदी उपस्थित होते. श्री. सच्चान म्हणाले की, पक्षाच्या नेत्या मायावती यांना पंतप्रधान होण्यासाठी अडविण्याची ताकद कोणामध्येच नाही. श्री. हत्तीअंबिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्यावर कडाडून टीका केली.

अणुकरार पवारांमुळेच मंजूर झाला - क्षीरसागर
बीड, १२ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच अणुकरार मंजूर होऊ शकला. परिणामी देशातील पुढच्या २५ वर्षांचा विजेचा प्रश्न सुटू शकला आहे. त्यामुळे विकासाची दृष्टी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारालाच साथ द्या, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. लोकसभेच्या बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ श्री. क्षीरसागर यांनी शिरूर तालुक्यातील खालपुरी व रायमोहा येथे रविवारी प्रचारसभा घेतल्या. ते म्हणाले की, केंद्रातीलआघाडी सरकारने मागील पाच वर्षांत जनतेच्या विकासाची कामे केली आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या भाजपने केंद्रात सत्ता असताना निर्णय का घेतला नाही? माजी आमदार जनार्दन तुपे म्हणाले की, शरद पवार यांना प्रादेशिक पक्ष पंतप्रधानपदासाठी समर्थन देऊ लागले आहेत. तालुकाध्यक्ष अरुण डाके, सभापती सतीश काटे या वेळी उपस्थित होते.

पडेगाव प्रकरणातील ३८ आरोपींना बुधवापर्यंत कोठडी
औरंगाबाद, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी

पडेगाव येथे रविवारी झालेल्या मारहाण आणि जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी ३८ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना बुधवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एल. जोगदंड यांनी दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एकूण ४१ जणांना अटक केली होती. मात्र तीन आरोपींची दवाखान्यात रवानगी झाल्यामुळे त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले नाही. उर्वरित ३८ आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले. या प्रकरणातील लाठय़ा, काठय़ा, वाहन आणि रॉकेलचे कॅन आदी बाबी जप्त करायच्या आहेत. तसेच जमिनीची कागदपत्रेही हस्तगत करायची आहेत. या घटनेमध्ये कटकारस्थानाचा शोध घ्यायचा आहे; त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील क्रांती कुलकर्णी यांनी केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. सर्व ३८ आरोपींना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बांधकाम मजुरावर प्राणघातक हल्ला
औरंगाबाद, १३ एप्रिल/प्रतिनिधी

बांधकामावरून परतणाऱ्या मजुरावर चेहऱ्यावर कापड बांधलेल्या अज्ञात चौघाजणांनी प्राणघातक हल्ला केला. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्रनगरात ही घटना घडली. लखन मन्नासिंग तामचिकर (३०, रा. नारेगाव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. त्याची छाती, डावा पाय तसेच शरीराच्या अन्य भागावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी काम संपल्यानंतर तो पायी घराकडे येत असताना राजेंद्रनगरात त्याला चारजणांनी घेरले. चौघांच्याही तोंडावर रुमाल बांधलेला होता. त्यामुळे तो हल्लेखोरांना ओळखू शकला नाही. हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्याची छाती, पाय तसेच हातावरही जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

अखिल भारतीय सेनेचे उमेदवार रवि तायडे यांची माघार
औरंगाबाद, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष आणि अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार रवि तायडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे. मात्र त्यांचे नाव मतदारयादीत कायम राहणार आहे. अखिल भारतीय सेनेच्या वतीने उत्तमसिंह पवार यांच्या स्वागताचे आयोजन छावणी परिसरात करण्यात आले होते. जातीयवादी शक्तीचा बिमोड करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष संघटीत होत आहेत. अखिल भारतीय सेनेने काँग्रेस पक्षाच्या सोबत राहून जातीयवादी शक्तीचा बिमोड करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उत्तमसिंह पवार यांनी आभार व्यक्त केले. या वेळी राजकुमार जाधव, राजेंद्र दाते पाटील, दिलीप सुतार, दादाराव राऊत, उत्तमसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

विकासरूपी अलंकाराने रेणापूरला मढवू - दिलीपराव देशमुख
लातूर, १३ एप्रिल/ वार्ताहर

नव्या लातूर मतदारसंघात समावेश झालेल्या रेणापूर तालुक्याला विकासरूपी अलंकाराने मढवू, असे प्रतिपादन लातूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाइं आघाडीचे उमेदवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचारार्थ रेणापूर तालुक्यातील खरोळा, कारेपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी उमेदवार जयवंतराव आवळे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, यशवंत पाटील, सर्जेराव मोरे, अॅड. त्र्यंबक भिसे, विश्वास देशमुख, शिवकन्या पिंपळे उपस्थित होते. श्री. देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला की, रेणापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी येथील जनता काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस साथ देईल.

‘निवडणुकीत पोलिसांनी सतर्कतेने काम करावे’
सिल्लोड, १३ एप्रिल/ वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या कामात पोलिसांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) सिल्लोड येथील पोलीस यंत्रणेस दिल्या.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून औरंगाबाद ग्रामीणचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. चावरिया येथे आले होते. त्यांनी शहर, ग्रामीण व अिजठा या तीन पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. लोकसभा निवडणुकीत पोलिसांची भूमिका, गुन्हेगारांची माहिती, परवानाधारक शस्त्रधारकांनी शस्त्रे जमा केली काय? यासह संवेदनशील मतदान केंद्रे, तेथील बंदोबस्त या विषयी त्यांनी माहिती घेऊन मार्गदर्शन केले. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी यंत्रणेने सावध रहावे, कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलीस उपअधीक्षक विश्वनाथ जटाळे, पोलीस निरीक्षक शालिग्राम पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.

मराठवाडय़ाचे नेतृत्व संपवू पाहणाऱ्यांना धडा शिकवा - पंडित
बीड, १३ एप्रिल/वार्ताहर

बीडच्या निवडणुकीत जातीय प्रचाराचे विष पेरून मराठवाडय़ाचे नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. त्यामुळे मतदारांनी मुंडेंच्या मागे मतांची ताकद उभी करून आपले नेतृत्व संपवू पाहणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. लोकसभेच्या बीड मतदारसंघातील युतीचे उमेदवार आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ आमदार पंडित यांच्या साखरे बोरगाव, अंजनवती, लोणीघाट, जेबा पिंप्री, सफेपूर येथे प्रचारसभा झाल्या. यावेळी ते बोलत होते. पंडित पुढे म्हणाले, की सर्वच मतदारसंघातून मुंडे यांना मताधिक्य मिळणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जातीच्या प्रचाराचे विष पेरत निवडणूक लढवीत आहेत. मात्र मराठा आरक्षणाची भूमिका असो, कापूस आंदोलन किंवा मराठवाडा अनुशेष असो यासाठी आग्रही भूमिका आमदार मुंडे यांनी मांडलेली आहे. मराठवाडय़ाला रचनात्मक नेतृत्व देण्याचा प्रयत्न झाला आहे. विरोधकांकडे असे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे जाती-जातीत भांडणे लावून मराठवाडय़ाचे नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र पश्चिम महाराष्ट्रातील नेते करीत आहेत. त्यामुळे मतदारांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्या भ् नेतृत्वाला मताची ताकद द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रमेश पोकळे, नारायण शिंदे, गोरक्ष रसाळ, मोहनराव झोडगे, शरद झोडगे आदी उपस्थित होते.