Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘कंदहार’च्या वेळीच अडवाणींमधील लोहपुरुष वितळला - पंतप्रधान
मुंबई, १३ एप्रिल / खास प्रतिनिधी

 

कंदहार विमान अपहरणाच्या वेळीच लालकृष्ण अडवाणी यांच्यातील लोहपुरुष वितळला, असे टीकास्त्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सोडले. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अडवाणी सातत्याने डॉ. मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान असल्याची टीका करीत असतानाच ‘ अडवाणी यांच्या बोलण्यातील आवेश कृतीत जाणवत नाही’, असा जोरदार हल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी चढविला.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील नामवंतांशी संवाद साधण्याबरोबरच पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी अडवाणी व भाजपलाच लक्ष्य केले होते. गेले पाच वर्षे डॉ. सिंग यांच्यावर दुबळे किंवा कमकुवत पंतप्रधान अशी टीका होत असताना त्यांनी कधीच त्याला उत्तर दिले नव्हते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान आक्रमक झाले आहेत. हा बदल कसा झाला असे विचारले असता पंतप्रधान म्हणाले की, लोकांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज पसरविला जात होता. वस्तुस्थिती लोकांना कळावी म्हणूनच आपण अडवाणींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. अडवाणी यांच्याबद्दल वैयक्तिक आकस काहीही नाही. भाजपच्या वतीने दहशतवादाचा मुद्दा प्रचारात उपस्थित केला जात आहे. कंदहार विमान अपहार प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारने दहशतावाद्यांपुढे सपशेल गुडघे टेकले होते. तत्कालीन परराष्ट्रमंत्री दहशतवाद्याला घेऊन कंदहारला गेले. त्यातील एक दहशतवादी आता देशाच्या मुळावर आला आहे. एनडीए सरकारच्या काळात संसदेवर हल्ला झाला. तेव्हाही काहीही कृती सरकारने केली नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही वाटाघाटी करीत बसलो नाही. एनएसजी कमांडोना धाडून नऊ दहशतवाद्यांचा खतमा केला. आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव आणण्याकरिता भारताने केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले. अडवाणींवर उपरोधिकपणे टीका करताना डॉ. सिंग म्हणाले, शतकापूर्वीची मशीद पाडल्यानंतर मी नाकाश्रू ढाळत बसलो नसतो वा अल्पसंख्यांकांच्या विकास कार्यक्रमावर पक्षाचा एक मुख्यमंत्री टीका करीत असताना मी शांतपणे बसू शकलो नसतो. पाकिस्तानमध्ये जाऊन मी असे एखादे विधान केले नाही की त्यामुळे देशात त्याची प्रतिक्रिया उमटून माझा पक्ष राजकीयदृष्टय़ा अडचणीत आला आहे. अडवाणी यांनी चर्चेचे आव्हान दिले असले तरी त्यांना आपण पंतप्रधानपदाचे प्रतिस्पर्धी म्हणून मानतच नाही. त्यामुळे चर्चेचा प्रश्नच येत नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले. अडवाणी यांनी स्वीस बँकेतील काळा पैसा देशात आणण्याची मागणी केली असली तरी नुकत्याच संपलेल्या जी-२० राष्ट्रांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. स्वीस बँकेत देशातील निश्चित किती पैसा आहे हे याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. १९८४ मधील शीखविरोधी दंगल तसेच २००२ मधील गुजरातमधील दंगल या दोन्ही घटना म्हणजे देशाला लागलेला काळीमा असल्याचे त्यांनी मान्य केले. अल्पसंख्याक व विशेषत: मुस्लिमांना देशातील साधनसंपत्तीत प्राधान्य असल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

राहुल चांगले पंतप्रधान होऊ शकतात
राहुल गांधी यांच्याबाबत पंतप्रधानांना विचारले असता ते म्हणाले, सत्ता नव्या पिढीकडे जावी, अशी आपलीही इच्छा आहे. राहुल गांधी हे चांगले पंतप्रधान होऊ शकतात, असे सांगून प्रियांकाची री ओढली आहे.