Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भारतीय मान्सूनचे अस्तित्व दीड कोटी वर्षांपासून!
अभिजित घोरपडे
पुणे, १३ एप्रिल

भारतीय उपखंडातील वैशिष्टय़ असलेला मान्सून अर्थात मोसमी वारे तब्बल दीड कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे पुरावे मिळाले असून, तेव्हापासून तो आपल्या प्रदेशाची साथ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हा काळ केवळ ऐंशी लाख वर्षांचा मानला जात होता, पण या नव्या संशोधनामुळे तो दुपटीने मागे गेल्याचे उघडकीस आले आहे. गोव्यातील राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतील (एन.आय.ओ.) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एस. कृष्णा तसेच, ब्रिटनमधील साऊथम्पटन विद्यापीठाचे प्रा. जॉन बुल आणि इडनबर्ग विद्यापीठाचे प्रा. रॉजर स्क्रूटन यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनात यावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरात केलेल्या दीर्घ संशोधनात मान्सूनच्या अस्तित्वाला सुरुवात कधी झाली याचा शोध घेतला. विशेष म्हणजे त्याच्या जन्मापासून आजपर्यंतच्या दीड कोटी वर्षांच्या काळात त्याचे प्रमाण कमी-जास्त झाले असले, तरी त्याची नियमितता कायम आहे, असे डॉ. कृष्णा यांनी ‘लोकसत्ता’ सांगितले.
भारतीय मान्सून कधी अस्तित्वात आला, याबाबत विविध मतप्रवाह आहेत. त्यापैकी सर्वाधिक स्वीकारलेल्या मतानुसार त्याची निर्मिती साधारणत: ऐंशी लाख वर्षांपूर्वी झाल्याचे भूशास्त्रज्ञ मानत होते. या काळात हिमालयाने विशिष्ट उंची गाठली व त्याचा परिणाम म्हणून मान्सून अर्थात मोसमी वारे उदयाला आले, असे मानले जात होते. हिमालयाची उंची वाढल्याचे प्रमुख पाच टप्पे मानले जातात. त्यापैकी पाचव्या व अखेरच्या टप्प्यात मान्सूनचा उदय झाला. हा काळ ऐंशी लाख वर्षांचा मानला जायचा. मात्र, डॉ. कृष्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या संशोधन मोहिमेत हिंदी महासागरातील २९९ भ्रंश (भूखंडांमध्ये असणाऱ्या कमकुवत भेगा) व बंगालच्या उपसागरात सुंदरबन प्रदेशाजवळ जमा झालेला गाळ यांचा अभ्यास केला. त्यात आढळले, की हिमालयाची उंची वाढण्याचा पाचवा टप्पा १.५४ कोटी ते १.३९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणूनच मान्सून अस्तित्वात आला. हिमालयाची ही शेवटच्या टप्प्यातील वाढ साधारणत: एक हजार मीटर किंवा त्याहून अधिक असावी, असे डॉ. कृष्णा यांनी सांगितले. त्याच्या आधी मान्सूनचे वारे कदाचित सौम्य स्वरूपात वाहत असावेत. मात्र, या अखेरच्या टप्प्यात त्यांची तीव्रता वाढली आणि त्यांना आता आहे तसे नेमके व ठोस स्वरूप प्राप्त झाले, अशी माहिती त्यांनी दिली.
या संपूर्ण काळात मान्सूनच्या वर्तणुकीत विशेष फरक पडलेला नाही. तो नियमित असला, तरी त्याच्या वागण्यात काही लहरीपणा आढळला आहे. त्याचे वागणे नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आताचे संशोधन उपयुक्त ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हिमालयाची निर्मिती नव्हे!
डॉ. कृष्णा यांच्या संशोधनाबाबत अनेक ठिकाणी हिमालयाची निर्मिती दीड कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की हिमालयाची निर्मिती पाच-साडेपाच कोटी वर्षांपूर्वी झाली. त्याची उंची अजूनही वाढत आहे. या संशोधनात हिमालयाच्या उंचीमध्ये दीड कोटी वर्षांपूर्वी झालेली पाचव्या टप्प्यातील वाढ व त्याचा मान्सूनच्या निर्मितीशी असलेला संबंध दाखवला आहे. तो हिमालयाच्या निर्मितीचा काळ नाही, असे कृष्णा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.