Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘सत्यम’वरील ताब्यात टेक महिंद्रची सरशी; लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो पिछाडीवर
मुंबई, १३ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची कंपनी टेक महिंद्र लिमिटेडची घोटाळेग्रस्त सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडवर ताबा मिळविण्यात आज अखेर सरशी झाली. अभियांत्रिकी क्षेत्रातील बलाढय़ कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेडला तिने पिछाडीवर टाकले. सत्यममधील ३१ टक्के भागभांडवल ताब्यात घेण्यासाठी टेक महिंद्रच्या प्रति समभाग ५८ रुपये अशा सर्वोच्च दराला देकार मिळाला असून, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि विल्बर रॉस या अन्य प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यासाठी अनुक्रमे प्रति समभाग ४५.९० रुपये आणि २० रुपये अशी बोली लावली होती, असे आता समजते.
सत्यमवरील सरकारनियुक्त संचालक मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सत्यमसंबंधीच्या निविदा प्रक्रियेत सर्वोच्च बोलीनुसार सरस ठरलेल्या टेक महिंद्रला समभाग अधिग्रहण करारानुसार प्रति समभाग ५८ रुपये दरानुसार सत्यममध्ये ३१ टक्के भागभांडवली हिस्सा प्रथम संपादित करावा लागेल आणि त्यानंतर आणखी २० टक्के भागभांडवलासाठी सामान्य भागधारकांसाठी ‘ओपन ऑफर’ द्यावी लागेल. ३१ टक्के भागभांडवलासाठी सुमारे १,७५६ कोटी आणि एकंदर ५१ टक्केभागभांडवलासाठी २,८९० कोटी रुपयांच्या घरातील गुंतवणूक टेक महिंद्रला या प्रकरणी करावी लागेल. यापैकी किमान विहित रक्कम टेक महिंद्रला येत्या २१ एप्रिलपूर्वी सत्यमकडे जमा करावी लागेल.
टेक महिंद्रने आपली उपकंपनी व्हेंचरबे कन्सल्टंट्सच्या माध्यमातून सत्यमवरील ताब्याची ही प्रक्रिया पार पाडली आहे. सत्यमच्या संपादनासाठी हवे असलेल्या २,८९० कोटी रुपयांपैकी तीन-चतुर्थाश भांडवल हे कर्जरूपाने उभे केले जातील, असे महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे मुख्य वित्तीय अधिकारी भारत दोशी यांनी स्पष्ट केले. महिंद्र समूहाकडे सध्या अंतर्गत स्रोतातून ७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय कंपनी लॉ बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर, उर्वरित २० टक्के भांडवली हिस्सा मिळविण्यासाठी टेक महिंद्रला ‘ओपन ऑफर’ जाहीर करण्यास सांगितले जाईल. मात्र ही पुनर्खरेदी प्रत्येकी ५८ रुपये दरापेक्षा निश्चितच जास्त नसेल, असा जाणकारांचा कयास आहे. तीन महिन्यांपूर्वी घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पाळापाचोळा झालेल्या सत्यमचे समभाग गोळा करणाऱ्यांना किमान प्रत्येकी ७० ते ८० रुपये भाव मिळणे अपेक्षित होते, त्यांचा यातून भ्रमनिरास होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान सत्यमवरील ताब्याच्या बातमीने टेक महिंद्रच्या समभागाने आज बाजारात मोठी उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजारावर हा समभाग शुक्रवारच्या तुलनेत तब्बल २९ टक्क्यांनी वधारून ४०६ रुपयांच्या उच्चाकांवर पोहचला होता. त्या उलट आजच्या व्यवहारात साडेतीन टक्क्यांच्या उसळीने ८६० रुपयांवर गेलेला लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचा समभाग बाजार बंद होता होता अध्र्या टक्क्यांच्या नुकसानीसह ८२४ रुपयांवर स्थिरावला. सरलेल्या तीन महिन्यांच्या काळात खुल्या बाजारातून सरासरी १५७ रुपये प्रति समभाग दराने सत्यममधील १२ टक्क्यांच्या घरात भांडवली हिस्सा लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने मिळविला आहे. आता ताबा प्रक्रियेत पिछाडीवर पडल्यानंतरही या कंपनीतील भांडवली हिस्सा कमी न करण्याचेच कंपनीचे धोरण राहील असे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या मुंबईतील प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. येत्या काळात कंपनीला सत्यममधील गुंतवणुकीचे अस्सल मूल्य निश्चितच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.