Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

गोदाम-दागिन्यांची दुकाने लुटणाऱ्या राजस्थानी टोळीला अटक
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी

 

गोदामामध्ये काम करणारा राजस्थानी कर्मचारी हेरून त्याच्याकरवी गोदामाची, दागिन्यांच्या दुकानाची माहिती घेऊन त्यानंतर दरोडा घालणाऱ्या आणि चोरलेला माल टेम्पोमध्ये भरून पोबारा करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गोरेगाव पोलिसांनी आज अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व संशयित राजस्थान येथील राहणारे आहेत.
ही टोळी पहिल्यांदा गोदाम, हार्डवेअर प्लंबिंगची दुकाने, दागिन्याच्या दुकानातील राजस्थानी कर्मचाऱ्याला हेरत असत. त्यानंतर टोळीतील काहीजण त्याच्याशी मैत्री करीत असत आणि त्यांच्याकरवी मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षिततेची चाचपणी करीत. एवढे सगळे केल्यानंतर ही टोळी प्रत्यक्ष दरोडय़ाची योजना आखून त्याला तडीस नेत असे आणि चोरलेला माल टेम्पोतून भरून पळ काढीत असे. दरोडा टाकल्यानंतर ही टोळी राजस्थानला पसार होत असे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात किंवा त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत असे. मात्र काही दिवसांपूर्वी एक बेरोजगार तरुण मध्यरात्री उगाचच घिरटय़ा घालत असतो, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या तरुणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या राजस्थानी तरुणांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले. पोलिसांनी टोळीचा म्होरक्या गणपतसिंग राजपूतसह (२२), चैनसिंग चौहान (२३), माधवसिंग सोलंकी (३२), रामशंकर विश्वकर्मा (२६) आणि जयंती पुरोहित (२८) या पाच जणांना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत सांताक्रुझ आणि एमआयडीसी परिसरात पाच गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. साडेचार लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.