Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
प्रादेशिक

गोदाम-दागिन्यांची दुकाने लुटणाऱ्या राजस्थानी टोळीला अटक
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी

गोदामामध्ये काम करणारा राजस्थानी कर्मचारी हेरून त्याच्याकरवी गोदामाची, दागिन्यांच्या दुकानाची माहिती घेऊन त्यानंतर दरोडा घालणाऱ्या आणि चोरलेला माल टेम्पोमध्ये भरून पोबारा करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गोरेगाव पोलिसांनी आज अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व संशयित राजस्थान येथील राहणारे आहेत.

प्रमोद महाजनांवरील आरोपांचा भाजपकडून निषेध
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी

भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी सजा झालेला गुन्हेगार प्रवीण महाजन याने प्रमोद महाजन यांच्यांवर व्यक्तिगत स्वरुपाचे अत्यंत अश्लाघ्य व निर्गल आरोप केले आहेत. मात्र अशा प्रकारे हयात नसलेल्या व्यक्तीवर चिखलफेक करणाऱ्यांना व्यासपीठ मिळवून देणे हे नैसर्गिक न्यायाला धरुन नाही, असे आज भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महाजन आज हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांना उत्तरे देणे वा आपली बाजू मांडणे त्यांना अर्थातच शक्य नाही. अशा स्थितीत हयात नसलेल्या व्यक्तीवर मनमानी स्वरुपाचे बेछूट आरोप करणे, हे तर विलक्षण बेजबाबदारपणाचे आहेच, पण त्याला एवढी मोठी प्रसिद्धी देणे हेदेखील योग्य नाही, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. आमच्या दिवंगत नेत्यावरील आरोपांना प्रोत्साहन देऊन गुन्हेगाराला व गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आली. या गोष्टीचा आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते तीव्र निषेध करीत आहोत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनीही आज एका पत्रकार परिषदेत या घटनेचा निषेध केला. भांडारी म्हणाले की, या प्रकरणी आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. या प्रकरणी कुठल्या पद्धतीने दाद मागितली जाऊ शकेल, ते आम्ही तपासून पाहत आहोत.

खारघरमधील युको बँकेवर दरोडा; १.९० लाखांची रोकड लंपास
पनवेल, १३ एप्रिल/प्रतिनिधी
खारघरच्या सेक्टर-२१ मधील युको बँकेवर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख ९० हजार रुपयांची रोख लंपास केली. या दरोडेखोरांनी ग्राहकांचे पाच मोबाईल फोनही चोरून नेले. दोन चॉपर आणि दोन रिव्हॉल्व्हरसह बँकेत घुसलेल्या पाच तरुणांनी शाखा व्यवस्थापक मांगले यांच्याकडे तिजोरीच्या किल्ल्यांची मागणी केली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र डांबून या चोरटय़ांनी रोखपालाकडील एक लाख ७२ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली, तसेच फ्रान्सिस अँथनी या ग्राहकाचे १८ हजार रुपये आणि मोबाईल फोनही हिसकावून घेतला. यावेळी बँकेत चार-पाच ग्राहक होते. या दरोडेखोरांनी अन्य ग्राहकांचे चार मोबाईल फोनही घेतले आणि रोकड रकमेसह पोबारा केला. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे पाच दरोडेखोर ३० ते ३५ वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

रेल्वे सप्ताहानिमित्त चर्चगेट स्थानकात प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेने चर्चगेट स्थानकावर ‘पश्चिम रेल्वे-कल से आज तक : रोमांचक यादों की सफर’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. ५४ व्या रेल सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या प्रदर्शनाचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. एन. वर्मा यांनी आज दुपारी उद्घाटन केले. या प्रदर्शनामध्ये भारतीय रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी अनेक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये वाफेच्या इंजिनांपासून ते एमयूटीपीच्या लोकलचा समावेश आहे. याखेरीज एटीव्हीएम मशीन व सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या आधुनिक उपकरणांखेरीज ‘रेल संपर्क १३९’ या क्रमांकासारख्या गोष्टींचीही माहिती देण्यात आली आहे. रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाकडून एका निबंध स्पर्धेचेही आयोजन केले आहे. ‘रेल वृत्तान्त यात्रा’ हा स्पर्धेचा विषय असून, हिंदी भाषेतून तो लिहायचा आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या पहिल्या तीन सवरेत्कृष्ट निबंधांना अनुक्रमे ४,०००, ३,००० आणि २,००० रुपये बक्षिस दिले जाणार आहे. तीन हजार शब्दांची मर्यादा असलेला लेख आपला नाव, पत्ता व फोननंबरसहित दिल्लीला रेल्वे बोर्डाच्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन रेल्वे बोर्डाने केले आहे.

पवार केवळ पश्चिम महाराष्ट्राचे नेते - जोशी
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते सध्या प्रचारसभांतून शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांनी परभणीतील जिंतूर येथील सभेत बोलताना पवारांवर टीकेची तोफ डागली. पवार हे राज्याचे, देशाचे नेते नसून केवळ पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहेत, असा हल्ला जोशी यांनी चढवला.शरद पवारांना आता येत असलेला शेतकऱ्यांविषयीचा कळवळा बेगडी असून ते निव्वळ थापा मारून शेतकऱ्यांची दिशाभूल करतात, अशी टीका करताना जोशी म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून जी कर्जमाफी देण्यात आली तिचा फायदा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला. महाराष्ट्रात महात्मा फुले, शाहु महाराज यांचे नाव घ्यायचे आणि दिल्लीत मराठी अस्मिता बाजूला ठेवून सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवायचा, ही पवार यांची परंपरा आहे.अ‍ॅड. गणेश दुधगावकर यांच्यासाठी झालेल्या या सभेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, ज्ञानोबा मुंडे, सुरेश जेथलिया, हनुमंत बोबडे आदींचीही भाषणे झाली.

प्रभाग समिती अध्यक्षपदी शिरसाट
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज एन विभाग प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक भालचंद्र शिरसाट बिनविरोध निवडून आले. सध्या प्रभाग समित्यांवर सेना-भाजपचे वर्चस्व असून ते कायम राहील, अशी शक्यता आहे. दरम्यान, बेस्टच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे दिलीप पटेल विजयी झाले. प्रभाग समित्यांच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा दिवस होता. एन विभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिरसाट यांच्या विरोधात कोणीही अर्ज भरला नाही. आता १६ एप्रिल रोजी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल.

पत्नीने केला पतीचा खून
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी
चारित्र्यावर संशय घेऊन सतत छळणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पतीची कोयत्याने गळा चिरून हत्या करणाऱ्या हेमलता ताडे (३५) या महिलेला कस्तुरबा पोलिसांनी आज अटक केली. हेमलता (३५) आणि ज्ञानेश्वर ताडे (४२) हे दाम्पत्य सुकुरवाडीतील रमाशंकर चाळीत ११ वर्षांची मुलगी आणि पावणेतीन वर्षांच्या दोन मुलांसह राहत होते. ज्ञानेश्वर हा मुंबई विद्यापीठात शिपाई म्हणून नोकरीला होता. परंतु क्षयरोगाच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून तो घरीच होता. हेमलताचे अन्य कोणाशी संबंध असल्याचा संशय घेऊन ज्ञानेश्वर सतत हेमलताचा छळ करीत असे.

किरकोळ भांडणातून कोळीवाडा येथे गोळीबार
मुंबई, १३ एप्रिल / प्रतिनिधी

किरकोळ भांडणातून आज रात्री शीव कोळीवाडा येथे गोळीबाराची घटना घडली. काँग्रेसचे पदाधिकारी असणाऱ्या जॉन रिबेलो याने हवेत गोळीबार केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. जुन्या रुपम चित्रपटगृहाच्या मागे जॉनचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या समोर लहान मुले खेळत होती. त्यावरून जॉनचे शिवसेनेच्या पदाधिकारी लक्ष्मी पाटील यांच्याशी भांडण झाले. भांडण वाढत गेले आणि एकमेकांना धमकी देण्यापर्यंत हा वाद वाढला. शेवटी जॉनने आपल्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळ्या झाडल्या. पोलिसांनी पाटील आणि जॉनला ताब्यात घेतले आहे.