Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘मुंबई आणि महाराष्ट्राची बाजू लोकसभेत मांडेन’
गेली ३७ वर्षे मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. भूमिपूत्रांना रोजगार मिळावा यासाठी मी यापूर्वी लढलो आहे. अनेक स्थानिक समस्यांविरुद्ध आंदोलने करीत त्या समस्या सोडविल्या आहेत. एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून मी ते प्रश्न शासनदरबारी मांडतो. त्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने मला ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. माझ्या मतदारसंघात सुमारे १५ लाख ७० हजार मतदार आहेत. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मानखुर्द आणि शिवाजीनगर

 

भागात पाणीटंचाई आहे. ती कमी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कुर्ला-ठाणे हा रेल्वेमार्ग सहापदरी करण्याच्या कामाची पूर्वतयारी होऊनही मुख्य काम रखडलेच आहे. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा याचा पाठपुरावा करणार आहे. ठाणे-सीएसटी हा हार्बर रेल्वेमार्ग व्हावा याची आत्यंतिक गरज आहे. या परिसरातील जनतेची तशी मागणी आहे. ती पूर्ण होईल, याकडे मी लक्ष देणार आहे. मुलुंड-भांडुप हा भागही मुंबईच्या हद्दीतच येतो. तरीही तेथील रहिवाशांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या पट्टय़ातील वीजपुरवठा ‘बेस्ट’ने स्वत:कडे घ्यावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विक्रोळी परिसर सध्या डम्पिंग ग्राऊंड झाला आहे. महापालिकेने डम्पिंगसाठी पर्याय शोधण्याची गरज आहे. पालघर, कल्याण आणि नवी मुंबई या ठिकाणांचा विचार महामुंबईत म्हणून विचार करून या संपूर्ण पट्टय़ाच्या बाहेर डम्पिंग ग्राऊंड झाले पाहिजे असे मला वाटते. ठाणे, कल्याण, मुंबई सेंट्रल इत्यादी ठिकाणी बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या रेल्वेगाडय़ा थांबतात. त्या गेल्यानंतर रेल्वे रुळांवर विष्ठा पडलेली दिसते. रेल्वेमध्ये शौचकुपांची सोय असून नये का? लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये ही सोय करण्यात यावी, यासाठी मी आग्रही भूमिका घेणार आहे. कांजूर मार्ग हे स्थानक आता महत्त्वाचे झाले आहे तरीही अजूनही त्या स्थानकावर दोनच फलाट आहेत. तेथे चार फलाट झाले पाहिजेत. भारतात आर्थिक घोटाळ्यांसाठी सहजासहजी जामीन मिळतो. २५ कोटी रुपयांवरील घोटाळ्यांसाठी जबाबादार असलेल्या व्यक्तींना किमान तीन वर्षे जामीन देण्यात येऊ नये, अशी तरतूद कायद्यात करण्याची मागणी मी करणार आहे. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्यांपैकी कोणीही महाराष्ट्राची बाजू मांडलीच नाही. मी मुंबईचा आणि महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे मुंबईच्या आणि महाराष्ट्राचे प्रश्न तडीस नेण्यासाठी मी लढेन.
‘सुखकर रेल्वे प्रवासासाठी प्रयत्न करणार’
१९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या काळात मी ईशान्य मुंबई मतदार संघातून निवडून आलो होतो. २००४ साली पराभव झाला. या पाच वर्षांच्या काळात मी अनेक कामे केली. २६ जुलैला मुंबईमध्ये महापूर आला होता. पुराच्या वेळी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम माझ्या कार्यकर्त्यांनी केले. त्यानंतर महापुरामागची कारणे शोधण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. मिठी नदीचे सुशोभीकरण केले. मिठी नदीच्या बाजूला ज्या झोपडय़ा होत्या त्या हटवल्या व तेथून नदीत रसायने सोडली जाऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना केली. भारनियमनाविरुद्ध आवाज उठवला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. असे असूनदेखील मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्ग या भागात भारनियमनाचा त्रास रहिवाशांना सोसावा लागत होता. त्याविरुद्ध आमच्या पक्षातर्फेधरणे आंदोलन केले. मेणबत्ती मोर्चा काढला. लोकांच्या सह्या घेतल्या. या ‘सिग्नेचर कॅम्पेन’ला तब्बल २५ हजार लोकांनी प्रतिसाद दिला. त्या आधारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
निकृष्ट दर्जाच्या लाल गव्हाचे प्रकरण उघडकीस आणले. हा गहू कोठे आहे, त्याचा दर्जा काय आहे ते तपासण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले. प्रयोगशाळेत गव्हाचे नमुने नेऊन त्याची चाचणी घेतली. त्यानंतर ते नमुने उच्च न्यायालयात पाठवले. हा गहू जनावरांच्याही खाण्याच्या योग्यतेचा नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यानंतर हा आयात करण्यात आलेला लाखो टन गहू सरकारला फेकून द्यावा लागला.
मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, मालाड, कांदिवली, बोरीवली याठिकाणची काही जमीन सरकारने अचानकपणे ‘फॉरेस्ट लँड’ म्हणून घोषित केली. अनेक वर्षे तेथे राहत असलेल्या रहिवाशांना आपले राहते घर सोडून जावे लागणार अशी भीती निर्माण झाली. या निर्णयाविरुद्ध मी उच्च न्यायालयात धाव घेतली. माझ्या मोहिमेमुळे या ठिकाणी राहत असलेल्या साडेचार लाख लोकांना दिलासा मिळाला. त्यानंतर मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर बळींना योग्य वेळेत मदतनिधी पोहोचावा यासाठी मी मानवी हक्क आयोगाकडे गेलो. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि बळींना वेळेत निधी मिळेल याची व्यवस्था केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही याच कारणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर प्रक्रिया सुरु आहे.
यावेळी निवडून आल्यावर सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे दहशतवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणे, अर्थनिती आखून महागाई आटोक्यात कशी राहिल यासाठी प्रयत्न करणे. रेल्वे ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. हा प्रवास मुंबईकरांना सुखकर व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दररोज धावणाऱ्या रेल्वेच्ये वेळापत्रकात बदल करुन, त्या वेळेत धावतील याकडे लक्ष देण्यात येईल. मुलुंडला थांबणाऱ्या जलद गाडय़ांची संख्या कमी आहे ती वाढविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, कुर्ला ते ठाणे या रेल्वेमार्गाचे सहापदरीकरण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
‘अनेक प्रश्न सोडवायचे आहेत’
२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे
मी आमदार म्हणून निवडून आलो. काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय आणि कामगार आघाडी यांची युती आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व युतीतील इतर पक्षातील
नेत्यांनीही माझ्यावर विश्वास दाखवून तरुण नेतृत्व पुढे यावे या दृष्टीकोनातून मला लोकसभेचे तिकीट दिले.
भांडूप, कांजूरमार्ग, मुलुंड या ठिकाणचा बहुतेक भाग हा डोंगराळ आहे. या भागात राहणाऱ्या लोकांना पाणी पुरवठा होत नव्हता. मी पाण्याच्या टाक्या बांधून पाइपने या भागातील लोकांना पाणी पुरवले व त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला. डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे अनेक दुर्घटना घडतात. त्या रोखण्यासाठी संरक्षण
भिंती उभारल्या. ज्येष्ठ नागरिकांना ‘ओळखपत्र’ मिळविण्यासाठी टपाल कार्यालयात जावे लागत असे. त्यांना ही ओळखपत्रे घरपोच मिळतील याकडे
लक्ष दिले. माझे वडील दीना बामा पाटील यांच्या प्रतिष्ठानाद्वारे दरवर्षी शंभर गरजू मुलांना आपण शिक्षण उपलब्ध करुन
दिले. बचतगट स्थापन केले. मुस्लिम महिलांना ‘मौलाना आझाद महामंडळा’च्या माध्यमातून शिवणकाम, संगणक, टायपिंगचे प्रशिक्षण
दिले जाते. दोन हजार गरीब लोकांवर
मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करुन दिली. गरीब महिलांना प्रसूतीविषयक समस्या असतील तर त्यावर उपचार घेण्यास मदत
केली.
निवडून आल्यावर भारनियमनापासून मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्ग या भागातील
नागरिकांची सुटका, वनजमिनीवरील लोकांचे प्रश्न, सुरक्षा व्यवस्था सुधारणे या कडे लक्ष
देणार आहे. त्याचबरोबर मुलुंडमधील कामगार विमा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्याचा माझा मानस आहे.
मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, मानखुर्द या ठिकाणी डंपींग ग्राऊंडची मोठी समस्या आहे. कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहे. २६/११ सारखा प्रसंग पुन्हा उद्भवू
नये यासाठी पोलीस दल
सक्षम करणे गरजेचे आहे. पोलिसांचे विशेष इंटेलिजन्स पथक तयार
करायचे आहे. त्याचबरोबर रेल्वेवर प्राथमिक उपचार कक्ष असतो. तेथील सुविधा सुधारण्याला देखील प्राधान्य देण्यात येईल. रेल्वेत अनेक प्रकारच्या सुविधा होणे गरजेचे आहे. महिला डब्यांची संख्या वाढवणे, अपंगांच्या डब्यात सहाय्यक ठेवणे की, जेणेकरुन त्यांना चढायला व उतरण्यासाठी तो मदत करु शकेल. महिलांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा असल्याने त्या डब्यात पोलीस नेमण्यात येतील. वनजमिनीवरील रहिवासी आपल्याच घरात सतत टांगत्या तलवारी खाली वावरत आहेत. केंद्र सरकारशी आणि पर्यावरण खात्याशी बोलून त्यांना घर सोडावे लागणार नाही, यासाठी प्रयत्न करेन.
संकलन - सुनील डिंगणकर,
नमिता देशपांडे