Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजकीय पक्षांचे ‘गणपती बाप्पा मोरया’
प्रतिनिधी

मुंबईतल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत वर्षभर काहीना काही उपक्रम सुरू असतात. सध्या निवडणुकांचा हंगाम असल्याने आपल्या प्रचारासाठी राजकीय पक्षाच्या उमेदवांरांनी

 

या उपक्रमांचा फायदा करून घेतला नसता तर नवलच. इतरवेळी कदाचित या उपक्रमांची राजकीय पक्षांकडून दखलही घेतली गेली नसती. मात्र निवडणुकांच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष गणेशोत्सव मंडळांशी जवळीक करू लागले आहेत. या मंडळांतील ‘युवा-शक्ती’चा वापर त्यांना आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करायचा आहे. प्रचारासाठी एकीकडे राजकीय पक्षांनी चित्रपट अभिनेत्यांशी जवळीक साधली आहे तर स्थानिक पातळीवर गणेशोत्सव मंडळांचे सहकार्य मागितले आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडीसारख्या सणांच्या वेळी ही मंडळे सक्रिय झालेली असतात. या मंडळांमध्ये बऱ्याच तरुणांचा समावेश असल्यामुळे उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांचा वापर करण्यात येऊ शकतो. चेंबूर येथील सामाजिक कार्यकर्ते टी. के. राजन यांनी सांगितले की, गणेशोत्सव मंडळांतर्फे दिल्या जाणाऱ्या या सहकार्यासाठी त्यांना मोबदलाही देऊ केला जातो. कार्यकर्त्यांच्या संख्याबळावर मोबदल्याची रक्कम ठरते. सुभाषनगर येथील एका गणेशोत्सव मंडळाचे सदस्य रत्नाकर साबळे यांनी सांगितले की, यांच्यापैकी अनेक मंडळे राजकीय पक्षांतर्फे नियंत्रित केली जातात. परंतु त्यांचे कार्यकर्ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. त्यामुळे सर्वाधिक मोबदला देणाऱ्या पक्षाला कार्यकर्ते आपली सेवा देऊ करतात.
मुंबईत सुमारे २५ हजार नोंदणीकृत मंडळे आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात भरपूर मागणी असते. एका सर्वसाधारण मंडळाच्या (२५ कार्यकर्ते) कार्यकर्त्यांकडून एका बूथवर काम करवून घेण्यासाठी तब्बल एक लाख रुपये मोबदला देण्याची राजकीय पक्षांची तयारी असते. एका बूथवर साधारण एक हजार मतदारांचा समावेश असतो. एका लोकसभा मतदारसंघात साधारण एक हजार पोलिंग बूथ असतात.
आर्थिक मोबदल्याप्रमाणेच त्यांना खाणे, पिणेही दिले जाते. परळमधील तिरंगा मित्रमंडळाचे सदस्य असोक दावडे यांनी सांगितले की, एखाद्या उमेदवाराची प्रत्येक घरोघरी ओळख करून देण्यासाठी राजकीय पक्षांना या यंग ब्रिगेडची गरज भासते.