Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नोकरानेच केला घात
एकेकाळी उच्च न्यायालयात वकिली करणारे चरणसिंग कुंदनानी (७९) हे वृद्धापकाळामुळे अंथरुणाला खिळले होते. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने ते हतबल झाले होते. त्यांची काळजी घेण्याची ताकद वयोवृद्ध पत्नी कमळा (६९) हिच्यात नव्हती. तीही आजारी असल्याने अमितकुमार या १७ वर्षांंच्या अल्पवयीन मुलाला त्यांची काळजी घेण्यासाठी नियुक्त करण्यात

 

आले होते.
इमारतीच्याच पहारेकऱ्याने कुंदनानी दाम्पत्याला अमितला या कामासाठी दिले होते. त्यामुळे या दाम्पत्याकडे त्याचे छायाचित्र वा अन्य कुठलाही तपशील नव्हता. अल्पवयीन अमितवर हळूहळू त्यांचा विश्वासही बसला. तोही कुंदनानी दाम्पत्याच्या सेवेत गुंतला होता. मात्र २६ फेब्रुवारी २००८ चा दिवस उजाडला आणि सकाळीच अंधेरी पोलिसांना दूरध्वनीवरून खबर मिळाली की, कुंदनानी दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तात्काळ घटनास्थळी पोहोचले तेव्हा दाम्पत्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. कुंदनानी यांच्या मागे कुणीही नसल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला याची कल्पना येत नव्हती. मात्र कुंदनानी यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, कमला यांच्या हातात असलेल्या बांगडय़ा चोरीला गेल्या होत्या. चरण यांचा मृतदेह बेडरुममध्ये, तर कमळा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळून आला. मॉलिशचे काम करणारा अमितकुमार फरार झाल्याने त्याच्यावरच पोलिसांचा संशय होता. ज्या पद्धतीने दाम्पत्याला ठार मारण्यात आले त्यानुसार हे दोन-तीन व्यक्तींचे काम असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला होता.
अमितचा शोध लागला तर या हत्येची उकल सहज होणार होती. पंरतु त्याचे छायाचित्र व कुठलाही तपशील पोलिसांकडे नव्हता. इमारतीच्या पहारेकऱ्याकडून अमितविषयी माहिती घेण्यात आली. एस. एस. सिक्युरिटी एजन्सीकडे अमितचे छायाचित्र व त्याचा रेल्वे क्वाटर्स, फत्तेहपूर सिक्री इतकाच पत्ता आढळला. त्यानुसार अंधेरी पोलिसांचे पथक कानपूर येथे रवाना झाले. दोन-तीन दिवस पाळत ठेवल्यावर अमित त्यांना सापडला. पोलिसांना पाहताच त्याने कुंदनानी दाम्पत्याच्या हत्येची कबुली दिली. सुधीर ऊर्फ गोलू नरेश वाल्मिकी (२६) व सिकंदर धनीराम वाल्मिकी (२२) या दोघांच्या मदतीने हत्याकांड घडवून आणल्याचे त्याने सांगितले.सुधीर आणि सिकंदर हे दोघे मुंबईतच पहारेकऱ्याचे काम करायचे. अमित त्यांना रोज भेटायचा. त्याने आपण वयोवृद्ध दाम्पत्याकडे काम करीत असल्याचे सांगितल्यानंतर तिघांनी दाम्पत्याला लुटण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी अमित या दाम्पत्याकडे गेला. तेव्हाच त्याने या दोघांना बोलावून घेतले. या दाम्पत्याला फक्त लुटण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु कमळा आरडाओरड करू लागल्याने सुरुवातीला त्यांची स्वयंपाकघरातच गळा दाबून हत्या केली. कुठलाही दुवा मागे राहू नये यासाठी अंथरुणाला खिळलेल्या चरण यांची हत्या केली. त्यानंतर ते कपाटाच्या चाव्या शोधत होते. परंतु कपाटाच्या चाव्या त्यांना मिळाल्या नाहीत. आपण पकडले जाऊ या भीतीने कमळा यांच्या हातातील बांगडय़ा काढून घेऊन ते थेट गावी पळून गेले. या बांगडय़ा कानपुरातच एका सोनाऱ्याला त्यांनी विकल्या आणि आलेले पैसे वाटून घेतले. त्यांना कपाटाच्या चाव्या मिळाल्या असत्या तर मात्र ४० किलो सोन्याचे घबाड हाती लागले असते. परंतु केवळ २० हजार रुपयांसाठी वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या करताना त्यांचे हात थरथरलेही नाहीत. आजही त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा अजिबात लवलेश दिसून येत नाही, असे सूर्यवंशी सांगत होते.
nishant.sarvankar@expressindia.com