Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पालिका शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सहा वर्षे गणवेशच नाही
संदीप आचार्य

महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याच्या लंब्याचवडय़ा बाता गेल्या अनेक

 

वर्षांमधील प्रत्येक महापालिका आयुक्तांनी मारल्या आहेत. त्याचप्रमाणे सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपनेही शाळांमधील गळती रोखण्यापासून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी चांगले उपक्रम राबविण्याच्या अनेक गप्पा मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात मराठी शाळा बंद पडणे, विद्यार्थ्यांची गळती आणि खालावणारा शिक्षणाचा दर्जा या चिंतेच्या बाबी बनल्या आहेत. हे सारे कमी ठरावे म्हणून की काय गेली सहा वर्षे शिक्षण विभागातील हमाल, शिपाई व माळी-रखवालदार यांना साधा गणवेशही देण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
महापालिकेला कर रुपने कोटय़वधी रुपये देणाऱ्या नागरिकांनी पालिकेचा कायदा कठोरपणे पाळावा अशी अपेक्षा करणाऱ्या प्रशासनातील उच्चपदस्थांकडून पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांंची सेवा करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या किमान सोयी-सुवधिांबाबतची अनास्था कमालीची चीड आणणारी म्हणावी लागेल. गणवेश नाही, अनेक विभागातील कामगारांना छत्र्या देण्याचे निश्चित करुनही त्याचा पुरवठा नाही, केरसुणी, खराटा, फिनेल आदी स्वच्छते साठीच्या गोष्टीही वेळेवर व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. हमालांना साबण व टॉवेल वेळेवर पुरविण्यात हेळसांड अशा अनेक रामकहाण्या या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळतात.
मुंबई महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हिंदी भाषिक व मराठी भाषिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सारखी झाली आहे. याचाच अर्थ मराठी शाळांमधील विद्यार्थी राखण्यात पालिकेला अपयश येत चालले आहे. पालिका शाळांमधील शिक्षकांना शिक्षणाशिवाय निवडणुकीसह अन्य कामे मठय़ा प्रमाणात देण्यात येत असल्यामुळे त्याचा परिणाम शिकविण्यावर निश्चितपणे होत असतो. याविरोधात शिक्षकांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी आवाजही उठवला आहे. हे सारे कमी ठरावे आणि शिक्षण खात्याचा कारभार चालविणाऱ्या उच्चपदस्थांबाबत घृणा निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आक्षेप म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस मोहन कांदळगावकर यांनी घेतला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये एकूण २६६७ चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. यात हमाल, माळी, शिपाई आदींचा समावेश असून या मंडळींना गेल्या सहा वर्षांपासून पालिका प्रशासनाने गणवेशच पुरवलेला नाही. पालिकेच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी कर्मचाऱ्यांना दोन जोडय़ा गणवेश, तसेच शिलाई व धुलाई भत्ता देणे आवश्यक आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना जेथे गणवेशाचे कापडच दिले नाही तेथे धुलाईभत्ता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
‘एमएमयु’ने याबाबत अनेक गंभी आक्षेप घेतले असून घेतले असून त्याची सोडवणूक करण्यासाठी येत्या १६ एप्रिलरोजी प्रशासनाबरोबर एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना सहा वर्षे गेणवेश नाही, ही गंभीर बाब असून पदोन्नती, कामाच्या वेळा अशा अनेक मागण्यांवर निर्णय घेण्यास प्रदीर्घ काळापासून प्रशासनातील उच्चपदस्थांना वेळ का मिळाला नाही, हे एक गौडबंगाल म्हणावे लागेल.