Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कृष्णा कल्ले
गायिका कृष्णा कल्ले यांनी मराठीत जी काही भावगीते गायिली त्यामध्ये ‘परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?’, ‘मन पिसाट माझे भुलले रे’, ‘कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा’, ‘तू अबोल होऊनी जवळी मजला घ्यावे’, ‘मीरेचे कंकण’ आणि ‘रामप्रहरी रामगाथा’ ही गाणी सर्वाधिक गाजली. त्यातही ‘परिकथेतील राजकुमारा’ या गाण्याने तर एकेकाळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. ‘स्वप्नातल्या कळ्यानो’ या गाण्यानंतर संगीतकार अनिल मोहिले यांना याच गीताने ओळख मिळवून दिली. बाकी ‘मन पिसाट माझे’ व ‘कुणी काही म्हणा’ ही गाणी यशवंत

 

देवांची तर ‘मीरेचे कंकण’ व ‘रामप्रहरी रामगाथा’ ही श्रीनिवास खळे यांची आहेत. मुळाच या गायिकेला अनिल मोहिले, यशवंत देव, खळे यांच्याशिवाय राम कदम, विठ्ठल शिंदे असे मोजकेच संगीतकार मिळाले. तिच्या गाण्यांची संख्याही त्यामुळे मोजकीच राहिली. या सीडीत कल्ले यांच्या जवळपास सर्व गाणी घेण्यात आली आहे. त्यामुळे ‘भाव दाटले मनी अनामिक, साद तयाला देशील का’ या ‘परिकथेतील राजकुमारा’ या वंदना विटणकर यांच्या काव्यातील शब्द इथे तंतोतंत जुळतात. ‘मन पिसाट माझे’खेरीज ‘चंद्र अर्धा राहिला’ आणि ‘तुझ्याचसाठी कितीदा’ ही गाणी त्यांना देवांनी दिली होती. तीही या सीडीत समाविष्ट आहेत. त्याखेरीज विठ्ठल शिंदे यांची ‘अशा या चांदराती’ आणि ‘कशी रे आता जाऊ’ ही दोन सुंदर गाणी आहेत. ‘कुंजात विहरतो सुगंध शिंपित वारा’ या संगीतकार वीरधवल करंगुटकर यांच्या गाण्याचा खास उल्लेख करावाच लागतो. कारण हे गाणे आता ऐकायला मिळत नाही. त्याशिवाय राम कदम यांची जी गाणी आहेत ती भावगीतांपेक्षा चित्रपटातील आहेत. ‘हेच तुझे घर’ आणि पुष्पा पागधरे यांच्या सोबतीने त्याने गायलेले ‘मेहरबाँ रात है’ ही त्यातील दोन गाणी विशेष उल्लेखनीय. एकूण २० गाणी संकलित करून कृष्णा कल्ले यांच्या कारकीर्दीचा आढावा एचएमव्हीने घेतला आहे. ही सीडी जरूर ऐकण्याजोगी झाली आहे. सुषमा श्रेष्ठ
संगीतकार श्रीनिवास खळे यांनी जशी उत्तमोत्तम भाव तसेच भक्तीगीते मराठीत दिली तशीच उत्तम बालगीतेही दिली. ही त्यांची कामगिरी इतर संगीतकारांच्या तुलनेत नि:संशय श्रेष्ठ आहे. त्यामध्ये आपली मुलगी शमा खळे यांच्याप्रमाणे अनेक गाणी त्यांनी त्यावेळच्या बालकलाकार सुषमा श्रेष्ठ यांच्याकडून गाऊन घेतली. ‘विहिणबाई विहिणबाई उठा आता उठा’, ‘पाऊस आला, आला वारा’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ ही सर्व खळेंची गाणी घराघरांत पोहोचली. ‘आई बघ ना कसा हा दादा’, ‘टप टप टाकित टापा चाले माझा घोडा’ ही दोन बालगीते संगीतकार सी. रामचंद्र यांची आहेत. ‘तुझा बाहुला नवरा’, ‘असते परीच राणी’, ‘स्वप्नातील एक परी ही’ त्यांची अन्य गाणीही चांगली आहेत. ‘या बकुळीच्या झाडाखाली’ हे सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेले भावगीतही लोकप्रिय झाले होते. ही सीडीही तशी ऐकण्याजोगी झाली आहे.
सी. रामचंद्र
संगीतकार व गायक सी. रामचंद्र यांनी गायलेली एकूण २२ गाणी या सीडीमध्ये संकलित झाली आहेत. ‘प्रभू तुझ्या दारी आलो’, ‘पळभर थांब जरा रे विठू’, ‘या सुग्रीवासी सांग’ आणि ‘जाहले आश्रम रिते रिते’ ही त्यांनी गायलेली चार गाणी संगीतकार नीळकंठ अभ्यंकर यांची आहेत. ‘किती वाणू तुला मी भगवंता’ हे मात्र स्वत: अण्णांचे आहे. ‘बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला’ हे त्यांचे गाणे बाळगोपाळांमध्ये चांगले लोकप्रिय आहे. त्याशिवाय ‘पाचोळे आम्ही हो पाचोळे’सुध्दा तसे लोकांच्या लक्षात आहे. बाकी त्यांची इतर गाणी आहेत, पण ती आता विस्मृतीत गेली आहेत. अण्णांची मराठीतील कामगिरी तशी तेवढी लक्षणीय नाही ती याचमुळे. अर्थात या सीडीमध्ये ते मराठीत जे गाऊन गेले ते सर्व संकलित झाले आहे. अन हेही नसे थोडके, असे म्हणावे लागेल.
satpat2007@rediffmail.com