Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कलावंतांसंगे जाऊया ‘पिकनिक’ला
मराठी सिनेमा सध्या फॉर्मात आहे. नव्या धाटणीचे, नव्या पद्धतीने गोष्ट सांगणारे, तद्दन गल्लाभरू, कौटुंबिक, ग्रामीण बाजाचे असे विविध प्रकारचे मराठी चित्रपट येऊ लागले आहेत. एकीकडे मराठी सिनेमाची घोडदौड जोरात सुरू असताना मराठी वाहिन्याही एकमेकांशी तीव्र स्पर्धा करीत टीआरपी सतत वाढता ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे दररोज नवं काहीतरी देऊन टीव्ही दर्शकांना टक लावून टीव्ही पाहण्यासाठी

 

खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत. मी मराठी वाहिनी नव्याने सुरू झाल्यानंतर एकमागून एक असे ११ नवे कार्यक्रम सुरू केले. आता त्यात आणखी एका नव्या फॉरमॅटच्या कार्यक्रमाची भर घातली आहे. कलावंतांच्या सान्निध्यात पिकनिक काढून गमतीजमती करीत रसिकांशी संवाद साधण्याचा ‘पिकनिक रंगे ताऱ्या संगे’ कार्यक्रम सुरू केला आहे. अभिनेत्री मेघना एरंडे या कार्यक्रमाचे निवेदन करीत असून टीव्ही, नाटक, सिनेमा अशा सर्व माध्यमांतून झळकणारे कलावंतांसोबत दर शुक्रवारी रात्री प्राइम टाइम स्लॉटमध्ये ती धमाल करणार आहे. ‘नायक’ या मालिकेद्वारे ‘माझ्या आयुष्याचा ‘हिरो’ व्हायचंय मला’ हे शीर्षकगीत पुढे ‘ऊनपाऊस’ मालिकेद्वारे खरे करून दाखविणारा अनिकेत विश्वासराव पहिल्या भागात ‘पिकनिक..’ एन्जॉय करून गेला. अतुल परचुरे, वंदना गुप्ते, भरत दाभोळकर, सुनील बर्वे, सचिन खेडेकर आदी अनेक कलावंत ‘पिकनिक..’मध्ये दिसणार आहेत.
‘लाडली वीक सेलिब्रेशन’
रिअॅलिटी शोचे वेगवेगळे प्रकार सादर करून दर्शकांचा सहभाग वाढवून टीआरपीचा आलेख उंचावण्यासाठी नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या लढविण्यात विविध वाहिन्या प्रयत्न करतात. जनरल एण्टरटेन्मेंट देणाऱ्या हिंदी वाहिन्यांमध्ये याबद्दल अधिक चुरस आहे. मात्र त्याबरोबरच थोडसे वेगळे पण चांगले देण्याचा प्रयत्न स्टार प्लसने केला आहे असे म्हणता येईल. या वाहिनीवरील ‘सबकी लाडली बेबो’ या मालिकेमार्फत अभिनव मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. याअंतर्गत प्रोजेक्ट नन्ही कली या के. सी. महिद्र ट्रस्टच्या एनजीओमधील मुलींना मालिकेतील बेबो ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी शिवशक्ती आणि तिचे मालिकेतील वडील व प्रसिद्ध अभिनेते कंवलजीत भेटून त्यांच्याशी गप्पाटप्पा करतील. १७ एप्रिलपर्यंत ‘लाडली वीक सेलिब्रेशन’ केले जाणार आहे. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ अशा पद्धतीचे हे सेलिब्रेशन आहे. एनजीओमधील गरीब-गरजू मुलींच्या शिक्षणासाठी स्टार प्लस मदत करणार आहे. दर्शकांनाही यात सहभागी करून घेण्यासाठी १७ एप्रिलपर्यंत प्रोजक्ट लाडलसाठी एसएमएस मोहीम केली जात आहे. सवरेत्कृष्ट एसएमएस पाठविणाऱ्या विजेत्याच्या मुलीला ‘सबकी लाडली बेबो’ या कार्यक्रमात काम करण्याची संधी हेच या मोहीमेचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण आजही आपल्या देशात प्रचंड आहे. त्यामुळे या मोहिमेद्वारे मुलींना जन्म देणे, त्यांना शिक्षण देणे आणि त्यातून आनंद मिळवणे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश यामागे आहे. त्यायोगे स्त्रीभ्रूणहत्येविरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा स्तुत्य प्रयत्न स्टार प्लस करीत आहे.
टाटा स्कायवर ‘आ देखे जरा’
सॅटेलाइट टेलिव्हीजन सव्र्हिस देणाऱ्या टाटा स्कायमार्फत नील नीतीन मुकेश अभिनीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘आ देखे जरा’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. डीटीएच सेवेंतर्गत ८ मेपर्यंत शुल्क भरून हा सिनेमा टाटा स्काय सेवाधारकांना पाहायला मिळणार आहे.
दिल मिल गयेमध्ये जेनिफर विंगेट
सुरुवातीला नच बलिये, विनोदवीरांचे असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर करणाऱ्या स्टार वन वाहिनीनेही आता फॅमिली एण्टरटेन्मेंट चॅनल हे बिरूद मिळविण्यासाठी दैनंदिन मालिका सुरू केल्या. दर सोमवार ते गुरुवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेतील डॉ. रिद्धिमा ही व्यक्तिरेखा आतापर्यंत सादर करणारी सुकृती खंडपाल आता मालिकेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता तिची ही प्रमुख व्यक्तिरेखा जेनिफर विंगेट सादर करणार आहे. सुरुवातीला राजा को रानी से प्यार हो गया आणि कुछ ना कहो या चित्रपटांतून पदार्पण केल्यानंतर कोई दिल में है, शाका लाका बूम बूम, कुसूम, कार्तिका, कहीं तो होगा, कसौटी जिंदगी की यांसारख्या ‘क’ची बाधा झालेल्या मालिकांमधून विविध भूमिका जेनिफरने केल्या आहेत. त्यामुळेच टीव्ही दर्शकांना तिचा चेहरा चांगलाच ओळखीचा आहे. म्हणूनच बहुधा डॉ. रिद्धिमा या व्यक्तिरेखेसाठी तिला पाचारण करण्यात आले असावे.
हा. का. ब. न.
येत्या शुक्रवारपासून झी मराठीवर हा. का. ब. न. म्हणजेच ‘हा कार्यक्रम बघू नका’ सुरू होत आहे. प्रसाद बर्वे प्रमुख सूत्रधार असून दैनंदिन मालिकांचा रतीब किंवा रिअॅलिटी डान्स शो पाहून कंटाळा आलेल्या प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम आहे असा दावा झी मराठीने केला आहे. फूल टाइमपास असे याचे स्वरूप असेल. सहज फेरफटका मारताना कुणाला तरी चिडवणे, कुणाची तर टर उडविणे व त्यातून निखळ हसविणे ही या कार्यक्रमाची थीम आहे. रात्री १० वाजता हा कार्यक्रम पाहता येणार असला तरी ‘हा कार्यक्रम बघायचा की नाही’ हे प्रेक्षकांनी ठरवावे.