Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

विखेसमर्थकांचा ‘सोयी’नुसार पाठिंबा!
‘नगर’मधील भूमिकेबाबत उद्या अंतिम निर्णय
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी
काँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख खासदार बाळासाहेब विखे यांनी नगर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात संकेत दिले असले, तरी इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंब्याची भूमिका अजूनही संदिग्ध मानली जाते. मात्र, त्यांच्या समर्थकांनी आता स्थानिक परिस्थिती, राजकीय सोय-गैरसोय लक्षात घेऊन भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, खासदार विखे बुधवारी (दि. १५) आपली नगर मतदारसंघातील भूमिका समर्थकांना कळवतील, असे समजले.

भ्रष्ट आघाडी सरकारने राज्याला आर्थिक खाईत लोटले - कदम
राहाता, १३ एप्रिल/वार्ताहर

आघाडी सरकारने १ लाख ६० हजार कोटींचे कर्ज करून राज्याला आर्थिक खाईत लोटले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पॅकेजमध्ये सरकारने मोठा गैरव्यवहार केला. वक्फ बोर्डाच्या जमिनीत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार सरकारने केला, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला. लोकसभेच्या निवडणुकीत भ्रष्ट आघाडी सरकारच्या उमेदवारांना गाडून टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रात्रं-दिन आम्हां निवडणुकीचा प्रसंग..
मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी
राजकारण्यांच्या अंगात जशी दिवस-रात्र लोकसभा निवडणूक शिरली आहे, तशीच ती जिल्ह्य़ातील सुमारे २४ ते २५ हजार कर्मचाऱ्यांच्याही अंगात संचारली आहे. सुटीच्या दिवशीही सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत हे सर्व कर्मचारी निवडणुकीची तयारी करण्यात गुंतले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वाचा यात समावेश आहे.

मार्जारकुल
पर्यावरणाचा झपाटय़ाने होणारा ऱ्हास व कमी होणारी वसतिस्थाने यामुळे बिबळे आपला नित्याचा अधिवास सोडून मनुष्यवस्तीत मुक्तपणे संचार करताना दिसू लागले आहेत. बिबळ्या शहरात सापडल्याच्या बातम्याही वाचावयास मिळतात. बिबळे मुख्यत्वे करून छोटी जनावरे व कुत्र्यांची शिकार करतात. क्वचित प्रसंगी माणसावर हल्ला केल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र, बिबळे सवंग नरभक्षक बनल्याचे ऐकिवात नाही. बिबळे दिसण्यास वाघासारखेच असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यालाच वाघ समजून तशी अफवाही पसरते. बिबळ्या मार्जार गटातील वन्यप्राणी आहे.

‘सत्तासंघर्षांचा वाद मिटवून कर्डिलेंच्या प्रचारात सहभागी व्हा’
दादापाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश
नगर, १३ एप्रिल/वार्ताहर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आपण शिवाजी कर्डिले यांना निवडून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे सर्वानी यापूर्वीच्या सत्तासंघर्षांचा वाद मिटवून कर्डिले यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा आदेशच आज माजी खासदार दादापाटील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कामे ठप्प.. प्रचार चालू!
लोकसभा निवडणुकीशी महापालिकेचा काहीही संबंध नाही. मात्र, तरीही या निवडणुकीमुळे संपूर्ण मनपा ठप्प झाली आहे. राजकीय गुंत्यामुळे अगोदरच स्थायीसारख्या महत्त्वाच्या समितीसह इतर कोणत्याही पदाचे अस्तित्वच नाही. निवडून आलेल्या नगरसेवकांची गेल्या ४ महिन्यांत फक्त एक सर्वसाधारण सभा झाली. तीसुद्धा जकातीचा ठेका निश्चित करण्याच्या विषयावर, मात्र त्याचाही उपयोग झालेला नाही. महिन्यातून किमान एक सर्वसाधारण सभा व्हावी, हा नियम आहे तोच मुळी या सभेत शहरातील नागरिकांच्या समस्यांवर चर्चा होऊन त्या सोडविण्याविषयी उपाय निश्चित केले जावेत या हेतूने.

आठवलेंना निर्णायक आघाडीची अपेक्षा
राहाता तालुका विखे पिता-पुत्रांचा बालेकिल्ला! त्यांची ताकद काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे तालुक्यातून आठवलेंना किती मताधिक्य मिळणार, याचीच सध्या उत्सुकता आहे. शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांची मदार नकारात्मक मतांवर आहे. काँग्रेसचे बंडखोर प्रेमानंद रूपवते यांचाही फारसा फरक जाणवणार नाही, असे सध्या चित्र आहे. शिर्डीत मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ लांबत चालल्याने विखेसमर्थकांमध्ये अस्वस्थता होती.

कर्डिले, गांधी व राजळेंचेही ‘पॉकेट’!
लोकसभेच्या चौरंगी लढतीने तालुक्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांची बंडखोरी राष्ट्रवादीची डोकेदुखी बनली आहे. खासदार बाळासाहेब विखे यांचे मौन हाही कळीचा मुद्दा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची मदार आमदार नरेंद्र घुले व राज्य साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यावरच आहे. कर्डिलेंना निर्णायक आघाडी मिळवून देण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली आहे.

केला जरी पोत बळेची खाली..
केला जरी पोत बळेची खाली..
केला जरी पोत बळेची खाली
ज्वाळा ती वरती उफाळे..
भाजपचे गोपीनाथ मुंडे हे असे आहेत. पक्षात, विशेषत राज्य संघटनेत त्यांचे जे खच्चीकरण चालले आहे, ते काही लपून राहिलेले नाही. त्यांचे विरोधक जाणीवपूर्वक त्यांना पक्षात व एकूणच राजकारणात कमी महत्त्व मिळेल या पद्धतीने वागताना दिसत आहेत. यात कदाचित ते यशस्वी होतीलही, पण मुंडे यांची धडाडी, बुद्धिमत्ता, समज, संघटन, वक्तृत्व या सगळ्या गुणांचे ते काय करणार? हे गुण ते कसे दाबू शकतील?
दिलीप गांधी यांच्या प्रचारदौऱ्याच्या निमित्ताने राहुरी व पारनेरमध्ये मुंडे यांच्या सभा झाल्या. त्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी पत्रकारांबरोबरही संवाद साधला. त्यात त्यांचे हे सर्व गुण प्रकर्षांने दिसून आले.

आता ‘मिशन मायावती’!
काहीशा उशिरानेच शेठजी गावात पोहोचले. पहिल्याच सभेला उशीर झाल्याने इतरांची भाषणे रद्द करून शेठजींनीच माईकचा ताबा घेतला आणि बोलायला सुरुवात केली..
‘बंधूंनो आणि भगिनींनो जय श्रीराम! ताज कॅरिडॉर प्रकरण जरा आठवा. जगप्रसिद्ध ताजमहालही या बाईंनी सोडला नाही. त्याच्या कॅरिडॉरमध्येही ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्या बाईंना तुम्ही सत्ता देणार का?’ वगैरे, वगैरे.. शेठजींना उमेदवारी मिळाली त्या दिवसापासून सदोबा नगरकर सावलीसारखा त्यांच्याबरोबर होता.

गांधींच्या प्रचारार्थ युतीतर्फे चौकसभा
कर्जत, १३ एप्रिल/वार्ताहर

भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव व भाजपचे तालुकाध्यक्ष शांतिलाल कोपनर यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात ठिकठिकाणी चौकसभा घेतल्या. विजय वहाडणे, कैलास शेवाळे, जि. प. सदस्य राजेंद्र गुंड, अल्लाउद्दीन काझी, स्वप्नील देसाई, रमेश झरकर, बापू चव्हाण, शिवसेनेचे दीपक शहाणे, अशोक खेडकर, नारायण दळवी, अंगद रूपनर, संजय शेटे, गुलाब तनपुरे, बिभीषण गायकवाड, चंद्रकांत घालमे, अमृत लिंगडे, हरिदास केदारे आदी कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले. चिंचोली, टाकळी खंडेश्वरी, रेहेकुरी, वालवड, शिंदे, थेरवडी, बेनवडी, कोळवडी, कुळधरण, कोपर्डी, राक्षसवाडी, बारडगाव, भांबोरे, खेड, आखोणी, कोरेगाव आदी ठिकाणी चौकसभा घेण्यात आल्या.

युद्धात नातं-गोतं विसरावं लागतं - थोरात
खर्डा, १३ एप्रिल/वार्ताहर
रणभूमीवर कोणतंही नातं-गोतं विचारात घेतलं जात नाही. विरोधात लढणाऱ्याला नामोहरम करावेच लागते. राजकारणातही हाच नियम पाळावा लागतो, असे स्पष्ट करून कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे कर्डिले यांच्या प्रचाराची सभा झाली. त्या वेळी श्री. थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, माजी जि. प. सदस्य ज्ञानदेव वाफारे, श्रीगोंदे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सुभाष जायभाय, पं. स. सदस्य विजयसिंह गोलेकर, जातेगावचे सरपंच पोपटराव गायकवाड, सुरेश भोसले, डॉ. गदादे आदी उपस्थित होते. श्री. थोरात म्हणाले की, राजळे भाचे असले, तरी पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार कर्डिले यांच्या विजयासाठीच काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतील. काँग्रेस सरकारने गेल्या पाच वर्षांंत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी हा त्यापैकीच एक निर्णय. केंद्रात पुन्हा काँग्रेस सरकार आणण्यासाठी मतदारांनी कर्डिलेंना निवडून द्यावे.

‘इंडियन मुस्लिम काँग्रेस’चा नौशाद शेख यांना पाठिंबा
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी
नगर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नौशाद अन्सार शेख यांना इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टीने पुरस्कृत केले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष डॉ. शेख उमर लतीफ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
श्रीमती नौशाद या वेळी उपस्थित होत्या. त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर व पालकमंत्री दिलीप वळसे यांच्यावर जोरदार टीका केली. पुढे-पुढे करीत मागे फिरणाऱ्या २-४ पुढाऱ्यांचेच वळसे नेते आहेत. सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांना देणे-घेणे नाही. कळमकर यांच्यामुळे राष्ट्रवादी रसातळाला जात असून, त्यांना तत्काळ पदावरून काढले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
पक्षाने न्याय न दिल्याने आपण अपक्ष उभे आहोत. मात्र, राष्ट्रवादीने निलंबनाचे पत्र दिले नसल्यामुळे मी अद्यापही राष्ट्रवादीतच आहे. मतदारसंघातील महिला, मुस्लिम व ख्रिश्चन समाजाचा आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पाठिंब्यासाठी कसरती
निवडणूक प्रचाराला रंग चढत असताना वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळविण्याच्या कसरतीही वाढल्या आहेत. कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी मेळावा घेत असल्याचे संघटना जाहीर करतात. प्रत्यक्षात मात्र पाठिंबा कुणाला द्यायचा हे आधीच फिक्स झालेले असते. मेळाव्यातील जेवणावळी, कार्यकर्त्यांच्या वाहतूक खर्चासह सर्व नियोजन एका उमेदवाराच्या ‘पीए’कडे आहे. मेळाव्यातील चर्चेवरही त्याचे बारीक लक्ष असते. नगरला रविवारी झालेल्या अशाच एका मेळाव्यात एकाने विरोधी उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी केली; अन्यथा आपल्यासह स्थानिक कार्यकर्ते ‘त्यांचे’ काम करतील, असा बंडाचा झेंडाही त्याने उभारला. सैन्याला रसद आपली अन् सैन्य लढणार शत्रूसाठी म्हटल्यावर ‘पीए’ने संघटनेच्या प्रमुखाकडे नेत्याच्या स्टाईलमध्ये कटाक्ष टाकला. मग काय संघटनेच्या प्रमुख नेत्याने ‘तुम्ही एकटे त्यांना मदत करा, आम्ही संघटना म्हणून मात्र ह्य़ांच्याच पाठीशी राहू’, असे स्पष्ट करून टाकले. संघटनेत फूट पडू नये, तसेच संघटनेची (नसलेली) ताकद दिसू नये, म्हणून केवळ मतदान करायचे, प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा राबवायची नाही, असे मेळाव्यात ठरवून नेत्यांनी मेळावा आटोपता घेतला.

आठवडेबाजार ठरतोय प्रचारासाठी पर्वणी!
कर्जत, १३ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आलाय. तरीही ग्रामीण भागात म्हणावे तसे निवडणुकीचे वातावरण नाही आणि लोकं पूर्वीसारखा उत्साह दाखवत नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी जिल्ह्य़ातील आठवडे बाजारांचा आधार मिळत आहे. आज येथील आठवडे बाजाराचा दिवस होता. जवळजवळ निम्मा तालुका बाजारासाठी कर्जतला येतो. शासकीय कामांसाठीही लोक मोठय़ा संख्येने येतात. याकडे राजकीय पक्षांचं लक्ष गेलं नाही, तरच नवल! हल्ली सभांना, प्रचारफेऱ्यांना लोकांचा फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे आठवडेबाजाराचा वार ठरवूनच प्रचाराचं नियोजन केलं जातंय. प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी येथे आज प्रचाराची राळ उठवून दिली. उमेदवाराचा परिचय, चिन्ह भोंग्याच्या गाडीतून लोकांना सांगितले जात होते. शेरोशायरी, गाणी, पोवाडे यामुळे बाजारकरूंची चांगलीच करमणूक झाली. दोन उमेदवारांच्या प्रचाराच्या गाडय़ा समोरासमोर आल्या की चांगलीच जुगलबंदी रंगत. प्रसंगी एकमेकांवर ते शाब्दिक चिखलफेकही करीत होते.

कालव्यात पोहताना विद्यार्थी वाहून गेला
राहाता, १३ एप्रिल/वार्ताहर

मित्रांसमवेत कालव्यावर पोहण्यास गेलेला महाविद्यालयीन विद्यार्थी कालव्याच्या पाण्यात वाहून गेला. आज दुपारी अडीचच्या सुमारास लोणी शिवारात प्रवरा डाव्या कालव्यावर हा प्रकार घडला. उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. प्रकाश सुरेश पलघडमल (वय २२, राहणार सात्रळ, तालुका राहुरी) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेला प्रकाश सुट्टीमध्ये कोल्हार येथे संगणकाचे प्रशिक्षण घेत होता. मित्र अजीज मणियार, गणेश दोंडे, तसेच चुलतभाऊ विजय आनंद पलघडमल यांच्यासमवेत लोणी येथे तो चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपट सुटल्यानंतर हे सर्व लोणी-पाथरे रस्तयाने सात्रळला चालले होते. प्रवरा डाव्या कालव्यातून सध्या आवर्तन सुरू आहे. उन्हाची काहिली जास्त असल्याने त्यांना कालव्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. प्रकाश पाण्यात वाहून चालल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड केली. परंतु मदतीला कोणीच नव्हते. या मुलांनीच घडलेल्या प्रकाराची लोणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. प्रकाशचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. या सर्वाना पोहण्यास येत नव्हते.

धनादेश न वटल्यानेकर्जदारास ६ महिने कैद
कोपरगाव, १३ एप्रिल/वार्ताहर
कर्जाच्या हप्त्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने न्यायालयाने आरोपी सुशांत काळवाघे याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. काळवाघे याने ज्योती सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्याने पतसंस्थेला धनादेश दिला होता. मात्र, तो न वटल्याने पतसंस्थेने त्याच्याविरुद्ध फौजदारी दाखल केली होती. सुनावणीत गुन्हा सिद्ध झाला.न्यायालयाने त्याला सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली, तसेच ३० दिवसांत पतसंस्थेला ५५ हजार २८५ रुपये नुकसान भरपाई न दिल्यास पुन्हा दोन महिने कैदेची शिक्षा न्यायाधीश एम. बी. सराफ यांनी सुनावली.

मोटारीतील सीडी डेकची चोरी
नगर, १२ एप्रिल/प्रतिनिधी

घरासमोर उभ्या केलेल्या होंडा सिटी मोटारीतून १० हजार रुपये किमतीचा सीडी डेक चोरीस गेला. देवकुमार आसनदास नवलानी (४४ वर्षे, रा. कंवरनगर सोसायटी, तारकपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली.

वीज यंत्रणेतील दुरुस्तीमुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

शहरात आज पाणीपुरवठा झाला नसल्याबद्दल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली. वीज वितरण कंपनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे वीजपुरवठा बंद झाल्याने पाण्याचा उपसा झाला नाही, असे विभागाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सध्या उपसा केंद्रावरील, तसेच पाणी साठवण टाक्यांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय येत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय प्रथम
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेत नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पहिल्या क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे, तर जिल्हा सैनिक कार्यालयास दुसऱ्या क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. प्रशासकीय कामकाजात संगणकाचा वापर करून नवी ‘ई-मित्र प्रणाली’ सुरू करण्यात जिल्हाधिकारी कार्यालय आघाडीवर होते. राज्य सरकारच्या वतीने राज्यस्तरावर ही स्पर्धा घेण्यात येते. त्यासाठी सरकारी कार्यालयांचे तटस्थ समितीमार्फत मूल्यमापन करून सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येतात.

गोरोबा कुंभार दिंडीचे जामखेडहून उद्या प्रस्थान
जामखेड, १३ एप्रिल/वार्ताहर
संत गोरोबा कुंभार पुण्यतिथीनिमित्त जामखेड ते श्रीक्षेत्र तेर (ढोकी, जिल्हा उस्मानाबाद) पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असून, बुधवारी (दि. १५) दिंडीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव राऊत यांनी दिली.पिंपळगावच्या अष्टलिंग संस्थानचे गोविंदस्वामी, पांडुरंगशास्त्री देशमुख, भागवताचार्य नंदकिशोरजीमहाराज पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा काढण्यात येतो. सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता शहरातील श्रीराम मंदिरापासून दिंडी निघेल. राजुरी, खर्डा, पाथरूड, बावी, कुष्णापूर, चिंचोली फाटा, हाडोंग्री, हिवरा, दिंडोरी, तेरखेड, रत्नापूर, येडेश्वरी देवी मंदिर, वडगाव, लातूर रोड, तुगावमार्गे दिंडी श्रीक्षेत्र तेर येथे जाणार आहे. दिंडी सोहळ्यात भाविकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे.

नगर तालुक्याचा कायापालट करू - राजळे
नगर, १३ एप्रिल/वार्ताहर
नगर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांनी केले. तालुक्यातील वाळकी, तसेच इतर गावांच्या भेटीदरम्यानच्या चौकसभेत राजळे बोलत होते. राजळे यांनी सांगितले की, तालुक्यात असलेले दबावाचे राजकारण थांबवण्याची आवश्यकता आहे. आपण उच्चशिक्षित असून, शेतकरी कुटुंबातील आहोत. त्यामुळे मतदारसंघाचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपली साथ हवी. आपले बंडही सर्वसामान्यांसाठीच आहे. माझ्या तरुण वयाचा व शिक्षणाचा मतदारसंघाला उपयोग झाला, तर मतदारसंघाचे भले होईल. त्यामुळे कोणत्याही मोठय़ा पुढाऱ्याचे राजकीय पाठबळ पाठीशी नसताना जनसामान्यांच्या जनशक्तीवर ही निवडणूक आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दूध व शेतीमालाचे भाव वाढून मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत, तसेच प्रलंबित प्रश्नांसाठी आपण सक्रिय राहू, अशी ग्वाही राजळे यांनी दिली.

मनीषा भगतला रौप्यपदक
नगर, १३ एप्रिल/वार्ताहर
मनुष्यबळ व्यवस्थापन या पदव्युत्तर पदविकेमध्ये मनीषा भगत हिने रौप्यपदक पटकाविले. मनीषाने पुणे येथील इंदिरा महाविद्यालयातून या अभ्यासक्रमातील चारही स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तिचा संस्थेच्या अध्यक्ष तारिता मेहंदळे व संचालक चेतन वाकळकर यांच्या हस्ते रौप्यपदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे सचिव डी. आर. भगत यांची ती कन्या आहे.

लाल निशाण पक्षाचा शिरसाठ यांना पाठिंबा
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी
राहुरी येथील लाल निशाण (लेनिनवादी) पक्षाने नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार का. वा. शिरसाठ यांना पाठिंबा जाहीर केला.शिरसाठ यांच्या राहुरी दौऱ्यात लाल निशाण गटाचे भि. र. बावके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निधी म्हणून ११ हजारांचा धनादेश बावके यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्याकडे सुपूर्द केला. शिरसाठ यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येऊन त्यांना जास्तीत जास्त मतदान घडवून आणा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस बाळासाहेब सुरुडे, राजेंद्र बावके, शरद संसारे, जीवन सुरुडे, गोवर्धन घोलप आदी उपस्थित होते.

हिंदू एकता आंदोलनाचा कर्डिले यांना पाठिंबा
पाथर्डी, १३ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा निवडणुकीसाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन शितोळे यांनी दिली. राष्ट्रवादी हा शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा देणारा पक्ष आहे. शरद पवार पंतप्रधान व्हावेत, अशी आमच्या पक्षाची अपेक्षा असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. मागील निवडणुकीत आमच्या पक्षाने सेना-भाजप युतीला पाठिंबा दिला होता. मात्र, धर्माच्या नावावर जाहीरनामा काढायचा अन् सत्ता आली की जाहीरनामा गुंडाळून ठेवण्याचे काम त्यांनी केले. यापूर्वी नगरमध्ये युतीचे खासदार असताना त्यांनी कोणताही विकास केला नाही. कर्डिलेंना निवडून देण्यासाठी जिल्ह्य़ातील पक्षाचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करतील.

आंबेडकर जयंतीनिमित्त कोल्हारला आज विविध कार्यक्रम
कोल्हार, १३ एप्रिल/वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि. १४) रोजी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार विकास अंत्रे व पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. शंकरराव दिघे यांच्या व्याख्यान होईल. संस्थेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य संभाजी देवकर अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य एस. एस. पंडित यांनी केले.

‘‘तक्षशीला’त शिक्षणात रुची निर्माण होईल यासाठी प्रोत्साहन’
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

तक्षशीला स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची निर्माण होईल, या दृष्टीने प्रोत्साहन दिले जाते. तसेच बौद्धिक गोष्टींबरोबर कला, क्रीडा विषयाची पारख केली जाते, असे प्रतिपादन पुणे येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीलम चक्रवर्ती यांनी केले. तक्षशीला स्कूल एज्युकेशन सोसायटीअंतर्गत शिक्षक-पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक विषयाची माहिती विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विविध प्रकारची चित्रे बनवली जातात. यावेळी शिक्षक व पालकांची चर्चा झाली. ‘तक्षशीला गान’ने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्राचार्या रश्मी सिंह, संजय कुमार, कर्नल सुधीर सिन्हा यांनी चर्चेत भाग घेतला.

राहुरी तालुक्यात कर्डिलेंचा प्रचारदौरा
नगर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या राहुरी तालुक्यातील प्रचार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामदैवत खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर दौऱ्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, सुरेश वाबळे, भगवान कोळसे, सखाहारी लांबे आदी अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.