Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

आज प्रचाराचा अखेरचा दिवस
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरवडय़ापासून सुरू असलेला प्रचार उद्या, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. विदर्भाच्या सर्व दहाही जागांसाठी येत्या गुरुवारी मतदान होणार असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. विदर्भात तब्बल १९४ उमेदवार मैदानात आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज या प्रमुख पक्षांसह इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराने वातावरण बदलले. ३० मार्चला अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून हा प्रचार सुरू झाला. कार्यकर्त्यांना रसद पोहोचवणे सुरू झाले. प्रचार साहित्य व वाहने जमवण्यात आली. यानंतर प्रचार जोमात सुरू झाला.

आज आंबेडकर जयंती नेत्यांच्या ‘दंडवता’ला प्रचाराचा आयाम!
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या आधी आंबेडकर जयंती आल्याने निर्णायक ठरणारा दलित मतदार ‘कॅश’ करण्यासाठी नेत्यांची मान दीक्षाभूमीवर आणि आंबेडकरांच्या पुतळ्यांपुढे झुकणार आहे. आंबेडकर जयंतीचा योग नेत्यांच्या ‘दंडवता’ला प्रचाराचा वेगळा असा आयाम देणारा ठरणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत दलित मतांना आलेल्या महत्वाच्या पाश्र्वभूमीवर उद्या प्रचाराची सांगता होणार आहे आणि आंबेडकर जयंतीचे पर्वही याच दिवशी आल्याने दलित मतांवर डोळा ठेऊन सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आंबेडकर जयंती ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

‘पोल मॅनेजर्स’ लागले कामाला!
नागपूर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचाराचा धडाका उद्या सायंकाळी संपल्यानंतरचे मतदानापूर्वीचे महत्वाचे दोन दिवस ‘मतदान व्यवस्थापना’चे राहणार असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे ‘पोल मॅनेजर्स’ कामाला लागले आहेत. विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, रिपाइँ या प्रमुख पक्षांसह इतरहीकाही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. आचारसंहिता, निवडणूक निरीक्षकांची नजर या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी गेल्या १५ दिवसात प्रचार यंत्रणा राबविली.

उष्मा पूर्वपदावर
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

मध्यंतरीचे ढगाळ वातावरण व पावसाच्या शिडकाव्यामुळे चाळीशीच्या आत उतरलेला पारा पुन्हा भडकला असून चटके देणारे उन्हं पूर्वपदावर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले नेते व कार्यकर्त्यांची उन्हाच्या चटक्यांमुळे दमछाक होत आहे. नागपुरात आज सर्वाधिक ४३ अंश तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारीपासून चटके देणाऱ्या उन्हाने मार्च महिन्यात चाळीशी गाठून लोकांना घाम फोडला.

उद्धव ठाकरेंचे काँग्रेसवर टीकास्त्र
नरखेड, १३ एप्रिल / वार्ताहर

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका वढेरा यांच्या वयाची तुलना विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाबाळांशी करावी, असा टोला सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे लगावला. रामटेक लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कृणाल तुमाने यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, संपर्क प्रमुख विनायक राऊत, आमदार अशोक मानकर, खासदार प्रकाश जाधव, किशोर कुमेरिया, रमेश कोरडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, काँग्रेसची लक्तरे कितीही वेशीवर टांगली, तरी ते फिरणारच.

चंकी पांडे, भाग्यश्रीचा कळमेश्वरात ‘रोड शो’
कळमेश्वर, १३ एप्रिल / वार्ताहर

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्या प्रचारासाठी १३ एप्रिलला सिनेस्टार चंकी पांडे-भाग्यश्री यांचा ‘रोड शो’ झाला. सकाळी ११.३० वाजता काँग्रेस प्रचार कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यावर शहर अध्यक्ष पुंडलिक धार्मिक, नगरसेवक सिद्धार्थ बागडे, पांडुरंग कामडी, जिल्हा महासचिव सरजू मंडपे, राजेश देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर चंकी पांडे-भाग्यश्री यांनी खुल्या जीपमध्ये उभे राहून ढोल-ताशाच्या निनादात जनतेला हात उंचावून अभिवादन केले. शहराच्या प्रमुख मार्गाने प्रचार मिरवणूक निघून समारोप ब्राह्मणी फाटय़ावर झाला. त्यांच्यासोबत चंदनसिंग रोटलेंसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होते.

३५ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती रक्कमेचे वाटप
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३१ मार्चला सेवानिवृत्त झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक शरदचंद्र जेठी यांच्या अध्यक्षतेखाली २ कोटी, ५९ लाख ६३ हजार १५१ रुपयांची सेवानिवृत्त रकमेचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, सेवा प्रमाणपत्र, आरोग्य पुस्तिका तसेच विभागाच्यावतीने प्रकाशित मार्गदर्शिका देण्यात आली. तसेच, रजत सेवा पदक देऊन कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. जीवनातील अपूर्ण राहिलेली स्वप्ने या सेवानिवृत्तीच्या रकमेतून पूर्ण करावी, असे प्रतिपादन शरदचंद्र जेठी यांनी केले. भविष्यात कोणतीही अडचण भासली तरीही, या विभागाचे दरवाजे कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच खुले राहतील, असेही जेठी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ विभागीय अधिकारी सुर्यप्रकाश यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अल्का मेहरा, शाखा अधिकारी एच.पी. नायक, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक कांबळे, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता राऊत आदी अधिकारी उपस्थित होते.

आंतरशालेय निबंध स्पध्रेचे आज बक्षीस वितरण
रांगोळी स्पध्रेत रवींद्र क्षीरसागर प्रथम
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

माधव नेत्रपेढीतर्फे नेत्रदान पंधरवाडय़ानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय निबंध स्पध्रेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या, १४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या स्पध्रेत नवयुवक विद्यालयाचा निखिल चौधरी प्रथम, भिडे कन्या शाळेची विद्यार्थिनी मानसी रडके द्वितीय तर, टाटा पारसी गर्ल्स हायस्कूलची अल्फीया बारामतीवाला आणि भिडे कन्या शाळेची श्रद्धा हेडाऊ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सोमलवार शाळेची सायली पिंपळखुटे, गौरी पतकी, शुभंकर रॉय, भिडे कन्या शाळेची पल्लवी गलबले, प्रोव्हिडन्स गर्ल्स हायस्कूलची स्वाइमिता अहमद, पं. बच्छराज व्यास हायस्कूलचा वैभव बोरकर, मधुरा रंभाड, टाटा पारसी गर्ल्स हायस्कूलची राशी जिभकाटे, चित्रलेखादेवी भोसले हायस्कूलचा सौरभ बुधबावरे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले. या स्पध्रेतील फिरता चषक भिडे कन्या शाळेला देण्यात येणार आहे. नेत्रदान पंधरवाडय़ानिमित्त आयोजित रांगोळी स्पध्रेत रवींद्र क्षिरसागर प्रथम, शिवानी धकाते द्वितीय, विभा सदावर्ते तृतीय आणि नीता क्षिरसागर उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले.

अ‍ॅड. नंदा पराते यांच्यासह तेरा कार्यकर्त्यांना अटक व सुटका
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या अ‍ॅड. नंदा पराते यांच्यासह ‘आदिम संविधान संरक्षण समिती’च्या तेरा कार्यकर्त्यांना तहसील पोलिसांनी अटक केली.
अ‍ॅड. नंदा चंद्रभान पराते यांच्या नेतृत्वाखाली काही महिला-पुरुष रविवारी दुपारी गोळीबार चौकात एकत्र आले. काही पारंपरिक वेषात होते. काही महिलांच्या कडेवर लहान मूल होते. काहींच्या गळ्यात ‘बहिष्कार’ असे लिहिलेले फलक होते. जात प्रमाणपत्र आणि हलबांवर होणाऱ्या अत्याचारामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचे आवाहन हे कार्यकर्ते करीत होते. हे समजताच तहसील पोलीस तेथे पोहोचले. मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नंदा पराते व इतर बारा अशा एकूण तेरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली.

शुक्रवारपासून टेबल टेनिस प्रशिक्षण शिबीर
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

कळंबे स्पोर्टीग क्लबचे उद्घाटन खामला प्लॉट होल्डर को-ऑप. सोसायटीचे माजी सचिव अ‍ॅड. अरविंद कुळकर्णी यांच्या हस्ते झाले. क्लबच्यावतीने १७ एप्रिलपासून ६८ अ, पांडे ले-आऊट येथे टेबल टेनिस प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक कळंबे, डॉ. मधुकर मानापुरे, टेबलटेनिसपटू श्रीकांत देशपांडे, हिरा गोस्वामी, टेबलटेनिस प्रशिक्षक प्रकाश खेडकर, रजत श्रीवास उपस्थित होते. दोन महिन्यांच्या या शिबीरात टेबलटेनिस प्रशिक्षक राजू मोपकर, रजत श्रीवास, प्रा. डॉ. अशोक कळंबे मार्गदर्शन करतील. शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रा. डॉ. अशोक कळंबे ९८२२३६२१९५, रजत श्रीवास ९९६०२७७०८४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ६८ अ, पांडे ले आऊट, खामला रोड, नागपूर २२८८६७४ वर संपर्क साधावा, असे आवाहन क्लबचे सचिव प्रा. डॉ. अशोक कळंबे यांनी केले आहे.

मतदान साहित्याचे आज वाटप
नागपूर,१३ एप्रिल/ प्रतिनिधी

विदर्भातील १० ही लोकसभा मतदारसंघात १६ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी पूर्ण केली असून उद्या मतदानाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. १६ तारखेला मतदान असल्याने मतदान यंत्र आणि निवडणुकीसंदर्भातील इतर साहित्य मतदानकेंद्र सहायकांनी उद्या, सकाळी १० वाजता ताब्यात घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी केले आहे. मतदानाशी संबंधित साहित्य घेण्यासाठी मतदानकेंद्र सहायक आणि निवडणूक प्रतिनिधींनी सकाळी १० वाजतापर्यंत उपस्थित राहण्याचे निर्देश दराडे यांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांना याठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीन सील करून ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी हयगय करणाऱ्या मतदानकेंद्र सहायकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दोन अपघातात दोघे ठार
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

गेले दोन दिवसात शहरात दोन अपघातात दोघे ठार झाले. ट्रेलरच्या धडकेने लुनास्वार ठार झाला. अमरावती मार्गावरील शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. गणेश शंकर हातनागरे (रा. नागलवाडी) त्याच्या एमएच ३१ सी ३७८२ क्रमांकाच्या लुनाने जात असता ट्रेलरने (एचआर/३९/ए/००७८) धडक दिली. या अपघातात गणेश ठार झाला. अपघात होताच ट्रेलर चालक ट्रेलरसह पळून गेला. सायंकाळी पोलीस ठाण्यात हजर झालेल्या ट्रेलर चालक आरोपी गोपालसिंह राठोड (रा. राजस्थान) याला वाडी पोलिसांनी अटक केली. दुसरा अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बिजलीनगरात घडला. वेगात आलेल्या एका वाहनाच्या धडकने रस्त्याने पायी जाणाऱ्या भीमनाथ मन्साराम उईके (रा़ बिजलीनगर) याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भीमनाथला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी वाहन चालकाविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विद्यापीठ ग्रंथालयातर्फे आज म. फुले व डॉ. आंबेडकर जयंती
नागपूर, १३ एप्रिल/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वि.भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते ग्रंथालयातर्फे उद्या, १४ एप्रिलला सकाळी ९ वाजता क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारंभ ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. जयंती समारंभास विशेष पाहुणे कुलगुरू डॉ. पठाण उपस्थित राहणार आहेत. सेवानिवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक विशेष पाहुणे असून गोंदिया येथील उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते, अजय ढोके आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. संजय मगर यावेळी उपस्थित राहतील. शहरातील मान्यवर, बुद्धिजीवी, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय कृती समितीने केले आहे.

चेन्नई-जयपूर विशेष गाडी आजपासून
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूर मार्गे चेन्नई-जयपूर साप्ताहिक विशेष गाडी उद्या, मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे. (०६७५) विशेष गाडी प्रत्येक सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता चेन्नईहून निघेल. बल्लारपूरला प्रत्येक मंगळवारी सकाळी ७.५० वाजता आणि नागपूरला सकाळी ११.१५ वाजता येईल. आणि जयपूरला प्रत्येक बुधवारला सायंकाळी ५.५० वाजता पोहोचेल. (०६७६) विशेष गाडी प्रत्येक बुधवारी रात्री ९.१५ वाजता जयपूरहून निघेल. नागपूरला प्रत्येक गुरुवारला दुपारी ४.२० वाजता आणि बल्लारपूला सायंकाळी ७.४० वाजता येईल. चेन्नईला प्रत्येक शुक्रवारी दुपारी १२ वाजता पोहोचेल. या विशेष गाडीला १८ डबे राहतील. त्यामधील एक डब्याच्या अर्धा भागात एससी फर्स्ट क्लास आणि अर्धा भागात एससी टू टायर, एक एसी थ्री टायर, १२ द्वितीय श्रेणी शयनयान डबे, दोन अनारक्षित राहणार आहेत. तर दोन डबे एसएलआर असतील.

औषधे चोरणाऱ्या तिघांना अटक
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

िभत फोडून दुकानातील औषधे चोरणाऱ्या तीन आरोपींना इमामवाडा पोलिसांनी अटक केली. उमरेड मार्गावरील सिरसपेठेत रविवारी दुपारी ही चोरी उघडकीस आली. योगराज पंढरी चांदेवार (रा. न्यु नंदनवन) यांचे हे दुकान आहे. दुपारी ओम मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोर्स हे दुकान उघडण्यास ते आले असता शटरचे दोन्ही कुलपे तोडून त्यावर दुसरी कुलपे लावलेली दिसल्याने त्यांना आश्चर्य वाटले. दुकानाची मागील भिंत फोडल्याचे काहीवेळानंतर त्यांना दिसले. चोरटय़ांनी मागील भिंत फोडून दुकानातील काही औषधी चोरून फर्निचर, टिव्ही, फ्रिज बाजूच्या खोलीत अस्ताव्यस्त फेकले. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन तुळशीराम पांडुरंग बागडे, किरण तुळशीराम बागडे (दोन्ही रा़ सिरसपेठ) व शंकर चंद्रभान गजभिये ( रा़ पाचनल चौक, इमामवाडा) या आरोपींना अटक केली़ दारू जप्त गिट्टीखदान पोलिसांनी रविवारी रात्री भिवसेनखोरी येथे छापा मारून मोहाची दारी जप्त केली. लंका पंजाब गजभिये (रा़ भिवसनखोरी) हिला अटक करून ४ हजार १०० किलो मोहफुलाचा सडवा, ४६ लोखंडी ड्रममधील दारू (किंमत अंदाजे ९८ हजार १०० रुपये) नष्ट केली.

‘फोन करा व मतदान कुठे हे जाणून घ्या’
नागपूर, १३ एप्रिल/ प्रतिनिधी

मतदानाच्या दिवशी ‘फोन करा व मतदान कुठे हे जाणून घ्या’, अशी सोय भाजपने नागपुरातील मतदारांना उपलब्ध करून दिली आहे. अनेकदा मतदानाच्या दिवशी मतदार यादीत आपला क्रमांक व मतदान केंद्र कोणते आहे हे जाणून घेण्यात मतदारांची गैरसोय होते. असे मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी भाजपने नागपूर मतदारसंघातील मतदारांना फोनच्या माध्यमातून मतदान केंद्र व मतदार क्रमांक सांगण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ६४६४७५३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९८२३१९३४८९, ९६७३५२६९३४ या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यास संबंधितांना ही माहिती मिळू शकेल. अधिक माहितीसाठी भाजप प्रचार कार्यालयात विनायक डेहनकर यांच्याशी संपर्क साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

ट्रकसह पळणाऱ्या चोरटय़ांना पकडले
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

क्रशरचे सुटे भाग चोरून ट्रकसह पळणाऱ्या चोरटय़ांना िहगणा पोलिसांनी सोमवारी पहाटे पाठलाग करून मोहगाव येथे पकडले. मिळालेल्या गुप्त माहितवरून िहगणा पोलिसांनी मोहगाव येथे जाऊन सापळा रचला. मेटाउमरीकडून एमएच ३१ एम ५५८१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंडी यंत्रसामुग्री दिसल्याने पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. चालकाला थांबण्याचा इशारा करूनही तो थांबत नव्हता. सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून ट्रकला थांबवण्यात पोलिसांना यश आले. ट्रकमध्ये लोखंडी यंत्रसामुग्री होती. त्यासंबंधी कुठलीही कागदपत्र चालकाजवळ नव्हती. पोलिसी हिसका बसताच आरोपींनी ही यंत्रसामुग्री मेटाउमरीतील क्रशरची असून ती चोरल्याची कबुली दिली. तोपर्यंत या क्रशरचे मालक जर्नेलसिंग भगतसिंग रहेल िहगणा पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी चोरीची तक्रार केली. पोलिसांनी विनोद वसंत मडावी, गुणवंत भाऊराव मडावी (रा. डेगमाखुर्द), अंकुश भाऊराव िपपळशेंडे, राजू सूर्यभान िपपळशेंडे, रवींद्र वासुदेव राऊत (रा. आमगाव देवळी), विलास प्रदीप कानतोडे (रा. देवळीसावंगा) या आरोपींना अटक केली.