Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
‘बाई तू का रडतेस?’

 

शुभ शुक्रवारी प्रभू येशूचा दु:खद अंत झाला. त्या संध्याकाळी येशूचा मृतदेह क्रुसावरून उतरून एका कबरेत ठेवण्यात आला. शुक्रवार संध्याकाळी सहा वाजल्यापासून ज्यू लोकांचा शब्बाथ म्हणजे परमविश्रांतीचा दिवस. त्या दिवशी कुटुंबातील सारे घरातच असतात. येशूच्या दफनानंतर त्याची आई मेरी, त्याची शिष्या मेरी मग्दलेन, त्याचा शिष्य पीटर हे येशूचा लाडका शिष्य जॉन याच्याकडे मुक्कामाला गेले. येशूच्या आठवणी जागवीत त्यांनी ती रात्र व दुसरा दिवस तिथेच घालविला.
मेरी मग्दलेन हिची येशूवर परमभक्ती होती. येशूचा विरह तिला सहन झाला नाही. तिच्या जीवनाला त्याने नवी उभारी दिली होती. येशूच्या आठवणींनी ती व्याकूळ झाली. रात्रभर तिच्या डोळय़ाला डोळा लागला नाही. तृषार्त हरिणी पाण्याच्या झऱ्यासाठी आसुसलेली असते तशी तिची गत झाली होती. अजून तांबडे फुटले नव्हते. झुंजुमुंजू झाले नव्हते. दिशा धूसर होत्या. मेरी उठली. कबरेच्या दिशेने निघाली. अंत:करणात प्रेमभक्ती असली की, सगळी संकटे धुक्यासारखी विरून जातात. ती कबरेजवळ पोहोचली. ती धाय मोकलून विलाप करू लागली.. तिने कबरेत ओणवून डोकावून पाहिले. प्रभूचा पार्थिव देह तिथे नव्हता.. तिचा धीरच खचला. ती मागे फिरली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
‘बाई, तू का रडतेस? कुणाचा शोध करतेस?’’ त्या निर्जन जागी ती अनोखी हाक ऐकून ती अधिकच भांबावली.. त्याने तिला साद घातली, ‘मेरी..!’ त्या ओळखीच्या आवाजाने ती भानावर आली.. तो साक्षात प्रभू होता.
प्रभूने मेरी मग्दलेनला प्रश्न विचारला,‘‘बाई, तू का रडतेस?’ मानवतेच्या प्रारंभापासून बाई रडत आहे.. बाई अप्रगत आफ्रिकेतील असो वा अतिप्रगत अमेरिकेतील असो, बाई संस्कृतिसंपन्न भारतातील असो वा अफगाणिस्तानातील आदिम गुहेतील असो, बाई रडतच आहे. बाईच्या सुखाला आणि दु:खाला दोन व्यक्ती सर्वात जास्त कारणीभूत असतात- ज्याच्या गळय़ात माळ घातली तो मंगळसूत्राचा धनी आणि ज्याला नवमास उदरात बाळगले तो तिचा नवसाचा कुलदीपक- पुत्र! आणि वासनेच्या कर्दमात लोळणारे पुरुष नावाचे इतर किडेही!
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd3@gmail.com

कु तू ह ल
अशनीचे परिणाम
पृथ्वीवर अशनी आढळण्याचे काय परिणाम होतात?
लहान आकारांच्या अशनींचे पृथ्वीच्या वातावरणात शिरताच फुटून तुकडे होत असल्यामुळे त्यापासून होणारं नुकसान मर्यादित स्वरूपाचं असतं. पण मूळ अशनीचा आकार जर तीस-चाळीस मीटरहून मोठा असला तर मात्र असा अशनी अखेपर्यंत एकसंध राहून मोठय़ा विध्वंसाला कारणीभूत ठरतो. अशनी हे पृथ्वीवर ताशी साठ-सत्तर हजार किलोमीटर वेगाने आदळत असल्यामुळे फक्त चाळीस-पन्नास मीटर आकाराच्या अशनीमुळेसुद्धा आघाताच्या जागी सुमारे दोन किलोमीटर व्यासाचं मोठं विवर निर्माण होतं. या आघाताच्या वेळी निर्माण होणाऱ्या उच्च तापमानामुळे मूळ अशनी नष्ट होऊन त्याचा मागमूसही राहात नाही.
सुमारे पाचशे मीटर आकाराच्या अशनीमुळे निर्माण होणारं विवर हे १५ ते २० किलोमीटर व्यासाचं असतं. ज्या परिसरात असा अशनी कोसळतो तिथे मोठा भूकंप घडून येतो. आघाताच्या जागी निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे व आघातात इतरत्र फेकल्या गेलेल्या अत्यंत तप्त खडकांमुळे आघाताच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात आगी लागतात. मोठय़ा प्रमाणात धूळ उडून काळोखी पसरते. तिथल्या शेतीचा नाश होतो. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून किनाऱ्यावरील प्रदेशात पाणी शिरतं. दहा किलोमीटरहून मोठय़ा आकाराच्या अशनीच्या आघातामुळे होणारं नुकसान तर अत्यंत विनाशकारी असतं. शेकडो किलोमीटर व्यासाचं विवर निर्माण करणाऱ्या या आघातामुळे अत्यंत तीव्र भूकंप घडून येतो आणि सर्वत्र त्सुनामीसदृश परिस्थिती निर्माण होऊन समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून शंभरहून अधिक किलोमीटर आतवर घुसतं. अशा आघाताच्या वेळी लागणाऱ्या आगींची व्याप्ती ही जगभर असते. आघाताच्या वेळी उडालेल्या धुळीमुळे जगभर भरदिवसासुद्धा रात्रीसारखा मिट्ट काळोख होतो आणि कित्येक वर्षे टिकून राहणाऱ्या दीर्घ हिवाळय़ांना सुरुवात होते. अशा आघातामुळे जगभरची सगळीच जीवसृष्टी धोक्यात येते.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
अग्निशमन दिन
१४ एप्रिल हा दिवस भारतात अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. हाच दिवस निवडण्यामागे एक भीषण घटना कारणीभूत आहे ती अशी- १४ एप्रिल १९४४ साली मुंबईत व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या एका महाकाय बोटीचा स्फोट झाला आणि समुद्रात मृत्यूचे तांडवनृत्य सुरू झाले. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. जपान्यांनी ब्रह्मदेशाचा ताबा घेतल्याने त्यांना हुसकावून लावण्यासाठी या बोटीतून शस्त्र आणले होते. त्यात १३९५ टन वजनाचा दारूगोळा, स्फोटके, सुरुंग, क्षेपणास्त्रे, अग्निबाण, बॉम्ब इत्यादींचा समावेश होता. महायुद्ध असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाच या बोटीचे रहस्य माहीत नव्हते. अनेकांना ती मालवाहू बोटच वाटली आणि १४ एप्रिलची ती दुपार! दुपारच्या सुमारास काही तांत्रिक चुकीने बोटीवर स्फोटाचा भडका उडाला. काही मिनिटांत ७८४ टन स्फोटके फुटली. त्याचा दणका ३००० फूट उंचीवर आकाशात पोहोचला. सारी मुंबई एका क्षणात हादरली. जपानचे आक्रमण झाले, अशी अफवा शहरात पसरली. स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, मुंबईपासून हजारो मैल असणाऱ्या सिमल्याची भूमीदेखील हादरली. ही महाकाय आग विझविण्यासाठी अग्निशामक दलातील जवानांनी अक्षरश: जिवावर उदार होऊन मुंबई शहर वाचवले. या भीषण स्फोटात दलातील ६५ मृत्युमुखी, तर ८० जखमी झाले. याशिवाय जहाजावरील शेकडो कर्मचारी, पोलीस, लष्करातील जवानही कामी आले. या दिवसाची स्मृती जपावी, यासाठीच १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिन’ म्हणून पाळण्यात येतो, तर १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. या कालावधीत अग्निशमन रक्षेबद्दल लोकजागृती करण्यात येते.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
खरा गुरू कोण?
आश्रमात अनेक शिष्य होते. ते आश्रमातील कामे करायचे, गुरुपत्नीला मदत करायचे, गुरू त्यांना विद्यादान करायचे. एके दिवशी एक शिष्य चोरी करत असताना इतर विद्यार्थ्यांनी पाहिले. सगळे अस्वस्थ झाले. आश्रमाच्या पवित्र ठिकाणी हा चोरीसारखे वाईट कृत्य करतो म्हणजे काय? किती चुकीचे वागणे आहे. सगळे चोरटय़ाला घेऊन तावातावाने त्याच्या गुरूंकडे गेले. ‘गुरुजी, हा चोर आहे. आम्ही याला चोरी करताना पाहिले. याला शिक्षा करून आश्रमातून घालवून द्या’, सगळय़ांनी मागणी केली. गुरुजींनी त्यांचे बोलणे फक्त ऐकून घेतले. शांतपणे शिकवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी पुन्हा तोच मुलगा चोरी करत असताना एकाने पाहिले. त्याने इतर विद्यार्थ्यांना बोलावले. एका दांडगट विद्यार्थ्यांने त्याचे मानगूट पकडले. दुसऱ्या धिप्पाड मुलाने मनगट पकडले आणि ओढत गुरूंसमोर नेऊन उभे केले. ‘गुरुजी, याने पुन्हा चोरीचा गुन्हा केलाय. हा आश्रमात नको.’ गुरुजींनी पुन्हा आपल्या शिष्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. मग मात्र सारे विद्यार्थी फारच रागावले. त्यांनी आपल्या गुरूंना एक पत्र दिले, ‘चोराला आश्रमातून लगेच हाकलण्यात यावे, नाहीतर आम्ही सगळेजण आपला आश्रम सोडून जाऊ.’ पत्र वाचून गुरूंनी आपल्या शिष्यांना बोलावून घेतले. समोर बसवले. घनगंभीर स्वरात ते म्हणाले,‘‘बाळांनो, तुम्ही शहाणे आहात. चूक काय बरोबर काय हे तुम्हाला कळते आहे. चुकीला शासन व्हावे असे तुम्हाला वाटते हे तुमच्या शहाणपणाचे लक्षण आहे. तुमची इच्छा असेल तर दुसऱ्या आश्रमात विद्याभ्यासासाठी जरूर जा. मला त्यात आनंद आहे. चोरी करणारा हा तुमचा जो गुरूबंधू आहे तो खरोखरच अज्ञानी आहे. त्याच्यात शहाणपणा आलेला नाही. आपण वागतो ते चूक का बरोबर हे त्याला समजू शकत नाही आणि ते शिक्षण जर मी त्याला आश्रमात देऊ शकलो नाही तर कोण शिकवणार? तुम्ही सारे मला सोडून गेलात तरी मी त्याला इथेच राहू देईन. त्याला गुरूची जास्त गरज आहे.’’ चोरी केलेल्या शिष्याच्या डोळय़ांतून पश्चात्तापाचे अश्रू खळकन ओघळले. चोरी करण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय यातला फरक ओळखायला आपल्याला शिक्षणामुळे येते. शिक्षण मन सुसंस्कृत आणि निर्भय करते. स्वत: विचार करण्याचे, आपले भविष्य घडवण्याचे सामथ्र्य देते. असे शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना जो देतो तो खऱ्या अर्थाने शिक्षक असतो. (. . . झेन कथेवरून).
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com