Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी पवारांना पाठिंबा द्यावा
उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन

बेलापूर/वार्ताहर -
‘उद्धव ठाकरे यांना आपण कळकळीची विनंती करतो की, अजूनही तुम्ही तुमची चूक मान्य करत असाल आणि ज्यांनी महाराष्ट्राला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देत असाल, तर आम्ही तुमच्या सर्व चुका माफ करू’, असे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी येथे केले. कोपरखैरणे येथे आयोजित प्रचारसभेत भोसले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे आम्ही वारसदार असतानाही आम्ही कधी त्यांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करत नाही, मात्र शिवसेना छत्रपतींच्या नावाचे भांडवल करून स्वत:च अस्तित्व टिकवून आहे. छत्रपतींचे नाव घेणाऱ्यांनी कधी त्यांचे विचार आचरणात आणले आहेत का? असा सवाल उदयनराजे यांनी शिवसेनेस केला. शिवसेनेच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण केली जात असून, त्यामुळे देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. अशा प्रवृत्तींना दूर ठेवले तरच भारत महासत्तेकडे वाटचाल करू शकेल, अन्यथा आपला विनाश अटळ असल्याचेही भोसले म्हणाले.

उपेक्षितांची आश्रयस्थाने म्हणजे समाजाची आधुनिक तीर्थस्थळे - भैय्याजी जोशी
प्रतिनिधी -
समाज ज्या प्रश्नांकडे कधी ढुंकुनही पाहत नाही, ते संवेदनशीलतेने समजून घेऊन पुरूषार्थाने ते काम समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे आणि ते काम चार ते पाच दिडक्यांच्या बळावर यशस्वी करून दाखविणे, हे अवघड काम श्री रामकृष्ण सेवा आश्रमाचे संस्थापक स्व. सदाशिव कात्रे तथा कात्रे गुरूजी यांनी केले. अशा आदर्श निर्माण करणाऱ्या संस्था समाजाची तीर्थस्थळे झाली पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी अलिकडेच येथे केले. छत्तीसगड चांपा येथील भारतीय कुष्ठ निवारस संघाच्या श्री रामकृष्ण सेवा आश्रमाचे संस्थापक सदाशिव गोविंद कात्रे तथा कात्रे गुरूजी यांच्यावरील हिंदी भाषेत असलेल्या जीवनचरित्राचा मराठी अनुवादीत ‘परमानन्द माधवम्’ हा ग्रंथ मंगळवारी येथे प्रकाशित करण्यात आला.

‘जोडे खाणाऱ्यांना मते कोण देणार?’
पनवेल/प्रतिनिधी -
मतदारांमध्ये काँग्रेसविरोधात कमालीचा असंतोष असल्याने त्यांच्या गृहमंत्र्यांना, तसेच उमेदवारांना मतदार मते कशी देतील, असा प्रश्न शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी रविवारी खांदा कॉलनी येथे उपस्थित केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाबर हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. मावळमध्ये टाटा कंपनीला पाणीपुरवठा करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि शेतकऱ्यांना अखेर पाणी मिळाले. त्यानंतर त्यांना ‘पाणीवाले बाबर’ असे संबोधले जाऊ लागले. अशा कर्तव्यदक्ष उमेदवारालाच मत द्या, असे आवाहन पाटील यांनी केले. काँग्रेसवाले आता गांधींना विसरले असून, गांधींचा उपयोग केवळ निवडणुकीत नोटा वापरताना होतो, अशी टीका बाबर यांनी केली. काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. एका काँग्रेसच्या अनेक काँग्रेस झाल्या. शिवसेना आणि शेकापचे मात्र तसे नाही. आमच्या पक्षाचे नेते, चिन्ह एकच आहे, असे ते म्हणाले. मात्र असा उल्लेख करताना बाबर यांना युतीतील मित्रपक्ष भाजपचे विस्मरण झाल्याने उपस्थित भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली. त्यापूर्वी भाषणासाठी उभे राहिलेले भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मतदारांना ‘कमळापुढचे बटन दाबा’ असे आवाहन अनवधानाने केल्याने श्रोते आश्चर्यचकित झाले. काही श्रोते आणि व्यासपीठावरील नेते ‘धनुष्यबाण’ असे ओरडल्यानंतर पाटील यांनी ‘युती आहे’ असे म्हणून भाषणाचा ओघ कायम ठेवला. आज महागाईने कळस गाठला आहे, परंतु शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर साडेचार वर्षे स्थिर ठेवण्यात आले होते, याची आठवण शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे यांनी सरकारी करांचे १७ लाख रुपये थकविल्याचा आरोपही त्यांनी केला.

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी संवाद
प्रतिनिधी -
‘सुदृढ मन सर्वासाठी’ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून औद्योगिक क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांपासून ते गडचिरोली जिलातील आदिवासींपर्यंत आणि स्क्रेझोफ्रेनियासारख्या आजाराच्या रुग्णांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम येत्या २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परळ येथील दामोदर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘बाराखडी दिल से’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘अंतरंगात डोकावताना’ या विषयावर संपदा जोगळेकर-कुलकर्णी डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत डॉ. नाडकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बकुळफुलं’ या पुस्तकाचे व ‘काचापाणी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अधिक माहिती व प्रवेशिकांसाठी अतुल (९८१९०००२५१), उल्हास (९८२१०३३७३६) किंवा सुवर्णा (९८९२०२०६३२) यांच्याशी संपर्क साधावा.