Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

भाजपसाठी ‘घबाड योग’ जुळून येण्याची चिन्हे
अभिजीत कुलकर्णी

नाशिक आणि जळगाव या दोन मोठय़ा शहरांचा अपवाद वगळता बहुसंख्य भाग निमशहरी, ग्रामीण वा आदिवासी स्वरुपाचा असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे सहा पैकी तब्बल पाच जागा भाजप लढवत आहे. याचा अर्थ या भागात भाजपचे मजबूत संघटन आहे वा सुरुवातीपासून पायाभरणी आहे असा नाही, तर त्यांच्या मित्रपक्षाला येथील लोकसभेच्या जागांमध्ये फारसे स्वारस्य नसल्याने इतर ठिकाणच्या जागांची तडजोड म्हणून भाजपच्या वाटय़ाला यातील काही जागा आल्या आहेत. तथापि, तिकीटवाटप व बहुरंगी लढतींच्या पाश्र्वभूमीवर बदललेल्या समीकरणांमुळे निकालानंतर कदाचित ‘पदरी पडले अन् पवित्र झाले’ या म्हणीचा प्रत्यय भाजपच्या मंडळींना यावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

‘सजगता महत्त्वाची’
निवडणुकीचे पडघम वाजू लागले की इच्छुक उमेदवार तसेच झोपलेल्या मतदारांना जाग येते. खासदारांच्या सोयी-सुविधा, पगार याची चर्चा होते पण त्यांचे अधिकार काय आहेत, व कायद्याने किंवा रुढीने त्यांचे काम काय याबद्दल सर्वसामान्य जनतेला फार थोडी माहिती असते. दुर्दैवाने फक्त निवडणूक आली की या गोष्टींचा ऊहापोह होतो. खासदार पद हे आपल्या सर्वाच्या कल्पनेपेक्षा खूप मोठे आहे. त्याला अनेक अधिकार आहेत, आणि खरोखरच तो एकटा सुद्धा राज्यसरकार किंवा केंद्र सरकार हलवू शकतो. मिनू मसानी, मधु लिमये, फिरोज गांधी, नानासाहेब गोरे, अमृतराव डांगे ही याची ठळक उदाहरणे. पण, सद्यस्थितीत निवडणुकीत पैशाला अती महत्व आल्याने लायक माणसे त्यापासून दूर राहत असल्याचे पहावयास मिळते.

टीव्हीला चला,
तुम्ही टीव्हीला चला!

भाऊसाहेब : कुटं निगालास येवडा नट्टापट्टा करून भावडय़ा?
भावडय़ा : टीव्हीवर चमकायचं म्हणजे जरा फ्रेश दिसायला पाहिजे ना..
भाऊसाहेब : तुला कोन बोलवाया लागलयं तितं?
भावडय़ा : खास निरोप आलाय आपल्याला, ‘टॉक शो’ साठी या म्हणून. तुम्हाला किंमत नाय, पण लोकांना माहितीये आपला भाव..
भाऊराव : कसली किंमत अन् कसला भाव ? टीव्ही चॅनल झाले सतरा आणि कार्यक्रम झाले सतराशे साठ.. त्यांना काय वेळ भरून काढायचा असतो, मग कुणीही चालतं.
भावडय़ा : तुम्हाला कुणी बोलवत नाही, म्हणून टीव्हीवाल्यांवर कशाला घसरता ?

बुडित पतसंस्थांमधील कर्मचारी वाऱ्यावरच
प्रश्न जिव्हाळ्याचे
वार्ताहर / जळगाव
जिल्ह्य़ातील नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्याने ठेवीदारांना आपले पैसे मिळविण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच दुसरीकडे या शेकडो पतसंस्थांमध्ये कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संस्था बंद पडल्याने व्यवहार नाहीत. ठेवीदारांची देणी देवू शकत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन नाही, वेतनच मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सहकार चळवळ जिवंत ठेवून कर्मचाऱ्यांचेही पुनर्वसन झाले पाहिजे, याकरिता जागरूक लोकप्रतिनिधीने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘मी शिवाजीराजे बोलतोय’च्या बनावट सीडी तयार करणाऱ्यांना अटक
वार्ताहर / धुळे

शहरातील साक्री रस्त्यावरील सिंचन भवनच्या पाठीमागे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी विविध चित्रपटांच्या बनावट सीडीज् तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला असून दोघांना अटक केली आहे. सध्या गाजत असलेल्या ‘मी शिवाजीराजे बोलतोय’ व ‘एक डाव धोबीपछाड’ या चित्रपटांच्या बनावट सीडी तयार करताना या दोघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या दोघांकडून अत्याधुनीक यंत्रसामग्री आणि बनावट सीडीज्चा लाखो रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. टर्मिनेट पायरसी कंपनीच्या पुणे येथील अधिकाऱ्यांच्या एका खास पथकाने गेल्या पंधरवडय़ापासून या कारखान्याचा शोध घेण्यासाठी काही जणांवर जबाबदारी सोपविली होती.

रावेरमध्ये पवारांच्या सभेनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
जळगाव / वार्ताहर
राष्ट्रवादीमधील धुसफूस, काँग्रेसची नाराजी या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेस चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना एकिकडे हायसे वाटत असले तरी भुसावळचे आ. संतोष चौधरी हे प्रचारात अद्यापही सहभागी नसल्याने त्यांच्यापुढील डोकेदुखी कायम आहे.

‘मंदीचे संकट टाळण्यासाठी धाडसी निर्णयांची गरज’
जळगाव / वार्ताहर

भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली असली तरी या वाढीसोबत मंदीनेही भारतात प्रवेश केला आहे, त्यामुळे देशाला जागतीक मंदीचा फटका बसू लागला असून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मंदीचे हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. तेव्हाच भारत मंदीच्या संकटातून सावरू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले. ‘जागतिक मंदी आणि सर्वसामान्य माणूस’ या विषयावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पाटील यांचे व्याख्यान झाले. कुलसचिव डॉ. एम. व्ही. बरीदे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. बेरोजगारीशीच मंदीचा अर्थ निगडित असून अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण साडेआठ टक्क्यांवर तर मंदीपूर्वी भारतात हे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त होते. आता यामध्ये भर पडली आहे. ज्या काळात वस्तु व सेवांच्या किंमती घसरतात, तेव्हा मंदी येते. अमेरिकेत कुवत व पात्रता न बघता कर्ज दिले गेल्याने मंदीचे भूत मानगुटीवर बसले. उत्पादकतेत काम करणारे घटक जेव्हा काम कमी करतात तेव्हा मंदी येते, असेही त्यांनी सांगितले. मंदीच्या काळात लोकांना काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. या कामातून सामाजिक मालमत्ता निर्माण करावी लागेल. केंद्र सरकारला काही धोरणात्मक धाडसी, निर्णय घ्यावे लागतील. आजच्या काळात गुंतवणुकीवर भर दिला जात नसल्यामुळे पैसा येतो तसा खर्चही होऊन जातो. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्यावर गुंतवणूक केली पाहिजे, असे बरीदे यांनी सांगितले.